घरफिचर्समोबाईलवर झटपट बँकिंग व्यवहार

मोबाईलवर झटपट बँकिंग व्यवहार

Subscribe

बँक-ग्राहक आणि सर्विस-प्रोवायडर अशा विविध पातळीवर खबरदारी घेणे आणि फसवणूक करणार्‍या टोळ्या, सायबर-दरोडेखोरीपासून ग्राहक-बँक आणि संपूर्ण यंत्रणाच कशी दूर ठेवता येईल ही एक आत्यंतिक महत्त्वाची बाब आहे.आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करताना मोबाईल-द्वारे बँकिंग-सेवा ही अधिक सुरक्षित होण्यासाठी काही टिप्स देणे जरुरीचे आहे,त्याच आपण पाहणार आहोत.

भारतीय बँकिंग हे तसे प्रगतीशील आहे. अर्थात संपूर्ण देशाचा भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्या पाहता सुरक्षित आणि सुरळीत यंत्रणा राबवणे म्हणजे नक्कीच येरा गबाळ्याचे काम नोहे ! आजवर आपण आणि आपल्या आधीच्या वडील पिढीने बँकिंग आणि एकूणच भवतालच्या अनेक क्षेत्रातील अनेक स्थित्यंतरे पाहिलेली आहेत. कालचे बँकिंग हे कागदी-रजिस्टरमध्ये अडकलेले होते,त्यानंतर अवतरलेल्या संगणक-युगाने आमूलाग्र अशी ‘कागद-विरहीत क्रांती’ घडवली. इंटरनेटच्या मायाजालने तर जग जवळ आणले आणि डिजिटल बँकिंगच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.तोवर आपल्याकडे मोबाईलच्या अनेक स्तरीय प्रणाली आल्या नि गेल्या. मोबाईलचा वापर एसेमेसपुरता राहिला, परंतु ‘मोबाईल-बँकिंग’ ही संकल्पना वास्तवापासून दूरच होती.त्यापैकी महत्त्वाची कारणे म्हणजे अद्ययावत तांत्रिक उपलब्धता आणि व्यवहारातील जोखीमेबाबत सुरक्षितता. देशाच्या मध्यवर्ती बँकेने -रिझर्व्ह बँकेने निर्णय दिल्यावर मोबाईलवर बँकिंग व्यवहार सुरू करण्याची प्रक्रिया वेगाने कार्यान्वित झाली आणि सुरुवातीला संपर्क, मग माहिती-करमणूक करणारा मोबाईल हा आर्थिक व्यवहारांचे माध्यम बनला. बघता-बघता केवळ बोटांच्या सहाय्याने बँकेबाबतचे काही व्यवहार सुरू झाले आणि खाजगी बँकापासून ते अगदी राष्ट्रीयीकृत, विदेशी आणि सहकारी बँकांनी नव्या दालनात प्रवेश केला. ग्राहक-सेवेबाबत आणखीन एक स्तर उंचावला गेला. हे व्यवहार जसे सहजसोपे तसे अधिक धोकादायक, म्हणूनच बँक-ग्राहक आणि सर्विस-प्रोवायडर अशा विविध पातळीवर खबरदारी घेणे आणि फसवणूक करणार्‍या टोळ्या, सायबर-दरोडेखोरीपासून ग्राहक-बँक आणि संपूर्ण यंत्रणाच कशी दूर ठेवता येईल ही एक आत्यंतिक महत्त्वाची बाब आहे.आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करताना मोबाईल-द्वारे बँकिंग-सेवा ही अधिक सुरक्षित होण्यासाठी काही टिप्स देणे जरुरीचे आहे,त्याच आपण पाहणार आहोत.

- Advertisement -

मोबाईलवर बँकिंगची पार्श्वभूमी- आजवरचा बँकिंगचा इतिहास बघितला तर असे लक्षात येईल की, बँक-वित्त क्षेत्रातील बदल म्हणा किंवा सुधारणा या पाश्चिमात्य देशात विशेषतः इंग्लंड-अमेरिकेतच अधिक प्रमाणात झालेल्या आहेत. परंतु मोबाईलवर बँक-व्यवहार सुरु करण्याचा मान जातो तो युरोपिअन देशाला-१९९९मध्ये सर्वप्रथम अशातर्‍हेचा वापर करण्यात आला आणि त्यानंतर इतरत्र सुरवात झाली. खुद्द आपल्या देशात ‘एसेमेस बँकिंग’मुळे २००२ मध्ये मोबाईल-बँकिंग सेवेचा श्रीगणेशा झाला. आणि तेव्हाच ग्राहकांना थेट स्वरूपातील व्यक्तिगत अशी प्रभावी सेवा देण्यास प्रारंभ झाला. त्या कारणाने बँकिंग जगतातली सेवा-गुणवत्ता वाढली,स्पर्धेस वाव मिळाला आणि ग्राहक-राजाला उत्तम सेवेचा लाभ मिळण्याची सुसंधी प्राप्त झाली.वेगवान असे अत्याधुनिक तंत्रज्ञान (थ्री-जी आणि फोर-जीच्या आगमनाने खूप सकारात्मक बदल वेगाने घडले) वापरून ग्राहकाला उपर्युक्त असा अनुभव देण्यास बँकिंग यंत्रणा सिद्ध झाली. अर्थात हे संक्रमण सोपे नव्हते कारण सरकारचे अर्थखाते, रिझर्व्ह बँक आणि टेलीकॉमसंबंधित परवानग्या आणि कायदेशीर मंजुरी मिळवणे, शिवाय डिजिटल-सुरक्षा पडताळून पाहणेदेखील तितकेच महत्त्वाचे होते. आज शहरी भागात मोबाईल्सचा अधिक वापर होत असला,तरी खरी गरज ही दूरस्थ अशा ग्रामीण भागात आहे.कारण जिथे बँक वा त्यांचे प्रतिनिधी पोहचू शकत नाहीत, तिथे संपर्क साधणे आणि व्यवहार करण्याकरिता मोबाईल हेच प्रभावी साधन आहे.पुढेमागे ग्रामीण भागात असा वापर अधिक प्रमाणात वाढेल, ज्या कारणाने खेड्या-पाड्यातील जनता ही अनेक दशके बँकिंग सेवेपासून वंचित राहिली त्यांना सहभागी होता येईल.

मोबाईल बँकिंगची वैशिष्ठ्ये-मोबाईलद्वारे विविध बँका आणि वित्तीय व्यवहार करणार्‍या संस्था ह्यांनी आपल्या ग्राहकांसाठी मोबाईलमार्फत व्यवहार करण्यास रिझर्व्ह बँकेने अनुमती दिलेली आहे.

- Advertisement -

1] एक प्रकारचे सॉफ्टवेअर म्हणजेच अ‍ॅप डेव्हलप केले गेले
२] रोखीचे व्यवहार होत नाहीत
३] ठराविक खात्यांसाठी अशी सुविधा (म्हणजे सरसकट नाही)
४] ठराविक व्यवहार करण्याची मुभा
५] रक्कम मर्यादा
६] इंटरनेट हे माध्यम अत्यावश्यक
७] बँकिंग संगणक यंत्रणा आणि संबंधित प्रणाली कार्यान्वित हवी
८] अगदी २४ तास उपलब्ध
९] अन्य व्यवहार करता येतात – विद्युत-बिल पेमेंट, चेक-भरणा, फंड ट्रान्सफर करणे इत्यादी
१०] सुरक्षा अतिशय महत्त्वाची
बँक ग्राहकांना होणारे फायदे –
१] वेळेची खूप बचत
२] हवी तेव्हा तत्काळ स्वरूपातील सेवा
३] हवी ती माहिती आपल्या मोबाईलद्वारे मिळू शकते
४] चोवीस तास उपलब्ध
५] आपल्या बँक-व्यवहारांवार नीट लक्ष
६] आपल्याला स्वतः जाण्याची किंवा कोणाकडे असे काम सोपवण्याची गरज नाही
बँकेला होणारे फायदे –
१] ग्राहक-सेवेसाठी लागणार्‍या वेळेत बचत होणे
२] कमी मनुष्यबळ संख्येत सेवा देता येणे
३] बँक-ग्राहकांना बँकेच्या शाखेत कमी वेळा येण्याची संधी देऊन त्यांचा वेळ वाचवणे
४] स्पर्धेत पुढे राहणे
५] अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे
६] अधिकाधिक ग्राहकांना एकाचवेळी उत्तम-सेवा पुरवणे
रिझर्व्ह बँकेतर्फे केलेल्या मार्गदर्शक सूचना / माहिती -आपल्या देशातील एकूण मोबाईल्सची संख्या आणि बँकेचे व्यवहार करण्यासाठी मोबाईलला होणारा वाढता वापर लक्षात घेऊन आणि बँक-ग्राहकांचे हित जपण्यासाठी रिझर्व्ह बँक बँकांना मार्गदर्शक सूचना देत असते. एका आकडेवारीत अशी माहिती मिळाली आहे की –
२०१७ मध्ये मोबाईल बँकिंग वापरणारे ग्राहक-संख्या – १६३ कोटी इतकी
२०१८ मध्ये मोबाईल बँकिंग वापरणारे ग्राहक-संख्या – २५१ कोटी इतकी

एकूण ५४ टक्के वाढ झालेली आढळते. जितके मोबाईल बाजारात येतील, त्यापैकी अनेक हे स्मार्टफोन असतील,तेव्हा साहजिकच आपल्याला त्यावरून बँक-सेवा करण्याचा मोह होणारच, त्याबाबत सूचना पाळणे मात्र आवश्यक आहे.
बँकांतर्फे दिलेल्या सूचना-मोबाईलमधील आपली वैयक्तिक माहिती म्हणजे आपले खाजगी गुपितच असते,त्यातील काही माहिती कोणाला कळली तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यातून आपले मोठे नुकसान होऊ शकते,म्हणूनच आपण मोबाईलमधील इंटरनेट वापरताना खूप खबरदारी घेतली पाहिजे.त्यातूनही बँकिंग व्यवहार करताना तर अक्षरशः

योग्य काळजी घेतलीच पाहिजे. याबाबत काही सूचना खालीलप्रमाणे:-
मोबाईल बँकिंग करताना नेमके – काय करावे ! आणि काय करू नये !
१] आपला पासवर्ड नीट जपायला हवा.कारण चांगला पासवर्ड असेल तरच आपले खाते आणि बँकेबरोबर करत असलेल्या व्यवहाराची माहिती सुरक्षित राहू शकते.तीच गोष्ट पिनबाबतची आहे.
पासवर्ड तयार करताना तुमच्या व्यक्तिगत माहितीशी निगडित शब्द वा आकडे कृपया वापरू नका.
उदाहरणार्थ – जन्म-महिना किंवा जन्म-तारीख टाळा
२] पासवर्ड हा कोणालाच सांगू नका किंवा कितीही अर्जन्सी असली आणि व्यक्ती कितीही जवळची असली तरीदेखील शेअर करू नका, पुढे घोटाळा झाला तर कोण जबाबदार ?
३] मोबाईलवरून किंवा ई-मेलद्वारे पासवर्ड किंवा तशी कोणतीही गोपनीय माहिती पाठवू नका
४] पासवर्ड हा कुठेच लिहून ठेवू नका, कोणाच्या हाती लागला तर गडबड आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
५] आपल्या खात्यातील व्यवहाराची माहिती देणारे बँक-स्टेटमेंट अधून-मधून तपासत रहा. कारण काही अनधिकृत किंवा चुकून आलेल्या डेबिट-क्रेडिट एन्ट्रीचा फटका बसू शकतो.कधी बँकेची पोस्टिंग चूक असू शकते,ती आपण त्यांच्या नजरेस आणून देवू शकतो.आणि खाते अपटूडेट ठेवू शकतो.
६] मोबाईल चोरीला गेला किंवा हरवल्यास लागलीच बँकेला कळवा आणि पोलीस स्टेशनला जावून तक्रार करा
७] आपला आयपीआयएन क्रमांक हा वारंवार बदलत रहा म्हणजे अधिक सुरक्षित राहील.
८] आपण पैसे ट्रान्सफर करताना योग्य नाव आणि माहितीची खातरजमा पाहून करा आणि तसे घडले की नाही? हे पडताळून पहा.
९] कोणतीही गोपनीय माहिती कधीच -कोणालाच सांगू नका. चिठोरे किंवा डायरीत लिहू नका.
१०] कोणतीही अनोळखी साईट उत्सुकतेने उघडू नका. त्यातून व्हायरस आपल्या मोबाईल यंत्रणेत शिरण्याची शक्यता असते.
११] सोशल मीडियात वावरताना आपली माहिती दुसर्‍याला पुरवू नका.
१२] बँकेतून फोन आला तरीही आपण आपली महत्त्वाची माहिती कधीच सांगू नका.
१३] काही मंडळीना आपली महत्त्वाची माहिती-क्रेडिट कार्ड/पासपोर्ट इत्यादी आपल्या मोबाईलमध्ये स्टोअर करतात, ते खूप चुकीचे आहे,तसे अजिबात करू नका.
१४] ब्लूटूथ हा सहसा सार्वजनिक जागी वापरू नका, कारण तिथे तुमची खाजगी महत्त्वाची माहिती असलेला डेटा ‘ट्रान्सफर’ होऊ शकतो.

थोडक्यात मोबाईलवरून बँकिंग व्यवहार करणे जरी सोयीचे असले तरी जोखमीचेही आहे, पण योग्य काळजी घेतली तर पुढे अडचणीत येण्याची वेळ येणार नाही. पारंपरिक बँकिंगपासून आपण आधुनिक नव्हे तर अत्याधुनिक बँकिंगकडे जाताना असे टप्पे येणे हे अपरिहार्य आहे. अवघड आणि अशक्य असे काही नाही, परंतु हलगर्जीपणा नको, मग चिंतेचे कारणच राहणार नाही.

-राजीव जोशी -बँकिंग आणि अर्थ-अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -