घरफिचर्सबडी लंबी जूदाई ....

बडी लंबी जूदाई ….

Subscribe

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन ऐंशी दिवस झाले. त्याचवेळी शिवसेना भाजपची युतीही तुटली. राज्यात भाजप विरोधी पक्षात बसली. पण कल्याण डेांबिवली महापालिकेत हे चित्र साधारण ऐंशी दिवसानंतर पाहावयास मिळाले. दोन दिवसांपूर्वीच केडीएमसीच्या महासभेतच शिवसेना भाजपनेही घटस्फोट घेतला. भाजपने विरोधी बाकावर बसण्याची भूमिका घेत, विरोधी पक्षनेतपदावर दावा केला. या सर्व राजकीय नाटय महासभेत घडामोडी असतानाच, त्याच महासभेत एका छोटया गायिकेचा महापौरांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला. सूर नवा ध्यास पर्व ३ ची राजगायिका मान मिळविल्याने डोंबिवलीतील तुकारामनगर परिसरात राहणारी अक्षय्या अय्यर हिचा सन्मान करण्यात आला. महासभेतच अक्षय्याला गाणं बोलण्याची संधी मिळाली. ” चार दिनोंका प्यार हो रब्बा, बडी लंबी जुदाई …हे हिरो चित्रपटातील गाणं तिने आपल्या मधूर स्वरात गायलं आणि सर्वांचीच वाह,वाह मिळवली. हे सांगण्याचा तात्पर्य म्हणजे, ज्या महासभेत गेल्या २५ वर्षापासून मित्रपक्ष असलेली शिवसेना- भाजपची जुदाई आणि त्याच सभेत अक्षय्या हिने गायलेलं हे गाणं हा योगायोगच ठरला.

कल्याण डोंबिवली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये होणार आहे. त्या अगोदरच भाजप सत्तेतून बाहेर पडली आहे. आता आरोप प्रत्यारोप करायला मोकळी झाली आहे, हेच काल- परवाच्या सभेतून दिसून आलंय. आठवडाभरापूर्वी डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन, शहरातील रखडलेल्या प्रकल्पाविषयी आंदोलनाचा इशारा दिला. खरं तर हा शिवसेनेलाच अप्रत्यक्ष इशारा म्हणावा लागेल. पण गेली साडेचार वर्षे भाजपने शिवसेनेबरोबर राहून सत्तेची फळं चाखली आहेत. मग शिवसेनेकडे बोटं दाखवताना भाजपलाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळेच कदाचित आमदारांनी शिवसेनेकडे बोट न दाखवता प्रशासनाला जबाबदार धरलं आहे.

- Advertisement -

कल्याण डोंबिवली हा शिवसेना भाजपचा बालेकिल्ला म्हणूनच एाळखला जातो. त्यामुळे इथले आमदार, खासदार आणि महापालिकेतील सत्ताही शिवसेना- भाजपकडेच राहिली आहे. मध्यंतरीच्या काळात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही डोंबिवली हे सर्वात घाणेरडे शहर असा उल्लेख करीत, सत्ताधा-यांचे कान टोचले होते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही स्वच्छतेवरून सत्ताधा-यांची कानउघाडणी केली. पण त्यातून सत्ताधा-यांनी कोणताच धडा घेतलेला दिसून येत नाही. मात्र महापालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी आधारवाडी कचरा डेपोवर जाऊन पाहणी करीत स्व्च्छतेला प्राधान्य दिलं आहे.

शहर घाणेरडे असेल तर मग हे अपयश प्रशासनाचे एकटयाचे कसे ? प्रकल्प रखडले असतील तर मग सत्ताधारी त्याला जबाबदार नाही का ? असा प्रश्न सामान्य नागरीकाला पडणे साहाजिकच आहे. जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतशी शिवसेना भाजपमधील संघर्ष वाढणार हे निश्चितच आहे. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या मागणीला आता चांगलाच रंग चढू आला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात सर्वपक्षीयांची बैठक पार पडली. मंत्रीमहोदयांनी सर्वांची मते जाणून घेतली आहेत. हा अहवाल ते मुख्यमंत्रयाकडे सादर करणार आहेत. त्यामुळे २७ गावांचा निर्णय हा मुख्यमंत्रीच जाहीर करतील हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंतचा गावे वगळण्याच्या आणि समाविष्ठ करण्याचा निर्णय हा त्या त्या काळातील मुख्यमंत्रयानीच घेतला आहे. फडणवीस सरकारच्या काळात २७ गांवाच्या स्वतंत्र नगरपालिकेचा निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे ठाकरे सरकारच्या काळात हा निर्णय होऊन महाविकास आघाडी हे श्रेय घेऊ शकते.

- Advertisement -

महापालिकेतील मनसेकडील विरोधी पक्षनेतेपद हे आता भाजपकडे आले आहे. भाजपचे राहूल दामले यांच्या गळयात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडली आहे. खरं तर दामले यांनी उपमहापौरपद, स्थायी समितीचे सभापतीपद, भाजपचे गटनेतेपद पक्षाचे विविध पद भूषवली आहेत. त्यामुळे एकाच व्यक्तीला किती पद देणार, पक्षात अजून केाणी नाही का ? असा प्रश्न पक्षातील नगरसेवकांच्या मनात उपस्थित होणे साहाजिकच आहे. भाजपच्या कल्याण जिल्हाध्यक्षपदी शशिकांत कांबळे यांची निवड झाली आहे. बहुजन समाजातील व्यक्ती भाजपचा अध्यक्ष बनला ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे.

पण सहा महिन्यांवर येऊन ठेपलेली निवडणुकीत त्यांचीही कसोटी लागणार आहे. यश, अपयशाचे धनी त्यांना व्हावे लागेल हे विसरून चालणार नाही. १९९५ साली महापालिकेची पहिली निवडणूक पार पडली. शिवसेना भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढली. त्यावेळी शिवसेनेने अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यावेळी भाजप विरोधी पक्षात होती. कधी युती करून, तर कधी स्वतंत्रपणे निवडणूका लढविल्या आहेत. त्यानंतर दोघेही पक्ष सत्तेसाठी एकत्रीत आले आहेत. त्यामुळे शिवसेनेशिवाय भाजपने निवडणूक लढवलेली आहे. मात्र यावेळी शिवसेनेबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची साथ आहे. त्यामुळेच भाजपने मनसेशी संधान साधत असल्याचे दिसून येतय. ज्यांनी साडेचार वर्षे शिवसेनेबरोबर सत्तेची फळं चाखली, ती भाजप सहा महिने विरोधी पक्षाच्या भूमिकेत असणार आहे. त्यामुळे ते विरोधी पक्षाची भूमिका व्यवस्थितपणे बजावू शकतील का ? त्या भूमिकेला न्याय देऊ शकतील का ? हाच खरा प्रश्न आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -