घरफिचर्सविचार काय करता सामील व्हा!

विचार काय करता सामील व्हा!

Subscribe

देशाला बसलेला करोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. आज देशात दुसर्‍या स्टेजचा करोना आहे. इतर देशांचा अनुभव बघता याच स्टेजला जर करोना रोखला नाहीतर तिसर्‍या स्टेजचा करोना हाताबाहेर होतो. काही दिवसांतच हजारो जणांना या विषाणूंची लागण होते. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढते. त्यामुळे दुसर्‍या स्टेजलाच करोनाची शृंखला तोडणे आवश्यक आहे. तिसर्‍या स्टेजपर्यंत भारतीयांना जाऊच नये, यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची हाक दिली आहे. गुरुवारी दूरदर्शनवरून देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत स्वत:हून कर्फ्यू पाळावा, स्वत:ला घरात कोंडून घ्यावे, घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. या जनता कर्फ्यूमुळे देशात कुठेही गर्दी होणार नाही आणि करोनाची शृंखला आपोआप तुटेल, हे त्यामागील कारण आहे. विशेष म्हणजे करोना रोखण्यासाठी सध्यातरी कोणतेही औषध नाही. एकमेकांपासून होणारा संसर्ग टाळणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. अशाप्रकारे संसर्ग टाळायचा असेल तर एकमेकांच्या संपर्कात न येणे हेच करोनाविरुद्धच्या लढाईचे आपल्या हाती एकमेव शस्त्र आहे. त्यामुळे त्याचाच वापर करून आपल्याला ही लढाई लढावी लागणार आहे. मात्र, जर कोणी हे शस्त्रच हाती घेणे टाळले, तर मात्र करोनाचा पराभव शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून देशातील जनतेला हेच शस्त्र हाती घेण्यास सांगितले आहे. अर्थात त्यात कोणतेही राजकारण न पाहता प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या, आपल्या कुटुंबियांच्या, मित्रमंडळींच्या आणि देशातील नागरिकांच्या हिताच्यादृष्टीने सहभागी व्हायला हवे. मात्र, हे शस्त्र तेव्हाच हाती धरले जाऊ शकते जेव्हा संकल्प आणि संयम या दोन गोष्टींचा अंगीकार केला जाईल. घरातून बाहेर न पडणे हे वाटते तितके सोपे नाही. त्यासाठी दृढसंकल्पाची गरज आहे. तसेच स्वत:वर संयम हवा. हा संयम आणि संकल्पच करोनाविरुद्धच्या लढ्याला मोठे बळ देणार आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाने करोनाविरुद्धच्या या लढाईत सहभागी व्हायला हवे.आज करोना ज्या स्थितीत आहे ती स्थिती कडेलोटाची आहे. तेथून मागे फिरायचे की स्वत:चा, आपल्या कुटुंबियांचा, मित्रमंडळींचा, समाजाचा, देशाचा कडेलोट होऊ द्यायचा, याचा विचार प्रत्येकाने सद्विवेकबुद्धीने करायला हवा. अवघे जग आजकाल करोनाच्या भयगंडाने पछाडलेले आहे. हा विषाणू कुठून येऊन आपल्या प्राणाशी संकट होईल हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे त्याच्या भयाने अमेरिकेतही घबराट पसरलेली आहे, पण हा करोना व्हायरस थेट कुठल्या माणसाचा बळी घेत नाही किंवा जीवावर उठत नाही, तर ज्यांचे वय अधिक आहे आणि ज्यांच्या देहातली प्रतिकारशक्ती दुबळी झालेली आहे, त्यांना करोनाची बाधा प्राणघातक टोकाला घेऊन जात असते. आतापर्यंत जगभर ज्यांचे बळी करोनाने घेतले असे म्हटले जाते, त्यात प्रामुख्याने वयोवृद्धांचा भरणा जास्त आहे. एका बाजूला वाढलेले वय आणि थकलेले शरीरावयव, तसेच अधिक कुठल्या ना कुठल्या घातक आजाराची बाधा असली, तर मग करोना प्राणघातक ठरत असतो. मधूमेह, रक्तदाब, किंवा श्वसनाचा कुठलाही आजार करोनाला प्राणघातक बनवित असतो. साहजिकच अशा कुठल्याही वयोवृद्धांना वा आजाराने थकलेल्यांना संसर्गापासून दूर ठेवणे, हा उपाय मानला गेलेला आहे. उलट तसा धोका पत्करणे म्हणजे संकटाला आमंत्रण देणेच आहे.करोना विषाणूंच्या संसर्गाने संपूर्ण जग चिंताग्रस्त झाले आहे. जगातील चाळीसहून अधिक देशांमध्ये त्या त्या देशातील राज्यव्यवस्था समस्येकडे युद्धपातळीवरून हाताळण्याची तयारी करत आहे. चीनच्या बव्हंशी सर्व महत्त्वाच्या प्रांतांपर्यंत पोहचलेल्या या व्हायरसमुळे २०० हून अधिक शहरे दोन महिन्यांहून अधिक काळासाठी पूर्णत: बंद ठेवावी लागली आहेत. यातूनच जगाची बॅकडोअर फॅक्टरी म्हणून मिरवणार्‍या चीनमधील उत्पादन व्यवस्था ठप्प झाल्याने मालाच्या पुरवठ्यासाठी जग हवालदिल झाले आहे. स्वस्त मिळतात म्हणून चिनी कंपन्यांकडे उत्पादन व्यवस्था देऊन पाश्चात्य जग निश्चिंत मनाने केवळ व्यापारावर एकाग्र झाले असतानाच हा प्रचंड मोठा हादरा बसत आहे. एकवेळ अणुबॉम्ब पडला तर जितके क्षेत्र प्रभावित होणार नाही त्याच्या कित्येक पटीने मोठ्या विस्तारातील भूभागात हे निसर्गनिर्मित की मानवनिर्मित संकट पसरले आहे, पण उत्पादनव्यवस्था मात्र एका देशापुरती सीमित झाली असल्याने हा फटका अधिक जाणवत आहे. २००३ साली आलेल्या सार्सच्या साथीची आज लोकांना आठवण येणे स्वाभाविक आहे. सार्स आणि करोना साथीची तुलना जर आर्थिक क्षेत्रासाठी केली तर लक्षात येईल की त्यावेळी चीन जगाच्या जीडीपीमध्ये सुमारे ४.२% एवढा हिस्सा देत होता. आज हा हिस्सा १७% वर गेला आहे. साहजिकच सर्वांनाच चिमटा बसत आहे. त्याचे प्रतिबिंब आपल्याला जगभरच्या शेअर मार्केटमध्ये दिसत असून एकजात सर्व ठिकाणी मार्केट कोसळल्याचे पहायला मिळत आहे. चीनसारखी स्थिती आपल्या देशाची होऊ नये, अशी देशातील प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. मग त्यानुसार कृती करणे महत्त्वाचे आहे. कारण करोनाचा विषाणू तुमची जात, धर्म, प्रांत, भाषा, समाज बघत नाही. तो बाधित व्यक्तीकडून सदृढ व्यक्तीकडे संक्रमित होतो. अशा संक्रमण अवस्थेतच त्याला रोखले तर करोना रोखला जाऊ शकतो. तेच त्यावरील एकमेव औषध आणि जालिम उपाय आहे. एका वाहिनीवर करोनाच्या संदर्भातली चर्चा होती. त्या चर्चेत देशातील नामांकित डॉक्टर सहभागी झाले होते. डॉ. प्रताप रेड्डी हेही त्या चर्चेत सहभागी झालेल्यांपैकी एक होते. त्या चर्चेत डॉ. रेड्डी यांनी एक मार्मिक वाक्य सांगितले. ते म्हणाले की, करोनाला अटकाव करण्यासाठी प्रत्येक देशात सरकारी पातळीवर उपाययोजना केल्या जातात. त्यात सहभागी होणे हे प्रत्येकाचे नागरिक म्हणून आणि राष्ट्रीय कर्तव्य असते. मात्र, अशा कालखंडात जे लोक उपाययोजनेचे घटक नसतात, ते आपोआप समस्येचा हिस्सा होऊन जात असतात. आता आपण उपाययोजनेचे घटक व्हायचे की समस्येचा हिस्सा याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे अथवा विचारधारेचे याबाबत करोनाला काहीही घेणेदेणे नाही. जोपर्यंत तुम्ही मानवी शरीर धारण केलेले आहे तोपर्यंत तो तुमच्यावर हल्ला करणार. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठल्या विचारधारेचे, त्यांचे विचार तुम्हाला पटोत अथवा न पटोत किंवा तुम्ही मोदींना पाण्यात बघा नाहीतर अजून कुठे बघा, त्याच्याशी देशाच्या जनतेला कर्तव्य नाही. आता प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य हे करोनाचा प्रसार होण्यापासून रोखणे आहे. झालंच तर त्याला जनता कर्फ्यू हे नाव देऊ नका, पण घरी बसा.. उपाय योजनांचा हिस्सा बनण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. नाहीतर तुम्ही आपोआप समस्येचा हिस्सा होऊन जाल. अशा समस्येचा जिचा आजतरी विज्ञानाकडे तोडगा नाही. मग तुम्ही कितीही विज्ञानवादी अथवा अंधश्रद्धाळू असाल तरीही संपूर्ण एक दिवस घरात बसून राहणे हेच उत्तर आहे. मग काय निर्धार करा आणि रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत घरातून बाहेर पडू नका..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -