लडाखमधील अटळ युद्धसज्जता

संपादकीय
Advertisement

लडाखमध्ये परिस्थिती गंभीर आहे. चीन सैन्याकडून वारंवार घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. मात्र, यावेळी भारतीय लष्करही सतर्क असून काही दिवसांपूर्वी चीनने पँगॉग भागात केलेल्या घुसखोरीला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लडाखमध्ये परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे.

चीन आपल्यापेक्षा बलाढ्य आहे, त्याचे सैन्य आणि त्याच्याकडील पैसा, उद्योग व्यवसाय याच्या भारत पासरीलाही पुरणार नाही. असा चीन वारंवार लडाखमध्ये खुशाल सीमा ओलांडून आत येतो. अक्साई चीन – पाकव्याप्त काश्मीर या भारताच्या प्रदेशातून रस्ते, रेल्वे बांधतो. सीमाप्रश्न उकरून काढतो. भारत-पाक विवादामध्ये पाकच्या बाजूने उभा राहतो. आपल्याकडील पोतीभर माल दिडक्या किमतीला बाजारपेठेत टाकून भारतीय मालाशी स्पर्धा करतो जेणेकरून इथले व्यावसायिक बरबाद होतील आणि कारखाने कायमचे बंद होतील अशा तर्‍हेने डावपेच आखतो, असे साधारण चित्र आपल्यासमोर आहे. वारंवार कुरापती काढणार्‍या चीनचे करायचे काय, असा प्रश्न मात्र आपल्याला सतावतो आणि त्याचे समाधानपूर्वक उत्तर मिळत नाही.

चीनच्या दांडगाईचे गुपित त्याच्या भौगोलिक स्थानामध्ये आहे. चीनच्या सीमेवरती देश आहेत १८ पण त्याचे सीमारेषेवरून भांडण आहे २३ देशांशी. यावरून त्याच्या युद्धखोर मानसिकतेची कल्पना येऊ शकेल. खरे तर हान वंशीय प्रजा जिथे राहते तो यांगत्सी नदी आणि पिवळ्या नदीकाठचा प्रदेश एवढाच खरा इतिहासकालीन चीन आहे. १९४८ नंतर ब्रिटिशांनी सत्ता सोडल्यानंतर धूर्त माओ यांनी तिबेट गिळंकृत केला आणि चीनची सीमा भारताला येऊन भिडली. असे होईपर्यंत भारत आणि चीन यांच्या सीमा एकमेकांना भिडलेल्या नव्हत्या. तिबेट उंचावर आहे. या पठारावरून वाहणार्‍या नद्यांचे चीनला त्याचे पाणी पुरवतात. तेव्हा तिबेट हातात नसते तर चीनचे नाक दाबणे किती सोपे होते हे समजते. लष्करीदृष्ठ्या तर उंचावरले तिबेट हाती आहे म्हणून चीन बलाढ्य झाला आहे. कारण खालच्या खोर्‍यामधल्या प्रदेशावर उंचावरून तोफा डागायला शत्रू येऊ शकत नाही. तिबेट हाती आहे म्हणून हानांचा प्रदेश सुरक्षित आहे. तिबेट हातात नसता तर मध्य आशिया आणि तिथून पुढे जमिनीच्या मार्गाने युरोपपर्यंत पोहचायचे स्वप्नही चीन बघू शकला नसता. म्हणजेच चीनचे भौगोलिक स्थान आज अलौकिक बनले आहे ते तिबेटमुळे. खरे तर तिबेटचे आणि भारताचे नाते अतूट आहे. कारण भारतामध्ये जन्मलेल्या गौतम बुद्धांचा धर्मच तिबेटमध्ये पाळला जातो. सांस्कृतिकदृष्ठ्या तिबेटची नाळ भारताशी जोडलेली आहे. पण आजच्या घडीला राजकीयदृष्ठ्या तिबेटवर चीनचे अधिपत्य आहे. तिबेटी जनतेच्या स्वातंत्र्याच्या आशा आकांक्षा धुडकावून आणि गरज पडेल तसे त्यांना जबरी जुलमी टाचेखाली भरडून आपली सत्ता राबवण्यास चीनने कमी केले नाही.

एका बाजूला जमिनीवरती अशी दादागिरी करणारा चीन आपल्या दक्षिणेकडील समुद्रावरतीही आपलाच अनिर्बंध हक्क आज गाजवू पाहत आहे. आपल्या किनार्‍यापासून जगापर्यंत पोहचण्यासाठी दक्षिण चीनचा समुद्र त्याला मुठीत हवा आहे. तसे झाले तर तो एका बाजूला पॅसिफिक महासागरापर्यंत आणि दुसरीकडे हिंदी महासागरापर्यंत पोहोचू शकतो. या समुद्रावर आपले स्वामित्व गाजवण्यासाठी चीनने तेथील बेटावर हक्क सांगितला आहेच शिवाय कृत्रिम बेटेही बांधून काढली आहेत. चीनने स्वतः च ठरवलेल्या रेषांच्या पलीकडे कोणतेही जहाज येता कामा नये आणि कोणतेही विमान उडता कामा नये, असा नियम चीननेच जारी केला आहे. तसे करताना आंतरराष्ट्रीय संकेत, नियम, कायदे त्याने पायदळी तुडवले आहेत. दक्षिण चीन समुद्रामधले चिन्यांचे खेळ मान्य करायचे तर अमेरिकेला जगाच्या या प्रदेशातून आपला गाशा गुंडाळावा लागेल. केवळ अमेरिकाच नाही तर याच भागामधल्या अन्य शक्तिमान देश जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सार्वभौमत्वालाच चीन आव्हान उभे करू शकेल. अर्थातच चीनने आपल्या वागणुकीमधून याही भागामध्ये संघर्षाची बीजे पेरली आहेत.

मुळात चीन ही एक सुपर पॉवर आहे असा मुद्दा जगाच्या गळ्यात बांधला तो अमेरिकन थिंक टँकने. तो काळ होता जेव्हा तत्कालीन लाभ उठवण्यासाठी अमेरिकन सरकारलाही चीनशी चुंबाचुंबी करायची होती. तर दुसरीकडे अमेरिका पहिल्या शीत युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाची कोंडी करण्याच्या उद्योगात मग्न होती.  मग चीनच्या मदतीने रशियाचा पाडाव करायचा म्हणून अमेरिकेने चीनशी हातमिळवणी केली होती. या निर्णयाचे समर्थन अमेरिकन थिंक टँक्स करत होत्या. चीन ही जगामधली सुपरपॉवर आहे म्हणत होत्या आणि त्यांचे हे प्रतिपादन आमच्या विद्वानांनी तसेच्या तसे स्वीकारले.
सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर अमेरिकेला चीनची गरज उरली नाही. पण तोपर्यंत चीन इतका मोठा झाला होता की या चिनी ड्रॅगनने फुत्कार सोडायला सुरुवात केली आणि अमेरिकेच्या बोटचेप्या भूमिकेचा पूर्ण फायदा उठवत स्वतःला एक आर्थिक महासत्ता पदापर्यंत खेचत नेले. आज भारत, मंगोलिया, जपान, तैवान अशा देशांना चीन आपल्या कब्ज्यात ठेवू इच्छित आहे. मात्र, चीन जसा बदलला तसेच हे देशही बदलले आहेत. चीनची दादागिरी आता ना भारत सहन करू शकत ना लहानसा तैवान. चीनचे मिग विमान शुक्रवारीच तैवानने पाडले आहे. यावरून चीनला आपल्या शेजारील देशांवर दादागिरी करता येणार नाही, हे उघड आहे. अशा परिस्थितीत चीन सातत्याने युद्धखोरीच्या पवित्र्यात राहू इच्छित आहे. मात्र, निदान भारताशी तरी त्याला दोन हात करणे पूर्वी इतके सहज शक्य राहिलेले नाही. चीनच्या सैन्याने लडाखमध्ये कोणतीही नवी आगळीक केली की त्यांना मार पडणार हे भारतीय लष्कराने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

दुसर्‍या बाजूला राजनैतिक पातळीवर चीनला जेरीस आणण्याच्या कृती भारत सरकारकडून होत आहेत. चीन अ‍ॅप्सवर बंदी, चीन मालावर बंदीचा पुरस्कार या माध्यमातून चीनला आर्थिकदृष्ठ्या बुक्क्यांचा मार देण्याचे धोरण राबवण्यात येत आहे. त्याचा थेट परिणाम चीनच्या सरकारवर झाला आहे. कोरोनामुळे अगोदरच चीनची अर्थव्यवस्था धुळीस मिळाली आहे. अनेक बड्या कंपन्या चीनमधून आपला बिस्तारा बांधण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी भारत, जपान, तैवान असे देश चीनच्या सामरिक सामर्थ्यालाच आव्हान देत आहेत. त्यामुळे चीन सध्यातरी कोंडीत सापडलेला दिसत आहे. अशा परिस्थितीत म्हणूनच चीनकडून कोणतेही नको ते साहस होऊ शकते. त्यामुळेच लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लेह-लडाखचा दौरा करत भारतीय लष्कराच्या तयारीचा आढावा घेतला. युद्ध चीनला परवडणारे नाही. पण तरीही अवघडलेल्या अवस्थेतच चीनकडून युद्ध लादण्याचे साहस होऊ शकते. त्यामुळेच भारतीय लष्कर युद्धसज्ज आहे.