घरफिचर्समाघारीचा अन्वयार्थ!

माघारीचा अन्वयार्थ!

Subscribe

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या अश्लीलतेच्या आरोपाचं करायचं काय, हे ठरवण्यात भाजपचा वेळ वाया जातो आहे. या पक्षात मुंडेंना त्यांची जागा दाखवणारे आहेत तसं त्यांच्याशी सलगी करणार्‍यांचीही काही कमी नाही. यात आपली भूमिका काय असायला हवी, हे एकदा त्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे. एखाद्या नेत्याचं करियर गुंडाळायला निघालेल्या महिलेसाठी सत्ताधार्‍यांना बडवायचं की आपल्याही नेत्याला ब्लॅकमेल करणार्‍या महिलेला वठणीवर आणायचं, याचा सारासार विचार भाजप नेत्यांना करावा लागणार आहे. कारण काल हेगडे, धुरी आणि कुरेशी होते. आज मुंडे आहेत. उद्या आपल्यापैकी कोणी असू शकतो, याची जाणीव भाजपच्या नेत्यांनी ठेवली पाहिजे. उठसूठ प्रत्येक घटनेचं राजकारण करण्याचा नाद त्यांनी सोडला पाहिजे. जगाच्या पाठीवर ही जणू पहिलीच घटना असल्यासारखे भाजपचे नेते गळे काढू लागले असताना त्यांचेच नेते मात्र यात सावधगिरी बाळगतात, याचा अर्थ कळायला वेळ लागत नाही. आपल्या देशात नव्याने कमाईचा ट्रेण्ड वाढू लागला आहे. लेदर करन्सी, नावाच्या उद्योगानेही कमाईची अशीच आस लावली आहे. हा अलिकडे वाढीस लागलेला मोठा धंदा असून यातून हनीट्रॅपच्या गोंडस नावाखाली कोट्यवधी रुपयांना गंडवलं जात असतं.

धनंजय मुंडे यातल्या कशात बसतात, ते शोधावं लागेल. सौंदर्याला कुमार्गाच्या वाटेवर नेणार्‍या या लेदर करन्सीच्या उद्योगाने भारतात सुरू केलेले थैमान हे काही आजचे नाही. सौंदर्य हे पैसे कमवण्याचं साधन बनता कामा नये. पण अलिकडच्या काळात सौंदर्याचा वापर पैसे कमविण्यासाठी उघडपणे केला जात आहे, हे अत्यंत वाईट होय. सौंदर्याचा वापर करून योग्य मार्गानेही पैसा कमवता येतो. याला कुणाचाही विरोध असण्याचं काहीच कारण नाही. पण त्याचाच वापर कृष्णकृत्यांसाठी केला जाऊ लागला तर त्याचे फार परिणाम वाईट होतील हे सांगण्याची आवश्यकता नाही. सौंदर्य आणि घायाळ करणार्‍या नजरांचा वापर करून आपल्या जाळ्यात ओढायचं. ब्लॅकमेलिंग करायचं आणि कोट्यवधी रुपये उकळायचे. त्यासाठी शिकारही राजकारणी किंवा पैसेवाल्यांची करायची, अशी जी पद्धत असते, तिला हनीट्रॅप म्हणतात. लष्कराची गुपितं मिळवण्यासाठी पाकिस्तान भारताच्या जवान आणि लष्करी अधिकार्‍यांना अशआ जाळ्यात ओढत असल्याची कितीतरी प्रकरणं उघडकीस आली आहेत. आता हनीट्रॅपचा विळखा राजकीय नेत्यांभोवतीही पडायला लागला आहे. धनंजय मुंडे प्रकरणाच्या अगोदर अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या हनीट्रॅपमध्ये राजकीय नेत्यांना आणि पोलीस अधिकार्‍यांना कसं अडकवलं गेलं याच्या सुरस कथा बाहेर आल्याच होत्या.

- Advertisement -

अशा प्रकरणाचा समाज विघातक अवैध व्यवसाय करणार्‍या महिलांपेक्षा शरीरविक्रय करून पोटाची खळगी भरणार्‍या महिला कितीतरी चांगल्या म्हणायच्या. सहमतीने संबंध ठेवायचे आणि नंतर पैशासाठी ब्लॅकमेलिंग करायचं, अशा वृत्तीच्या महिलांमुळे खर्‍या बलात्कार पीडित महिलांवर अन्याय होतो. त्यांनाही शरमेनं मान खाली घालावी लागते, त्यांनाही कुलटा ठरवलं जातं, हे कुणाच्या लक्षात येत नाही. नेमकी ही बाब मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी अधोरेखित केली आहे. केवळ एका अबलेवर झालेला अन्याय अशा व्याख्येत त्या अडकून पडल्या नाहीत. योग्य ते योग्य आणि अयोग्यावर प्रहार करण्याची पाटील यांनी दाखवलेली हिंमत वाखाणण्याजोगेच म्हटली पाहिजे. आपल्या नेत्यांना काय वाटेल, यापेक्षा महिलांना बदनाम करणार्‍या प्रवृत्तीला ठेचण्याचा धीटपणा दाखवून त्यांनी फुटकळ टीकाकारांना जागेवर आणलं आहे. पैशासाठी कोण कुठल्या थराला जाईल, याचा भरवसा नसतो. मुंडेंवरील आरोपानंतर संबंधित तक्रारदार महिलेसंबंधी एक एक पडदा जेव्हा उघडत गेला, तेव्हा सारेच अचंबित झाले. आपल्या स्वार्थासाठी कोणी किती लाज सोडावी, हा प्रश्न यामुळे अधिकच गंभीर बनला आहे. खरं तर धनंजय मुंडे हा विषय इथे गौण आहे. पण त्याआधी याच तक्रारदार महिलेने केलेल्या उद्योगाने ती पोहोचलेली हस्ती आहे, हे कळायला फार वेळ लागला नाही. तिने आपल्याही एका नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता, याची जाणीव ठेवण्याऐवजी घडल्या प्रकरणाचं राजकारण करण्याचा आगाऊपणा भाजप नेत्यांनी सुरू केला आहे. मुंडे यांनी राजीनामा द्यावा, म्हणून हे नेते आजपासून राज्यभर आंदोलन करणार आहेत. हाच तोरा आपलं सरकार असताना का दाखवला नाही? तेव्हा तर आजचे प्रदेशाध्यक्ष हे राज्याचे ज्येष्ठ मंत्रीही होते. आपल्याच सहकारी मंत्र्यांविरोधात झालेल्या आरोपानंतर मौनी बनलेले किरीट सोमय्या आणि अतुल भातखळकर यांच्यासारखे नेते तेव्हा कुठे होते? जेव्हा भाजपच्या नेत्यांची कुठली प्रकरणे बाहेर पडतात तेव्हा आता कागदोपत्री पुरावे देणारे किरीट सोमय्या हे शोधूनही सापडत नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रकरणाचं गांभीर्य अधोरेखित केलं. यामुळे मुंडेंना घरी जावं लागेल, असं वाटत असतानाच रेणूच्या कारनाम्याची तीन प्रकरणं बाहेर आली आणि मुंडेंना हायसं वाटलं. भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी रेणूचे उपद्व्याप बाहेर आणले आणि ती चांगलीच अडचणीत आली. रेणूने आपल्याला कसं जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, ती कसे संदेश पाठवायची आणि लगट कशी करायची याची फिर्यादच हेगडे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. दुसरीकडे मनसेच्या मनीष धुरी यांनीही रेणूवर असेच गंभीर आरोप केले. आपण सावरलो नसतो, तर २००८ मध्येच आपला मुंडे झाला असता, असं धुरी यांनी म्हटलं आहे. हेगडे आणि धुरी यांनी केलेले आरोप रेणूने फेटाळले असले आणि राजकारणी नेत्यांचे आरोप म्हणून त्यांच्याकडं दुर्लक्ष करायचं ठरवलं, तरी मग जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या अधिकार्‍याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर त्याची फसवणूक केल्याप्रकरणाचं काय करायचं हेही भाजप नेत्यांनी ठरवलं पाहिजे. रेणूचा वकील हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातं. तीही भाजपची कार्यकर्ती असल्याचं सांगितलं जातं. सत्ता असताना तिची महामंडळावर वर्णी लागू शकते याचा अर्थ रेणू आणि भाजपचे संबंध काय असावेत, हे लक्षात येते. राज्यातल्या सत्तेदरम्यान तिची केंद्रीय सेन्सॉर बोर्डावर वर्णी लागली होती. महाराष्ट्र भाजपात काम करणार्‍या महिलांची कमी नव्हती. तरी तिची वर्णी या मंडळावर लागावी, हे अजबच. रेणू उघडपणे नेत्यांना ब्लॅकमेल करत असल्याचं दिसू लागल्यावर तिच्यावर प्रचंड टीका झाली. आता टीकेला उत्तर देता देता तिला अडचणीचं जाऊ लागल्यावर तिने अचानक माघार घेत असल्याचं ट्विट केलं. कोणीही व्यक्ती अन्याय झाला असेल तर माघार घेणार नाही. परिस्थिती आपल्याला साथ देणार नाही, याची जाणीव तिला झाली, हे बरं झालं. जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी नावाच्या तरुणाला छळल्याचा आरोप मर्यादित नाही. सातत्याने ब्लॅकमेल होऊ लागल्याने त्याने आपला खिसा रिता केला. आता आणखी काही देणं अवघड बनल्यावर तिने त्याच्याविरोधात बलात्काराचा प्रयत्न आणि विनयभंग केल्याची तक्रार केली. या घटनेनंतरही भाजप नेत्यांना ती योग्य वाटत असेल तर दुर्दैवच म्हटलं पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -