घरफिचर्सखारफुटींची कत्तल मुंबईला भोवणार

खारफुटींची कत्तल मुंबईला भोवणार

Subscribe

कत्तल पर्यावरणाची …

मुंबईच्या किनारपट्टीवर असलेल्या खारफुटीची काही वर्षांपासून बेसुमार कत्तल करण्यात येत आहे. मुंबईत वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे खारफुटी उध्वस्त करून त्या ठिकाणी निवारे बनविण्यात येत आहेत. खारफुटीवर अतिक्रमण करण्यात येत आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरातील खारफुटी नष्ट करून त्या जागी झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी खासगी संस्थांनी अतिक्रमण केल्याचे भेसूर चित्र दिसून येत आहे. पर्यावरणाचे अतोनात नुकसान करणार्‍या या अतिक्रमणांकडे सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून साफ दुर्लक्ष केले जात आहे. खारफुटीच्या होणार्‍या बेसुमार कत्तलीमुळे मुंबईत पावसाळ्यात जलप्रलय होऊन जीवित आणि मालमत्तेची हानी होते. खारपुटीची बेसुमार कत्तल येणार्‍या काळात मुंबईला भोवणात यात शंकाच नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. मुंबईभोवती असलेल्या या नैसर्गिक संरक्षण कड्याला वाचवण्यासाठी हायकोर्टातही लढा सुरू आहे. तो पुरेसा नसून यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची गरज आहे.

१ हजार चौरसमीटरचा परिसर सीआरझेड-१

मुंबईत किनारपट्टीलगतच्या तिवरांची गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर कत्तल झाली असून त्या ठिकाणी इमारती व इतर बांधकाम करण्यात आले आहे.यामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेत तिवराचं संरक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार १ हजार चौरसमीटरपर्यंतचा परिसर सीआरझेड-१ मध्ये समाविष्ट करण्यात येईल. तसेच ५० मीटरच्या बफर झोनचा समावेशही न्यायालयाच्या आदेशाने सीआरझेड-१ मध्ये केला जाणार आहे.तिवरांच्या परिसरात केवळ संरक्षण भिंत बांधण्याचीच परवानगी राहील. मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यात तिवरांच्या परिसराची सर्व माहिती समाविष्ट करावी, तसेच याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ६ महिन्यांनी तिवरांच्या परिसराचं सॅटेलाईट मॅपिंग करत तिवरांची कत्तल झाली का, हे तपासावं असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने राज्य सरकारला तिवरांचं संवर्धन-संरक्षण करण्याच्या दृष्टीनं २००५ मधील आदेशाचं कडक पालन करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी १ डिसेंबरला होणार आहे.

- Advertisement -

दंड आणि ३ ते ४ वर्षाची शिक्षा-

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ५० मीटरचा बफर झोन सीआरझेड-१ मध्ये कोणतंही अनधिकृत बांधकाम करण्यास मनाई केली आहे. तिवरांची कत्तल करत अनधिकृत बांधकाम करणार्‍या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार आता तिवरांची कत्तल करणार्‍यांना १ लाखांच्या दंडासह ३ ते ४ वर्षांपर्यंतची शिक्षा केली जाणार आहे.

१४ वर्षात बैठक नाही

तिवरांचे संवर्धन आणि संरक्षण करता यावे यासाठी न्यायालयाने २००५ मध्ये आदेश दिला होता. या आदेशाप्रमाणे समिती गठीत करण्यात आली.मात्र गेल्या १४ वर्षांत या समितीनं तिवरांच्या संरक्षण-संवर्धनासाठी उपाययोजना करणं तर सोडाच, पण १४ वर्षांत एक बैठकही घेतलेली नाही.

- Advertisement -

कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती –

तिवरांचे संवर्धन, संरक्षण करावे म्हणून तसेच आदेशाची अंमलबाजवणी करण्यासाठी कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

तिवरांची कत्तल करून बीकेसी-

कुर्ला आणि वांद्रे दरम्यान मोठ्या प्रमाणात तिवरांची झाडे होती. ही तिवरांची झाडे सरकारनेच तोडून या ठिकाणी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) उभारले आहे.या ठिकाणी टोलेजंग इमारती उभारून देश आणि विदेशातील अनेक मोठ्या कंपन्या व सरकारी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. २६ जुलै २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीवेळी मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. याला मिठी नदी परिसरातील तिवरांची कत्तल करून सरकारने उभारलेले बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स कारणीभूत असल्याचा आरोप आहे.

तिवरांना नवसंजीवनी मिळेल –

तिवरांचा परिसर, बफर झोन सीआरझेड-२,३ मध्ये येतो, असं म्हणत सरकारी यंत्रणा तिवरांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष करत होत्या. तिवरांच्या कत्तलीविरोधात कोणतीही कारवाई केली जात नव्हती. आता मात्र किनारपट्टीलगतचा १ हजार चौरस मीटरचा परिसर आणि ५० मीटरचा बफर झोन सीआरझेड-१ मध्येच येतो, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. यामुळे तिवरांना नवसंजीवनी मिळेल.
-दयानंद स्टॅलिन,वनशक्ती, प्रकल्प संचालक

खारफुटींच्या जागी चाळी आणि अनधिकृत बांधकाम

पश्चिम उपनगरामध्ये खारफुटींंच्या जागेवर चाळी

बोरिवली येथील खारफुटींची कत्तल करून त्या ठिकाणी टुरिझमच्या बसेसला वाव करून दिला जात आहे. एकीकडे या खारफुटीमध्ये अनधिकृत बांधकाम करून चाळी वसविल्या जात आहेत. तर दुसरीकडे खासगी कंपनीसुद्धा आपल्या फायद्यासाठी खारफुटीची कत्तल करून धंदे थाटताना दिसून येतात. परिणामी खारफुटी नष्ट होणे ही मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे. पर्यावरण आणि मुंबईच्या रक्षणासाठी आज खारफुटीचे महत्त्व लक्षात घेणे गरजेचे आहे. मुंबईत सुमारे ५,४१७ हेक्टर जमिनीवर खारफुटीचे जंगल आहे. या जागेवरील खारफुटींना राखीव वनक्षेत्राचा दर्जा मिळाला असल्याने त्यांची स्वच्छता खारफुटी संरक्षण विभागाकडूनच केली जाते. मात्र याचे संरक्षण होताना दिसत नाही. दहिसर-गोराई पाठोपाठ शिवडी, घाटकोपर, तुर्भे, कुलाबा, वर्सोवा येथील खारफुटी क्षेत्रामध्ये अनेक स्वयंसेवी संस्थाकडून स्वच्छता मोहीम राबविली जाते. मात्र त्याच्या काही उपयोग होताना दिसून येत नाही.

मुंबईमधील गोराई या समुद्र किनार्‍यापट्टीवर 500 मीटरच्या आत कायद्याला धाब्यावर बसवून गेस्ट हाऊस चालविले जात आहे. विशेष म्हणजे सीआरझेड असूनदेखील या समुद्रपट्ट्यावरच सर्रासपणे अनधिकृत रिसॉर्ट थाटून व्यवसाय केला जात आहे. ही जागा पर्यटनस्थळ म्हणून घोषित असल्याने गोराई आणि मनोरा या ठिकाणी दर दिवशी शेकडो प्रेमी युगले फेरफटका आणि मौजमजा करण्यासाठी येथे येतात.यांच्या फायदा घेऊन इथे खासगी कंपन्यांकडून सरकारी नियम धाब्यावर बसवून रिसॉर्ट बांधण्यात आले आहेत. यासाठी त्यांनी खारफुटीची कत्तल केली आहे.

ठाणे, डोंबिवलीत खुलेआम होतेय कत्तल

ठाण्यातील कळवा खाडी किनारी आणि डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर खाडीलगत खारफुटीची कत्तल करून भूमाफियांनी अनधिकृतपणे चाळी उभारण्याचा सपाटा लावला आहे. मात्र याकडं पालिका प्रशासन, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड आणि महसूल प्रशासन हे एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. पालिकेकडून अनधिकृत चाळी व झोपड्यांवर ठोस कारवाई होत असली तरी खारफुटीची कत्तल करून अनधिकॄत चाळी उभारणार्‍या भूमाफियांवर ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळेच भूमाफियांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कळवा खाडीकिनारा परिसरात मोठ्या प्रमाणात झोपड्या उभ्या राहिल्या असून यामुळे खाडीकिनारी भागातील खारफुटी नष्ट होऊ लागली आहे. कळवा ते साकेत भागात मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधल्या जात आहेत. या झोपड्यांना पालिकेकडून करही लावला जात आहे. अनेकवेळा हा मुद्दा पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही चर्चिला गेला आहे. कळव्यातील सायबानगर भागात झोपड्या बांधण्याकरीता खारफुटीची कत्तल करण्यात आल्याचा मुद्दाही सदस्यांनी उपस्थित केला हेाता. पालिकेकडून अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केली जाते. मात्र त्यानंतर काही महिन्यांनी परिस्थिती जैसे थे दिसून येते. ठाण्यातील गायमुख, कोलशेत, बाळकूम परिसरांत दिवसाढवळ्या तिवरांची कत्तल सुरू आहे. मोठ्या प्रमाणात भराव टाकून बांधकाम केले जात आहे. मात्र त्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. या बांधकामांमुळे खाडीचे मुख अरुंद होत चालले आहे. मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर येथून येणा-या डेब्रिजच्या गाड्या या भागात रिकाम्या केल्या जातात. मात्र कारवाई होत नाही. त्यामुळे खारफुटीची कत्तल करणा-यांवर कडक कारवाई करण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची खरी गरज आहे. डोंबिवलीत मोठागाव ते दुर्गाडी असा विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिवरांची कत्तल आणि रेती उत्खन्नामुळे खाडीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. डोंबिवली देवीचापाडा खाडीकिनारी तिवरांच्या झाडांची बेसुमार तोड केली जात आहे. भराव टाकून त्याठिकाणी भूमाफियांकडून अनधिकृतपणे चाळी उभ्या केल्या जात आहे. खाडीकिनारी सीआरझेड क्षेत्रात कोणत्याही बांधकामास बंदी असतानाही खुलेआमपणे बांधकाम सुरू आहेत याकडं कुणाचं लक्ष नाही. रेतीबंदर खाडीकिनारा हा सागरी किनारा नियमन क्षेत्रात (सीआरझेड) मोडतो. मात्र इथल्या भूमाफियांनी सगळेच नियम धाब्यावर बसवल्याचे दिसून येते.

कल्याण डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सुरू आहेत. मोकळ्या व आरक्षित जागांवर अनधिकृत चाळी, इमारती उभारल्या जात आहेत. अवघ्या सहा महिन्यात इमारत उभी राहत आहेत. चाळींमध्ये पाच ते सहा लाखाला रूम विकली जाते. भूमाफियांकडून शासनाची फसवणूक केली जात आहे. तसेच डोंबिवली पश्चिमेतील कोपर रेल्वे स्थानक परिसरात रेती माफियांनी अक्षरश धुडगूस घातला आहे. या भागात खाडीकिनारी असलेल्या खारफुटीच्या जंगलाची कत्तल करून रेती माफियांनी अनधिकृतपणे रेतीउपसा सुरू ठेवला आहे. रेल्वे रूळांच्या काही अंतरापर्यंत रेती उपसा केला जात असल्याने भविष्यात रेल्वे रूळाला धोका पोहचण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासनाकडून तोंडदेखली कारवाई केली जाते त्यानंतर परिस्थिती जैसे थे ! त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवा परिसरातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. तिवरांची कत्तल करून तिथे दिवसागणिक चाळी आणि इमारती उभारल्या जात आहेत. कमी किमतीत घरे उपलब्ध होत असल्यामुळे ग्राहक ही घरे खरेदी करत आहेत. तिवरांच्या बेसुमार कत्तलीमुळे रेल्वे मार्गाबरोबरच पर्यावरणाच्या संतुलनाला धोका निर्माण झाला आहे.

महत्त्व खारफुटींचे….

खारफुटीचे लाकूड जरी चमकदार असले, तरी आर्थिक दृष्टीने ते फारसे उपयुक्त नाही. मात्र मोठ्या झाडांचे लाकूड बंदरातील गोदी आणि धक्के बांधण्यासाठी वापरले जाते. कारण हे लाकूड पाण्यात कुजत नाही आणि त्याला कीड लागत नाही. तांबड्या खारफुटीच्या सालीपासून टॅनिन हा पदार्थ मिळतो. टॅनिनचा उपयोग कातडी कमविण्यासाठी, रंगविण्यासाठी व माशांची जाळी मजबूत बनविण्यासाठी केला जातो.

या खारफुटीच्या दाट झाडीमुळे समुद्र व जमीन तसेच खाडी, किनारावर हिरवी भिंत तयार होते. त्यामुळे किनार्‍याजवळच्या जमिनीची पाण्यापासून होणारी धूप थांबते. भूसंरक्षणाच्या दृष्टीने या वनस्पती अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यामुळे इतर वनस्पती व जीवसृष्टीचे संरक्षण होते. पाण्यातील प्राण्यांना संरक्षण मिळते. मासे, खेकडे, झिंगे वगैरे प्राणी येथे अंडी घालतात. पिले मोठी झाली की समुद्राकडे जातात. या वनस्पतीसमूहात झिंगे चांगले वाढतात. खारफुटीची वने असलेल्या सर्व ठिकाणी सागरी लाटांपासून संरक्षण मिळते.

तिवरांच्या जतनाची गरज केवळ जमिनीची धूप थांबवण्यासाठी नसून तिथे खचणारे समुद्रकिनारे आणि मासे वाचवण्यासाठीही आहे. किनारपट्टीपासून थोडे आत, पुळणीच्या किंवा खाडीच्या भागाकडे बर्‍याचदा कोणत्या ना कोणत्या नदीचे मुख येऊन मिळालेले असते. या मुखापाशी माशांची चांगली पैदास होते. तसेच माशांना आवश्यक असणारे प्लँक्टनसारखे एकपेशीय जीवही इथे मोठ्या प्रमाणात वाढतात. शिवाय विविध प्रकारचे कोळी, पक्षी, पाणकावळे, पाणबगळे, गरुड, साप यांची वाढही इथे चांगली होते. एकंदरीत संपूर्ण जीवसाखळी या भागात आकाराला येत असते. त्यामुळे खाडीचा भाग तिवरांनी समृद्ध असणे आवश्यक आहे. तिवरांमुळे वादळांचा तडाखा सौम्य होत असतो. तिवरांमुळे जीवसृष्टीही टिकून राहते. समशीतोष्ण हवामानात उत्पन्न होणार्‍या सागरी माशांपैकी ९० टक्के माशांच्या जीवनसाखळीत तिवरांचा संबंध एकदा तरी येतोच.

किनारपट्टीचे रक्षण हे खारफुटीचे सर्वात महत्त्वाचे योगदान आहे. भारताच्या विस्तृत किनारपट्टीचे संरक्षण होण्यासाठी एका सक्षम नैसर्गिक साधनाची गरज असते. खारफुटी ही यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. खारफुटी म्हणजे जणू काही या किनारपट्टीची त्वचा असते व त्वचा जशी आपल्या शरीराच्या आतील भागांची काळजी घेते, तसेच खारफुटी किनारपट्टीचे समुद्राच्या लाटा, वादळे, वारा यापासून संरक्षण करते. पण येथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे खारफुटी फक्त संरक्षित किनार्‍यावर नद्यांच्या मुखाशी आढळतात.

जैविक महत्त्वाबरोबरच खारफुटीपासून इतरही अनेक फायदे होतात. खारफुटीच्या काही जातींचे लाकूड हे सागवानासारखे मजबूत असून ते इमारत, फर्निचर तसेच जहाजबांधणीसाठी वापरता येते. या सोबतच काही आजारांवरील औषधांमध्येदेखील खारफुटीचा वापर केला जातो.
-डॉ. सुरज गजभिये,भवन्स कॉलेज चौपाटी.

संकलन – अजेयकुमार जाधव, नितीन बिनेकर, संतोष गायकवाड, धवल सोलंकी,
फोटो – संदीप टक्के, अमित मार्कंडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -