घरफिचर्सबॉण्ड्समधील गुंतवणूक - आणखी एक सुरक्षित पर्याय !

बॉण्ड्समधील गुंतवणूक – आणखी एक सुरक्षित पर्याय !

Subscribe

आर्थिक साक्षरता ही काही कोणा एका वर्गाची वा जाती-जमातीची मिरासदारी नाही. पैसे कमावण्याचा हक्क-अधिकार हा प्रत्येकाचाच आहे, श्रीमंत होणे हा काही गुन्हा नाही. योग्य मार्गाने पैसा कमावता येतो, हे आपल्याकडे विकसित झालेल्या मार्केट व अर्थव्यवस्थेकडे पाहिल्यावर दिसून येते. आज आपण ‘बाँड’ म्हणजे काय? त्यात कशी गुंतवणूक करायची? हे पाहणार आहोत.

आपण गुंतवणूक म्हटली की, अगदी परंपरागत साधनांकडे आपसूकपणे वळत असतो. बँक-पोस्ट ऑफिसपलीकडे काही असते हे पूर्वी तर फारच कमी लोकांना ठावूक असायचे, पण काळाच्या ओघात शेअरबाजार, सोने, रिअल इस्टेट असे अनेक मार्ग उपलब्ध असल्याचे जाणवत गेले. सुशिक्षित तरुणवर्ग -खाजगी बँकांचा नवनवीन साधने व आधुनिक तंत्रज्ञानसहित झालेला उदय आणि रिटेल बँकिंगचा वाढता पगडा यातून नव-मध्यमवर्ग उच्च-वर्गाप्रमाणे अधिक नफा मिळवण्यासाठी अधिक जोखीम असलेल्या साधनांत आपले पैसे गुंतवू लागला. ज्या गुंतवणुकीत पारसी किंवा अ-मराठी गुंतवणूकदार यांचा वरचष्मा होता, तिथे आपला मराठी माणूस पैसा कमावतो आहे, शिवाय अभ्यासू-तज्ञ म्हणून इतरांना मार्गदर्शन करतो आहे. सर्वसाधारण मराठी गुंतवणूकदार आता धाडशीपणे गुंतवणूक करतो आहे, ही खरोखरच चांगली बाब आहे. कारण आर्थिक साक्षरता ही काही कोणा एका वर्गाची वा जाती-जमातीची मिरासदारी नाही. पैसे कमावण्याचा हक्क-अधिकार हा प्रत्येकाचाच आहे, श्रीमंत होणे हा काही गुन्हा नाही. योग्य मार्गाने पैसा कमावता येतो, हे आपल्याकडे विकसित झालेल्या मार्केट व अर्थव्यवस्थेकडे पाहिल्यावर दिसून येते. आज आपण ‘बाँड’ म्हणजे काय? त्यात कशी गुंतवणूक करायची? हे पाहणार आहोत.

पार्श्वभूमी- आपल्याकडे बँक आणि पोस्टात पैसे ठेवणे हे अधिक सुरक्षित मानले जायचे, कालांतराने आपली आर्थिक बाजारपेठ विकसित होत गेली आणि नवनवीन गुंतवणूक साधने बाजारात आली. सरकारी व सहकारी बँकांच्या स्पर्धेत खाजगी बँक्स उतरल्याने, शिवाय जागतिकीकरण-आर्थिक सुधारणांचा वेग वाढता राहिल्याने गुंतवणूकदारांना विविध पर्याय मिळू लागले. बिगर बँकिंग कंपन्या म्हणजेच एनबीएफसीने आकर्षक व्याजदर व काही स्कीम्स आणून एक प्रकारची व्याज-चुरस निर्माण केली. भीत-भीत पैसे ठेवणार्‍या मध्यमवर्गीय ठेवीदारांची भीड-भीती चेपली गेली. पुढे चिटफंड आणि बोगस कंपन्या यांनी सर्वसामान्यांच्या परिस्थितीचा व अधिक कमाईच्या प्रवृत्तीचा गैरफायदा घेतला. ‘‘झटपट पैसे डब्बल करू-भरमसाठ व्याज देवू अशा मृगजळाची निर्मिती करून लोकांना लुटले. इतका की, अनेक कुटुंबे रस्त्यावर आली. अनेकांच्या गुंतवणुकीवरचा विश्वासच उडाला. पुढे रिझर्व्ह बँक-सेबी आणि केंद्र सरकारच्या नियंत्रणाने अशा गैरव्यहाराना आळा घातला गेला. तरीदेखील अधूनमधून असे गैरप्रकार आणि बनावट योजना येतच असतात व लोकांना लुबाडत असतातच!

- Advertisement -

पारंपरिक गुंतवणूक साधने – आज अशी अनेक साधने अस्तित्वात असली तरीही अनेकजण त्याचा लाभ घेत नाहीत. साधे बँक-खाते उघडणेदेखील ज्यांना जमत नाही, अशी हजारो मंडळी आहेत. बँक्स व पोस्ट ऑफिसेसच्या बचत-योजना गेली अनेक वर्षे लोकांना ठावूक आहेत. सहकारी बँका-सरकारी बँक्स व पतपेढी यांनी देशाच्या कोपर्‍यात शाखा उघडून किमान बचत व काही कर्जे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी मोठ्या खाजगी बँक्सच्या आकर्षक योजना व कर्जेही अर्बनपातळीवर लोकप्रिय आहेत. आजच्या घडीला बँकांचे व्याजदर कमी झाल्याने भांडवल-वृद्धी हा मुद्दा बाजूला पडतो आणि मला हातात किती व्याज पडते, यावर कुठे व किती पैसे गुंतवायचे असा विचार होतो. शिवाय एखादी बँक बुडाली किंवा त्यावर सायबर दरोडा पडला की लोकांची मानसिकता डळमळीत होते व बँकांतून पैसे काढण्याची घाई सुरु होते. तरीही एक सुलभ पर्याय म्हणून जवळच्या बँकेत पैसे ठेवले जातात, हेतू हा की ऐनवेळेला हाताशी पैसे असावेत, चटकन काढता यावेत. ज्यांना थोडे-अधिक कळते, ते बँकांच्याऐवजी थेट शेअरबाजार-म्युचुअल फंड किंवा सोन्यात-जमिनीत आपले पैसे गुंतवतात आणि जोखीम घेत-घेत त्याप्रमाणात कमाई करतात. मात्र शेअर्समधील गुंतवणूक ही बिन-भरोशाची वाटत असल्याने सर्वसाधारण माणसे तिथे साहसा वळत नाहीत. म्युच्युअल फंड आल्याने एक सोप्पा पर्याय थेट शेअर्समधील गुंतवणूक ज्यांना झेपत नाही, किंवा करायची नाही, अशांसाठी तुमच्या-आमच्या हाती आलेला आहे, तिथे शहरी-निम-शहरी गुंतवणूकदारांनी मोहरा वळवलेला आहे. पगारदारांना पी.एफ. असतो शिवाय पीपीएफ किंवा एनपीएससारखे नवनवीन पर्याय माहीत असतात. तरीही अनेक गोष्टी अनेकांना ठावूक नसतात. देशाची एकूण लोकसंख्या पाहता लोकांनी अधिक प्रमाणात अर्थसाक्षर व्हावे व उत्तम अशा इन्वेस्टमेंट प्रोडक्टमध्ये पैसे ठेवावेत ही संकल्पना हळूहळू रुजते आहे. ‘‘सुरक्षितता-जोखीम आणि लाभ ही त्रिसूत्री लक्षात ठेवून नवनवीन साधने लोकप्रिय करणे जरुरीचे आहे. बाँडसारखे पर्याय नेमके कसे आहेत? हे घेण्यात किती जोखीम आहे? त्यात व्याज कसे मिळते? नको असल्यास ते विकता येतात का? असे अनेक प्रश्न अनेकांना पडतात, त्यांची माहिती आपण आज घेणार आहोत.

बाँड-एक विश्वसनीय गुंतवणूक साधन – इंग्रजी सिनेमात लोकप्रिय असलेला नायक-जेम्स बाँडचा जनक कोण? हे एकवेळ गुगलवर शोध घेऊन सहज सांगता येईल, पण हे आर्थिक व्यवहारास सुकर असलेले बाँड्स म्हणजे रोखे हे नेमके कधी अस्तित्वात आले, हा एक अभ्यासाचा विषय आहे. एकमात्र आहे की, आपल्या अर्थव्यवस्थेत बाँड रुजलेले आहेत. जसे बाँड म्हणजे रोखे तसे डिबेंचर म्हणजे कर्जरोखे हे मुद्दाम लक्षात ठेवा, पुढेमागे आपण डिबेंचर्सबद्दलसुद्धा तपशीलात माहिती घेऊ.

- Advertisement -

बाँडची ठळक वैशिष्ठ्ये -बाँड विक्रीला काढण्याआधी त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. जशी शेअर्सबाबतही असते. शेअर्सच्या तुलनेत बाँड्स हे कमी जोखमीचे आणि सुरक्षित असे साधन मानले जाते.तसेच मध्यम व दीर्घकालीन गुंतवणूक-साधन म्हणूनही याकडे बघितले जाते.

रोकड सुलभता हे एक वैशिष्ठ्य
कुपन-रेट-व्याजरूपी उत्पन्न
मुदत-पूर्ती दिनांक-मात्र मुदती-पूर्वी विक्री केल्यास तुम्हाला तुम्ही केलेल्या गुंतवणुकीपेक्षा कमी पैसे मिळण्याची शक्यता असते.
व्याज -वर्षातून एकदा
पार व्हॅल्यू
करपात्र किंवा कर-विरहीतदेखील असू शकतात
पतमापन करण्याची सुविधा असल्याने कोणते रोखे अधिक जोखमीचे किंवा कमी हे कळू शकते.
कसे गुंतवाल ?- थेट/मोबाईल अ‍ॅप/ इंटरनेट माध्यमातून

मुख्य असे तीन जोखीम प्रकार असतात –
1) उत्पन्न जोखीम – रोखे निर्माण करणारी कंपनी किंवा बँक यांच्या उत्पन्नाचे मार्ग कोणते व कसे आहेत? त्याचे भवितव्य काय? असे अनेक प्रश्न यात गुंतलेले असतात.
2) पत-जोखीम – मुळात कंपनी वा बँक यांच्याबद्दल काय पत आहे? त्याचा कारभार कशारीतीने होतो हे पाहिले जाते. व्यवस्थापन कसे आहे? कोण मंडळी आहेत? त्यांची पार्श्वभूमी व इतिहास पाहिला जातो.
3) रोकडसुलभता जोखीम-जेव्हा गरज लागेल तेव्हा चटदिशी पैसा मिळू शकतो का? बाँड बाजारात विकून किती झटकन पैसे मिळतील? यालाच रोकडसुलभता असे म्हणतात. अनेकांना आपली गुंतवणूक अशी पटकन मिळावी असे वाटत असते. प्रत्येकजण आपल्या सोयीने जोखीम तपासत असतो आणि निर्णय घेत असतो. कोणाचे चूक किंवा बरोबर हा मुद्दाच नाही. कोणाला गरजेला पटकन रोख पैसे देणारे गुंतवणूक साधन हवे असतात. म्हणून काही लोक केवळ बचत खात्यात किंवा घरातच मोठी रक्कम ठेवून देतात, पण असे करणे योग्य नाही. पडून राहिलेल्या पैशातून काहीच उत्पन्न मिळत नाही. पैशाची वृद्धी व्हायला हवी, मात्र काही प्रमाणात जोखीम व गरज याचा समतोल साधता आला पाहिजे.
शेअरबाजारात जर रोखे नोंदवलेले असतील तर तिथे विक्री-व्यवहार करता येतात.
विविध प्रकारचे रोखे असतात -जोखीम घेण्यावरून त्यांची वर्गवारी केली जाते.

मुख्य प्रकार –
1) सरकारी रोखे-सर्वात सुरक्षित गुंतवणूक असे मानले जाते.(गव्हर्नमेन्ट सेव्हिंग बॉण्ड्स, सॉव्हरेन बॉण्ड्स, कॅपिटल गेन्स बॉण्ड्स, टॅक्स फ्रि बॉण्ड्स)
2) बँकांचे रोखे-हेही रोखे तसे कमी जोखमीचे व सुरक्षित असतात.
3) सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांचे रोखे-उदाहरणार्थ – रेल्वे बाँड /आयएफसीआय/रुरल बॉन्ड्स – राष्ट्रीय महामार्ग (एन.एच.) उभारणीसाठीदेखील बाँड उभे केले गेले आहेत.
4) कंपनीचे कर्जरोखे – हे डिबेंचर्स म्हणून ओळखले जातात.
5) अन्य काही प्रकार-माहितीसाठी- (फिक्ड रेट, फ्लोटिंग रेट, झिरो इंटरेस्ट, इन्फ्लेशन लिंक्ड, परपेच्युअल, सबऑर्डिनेटेड, बिअरर, वॉर बॉण्ड्स)
आपण नक्कीच या पर्यायाकडे डोळसपणे पाहू शकतो

-राजीव जोशी- बँकिंग व अर्थ-अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -