घरफिचर्सकलियुगातला वादग्रस्त 'राम'

कलियुगातला वादग्रस्त ‘राम’

Subscribe

भाजप आमदार राम कदम यांची आतापर्यंतची वादग्रस्त कारकिर्द पाहता हा कलियुगातला वादग्रस्त राम आहे की काय? असा प्रश्न निर्माण होतो.

दहिहंडी उत्सवात महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सध्या भाजपाचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम चर्चेत आहेत. त्यांच्यावर आता चहुबाजूने टीका होत आहे. मात्र स्वत:ला दयावान आणि डॅशिंग म्हणवून घेणाऱ्या राम कदमांचे प्रताप पाहिले तर तुमच्याही डोळ्यांचे पारणे फिटेल. तसे वाद आणि राम कदम यांचे नाते जुनेच आहे. पूर्वाश्रमीच्या मनसे या पक्षात असताना देखील राम कदम येन केन प्रकारे चर्चेत राहायचे. मतदारसंघात जरी दानशूर म्हणून राम कदम फेमस असले तरी राजकीय वर्तुळात मात्र ते वादग्रस्त राहिले आहेत. त्यामुळे कलियुगातला राम ‘वादग्रस्त’ आहे काय? असा सवाल देखील उपस्थित होतो.

नवा वाद काय आहे? 

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ५४ सेकंदाचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला होता. यामध्ये राम कदम यांनी म्हटले की, “तुम्हाला पसंत असलेली मुलगी पळवून आणू आणि तुम्हाला देऊ”, असे वक्तव्य केले आहे. तसेच गोविंदांना चेव आणण्यासाठी त्यांनी आपला फोन नंबरही दिला. ‘साहेब मी तिला प्रपोज केलं. ती मला नाही म्हणतेय. मला मदत करा’, या कामासाठीही मी तुमची मदत करायला तयार आहे, असे राम कदम सांगून बसले. यावर उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे लक्षात येताच राम कदम यांनी स्वतःला सावरत स्पष्टीकरणही दिले. ‘मी शंभर टक्के मदत करणार. आधी तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायचं. तुमचे आई-वडील म्हटले की, आम्हाला ही पोरगी पसंत आहे. तर काय करणार मी? तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार’ असे त्यांनी सांगितले. ही मुक्ताफळे उडवल्यानंतर चौफेर टीका झाली आणि त्यानंतर उशीरा त्यांनी दिलगीरी व्यक्त केली. मात्र अद्याप माफी मागितलेली नाही.

- Advertisement -

घाटकोपरमध्ये रेशनिंग अधिकाऱ्याला मारहाण

आधी मनसेमध्ये आणि आता भाजपामधून राम कदम आमदार आहेत. मनसेमध्ये असताना घाटकोपर येथे रेशनिंग कार्यालयातील अधिकारी महेश पाटील यांना २०१३ मध्ये त्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे त्यांना विक्रोळी न्यायालायात न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. यावेळी राम कदम यांच्यावर पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद क्रमांक २१/ २०१३ अंतर्गत  भा. द. वि. कलम १०७, ३५३, १४१, १४३, १४७, १४९, ३३६, ३३२, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सरकारी कामात हस्तक्षेप, कर्तव्यावर असलेल्या सरकारी अधिकाऱ्याला धमकावणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.

विधानभवनातच पोलिस अधिकाऱ्याला मारहाण

२०१३ मध्ये विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना विधान भवनातच राम कदम यांनी पोलिस अधिकारी सचिन सुर्यवंशी याला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी राम कदम यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या या कृत्यावर तेव्हा मनसेकडून आक्षेप घेण्यात आला होता.

- Advertisement -

भारिप बहुजन महासंघाच्या ३ कार्यकर्त्यांना मारहाण

२०१४ साली श्रीलंकेहून गौतम बुद्धांच्या अस्थी आणल्याचा दावा आमदार राम कदम यांनी केला होता. तसेच विक्रोळी, घाटकोपरमध्ये बॅनरबाजी करून १८ ते २० एप्रिल २०१४ दरम्यान या अस्थींच्या दर्शनासाठी त्यांनी आपल्या घरी दलित बांधवांना आमंत्रण दिले होते. या अस्थींबाबत जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेलेल्या भारिप बहुजन महासंघाच्या तीन तरुण कार्यकर्त्यांना राम कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. या वेळी कदम यांनी जातीवाचक शिवीगाळ करत कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी राम कदम यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भाजपामध्ये बाहेरून आलेले गुण उधळतायेत

दरम्यान दहीहंडी उत्सवात महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांच्यावर आता सगळीकडून टीका होत आहे. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने देखील आता राम कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांनी देखील राम कदम यांच्यावर टीका केली आहे. भाजपामध्ये बाहेरून आलेले अनेक नेते गुण उधळत असून, त्यांच्या शुद्धिकरणाचे काम सुरू असल्याची टीका अनिल परब यांनी केली आहे.

तो व्हिडिओ अर्धवटच दाखवला – राम कदम

मी काय बोललो, याचा व्हिडिओ अर्धवटच दाखवला आणि व्हायरल केला. तरी सुद्धा त्याचे विवेचन न करता महाराष्ट्रातील सगळ्या माता-भगिनी यांचा सन्मान माझ्यासाठी लाखमोलाचा आहे, सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे कोणताही खुलास न करता अत्यंत नम्रपणे मी दिलगीरी व्यक्त करतो, असे सांगणारा नवा व्हिडिओ राम कदम यांनी व्हायरल केला आहे. प्रश्न असा आहे की, हा लेख अपलोड होईपर्यंत त्यांनी अद्याप माफी मागितलेली नाही.

भाजपाच्या इतर नेत्यांचे सोयीस्कर मौन

दरम्यान राम कदम यांच्या या वादग्रस्त विधानावर भाजपाच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी मात्र सोयीस्कर मौन पाळले आहे. खासदार किरीट सोमय्या आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना आपलं महानगरने या सर्व प्रकाराबद्दल विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -