जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द व्हायला हवा !

सुरक्षित त्सुनामी उंची 21 फूट आहे. परंतु जांभ्या दगडाचा भाग माडबन पठारावर अगदी समुद्री सपाटीच्याही खाली आहे. जांभा हा सच्छिद्र दगड असल्याने त्यावर अणुभट्ट्यांचा पाया होऊ शकत नाही. त्यामुळे संपूर्ण 80 फूट आणि काळा दगड (बेसॉल्ट) लागेपर्यंत समुद्र सपाटीचा भागच कापून काढावा लागेल. यामुळे निर्माण होणारा करोडो टन कचरा शेवटी टाकणार कुठे? त्याचे पर्यावरणीय परिणाम भयंकर असतील. सध्यातरी केंद्रीय पर्यावरण खात्याने समुद्रात कचरा टाकण्यास मनाई केली आहे. किरणोत्साराच्या परिणामामुळे पक्षी, कीटक व इतर सजीवांवर परिणाम होतच असतात.

Mumbai
Nuclear

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला तो प्रस्तावित असल्यापासून विरोध होत आहे. या विरोधाची कारणे किरणोत्साराचे भयानक स्वरूप, अपघातामुळे कधीही भरून न येणारे नुकसान, अणुकचरा, वापरात नसलेल्या तंत्रज्ञानाच्या अणुभट्ट्या, प्रकल्पाचा अवाढव्य भांडवली खर्च आणि निर्माण होणार्‍या विजेचा उच्च दर, भूकंप रेषा, भूकंप प्रवणता, आंतरराष्ट्रीय गुलामगिरी, सार्वभौमत्वाचा आणि पर्यावरणीय प्रश्न, मानवी आरोग्याला धोका अशी आहेत. त्यातच पर्यावरणीय प्रश्नांकडे आपल्याला फार तुच्छतेने बघायची सवय आहे. त्यामुळेच जैतापूर प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांची फार चर्चा झाली नाही. अणु अपघातामुळे संपूर्ण परिसर बेचिराख होण्याचा धोका असतोच. चेर्नोबिल आणि फुकुशिमा अणु अपघातांमुळे हे सर्वांनी बघितलेच आहे, परंतु अणुभट्टी सामान्य अवस्थेत सुरू असतानाही त्याचे पर्यावरणावर परिणाम होत असतात.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प जड्या माडबनच्या पठारावर प्रस्थापित आहे. ते पठार जांभ्या दगडांनी बनलेले आहे. या पठारावरील जैवविविधता अमूल्य आहे. जून ते ऑक्टोबर या महिन्यांत बहरलेली फुले, पाने, एडमिक (फक्त अशाच पठारांवर होणारी) यामुळे हे पठार गजबजते. दर पंधरा-वीस दिवसांनी बदलणारी फुलांची विविधता, त्यावर बहरणारे किटक, पक्षी हे एकमेवद्वितीया आहे. या पठारावर रानडुक्कर, भेकर, बिबळे, खवले मांजर, साळींदर आदी वन्य जीवांचाअधिवास होता. आता कंपाऊंड भिंत बांधताना आणि रस्त्याचे काम करताना हे प्राणी गायब झाले. अधिवास गेल्यावर प्राणी नष्टच होतात. अर्थात, विकासपुढे हे क्षम्यच वाटत असावे. शासनाला. आता नैसर्गिक फुलोरा, या पावसात माडबन पठारावर आला असेल का? पण नक्कीच कमी झाला असेल. त्याचं ऑडिट कुणी केले असेल का? शक्यता नाही. प्रकल्पाला लागणार्‍या पायासाठी माडबन पठारावर तीन मोठ्या आकाराचे आणि खोलीचे खड्डे करण्यात आले. यामुळे जांभ्या दगडाच्या संरचनेत फरक होऊन पाण्याच्या प्रवाहांमध्ये बदल घडून आला. त्याचा परिणाम माडबन आणि घानिवरे गावातील विहिरींतील पाण्यावर झाला आहे.

प्रकल्पातून दररोज 5200 कोटी लिटर गरम पाणी समुद्रात सोडण्याचे प्रस्तावित आहे. समुद्रातूनच हे पाणी घेऊन भट्टया थंड करण्यासाठी वापरून ७ अंश ते जास्त वाढीव तापमानाला पुन्हा समुद्रात सोडल्याने समुद्री जीव नष्ट होतील. मुख्य म्हणजे समुद्री शैवाल (झू प्लॅक्टन, फायटो प्लॅक्टन) जे अगदी छोट्या माशांचे व समुद्री जीवांचे अन्न असते, तेच नष्ट झाल्यावर पुढची जैव साखळी संपुष्टातच येईल. दिवस-रात्र हे गरम पाणी समुद्रात फेकण्याची क्रिया सातत्याने सुरूच राहिल्यावर परिसरातील समुद्रात ‘सागरी वाळंवटे’ निर्माण होती. त्याचा परिणाम या भागातील मच्छीमार समाजावर होऊन ते देशोधडीला लागतील. विजयदुर्ग खाडी आणि जैतापूर खाडीच्या किनार्‍यावरील साखरी नाटे, तुळमुदा, नवानगर,विजयदुर्ग, कातळी, इंगळवाडी आदी गावांना याचा फटका पडेल. अणुऊर्जा प्रकल्प परिसरातील समुद्रात मासेमारी प्रतिबंधित क्षेत्रही असते. त्यात ही सर्व गावे भरडली जातील. ज्याने पिढ्यानपिढ्या या समुद्रावर हक्क गाजविला तो अणुऊर्जेला बळी पडेल. गरम पाण्याने संपूर्ण परिसरातील तापमान वाढलेले असेल. या वाढीव तापमानाचा परिणाम येथील प्रसिद्ध हापूस आंब्यांच्या बागायतीवर होईल. जागतिक हवामान बदलामुळे आंब्याचे पीक असेच धोक्यात आले असताना, परिसरातील तापमान वाढीचा फटका येथील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या हापूस आंब्यालाच बसेल.

मासेमारी आणि आंबा या मुख्य उत्पादनांना अणुभट्टीतून कायम सुरू असणार्‍या किरोणत्सारी गळतीमुळे धोका आहेच. मुख्य मोसमात जर किरणोत्सारची अफवाही आली तरी, कोकणातील हापूसचे मार्केट संपून जाईल. किरणोत्सारी आंबा, काजू व मासे कुणीही विकत घेणार नाही. माडबनच्या पठाराची उंची समुद्र सपाटीपासून 80 फूट आहे. शास्त्रज्ञ काकोडकर यांच्या सहीत सर्वच अणुतंत्रज्ञ विधिमंडळातही सांगत होते की, सुरक्षित त्सुनामी उंची 21 फूट आहे. परंतु जांभ्या दगडाचा भाग माडबन पठारावर अगदी समुद्री सपाटीच्याही खाली आहे. जांभा हा सच्छिद्र दगड असल्याने त्यावर अणुभट्ट्यांचा पाया होऊ शकत नाही. त्यामुळे संपूर्ण 80 फूट आणि काळा दगड (बेसॉल्ट) लागेपर्यंत समुद्र सपाटीचा भागच कापून काढावा लागेल. यामुळे निर्माण होणारा करोडो टन कचरा शेवटी टाकणार कुठे? त्याचे पर्यावरणीय परिणाम भयंकर असतील. सध्यातरी केंद्रीय पर्यावरण खात्याने समुद्रात कचरा टाकण्यास मनाई केली आहे.

किरणोत्सराच्या परिणामामुळे पक्षी, कीटक व इतर सजीवांवर परिणाम होतच असतात. परंतु, अणू आस्थापने त्याचा योग्य अभ्यास करीतच नाहीत व काहीही परिणाम नाही असे, सरासर खोटे बोलतात. या प्रकल्पापासून निघणारी वीज वाहून न्यायला ट्रान्समिशन टॉवरसाठी कित्येक एकर जमीन लागेल. राष्ट्रीय ग्रीड ला ‘कराड’ येथे पोहचण्यास पश्चिम घाटाच्या जंगलातून जावे लागेल. लाखो वृक्षांची कत्तल होऊन, वन्य जीवांची होरपळ होईल. असे एक ना अनेक गंभीर परिणाम पर्यावरणावर जर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प अस्तिवात आला तर होतील. तेव्हा वेळीच हा रखडलेला विघातक प्रकल्प, जनतेने विरोध करून रद्द करण्यास शासनास भाग पाडले पाहिजे.


-सत्यजित चव्हाण