यापुढेही असावा जनता कर्फ्यू

Mumbai
संपादकीय

करोनाला पायबंद घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची हाक दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याचे राजकारण न करता जनता कर्फ्यूत सहभागी होण्याचे आवाहन केले. या आवाहनास सर्वत्र अपेक्षेप्रमाणे भरभरुन प्रतिसाद लाभला आणि ‘न भूतो…’ असे चित्र देशाने अनुभवले. एरव्ही ज्या रस्त्यांवर चालण्यासाठीही जागा नसते, ते रस्ते अक्षरश: ओस पडलेले दिसत होते. रेल्वे स्टेशन्स, बस स्थानके, मंदिरे, मशिदी, चर्च, आठवडे बाजार आणि अन्य गर्दीच्या ठिकाणांवर रविवारी शुकशुकाट होता. दुपारपर्यंत लोकल सुरू होत्या. मात्र, त्या प्रवाशांविनाच धावत होत्या. भारतीय नागरिकांच्या सुजाणतेचे प्रतिक म्हणून या कर्फ्यूकडे बघितले गेले. भारतीयांच्या या समजदारीमुळे करोना विषाणूंचा रविवार कदाचित उपासमारीत गेला असेल. ही उपासमारी वाढवली तर स्वाभाविक ते नष्ट होण्यास सुरुवात होईल. इतक्या साध्या तर्कावर जाहीर केलेला हा कर्फ्यू मोदींच्या आजवरच्या निर्णयातील सर्वोच्च परिणामकारकता साधणारा ठरावा, अशी अपेक्षा आहे. रविवारचा जनता कर्फ्यू ही खरंतर पुढील दिवसांतील व्यवहार थांबवण्याची रंगीत तालीमच समजायला हवी. जो घरात राहील तोच यापुढील काळात जगू शकेल हेदेखील प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. भारताला आता चीनच्या हुकूमशाहीचा आदर्श ठेवावा लागेल. करोनाबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील. भारतात करोना विषाणुंची लागण झालेल्यांची संख्या वाढत असतानाच, भारत हे करोना विषाणूचे पुढील मुख्य केंद्र ठरू शकते, अशी चिंता वाढवणारी शक्यता वॉशिंग्टनस्थित ‘सेंटर फॉर डिसिज डायनॅमिक्स, इकोनॉमिक्स अँड पॉलिसी’चे संचालक तसेच प्रिन्सटन विद्यापीठातील प्रा. डॉ. रामानन लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपल्याला अधिक सावध पाऊले उचलावी लागतील. २० टक्के ते ६० टक्के लोकसंख्येला करोना विषाणुंची लागण होऊ शकते हा अमेरिकेने स्वत:बाबत व्यक्त केलेला अंदाज भारतात लागू केला, तर ६० टक्के भारतीयांना म्हणजेच ७० ते ८० कोटी लोकांना करोनाची लागण होऊ शकते, अशी शक्यता लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केली. मात्र, यातील बहुसंख्य लोकांमध्ये विषाणुंचे सौम्य परिणाम दिसतील, थोड्या लोकांमध्ये हा आजार तीव्र स्वरूप धारण करेल आणि फार थोड्या लोकांना यामुळे प्राण गमवावे लागतील, असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे आता भारतीयांना स्वयंशिस्त लावावी लागणार आहे. खोकल्यातून, रस्त्यावर थुंकण्यातून करोना विषाणू पसरतो याविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली आहे. मात्र, अजूनही काही मंडळी हे ऐकायलाच तयार नाही. बेफिकीरपणाच्या त्यांच्या अशा सवयीमुळे त्यांचे रस्त्यावर थुंकणे सुरूच आहे. थेट समाजालाच संपवायला निघालेल्या अशा विकृतांवर कायद्याने कारवाई करण्याची वेळ आली आहे. कारण, अशा परिस्थितीत संकट वाढले तर फक्त सरकारला कसे जबाबदार धरता येणार? हा विषाणू मानवी संपर्काद्वारे पसरतो आणि ताज्या माहितीनुसार त्याचे आयुष्य आधी सांगितल्याप्रमाणे आठ नव्हे तर तब्बल चोवीस तास आहे. त्यामुळे आपण स्वच्छतेचे नियम पाळणे, सजग राहणे आणि गर्दी टाळणे हे त्यावरचे परिणामकारक मार्ग आहेत. लोक एकमेकांपासून दूर राहिले तर रोग प्रसाराची गती कमी होईल आणि त्यामुळे रुग्णांचा आकडा फुगण्याची शक्यता कमी-कमी होत जाईल. यामुळे रुग्णालयांवरचा ताण अचानक न येता तो जास्त काळासाठी पसरत जाईल.करोनामुळे सर्वत्र भीती आणि चिंतेचे वातावरण असले तरी सर्वसामान्य नागरिकांना हातपाय गाळून चालणार नाही. सरकारी उपाययोजनांना सक्रिय प्रतिसाद देण्याचे एकमेव काम सर्वसामान्यांनी केले तरीही भविष्यात येऊ घातलेल्या संकटाची तीव्रता कमी होऊ शकते. काही महिन्यांपूर्वी चीनमधल्या वुहानमध्ये जेव्हा करोना व्हायरस प्रथम आढळला, तेव्हा तो रोग म्हणजे न्युमोनिया नसून काहीतरी वेगळाच आहे आणि त्यावर उपचार नाही, हे कळेपर्यंत तो अनेकांना झालासुद्धा होता. त्यामुळेच अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर आधी चीन आणि मग जगाची झोप उडाली. वुहान शहरात करोना विषाणूने चार हजारांवर बळी घेतले. या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन केले गेले. तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आली. बसेस, रेल्वे, मेट्रो सगळे बंद केले. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी कठोर उपाय योजले. परिणामी वुहान शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी-कमी होऊ लागली. दुसरीकडे मात्र, परिस्थिती काही वेगळीच आहे. महाराष्ट्राचाच विचार करायचा झाल्यास येथील रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आजवर बेरजेतच रस दाखविणारा हा विषाणू गुणाकाराकडेही वळेल. तशी दाट शक्यता आता निर्माण होत आहे. मात्र, चीनकडे जो पूर्वानुभव नव्हता तो आपल्याकडे आहे ही तेवढी एक जमेची बाब म्हणावी लागेल. परदेशात करोनाशी सामना करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्यांची परिणामकारकता किती आहे याचा अभ्यास करण्याची संधी भारताकडे आहे. त्यातून या उपाययोजना भारतातही लागू करत सावरण्यासाठी पुरेशी संधी आहे. जनता कर्फ्यूची संकल्पना त्यातूनच आली आहे. चीन, अमेरिका, इराण, स्पेन आणि अन्य करोनाबाधित देशांमध्ये रस्ते ओस पडले, लोकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले तेव्हाच या आजारावर नियंत्रण येऊ शकते, असा तेथील सरकारचा आत्मविश्वास बळावला. त्याच धर्तीवर जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता. आता हळूहळू सरकार एक-एक निर्णय जाहीर करेल, जेणेकरून गर्दी कमी होईल. प्रत्येक निर्णयाचे तंतोतंत पालन करण्याचे कर्तव्य सर्वसामान्यांचे आहे. गेल्या महिनाभरात संपूर्ण चीन अक्षरशः बंद पडलेय. लोकांना स्वतःची संपूर्ण सोय करून घरांमध्येच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हेच आदेश यूकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीही दिले आहेत आणि तीच आदेशवजा विनंती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. घरांमध्येच राहा, अनावश्यक प्रवास आणि बाहेरील संपर्क टाळा. या आदेशाचे पालन करणे हे सर्वांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य समजावे इतकेच!