घरफिचर्सभारत आक्रमक कधी होणार !

भारत आक्रमक कधी होणार !

Subscribe

युद्ध नको, बुद्ध हवा, अशीच भूमिका भारतीय राज्यकर्त्यांंनी वेळोवेळी घेतलेली आहे, पण भारताचा जेव्हा आक्रमक जहालवादाशी सामना झाला तेव्हा भारताच्या शांंततावादाच्या ठिकर्‍या उडालेल्या दिसल्या. पाकिस्तान हा भारताच्या मुठी येवढा आहे. तरी गेली सत्तर वर्षे भारताला त्याने सतावून सोडले आहे. त्याला आता चीनची आक्रमक साथ मिळत आहे. भारत आपल्या सैन्याला अधिक मजबूत करण्यासाठी इस्त्रायलकडून आधुनिक शस्त्रास्त्रे विकत घेत आहे, पण केवळ येवढ्यावर भागणार नाही. इस्त्रायलची स्वसंरक्षणाची आक्रमक नीती आणि वृत्ती भारतीय राज्यकर्त्यांना स्वत:मध्ये बाणवावी लागेल. कारण आधुनिक शस्त्रास्त्रांसोबत आक्रमक धोरण नसेल तर शस्त्रास्त्रे केवळ प्रदर्शनीय वस्तू ठरतात. भारताचे घोडे इथेच अडते आहे.

भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात वैज्ञानिक आणि भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी इतिहासाच्या अभ्यासकांच्या एक बैठकीत एक प्रश्न उपस्थित केला होता की, मागील अडीच हजार वर्षांचा इतिहास पाहिला तर भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या देशाच्या सीमांचा विस्तार करण्याचा का प्रयत्न केला नाही? आपल्या प्रदेशाच्या सीमा विस्तारित कराव्यात, असे त्यांना का वाटले नाही ? त्यांनी तशी महत्त्वाकांक्षा का बाळगली नाही ? या प्रश्नावर इतिहासकारांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. आपण भारताचा इतिहास पाहिला तर आपल्याला या देशावर बाहेरील अनेक आक्रमकांनी वेळोवेळी आक्रमणे केलेेली दिसतील. मुघलांसारखे आक्रमक तर या देशात येऊन केवळ राज्यकर्तेच झाले नाहीत तर येथे येऊन ते कायमचे वसले. अनेक मुस्लीम आक्रमक या देशात लूट करून पुन्हा आपल्या देशात गेले. मागील तीन चारशे वर्षांचा विचार केला तर भारताच्या भूमीवर आक्रमण करून त्यावर ब्रिटिश, फ्रेंच, डच आणि पोर्तुगीज यांनी आपल्या वसाहती निर्माण केल्या. पण या चारही आक्रमकांना भारतीयांनी सुरू केलेल्या स्वातंत्र्य लढ्यामुळे हा देश सोडून जावे लागले.

या सगळ्या आक्रमकांना या देशांवर आक्रमणे करून या भूमीवर दीर्घकाळ का राहता आले, याचा विचार केला तर एकच दिसेल की, भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या जरी जोडला गेला असला तरी येथील विविध भागांमध्ये राज्य करणार्‍या राजकर्त्यांमध्ये एकीच्या भावनेचा अभाव होता. जेव्हा ग्रीसहून आलेल्या सिंकदराने पुरुशी युद्ध पुकारले, तेव्हा त्याच्या बाजूला असलेल्या अंभी या राजाला त्याच्याशी काही देणे घेणे नव्हते. पुरू आणि अंभी हे भारतीय राजे होते, ते संस्कृतीने एकमेकांशी जोडलेले होते, पण पुरु हा आपला प्रतिस्पर्धी असून तो जर परस्पर मारला जात असेल तर बरे, असा अंभीने विचार केला. पण त्यासाठी आपण एका परकीय आक्रमकाला सहाय्य करतोय, हे त्याच्या लक्षात आले नाही. आजही आपल्या असे लक्षात येईल की, एकेकाळी विस्तारित भारत वर्षाचा भाग असलेले आणि भारताशी सांस्कृतिक साम्य असलेेले पाकिस्तान, बांगला देश, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, भूतान असे देश आज भारताच्या विरोधात भूमिका घेत आहेत. खरे तर हे सगळे एकेकाळच्या अखंड भारताचे भाग आहेत. आज हे भारताभोवती निर्माण झालेले छोटे छोटे देश भारताला सोडून चीनसारख्या सांस्कृतिक साम्य नसलेल्या देशाशी सलगी करण्यात धन्यता मानत आहेत.

- Advertisement -

जहाल आणि मवाळ असे दोन मतप्रवाह मानवी समाजात असतात, पण आपल्याला नेहमीच जहालावाद्यांचा वरचष्मा असलेला दिसून येईल. कारण त्यांच्या आक्रमकतेपुढे मवाळांचा टिकाव लागत नाही. ब्रिटिशांविरोधातील लढ्याचा विचार केला तर असे दिसून येईल की, त्यावेळी भारतीय समाजात त्यांच्या विरोधात लढणारे दोन प्रवाह होते. एक जहालवादी आणि दुसरे मवाळवादी, पण ब्रिटिशांची आक्रमकता मोठी असल्यामुळे त्यांना जास्त हानीकारक ठरणार्‍या जहालवाद्यांचा ब्रिटिशांनी अगोदर निकाल लावला. त्यांना कठोर शिक्षा देऊन तसेच फासावर चढवून त्यांचा प्रभाव कमी करून टाकला. मवाळवादी ब्रिटिशांविरोधात आंदोलन करत असले तरी ते ब्रिटिशांना हानीकारक ठरत नव्हते. त्यांच्या आंदोलनांमुळे ब्रिटिशांच्या साम्राज्याला धोका संभवत नव्हता.

पण भारतात ब्रिटिशांविरोधात सुरू असलेली आंदोलने आणि दुसर्‍या महायुद्धांनंतर ब्रिटिशांचे झालेले अतोनात नुकसान यामुळे त्यांना आपल्या वसाहतींना स्वातंत्र्य देणे भाग पडले. भारत तर ब्रिटिशांची सर्वात मोठी वसाहत होती, ती त्यांना सहजासहजी मुक्त करायची नव्हती. कारण ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणाले होते की, भारताला स्वातंत्र्य द्यायला मी ब्रिटनचा पंतप्रधान झालेलो नाही. ब्रिटिशांच्या अखत्यारित असलेल्या वसाहतींना स्वांतत्र्य मिळण्यात दुसर्‍या महायुद्धापूर्वी अमेरिकेने ब्रिटनशी केलेला अटलांटिक करार महत्वाचा ठरतो. त्यात अमेरिकेने दुसर्‍या महायुद्धात हिटलरचा पराभव झाल्यानंतर तुमच्या ताब्यातील वसाहतींना तुम्ही स्वांतत्र्य देणार असाल तरच आम्ही तुमच्या बाजूने दुसर्‍या महायुद्धात उतरू, असे ब्रिटिशांकडून कबूल करून घेतले होेते. खरे तर ब्रिटिशांचे साम्राज्य खालसा करण्याचाच हा करार अमेरिकेने ब्रिटिशांसोबत केला होता. पण ती अट मान्य करण्याशिवाय ब्रिटिशांना पर्याय नव्हता.

- Advertisement -

पुढे ब्रिटिशांनी भारत सोडला. भारतीयांच्या हाती सत्ता आली, पण त्याअगोदर भारताची फाळणी झाली. या फाळणीमध्ये जे जहालवादी होते, त्यांचाच विजय झाला. पाकिस्तानची मागणी करणारे महमदअली जिना हे जहालवादी होते. महात्मा गांधीजींनी त्यांना खूप समजावून देशाच्या विभाजनाच्या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. अगदी या देशाचे तुकडे होण्यापूर्वी माझ्या देहाचे तुकडे होतील, असा निर्वाणीचा इशारा दिला, पण जिनांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ते वेगळ्या पाकिस्तानच्या आपल्या हट्टावर कायम राहिले. बर्‍या बोलाने भारतीय नेते ऐकत नाहीत, हे कळल्यावर त्यांनी देशभरातील मुस्लिमांना चिथावणी देऊन हिंदूंसाठी हिंदुस्थान, मुस्लिमांसाठी पाकिस्तान हा द्विराष्ट्रीय सिद्धांत मांडून सगळ्या देशात दंगली घडवल्या. शेवटी भारतीय नेते कंटाळले. त्यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी नाइलाजास्तव मान्य केली. जिनांच्या जहालवादापुढे मवाळवादी काँग्रेस नेत्यांचे काहीच चालले नाही. जिनांनी ज्या दंगली आणि रक्तपात घडवून आणला त्यापुढे त्यांना नमते घ्यावे लागले. स्वतंत्र पाकिस्तानची मागणी त्यांना मान्य करावी लागली. यात जहालवाद्यांचा विजय झाला.

पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर ते एका बाजूला गुण्यागोविंदाने राहतील, असे वाटत होते, पण तसे झाले नाही. त्यांचा आक्रमकपणा कायम राहिला. भारताला त्याचा वेळोवेळी अनुभव येत आहे. भारताच्या मुठी एवढा असलेल्या पाकिस्तानने गेल्या सत्तर वर्षात भारताला सतावून सोडलेले आहे. सगळ्या दृष्टीने भारत पाकिस्तानपेक्षा मोठा आहे, तरीही पाकिस्तानला भारताची म्हणावी तशी जरब वाटत नाही, त्यामुळेच त्यांच्या सतत कुरापती चालू आहेत. १९४७ ला पाकिस्तानने काश्मिरात घुसखोरी केली, त्यानंतर १९६५, १९७१ आणि कारगील येथील लढाई अशी चार वेळा पाकिस्तानने मोठी आक्रमणे केली. सीमापार दहशतवाद आणि हल्ले हे तर पाकिस्तानकडून नेहमीच सुरू असतात. चीन हा तर भारताचा मोठा प्रतिस्पर्धी राहिलेला आहे. त्यांना भारताला जागतिक स्पर्धेपासून रोखायचे आहे. त्याचसोबत भारताची भूमी जसे शक्य होईल, तशी गिंळकृत करायची आहे. चीन आणि पाकिस्तान यांचा आक्रमक जहालवाद भारताला नेहमीच भारी पडलेला आहे.

मानवी जीवन हे एक अखंड चालेले युद्ध आहे. कधी ते घोषित असते तर कधी अघोषित असते. युद्धात नेहमीच जहालवादी आक्रमकतेचाच विजय होतो, हा इतिहास आहे. मवाळवादी लोक चिरडले जातात. जहालवादी पाकिस्तान आता जहालवादी चीनसोबत हातमिळवणी करून भारताशी लढा देत आहे, त्यामुळे या दोन्ही जहालवादी देशांचा सामना करण्यासाठी भारताला आक्रमक आणि जहालवादी धोरणाचा अवलंब करावा लागेल. अन्यथा त्यांच्यासमोर भारताचा टिकाव लागणे कठीण आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्याविरोधात आपल्या सैन्याला अधिक सक्षम करण्यासाठी भारतीय राज्यकर्ते इस्त्रायलकडून आधुनिक शस्त्रास्त्रे विकत घेत असतात, पण इस्त्रायलची आक्रमकता त्यांना घेता आलेली नाही. ती भारतीय राज्यकर्त्यांना आपल्यात जोपासावी लागेल, अन्यथा नुसत्या शस्त्रास्त्रांचा काही उपयोग होणार नाही. ईस्त्रायलच्या चोहोबाजूंनी त्यांची प्रतिस्पर्धी राष्ट्रे आहेत, पण त्या सगळ्यांना तो पुरुन दशांगुळे उरला आहे. कारण लोहा लोहे को काटता हैं, अशी म्हण आहे, ती भारतीय राज्यकर्त्यांनी अंमलात आणण्याची गरज आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -