चलनी नाण्यापेक्षा त्यांनी गाणं पाहिलं!

किशोरकुमारचा तो बहराचा काळ होता, किशोरकुमारचं गाणं जरी त्या काळात बहरून आलं होतं तरी त्यामुळे त्याच्याबरोबरचे समकालीन गायक झाकोळून गेले होते. त्याआधी महंमद रफींची प्रचंड चलती असली तरी त्यांच्या गाण्याचं नाणं तसं कमी वाजायला लागलं होतं आणि त्यामुळे ते पिछाडीवर पडलं होतं. तरीही मदनमोहननी त्या एका काळात ‘हंसते जख्म’मधलं ‘तुम जो मिल गये हो’, ‘मौसम’मधलं ‘छडी रे छडी, कैसे गले में पडी’ वगैरे गाणी महंमद रफींकडूनच गाऊन घेतली. मदनमोहन हे माणूस जुना झाला म्हणून त्याला मोडीत काढणारे नव्हते. चलनी नाण्याच्या मागे उगाच धावणारे नव्हते.

उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याचा प्रघात कुणालाच तसा आवडत नसतो, पण तो प्रत्येक क्षेत्रात असतो. अगदी गंधर्वनगरीचाही त्याला अपवाद नाही. एखादं नवं नाणं चालायला लागलं की अवघी गंधर्वनगरी तेच चलनी नाणं प्रत्येक गल्ल्यावर चालवायला लागते. ‘आराधना’ नावाचा सिनेमा आला होता तेव्हा असाच एक काळ आला होता. ‘मेरे सपनों की रानी कब आयेगी तू’ ह्या गाण्यापासून त्या सिनेमातली किशोरकुमारची सगळी गाणी वाजली-गाजली. सभासमारंभात, टपरीवर, ठेल्यावर, जिथे जावं तिथे ऐकू येऊ लागली. ‘आराधना’तलं संगीत म्हणजे किशोरकुमारच्या कारकिर्दीला मिळालेलं एक अनोखं वळण ठरलं. किशोरकुमारच्या गाण्याला चार चाँद लावून गेलं. किशोरकुमारच्या गाण्याची ओळख तशी आधीपासूनच सगळ्यांना होती. पण ‘आराधना’मधल्या गाण्यांमुळे किशोरकुमारच्या गाण्याचं रसिकप्रेक्षकांशी असलेलं नातं अधिक घट्ट झालं होतं. साहजिकच, किशोरकुमार हे नाव म्हणजे ह्या मायानगरीत चलनी नाणं झालं. येऊ घातलेल्या बहुतेक नवनव्या सिनेमांच्या निर्मात्या-दिग्दर्शकांपासून संगीतकारांपर्यंत जो तो किशोरकुमारच्या घराचे उंबरठे झिजवू लागला. त्यांच्या तारखांसाठी तेव्हाचे लॅण्डलाइन फोन्स गरागरा फिरवू लागला. किशोरकुमार जरा जास्तच बिझी झाले. निर्माते-दिग्दर्शकांना त्यांच्या सोयीच्या तारखा किशोरकुमारकडून मिळेनाशा झाल्या. कोणताही कलाकार आपल्या आयुष्यातला हा बहराचा काळ तसा सोडत नसतो. किशोरकुमारनीही त्या संधीचं सोनं करून घेतलं.

किशोरकुमारचा तो बहराचा काळ होता, किशोरकुमारचं गाणं जरी त्या काळात बहरून आलं होतं तरी त्यामुळे त्याच्याबरोबरचे समकालीन गायक झाकोळून गेले होते. त्याआधी महंमद रफींची प्रचंड चलती असली तरी त्यांच्या गाण्याचं नाणं तसं कमी वाजायला लागलं होतं आणि त्यामुळे ते पिछाडीवर पडलं होतं. किशोरकुमार हे एव्हाना सिनेसंगीतातले उगवता सूर्य ठरले होते. काही लोक म्हणतात की, महंमद रफींना तेव्हा नर्व्हस ब्रेकडाउन आला होता. पण त्याही परिस्थितीत ह्या सिनेमालाइनीत एक गृहस्थ असे होते की त्यांना ह्या प्रवाहासोबत जाणं मंजूर नव्हतं. नये मिल जाते हैं तो पुराने भुल जाते हैं, हा जीवसृष्टीचा नियम त्यांच्या लेखी क्रूर होता. नवं काही उगवत असेल तर उगवू दे, त्याचं मनापासून स्वागतच करू, पण त्यासाठी ज्या जुन्याशी आपलं नातं जुळलेलं आहे त्याला असं अमानुषपणे मोडून कसं काढायचं असा त्यांचा साधासरळ प्रश्न होता…आणि म्हणूनच ‘आराधना’नंतर किशोरकुमारचं गाणं अख्ख्या सिनेमालाइनीभर फोफावलेलं असतानाही त्यांनी आपली केमिस्ट्री, आपले सूर ज्यांच्याशी जुळले त्या महंमद रफींना अजिबात बाजूला केलं नाही. माझं गाणं महंमद रफीच गातील असं नम्रपणे असलं तरी खालच्या पट्टीतही त्यांनी ठासून सांगितलं. ह्या संगीतकाराचं नाव होतं मदनमोहन!

मदनमोहनच्या संगीतरचनेतला अणूरेणू, त्यांच्या शैलीतला प्रत्येक धागादोरा महंमद रफींना कळलेला होता. थोडक्यात सांगायचं तर मदनमोहनच्या संगीताची संपूर्ण चौकट महंमद रफींना सर्वार्थाने आत्मसात झाली होती. अशा वेळी कुणीतरी नवा सूर आला आहे म्हणून मदनमोहनसारखा माणूस त्यांना आजच्या भाषेत सांगायचं तर एकदम डिलिट कसा काय करून टाकणार होता!

मदनमोहन ह्या नावाचा तसा सिनेमासृष्टीत दबदबा होता, त्यामुळे काही निर्माता-दिग्दर्शकांनी मदनमोहनना भीत भीत तशी विनम्र सूचना करून पाहिली. हल्ली सगळीकडे किशोरकुमारचा आवाज चालतो आहे, त्यांच्या आवाजाला मागणीही आहे, त्यामुळे आपल्या सिनेमातसुध्दा आपण त्यांचा आवाज घ्यायला हरकत नाही, असं आडून आडून सुचवूनही पाहिलं. कधी कधी वितरकांची सबबही पुढे करून पाहिली. पण मदनमोहन अशा सूचना करताना फक्त त्यांच्याकडे पहात बसले. त्यांनी त्यापलिकडे कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली नाही की कुणाशी वाद घातला नाही. पण आपल्याला करायचं तेच केलं. आपलं गाणं महंमद रफींकडूनच गाऊन घेतलं.

मदनमोहननी महमद रफींच्या सुरांशी असलेलं आपल्या संगीताचं नातं तुटू दिलं नाही. महंमद रफी हे आवाजाचे बादशहा होते. त्यांच्या गाण्याने सिनेमासृष्टीत त्यांचं आपलं असं स्थान त्यांनी अबाधित ठेवलं होतं. पण कोणत्याही कलाकाराच्या आयुष्यात जो ऊनपावसाच्या खेळाचा एक काळ येतो तसा त्यांच्या आयुष्यात तो काळ आला होता. मदनमोहनना तो समजला असेल किंवा नसेल, पण ‘आराधना’मुळे नव्याने निर्माण झालेल्या किशोरकुमारच्या झंझावातापुढे मदनमोहननी महंमद रफींना झाकोळू दिलं नाही.

‘सुहागन’साठी त्यांनी एकदा जे गाणं केलं होतं त्याचे शब्द होते – तू मेरे सामने हैं, तेरी जुल्फे हैं खुली, तेरा आँचल हैं ढला, मैं भला होश में कैसे रहूँ. हे गाणं त्यांनी केलं होतं तेव्हा त्यांच्या आजुबाजूला असलेल्या चेहर्‍यांवर प्रश्नावली होती. ती प्रश्नावली महंमद रफींच्या नावाने होती. पण मदनमोहननी त्यांच्या चेहर्‍यावरच्या प्रश्नांची यत्किंचितही दखल घेतली नाही. त्यांनी ते गाणं महंमद रफींकडूनच गाऊन घेतलं. रफींनीही ते गाणं असं काही गायलं की त्या गाण्यातली सेक्सी लटकझटक छान वठवली.

मदनमोहननी त्या एका काळात ‘हंसते जख्म’मधलं ‘तुम जो मिल गये हो’, ‘मौसम’मधलं ‘छडी रे छडी, कैसे गले में पडी’ वगैरे गाणी महंमद रफींकडूनच गाऊन घेतली. मदनमोहन हे माणूस जुना झाला म्हणून त्याला मोडीत काढणारे नव्हते. जोपर्यंत त्याच्या गळ्यातलं गाणं आपल्याला हवं तसं वाजतं आहे, तोपर्यंत वाजवून घेणारे होते. चलनी नाण्याच्या मागे उगाच धावणारे नव्हते.

‘बस्ती बस्ती परबत परबत गाता जाये बंजारा, ले कर दिल का इकतारा’ ह्या साहिर लुधियानवींनी लिहिलेल्या गाण्याला त्यांनी शब्दातला भावार्थ लक्षात घेऊन चाल लावली. ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ ह्या सिनेमात चरित्र अभिनेते मनमोहन कृष्ण ह्यांच्यावर हे गाणं चित्रित होणार होतं. मनमोहन कृष्णना गाण्याचं अंग होतं. त्यांच्या आवाजात हे गाणं एक प्रयोग म्हणून रेकॉर्डही झालं. पण त्यांच्या गाण्यात मदनमोहनना अपेक्षित आरोह-अवरोह आढळले नाहीत म्हणून शेवटी मदनमोहननी ते गाणं गाऊन घेतलं ते महंमद रफींकडूनच. रफींना त्यांनी सोडलं नाही ते नाहीच!