घरफिचर्स...नाहीतर शिवसेनेशिवाय निवडणूक लढवीन - केदार दिघे

…नाहीतर शिवसेनेशिवाय निवडणूक लढवीन – केदार दिघे

Subscribe

‘माय महानगर’च्या ‘खुल्लम खुल्ला’ या स्पेशल शोमध्ये राजकीय, सामाजिक, मनोरंजन, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातून विविध मान्यवरांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात येतं. यावेळी शिवसेनेचे ठाण्यातील दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी निलेश राणेंचे बाळासाहेबांवरील आरोप, पक्षात कधीच न मिळालेलं पद, ठाण्यात शिवसेनेची होत असलेली पीछेहाट अशा सर्वच मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हयातीमध्ये ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र त्यानंतर शिवसेनेला मोठी आव्हानं उभी राहिली. दरम्यानच्या काळात शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाकडून अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मात्र, दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना देखील संधी मिळाली. मात्र, खुद्द आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना मात्र आजतागायत पक्षाकडून कोणत्याही पदाची जबाबदारी किंवा निवडणुकांची उमेदवारी दिली गेली नाही. पक्षाच्या याच भूमिकेवर केदार दिघेंनी नाराजी व्यक्त करताना ‘झालं तर शिवसेनेसोबत नाहीतर शिवसेनेशिवाय हा केदार दिघे निवडणूक लढवणारच’, अशा स्वरुपाची घोषणा केली आहे. mymahanagar.comच्या फेसबुक लाइव्हवर ‘खुल्लम खुल्ला’ या स्पेशल शोमध्ये केदार दिघे यांनी शिवसेनेवरची त्यांची नाराजी जाहीररित्या बोलून दाखवतानाच २०१९च्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा संकल्प बोलून दाखवला.

‘शिवसेनेवर माझा विश्वास, पण…’

‘शिवसेनेकडून मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. अजूनही माझा शिवसेनेवर विश्वास आहे. पण जर २०१९ला मला शिवसेनेनं उमेदवारी नाही दिली, तरी मी निवडणूक लढवणार हे मात्र नक्की,’ असा निर्धार यावेळी बोलताना केदार दिघे यांनी व्यक्त केला. तसेच, ‘आमदारकी हे माझं कधीच उद्दिष्ट राहिलं नाही. गेल्या १८ वर्षांत मी कधीही शिवसेना नेतृत्वाकडे उमेदवारी मागायला गेलो नाही. पण जेव्हा ठाण्यातच शिवसेनेचे आमदार, नगरसेवक पडतात, तेव्हा मात्र मला निवडणुकीत उतरणं आवश्यक वाटतं. ठाण्याच्या विकासासाठी मला आमदार व्हायचंय’, असं देखील केदार दिघे यावेली म्हणाले.

- Advertisement -
Kedar Dighe
केदार दिघे

मनसेच्या आमदारकीच्या ऑफरचं काय?

यावेळी केदार दिघेंना मनसेच्या अविनाश जाधव यांनी दिलेल्या आमदारकीच्या ऑफरविषयी देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मात्र, ‘जर-तरच्या मुद्द्यांवर बोलण्यात काही अर्थ नसतो. जेव्हा हाती काहीतरी येईल, तेव्हा बोलेन अविनाश जाधव यांनीही फक्त ओपन फोरममध्ये मला मनसेत येण्याचं आवाहन केलंय’, असं उत्तर त्यांनी दिलं.

‘सत्य माहीत असेल, तर समोर आणावं’

यावेळी निलेश राणेंनी आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दल बाळासाहेब ठाकरेंवर केलेल्या आरोपांचा देखील त्यांनी समाचार घेतला. ‘प्रत्येक निवडणुकीत आनंद दिघेंच्या मृत्यूची चर्चा होते. आणि निवडणुक संपली की चर्चाही संपते. त्यांच्याकडे जर खरंच काही सत्य असेल, तर त्यांनी ते समोर आणावं. मी सत्याच्या बाजूने उभा राहीन. पण फक्त त्या मुद्द्यावर निवडणुकांसाठी चर्चा घडवून आणायची हे बरोबर नाही. अशा मुद्द्यांऐवजी आपण विकासाच्या मुद्द्यांवर बोललं पाहिजे’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

‘आनंद दिघेंचा फक्त निवडणुकीसाठी वापर’

आनंद दिघेंचा शिवसेना नेते फक्त बॅनरवर वापर करत असल्याबद्दलही त्यांनी यावेळी खंत व्यक्त केली. ‘मला याची खंत वाटते. २००१ ते २००६ यादरम्यान दिघे साहेबांचे फोटो छोटे झालेले पाहिले. दिघे साहेबांचं व्यक्तीमत्व कोणत्या बॅनरमध्ये एखाद्या छोट्या कोपऱ्यात मावण्यासारखं नाही. ज्या व्यक्तीने आयुष्यभर लोकांसाठी काम केलं, त्यांचे बॅनर व्यवस्थित लावले गेले पाहिजे. इथे नवख्या, काही कामही न केलेल्या कार्यकर्त्यांचे फोटो त्यांच्यापेक्षा मोठे झालेले आहेत. ही खरी खंत आहे’, असं ते म्हणाले.

“दिघे साहेबांनी मला सांगितलं होतं, आपले विचार आणि आपलं मन कायम मोठं ठेवायला हवं. संकुचित विचार ठेवले तर आपण पुढे जाऊ शकत नाही. शिवाय मला वाटतं देशातले जे चांगल्या विचारांचे नेते आहेत, त्यांचे चांगले गुण आपण फॉलो करायला हवेत.”

आनंद दिघेंच्या वेळची शिवसेना वेगळी होती!

‘आनंद दिघे यांच्या वेळची शिवसेना वेगळी होती. ते असताना संबंध वैयक्तिक, आत्मीयतेचे, जिव्हाळ्याचे होते. कार्यकर्त्यांना विश्वास होता. पण आनंद दिघेंनंतर सगळ्या गोष्टींचं व्यावसायिकीकरण झालं. त्यात वैयक्तिक संबंध विरळ होत केले. कार्यकर्त्यांना नेत्यांबद्दल किंवा नेत्यांना कार्यकर्त्यांबद्दल वाटणारी भावना विरळ होत गेली. कार्यकर्त्यांबद्दल नेत्याचे वैयक्तिक संबंध असलेच पाहिजेत. ते आज दिसत नाहीत’, असं केदार दिघेंनी सांगितलं.

केदार दिघे स्वत:चे बॅनर लावत नाहीत!

बुधवारी अर्थात १६ जानेवारी रोजीच केदार दिघे यांचा वाढदिवस देखील होता. मात्र, ‘आपण आपल्या वाढदिवशी बॅनर लावण्याच्या विरोधात आहोत’, असं त्यांनी सांगिलं. ‘मी काही समाजाने माझा मोठा वाढदिवस करायला हवा इतका मोठा माणूस किंवा कार्यकर्ता नाही. आणि माझ्या वाढदिवसाच्या बॅनरमुळे लोकांना त्रास का व्हावा? लोकांना काहीही फरक पडत नाही. उलट तेच पैसे एखाद्या गरजूला किंवा चांगल्या गोष्टीसाठी लावले तर त्याचा काहीतरी उपयोग होईल’, अशी भूमीका त्यांनी मांडली.

Kedar Dighe
केदार दिघे

केदार दिघे आदित्य, राज ठाकरेंमुळे प्रभावित!

दरम्यान, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंमुळे आपण प्रभावित झाल्याचं यावेळी ‘खुल्लम खुल्ला’मध्ये बोलताना केदार दिघे यांनी सांगितलं. ‘शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आणि सगळ्यांशी सहज मिसळून जाण्याचं कसब आदित्य ठाकरेंकडे आहे. तर राज ठाकरेंचं वक्तृत्व आणि त्यांचा अभ्यास हे विशेष आहे. त्यांच्याकडून फार शिकण्यासारखं आहे’, असं ते म्हणाले. तसेच, ‘नितीन गडकरींना देखील त्यांच्या दृरदृष्टीसाठी मी मानतो’, असं देखील त्यांनी सांगितलं.

राज-उद्धव एकत्र यायला हवेत का?

यावेळी ‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं का?’ असा प्रश्न विचारला असता केदार दिघेंनी आधी थोडी सावध भूमिका घेत नंतर स्पष्ट मत मांडलं. ‘आनंद दिघेंचा पुतण्या म्हणून मला वाटतं की या दोघा नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावं. त्यातून दोघांमधले जे गुण असतील, ते एकत्र येऊन मराठी माणसाला योग्य तो न्याय मिळावा’, असं ते म्हणाले.

ठाणेकरांसाठी महत्त्वाच्या समस्या कोणत्या?

केदार दिघेंनी ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचं कौतुक केलं. ‘ठाण्यात संजीव जयस्वाल जे करतायत, त्यांनी ठाण्यात खरंच खूप बदल केले. विशेषत: नवीन ठाण्यात त्यांनी काम केलं’, असं ते म्हणाले. त्यासोबतच ठाण्यातल्या ट्रॅफिक, वीजपुरवठ्यासारख्या प्रश्नांवर त्यांनी मत मांडलं. ‘ठाण्यात ट्रॅफिक ही सर्वात महत्त्वाची समस्या आहे. लोकांचा महत्त्वाचा वेळ ट्रॅफिक आणि प्रवासात जातो. आपल्याकडे इतका विकास होऊनसुद्धा अजूनही लाईट जाते. पाण्याचा प्रश्न अजूनही सतावतोय. या दोन्ही गोष्टी २४ तास उपलब्ध होणं गरजेचं आहे’, असं ते म्हणाले.

पाहा संपूर्ण मुलाखत इथे:

ठाण्यातलं राजकारण नक्की कोणत्या दिशेने जातंय?

#Live :एकीकडे आनंद दिघेंच्या नावाचा फक्त वापर होत असल्याची टीका होत असतानाच शिवसेनेची ठाण्यावरची पकड मात्र ढिली होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातलं राजकारण नक्की कोणत्या दिशेने जातंय? यावर भूमिका मांडतायत खुद्द आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे! तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि थेट फेसबुक लाइव्हमध्ये उत्तरं घ्या! | #MyMahanagar

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, January 16, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -