घरफिचर्सअजिंक्य भारत!

अजिंक्य भारत!

Subscribe

यंदा ऑस्ट्रेलियाच्या परिपूर्ण’ संघावर भारताने 2-1 असा दिमाखदार विजय मिळवून विजयी हॅट्ट्रिक साजरी केली

शरद कद्रेकर

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय मालिका विजय (2-1) अशी ऑस्ट्रेलियातील या विजयाची दखल कायम घेतली जाईल! भारतीय क्रिकेटच्या इतिहासात परदेशातील मालिका विजय तसे दुर्मिळच, परदेशात भारतीय संघाने आतापर्यंत 21 मालिका विजय संपादले असून ऑस्ट्रेलियातील भारताचा हा केवळ दुसराच मालिका विजय! दोन वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी मात केली, परंतु त्या ऑस्ट्रेलियन संघात डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश नव्हता. परंतु यंदा मात्र ऑस्ट्रेलियाच्या ‘परिपूर्ण’ संघावर भारताने 2-1 असा दिमाखदार विजय मिळवून विजयी हॅट्ट्रिक रूबाबात साजरी केली. त्यात कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेचे योगदान हे अतुल्य आहे.

- Advertisement -

भारतीय क्रिकेटच्या जवळपास 9 दशकांच्या कसोटी क्रिकेट (1932-2021) इतिहासात 19 जानेवारी 2021 या दिवसाची नोंद सुवर्णाक्षरात करावी लागेल. अजिंक्य रहाणेच्या युवा शिलेदारांनी मेलबर्न, सिडनी, ब्रिस्बेन कसोटीत झुंजार खेळ करून ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच 2-1 असे खडे चारले अन बोर्डर-गावस्कर करंडकावर सलग तिसर्‍यांदा आपलं नाव कोरून आगळीवेगळी संस्मरणीय विजयी हॅट्ट्रिक नोंदवली. ब्रिस्बेन गॅब्बावर ऑस्ट्रेलियाच्या मक्तेदारीला शह देत रहाणेच्या संघाने भारताच्या अंजिक्यपदाची ग्वाही दिली. अ‍ॅडलेडमधील 36 व्या नीचांकी धावसंख्येवर आलेली उदासी, मरगळ, झटकून टाकत अंजिक्यच्या भारतीय संघाने कात टाकली. या संघाला विराट कोहलीची उणीव भासली नाही. तसेच महमद शमीच्या दुखापतीमुळे संधी लाभलेल्या हैद्राबादी महमद सिराजने कसोटी पदार्पणात 5 मोहरे टिपून आपली छाप पाडली. कर्णधार रहाणेने मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर शतक झळकावून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. एमसीजीवरील विजयामुळे भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. सिडनी कसोटीत भारतीय खेळाडूंनी झुंजार खेळ करून कसोटी अनिर्णित राखली. या अनिर्णित कसोटीमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला. ब्रिस्बेन गॅब्बावरील ऑस्ट्रेलियाच्या अभेद्य गडाच्या नवोदितांचा भरणा असलेल्या भारतीय संघाने ठिकर्‍या उडवल्या. मालिकेत 2-1 अशी सरशी साधली. शिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 71 गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली.

- Advertisement -

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय मालिका विजय (2-1) अशी ऑस्ट्रेलियातील या विजयाची दखल कायम घेतली जाईल! भारतीय क्रिकेटच्या इतिहासात परदेशातील मालिका विजय तसे दुर्मिळच, परदेशात भारतीय संघाने आतापर्यंत 21 मालिका विजय संपादले असून ऑस्ट्रेलियातील भारताचा हा केवळ दुसराच मालिका विजय! दोन वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी मात केली, परंतु त्या ऑस्ट्रेलियन संघात डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश नव्हता. परंतु यंदा मात्र ऑस्ट्रेलियाच्या ‘परिपूर्ण’ संघावर भारताने 2-1 असा दिमाखदार विजय मिळवून विजयी हॅट्ट्रिक रूबाबात साजरी केली.

अजित वाडेकरच्या भारतीय संघाचे (1971) वेस्ट इंडीज, इग्लंडमधील पहिले वहिले मालिका विजय, राहुल द्रविड -व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्या त्रिशतकी भागीमुळे कोलकत्याच्या इडन गार्डनवरील भारताचा संस्मरणीय विजय, कपिलच्या संघाचा लॉर्डसवरील (1983) वर्ल्डकप जेतेपद, कर्णधार धोणीच्या सणसणीत षटकारांमुळे वानखेडेवरील वर्ल्डकप विजयाचा सॅटर्डे नाईट जल्लोष (2011) हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सोनेरी क्षण. या सर्व विजयांवर कडी करणारा विजय रहाणेच्या संघाने ऑस्ट्रेलियात मिळवून भारतीय क्रिकेटला तसेच कसोटी क्रिकेटला संजीवनी दिली.

जगभरात कोविडने थैमान घातले असताना बायो-बबलमध्ये विलगीकरणात राहण्याची सक्ती, अ‍ॅडलेडच्या सलामीच्या डे-नाईट कसोटीत तीन दिवसातच मानहानीकारक पराभव (36 धावांचा नीचांक), कर्णधार विराट कोहलीचे मायदेशी प्रयाण, 11 फिट (तंदुरस्त) खेळाडूंची चणचण या सार्‍या अडचणींवर मात करण्याची जिद्द अंजिक्यच्या युवा संघ सहकार्‍यांनी दाखविली.कर्णधार अंजिक्य रहाणे, चेतेश्ववर पुजारा हे दोघेजण मालिकेतील सारेच्या सारे 4 कसोटी सामने खेळले. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघात एक दोन नव्हे तर तब्बल 10 बदल करण्यात आले!

ब्रिस्बेन गॅब्बाच्या निर्णायक कसोटीसाठी भारतीय संघाच्या आक्रमणात (गोलंदाजी) आमूलाग्र बदल करण्यात आले. टी.नटराजन, वॉशिग्टंन सुंदर या दोन तामिळी युवकांसह शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, महमद सिराज या युवा पंचकाने आपली कामगिरी चोखपणे पार पाडली. भारतीय तेज चौकडीकडे जेमतेम 4 कसोटींचा अनुभव तर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियन चौकडीकडे जवळपास 250 कसोटींचा प्रदीर्घ अनुभव होता. भारतीय चौकडीच्या खात्यात केवळ 11 बळी तर ऑस्ट्रेलियन चौकडीच्या पोतडीत एक हजाराहून अधिक बळी.

कसोटीमधील पहिलावहिला ‘टाय’ सामना 1961 मध्ये खेळला गेला तो ब्रिस्बेन गॅब्बाच्या खेळपट्टीवर. याच ऐतिहासिक मैदानावर गेल्या 32 वर्षात 31 कसोटी ऑस्ट्रेलियन संघ अपराजित राहिला आहे. परंतु यंदा ऑस्ट्रेलियन संघाची ही पंरपरा भारतीय संघाने खंडित केली. गॅब्बाच्या खेळपट्टीवर चेंडू उसळत होते. कमिन्स, हेझलवुड, स्टार्क या ऑस्ट्रेलियन तेज त्रिकुटाने चेतेश्वर पुजाराला चांगला ‘शेक’ दिला. ‘‘ रॉक ऑफ जिब्राल्टर’’ पुजाराने न डगमगता नेटाने चेंडू खेळून काढले. त्याची बोटे सोलवटून निघाली. अंग काळनिळे पडले, पण राजकोटच्या या जिगरी खेळाडूने मैदान सोडले नाही. नव्या चेंडूला धैर्याने सामोरे जात त्याने सव्वा तीन तास किल्ला लढवत 56 धावा केल्या, त्या आधी सिडनी कसोटीत पावने तीन तास खेळपट्टीवर ठाण मांडून 77 धावा केल्या. या मालिकेत पुजाराने 3 अर्धशतकांसह 271 धावा केल्या त्या 922 चेंडूत. त्याच्या या धावा अनमोल ठरल्या.

पुजाराकडून चिवट, झुजांर फलंदाजीची अपेक्षा होतीच ती त्याने पूर्ण केली. परंतु महत्वाची बाब म्हणजे त्याच्या छायेत वावरताना शुभमन गिलचा खेळ बहरला. पंजाबच्या या 21 वर्षीय युवकांने सलामीवीराची भूमिका चोखपणे पार पाडताना 3 कसोटीतील 6 धावात 52 च्या सरासरीने 259 धावा केल्या. शुभमनचा दर्जा वादातीत असून रणजी, ‘अ’ संघाचे दौरे यात त्याने आपला ठसा उमटविला होताच. कसोटी पदार्पणाची संधी मिळतात त्याने आपले नाणे खणखणीतपणे वाजवून दाखविले. संयम, मानसिक कणखरता या शुभमनच्या जमेच्या बाजू ऑस्ट्रेलियन तेज त्रिकुटाला फ्रंटफुट तसेच बॅकफुटवर जात त्याने अप्रतिम, नजाकतदार फटके लगावून जाणकार रसिकांची वाहवा मिळविली. गॅब्बावर-गिल-पुजारा यांच्या शक्तीभागीने भारतीय विजयाचा पाया रचला. शुभमनचे वडील पंजाबच्या जलालाबाद जवळील चक्क खेरेवाला या गावचे जमिनदार, आपल्या मुलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनविण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले होते. शुभमन मोठा झाल्यावर त्यांनी मोहाली स्टेडियमजवळ घर घेतले. जेणेकरून शुभमनला खेळासाठी जास्त वेळ देता येईल. आपल्या वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी शुभमनने कसोटी कारकिर्दीचा शुभारंभ मोठ्या झोकात केला.

तेवीस वर्षीय छोट्या चणीच्या ़िरषभ पंतने या दौर्‍यात भारतातर्फे सर्वाधिक 274 धावा फटकावताना क्रिकेट जाणकार, बुजुर्ग माजी ऑस्ट्रेलियन तसेच भारतीय कसोटीपटूंसह रसिकांची मने जिंकली. सिडनी कसोटीत डावखुर्‍या पंतचे शतक 3 धावांनी हुकले, त्याची चुटपुट सर्वांनाच लागली. दुखापतग्रस्त पंतला फलंदाजीत बढती देण्याची भारताची चाल विलक्षण यशस्वी ठरली. बेडर, आक्रमक फलंदाजी ही पंतची खासियत. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची खासकरून नॅथन लायनच्या फिरकीची लय बिघडविण्याची भूमिका त्याने नेटाने पार पाडली. रिषभ पंत मूळचा उत्तराखंडचा. रूरकीहुन मध्यरात्री 2.30 च्या सुमारास बस पकडून रिषभ दिल्ली गाठत असे. छोट्या रिषभला त्याची आई थर्मासमधून कॉफी तसेच पनीर पराठ्याचा लंच बॉक्स देत असे. आईच्या या कष्टांचे चीज रिषभने केले.

भारतासाठी महमद सिराज हा ‘फाईट ऑफ द टूर’ ठरला. महमद शमीच्या गैरहजेरीत भारतीय गोलंदाजीची धुरा वाहणार्‍या हैदराबादी सिराजने मालिकेत भारतातर्फे सर्वाधिक 13 मोहरे टिपले. मेलबर्न कसोटी पदार्पणात त्याने 5 बळी मिळविले तर ब्रिस्बेनच्या निर्णायक कसोटीत त्याने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 73 धावात गारद केला. सिराज स्विंगमध्ये पटाईत, परंतु यॉर्कर तसेच बाऊन्सवर प्रभुत्व मिळविण्यासाठी त्याला अधिक मेहनत करावी लागेल. कसोटी मालिकेला सुरवात होण्याआधी सिराजच्या वडीलांचे निधन झाले. कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री, भारती अरूण (गोलंदाजी प्रशिक्षक) यांनी सिराजचे सांत्वन करून त्याला धीर दिला. कसोटी पदार्पणाची संधी मिळतात त्याने तिचे सोने केले. हैदराबादमधील रिक्षा चालकाच्या या मुलाने थक्क करणारी कामगिरी केली. हैदराबादच्या चारमिनार क्रिकेट क्लबकडून खेळणार्‍या सिराजने रणजी स्पर्धा, भारतीय ‘अ’ संघातून खेळताना आपली छाप पाडली. आयपीएलमध्येही त्याने बर्‍यापैकी कामगिरी केली. बुमरा, शमी, उमेश यादव यांच्या गैरहजेरीत त्याने भारतीय तेज आक्रमणाची धुरा समर्थपणे वाहिली.

शार्दुल ठाकुरने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले ते 2 वर्षांपूर्वी, परंतु दुखापतीमुळे केवळ 10 चेंडू टाकून तो माघारी परतला. त्यानंतर भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी त्याला दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागली. रणजी,आयपीएलमध्ये त्याची कामगिरी चांगली होती. शार्दुलचा रनअप सुरेख, सतत 130 प्रति-किमीच्या वेगाने मारा करण्यात तो पटाईत. प्रतिस्पर्ध्यांच्या शेपटाला वळवळ करण्याची संधी तो क्वचितच देतो. बोईसर-पालघरच्या या युवकाने मुंबईत क्रिकेट खेळण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. पहाटे लवकर उठून नियमितपणे सराव केला. बोरीवलीच्या स्वामी विवेकांनद शाळेकडून आंतर-शालेय क्रिकेट स्पर्धेत खेळताना त्याला प्रशिक्षक दिनेश लाड यांचे मार्गदर्शन लाभले. रणजीतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला संधी मिळाली. वेळप्रसंगी शार्दुल बॅटही चालवू शकतो. याची प्रचिती ब्रिस्बेन कसोटीत आली. वॉशिग्टंन सुंदरच्या साथीने शार्दुलने शतकी भागीदारी रचली. तसेच ऑस्ट्रेलियाला दोन्ही डावात खिंडार पाडण्याची भूमिका त्याने सफाईदारपणे पार पाडताना 7 (4 -़ 3) विकेटस काढल्या.

टी.नटराजन, वॉशिग्ंटन सुंदर या तामिळनाडुच्या खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले ते ब्रिस्बेन गॅबावर. भारताचे ते अनुक्रमे 300 ते 301 वे कसोटीपटू. उंचपुर्‍या वॉशिग्टंनच्या बहारदार खेळामुळे भारताला गॅब्बाच्या निर्णायक कसेाटीत दोन्ही डावात त्रिशतकी मजल मारता आली. शिवाय त्याच्या फिरकीमुळे भारतीय आक्रमणात विविधता आली. अश्विनची उणीव त्याने भासू दिली नाही. आयपीएल, टी-20 क्रिकेटमधून त्याला कसेाटी पदार्पणाची संधी लाभली. वॉशिग्टनचे चेंडूवरील नियत्रंण वाखाणण्याजोगच, त्याची फलंदाजी हा संघासाठीच बोनसच. टी.नटराजनचे दैव बलवत्तर. नेट गोलंदाज म्हणून त्याची या दौर्‍यात भारतीय संघात निवड झाली होती. परंतु संघातील प्रमुख खेळाडू जायबंदी झाल्यामुळे त्याला कसोटी पदार्पणाची संधी लाभली. या दौर्‍यात त्याला वन डे, टी-20 तसेच कसोटी क्रिकेट खेळण्याचे भाग्य लाभले. ऑस्ट्रेलियन दौर्‍यात नव्या दमाच्या खेळाडूंनी इतिहास घडविण्यात मोलाची भूमिका बजावली यातच भारतीय संघाच्या यशाचे गुपित दडलंय असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

भारताचे परदेशातील मालिका विजय (1932-2021)

वर्षे – प्रतिस्पर्धी – निकाल – कर्णधार

1967 – न्युझीलंड – 3-1 – पतौडी (ज्यु.)
1970 – 71 – वेस्ट इंडीज- 1-0 – अजित वाडेकर
1971 – इंग्लंड – 1-0 – अजित वाडेकर
1986 – इग्लंड – 2-0 – कपिल देव
1993 – श्रीलंका – 1-0 महम्मद अझरूद्दीन
2000- 01 – बांगलादेश – 1-0 सौरभ गांगुली
2003-4 – पाकिस्तान – 2-1 – सौरभ गांगुली
2004-5 – बांगलादेश –  2-0 – सौरभ गांगुली
2005 – झिम्बाब्वे – 2-0 – सौरभ गांगुली
2006 – वेस्ट इंडीज – 1-0 – राहुल द्रविड
2007 – बांगलादेश – 1-0 – राहुल द्रविड
2007 – इंग्लड – 1-0 राहुल द्रविड
2008-9 – न्युझीलंड – 1-0 धोणी
2009-10 – बांगलादेश – 2-0 धोणी
2011 – वेस्ट इंडीज – 1-0 धोणी
2015 – श्रीलंका – 2-1 विराट कोहली
2016 – वेस्ट इंडीज – 2-0 विराट कोहली
2017 – श्रीलंका – 3-0 विराट कोहली
2018-19 – ऑस्ट्रेलिया – 2-1 विराट कोहली
2019 – वेस्ट इंडीज – 2-0 विराट कोहली
2020-21 – ऑस्ट्रेलिया –  2-1 कोहली / रहाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -