घरफिचर्ससावध ऐका पुढल्या हाका!

सावध ऐका पुढल्या हाका!

Subscribe

एक देश, एक झेंडा, एक मातृभूमी आणि एक सरकार ही घोषणा देऊन एर्दोगान यांनी तुर्कस्थानची निवडणूक जिंकली आहे. महापौर, पंतप्रधान आणि पुढे राष्ट्रपती हा प्रवास करत असताना कट्टर इस्लामीकरणाचा वापर करुन तुर्कस्थानच्या राजकारणात त्यांनी देवत्व प्राप्त केलं आणि आपल्या राजकीय भक्तांची एक नवी फळी निर्माण केली. यात जे जे आडवे आले त्या लोकांना त्यांनी संपवले. पुढे त्यांना मदत करणाऱ्यांनाही संपवले. एर्दोगान यांच्या फॉर्म्युल्याचे आकर्षण वाटणारा भारतातही मोठा वर्ग आहे. पण त्यांनी पुढल्या हाका सावधपणे ऐकण्याची गरज आहे.

सध्या अनेक देश आपापल्या पध्दतीने मूळ लोकशाहीच्या सिध्दांताला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात आता लोकशाहीच्या नव्या तुर्की सिध्दांताने भर घातली आहे. अशीच काही पावले भारतानेदेखील मागच्या काही वर्षात उचलायला सुरुवात केली आहे. तसे पाहता भारताची संस्कृती अतिप्राचीन असून जगात अस्तित्वात असलेल्या जवळपास सर्वच धर्मांना या संस्कृतीने आश्रय दिला आहे.

- Advertisement -

अशा या बहुरंगी असलेल्या देशाला गुण्यागोविंदाने राहता यावे म्हणून संविधानकर्त्यांनी पराकाष्टेचे प्रयत्न केले आहेत. परंतु या संविधानाला नेहमीच दोष देऊन ते संपुष्टात आणण्याचे प्रयत्नही अनेक वेळा झाले. ते सार्वभौम असलेल्या भारतीयांनी वेळोवेळी हाणूनही पाडले आहेत. याचे कारण म्हणजे जनतेची संविधानाप्रती असलेली श्रध्दा असेच म्हणावे लागेल. परंतु या संविधानाला दोष देणारा एक वर्ग आजही अस्तित्वात आहे. तो तुर्कस्तानच्या वाटेवर निघाला आहे की काय? असे वाटायला लागले आहे.

एप्रिल २०१७ मध्ये ज्याप्रमाणे तुर्कस्तानचे संविधान बदलले गेले आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एक देश, एक भाषा, एक धर्म आणि एक सरकारची घोषणा देऊन रेसेप तयियप एर्दोगान यांनी निवडणूक जिंकली. तसाच प्रयत्न भारतातही काही वर्षांपासून सुरू आहे. एक वंश, एक धर्म, एक भाषा आणि एक राष्ट्र या संकल्पनेवर आधारीत राष्ट्राची उभारणी करण्याचा प्रयत्न एक विचारप्रवाह करताना दिसतो आहे.

- Advertisement -

मूळातच याची प्रेरणा आपल्या धर्माबद्दल असलेली आपर श्रध्दा आणि धार्मिक राजकारण करणाऱ्या आपल्या नेत्याप्रती असलेल्या भक्तीत दडलेली आहे, असे म्हणावयास काहीच हरकत नाही. परंतु या भक्तीपोटी आपण आपली स्वातंत्र्याची सुमने एखाद्या व्यक्तीच्या चरणी अर्पण केली तर भविष्यात लोकशाहीला मोठा धोका निर्माण होईल. भक्ती आणि व्यक्ती महात्म्य पूजा जेव्हा राजकारणात येतात तेव्हा निश्चितच एखाद्या हुकूमशहाचा जन्म होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकत्याच तुर्कस्थानात पार पडलेल्या निवडणुकीकडे आपल्याला पाहता येते.

एक देश, एक झेंडा, एक मातृभूमी आणि एक सरकार ही घोषणा देऊन एर्दोगान यांनी तुर्कस्थानची निवडणूक जिंकली आहे. महापौर, पंतप्रधान आणि पुढे राष्ट्रपती हा प्रवास करत असताना कट्टर इस्लामीकरणाचा वापर करुन तुर्कस्थानच्या राजकारणात त्यांनी देवत्व प्राप्त केलं आणि आपल्या राजकीय भक्तांची एक नवी फळी निर्माण केली. यात जे जे आडवे आले त्या लोकांना तर त्यांनी संपवलेच शिवाय या कामात ज्यांनी त्यांना मदत केली, अशा संसदेतील आणि संसदेबाहेरील आपल्या सर्वच विरोधकांनादेखील संपविले.

भारतात ज्याप्रमाणे आज पुरोगामी आणि प्रतिगामी असा संघर्ष सुरु आहे, तसाच संघर्ष केमाल पाशाच्यानंतर तुर्कस्थानातदेखील सुरु झाला. याचे स्पष्ट चित्र नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पहावयास मिळाले. धर्मनिपरेक्ष विरुध्द प्रतिगामी हा संघर्ष त्यांनी जाणीवपूर्वक जिवंत ठेवला. जगभरातील मुस्लिमांचे आपण नेते आहोत असा आव त्यांनी आणायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून जगभरातील ५७ मुस्लीम राष्ट्रांचे मिळून आपण नवे सैन्य उभे करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

२०१६ पासून देशात लष्करी बंड सुरु असल्याचा फायदा घेऊन प्रसारमाध्यमांवर प्रचंड निर्बंध लादले आणि सामान्यांचा आवाजच बंद केला. एकूणच संसदीय लोेकशाहीमध्ये निर्णय घेणे अवघड जाते म्हणून आपल्या देशाचा विकास झाला नाही असे चित्र जनतेसमोर जाणीवूर्पक उभे केले गेले. पंतप्रधानपद रद्द करुन अध्यक्षीय लोकशाहीचे नवे संविधान लोकांसमार ठेवले. देशात सुरु असलेल्या आणीबाणीचा फायदा घेत नव्या संविधानानुसार १९ महिने मुदतपूर्व निवडणुका घेऊन ते तुर्कस्तानचे अध्यक्षही झाले.

अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला न घाबरणारा नेता आपल्याला मिळाला आहे, अशी भावना तेथील जनतेमध्ये निर्माण झाली आणि यातूनच व्यक्तीपूजा करणाऱ्या भक्तांत प्रचंड वाढ झाली आणि याच इस्लामिक भक्तांनी त्यांना पुन्हा एकदा तुर्कस्तानचा अध्यक्ष म्हणून निवडून दिले. ही निवड जरी लोकशाही पध्दतीने झाल्याचे आपल्याला दिसत असले तरी नुकत्याच लागू झालेल्या संविधानानुसार पंतप्रधान हे पद रद्द करण्यात आले आहे. सर्व अधिकार आता अध्यक्षाच्या हाती आले आहेत. वरकरणी हा बदल मतपेटीतून झालेला दिसत असला तरी याच्या पाठीमागे द्वेषाचे राजकारण असल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच पुरोगामी, धर्मनिरपेक्ष असलेल्या अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता तुर्कस्थानात नव्याने निर्माण झाला आहे.

बहुसंख्याकांना हे चित्र सुखकारक जरी वाटत असले तरी याचा फटका त्यांच्या स्वातंत्र्याला काही काळानंतर बसणार आहे हे मात्र निश्चित. सुरुवातीला हे चित्र धर्मांध लोकांना चांगले जरी वाटत असले तरी ज्या दिवशी हुकूमशाहीतले निर्बंध आपल्या घरापर्यंत पोहचतात त्याच दिवशी आपल्याला आपली चूक समजत असते. तोपर्यंत एर्दोगानसारखे लोक आपल्याला आपल्या धर्माचे हिरोच वाटत असतात.

तुर्तास तरी एर्दोगान हे आपला कारभार किती लोकशाही मार्गाने आणि जनतेच्या पाठिंब्याने सुरु आहे असेच दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. परंतु एक गोष्ट भारतासह जगभरातील लोकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे की, जी व्यक्ती धार्मिक असते ती व्यक्ती कधीच राष्ट्रवादी नसते हे लवकर समजून घ्यावे, अन्यथा कोणत्या देशात हा लोकशाहीचा तुर्की सिध्दांत लागू होईल हे सांगता येत नाही.


डॉ. ह. नि. सोनकांबळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -