कॅन्सरची चोरपावले वेळीच ऐका

Mumbai
कॅन्सर

कॅन्सर हा चोरपावलाने येणारा व्याधी असला तरी त्याची पूर्वसूचक लक्षणे आहेत. मलप्रवृत्ती वा मूत्रप्रवृत्तीच्या सवयीतील बदल,न भरणारी जखम, अनैसर्गिक रक्तस्त्राव अथवा अन्य कोणताही स्त्राव, शरीरात कोठेही आढळणारी गाठ,अपचन किंवा अन्न गिळण्यास होणारा त्रास, शरीरावरील तीळ किंवा वांग यामध्ये अचानक होणारा बदल, सतत खवखवणारा घसा किंवा बदललेला आवाज अशी ही पूर्वसूचक लक्षणे १५ दिवसांपेक्षा अधिक काळ टिकल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे उचित ठरते.

एकविसाव्या शतकात मानवाने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. परंतु या प्रगतीमुळे माणूस खरोखर सुखी झाला आहे का ? हा चिंतनाचा विषय आहे. आधुनिकीकरणाने मानवी जीवन अधिक सुकर झाले असले तरी सामाजिक स्वास्थ्यविषयक चित्र मात्र निश्चितच सुखावह नाही. आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कॅन्सर हा जगातील मृत्यूच्या कारणांपैकी एक प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१८ आकडेवारीनुसार संपूर्ण जगात प्रतिवर्षी कॅन्सरमुळे मृत्यूचे प्रमाण अंदाजेे ९.६ दशलक्ष आहे. तसेच पुढील वीस वर्षांत कॅन्सरग्रस्त रूग्णांमध्ये सुमारे ७० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी शक्यता वर्तवली आहे. कमी किंवा मध्यम उत्पन्न देशात तर सुमारे ७० टक्के लोक कॅन्सरने मृत्युमुखी पडतात.

जगभरातील कॅन्सरने होणा-या मृत्यूंपैकी जवळजवळ १/३ मृत्यंमागे अयोग्य आहार, अयोग्य विहार व व्यसने कारणीभूत ठरतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार व्यायामाचा अभाव, पोषक आहाराचा विशेषत: फळे व भाज्यांचा आहारातील अभाव, स्थूलपणा ,तंबाखूसेवन व मद्यपान ही पाच प्रमुख कारणे आढळली आहेत.

कॅन्सर हा चोरपावलाने येणारा व्याधी असला तरी त्याची पूर्वसूचक लक्षणे आहेत. मलप्रवृत्ती वा मूत्रप्रवृत्तीच्या सवयीतील बदल,न भरणारी जखम, अनैसर्गिक रक्तस्त्राव अथवा अन्य कोणताही स्त्राव, शरीरात कोठेही आढळणारी गाठ,अपचन किंवा अन्न गिळण्यास होणारा त्रास, शरीरावरील तीळ किंवा वांग यामध्ये अचानक होणारा बदल, सतत खवखवणारा घसा किंवा बदललेला आवाज अशी ही पूर्वसूचक लक्षणे १५ दिवसांपेक्षा अधिक काळ टिकल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे उचित ठरते.

स्त्रिया व पुरूष यांमधील कॅन्सर प्रकारांचा विचार करता स्त्रियांमध्ये स्तन, गर्भाशयमुखाचा कॅन्सर, आतड्याचा, आमाशयाचा व फुप्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आढळते. तर पुरूषांमध्ये फुप्फुस, पौरूषग्रंथी, आतड्याचा कॅन्सर, आमाशयाचा व यकृताचा कॅन्सर विशेषत्वाने आढळतो.

आमच्या इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर, वाघोली पुणे येथील आतापर्यंतच्या निरीक्षणांनुसार सामान्यत: कॅन्सर व्याधीस एकच निश्चित कारण नसून वेगवेगळी कारणे आहेत. यात प्राधान्याने अयोग्य आहार, अयोग्य विहार, व्यवसायजन्य कारणे, अतिरिक्त व्यसने, अनुवंशिकता, अधारणीय वेगांचा अवरोध, मानसिक हेतू अशी अनेक कारणे आहेत.

आहारीय कारणांत प्राधान्याने वारंवार व अधिक प्रमाणात मिरचीसारख्या तिखट पदार्थाचे सेवन, तसेच पावभाजी, पाणीपुरी, रगडा पॅटिस यासारख्या जळजळीत म्हणजे विदाही पदार्थांचे सेवन कॅन्सरला कारणीभूत ठरते. चिंच, टोमॅटो सॉससारख्या आंबट चवीच्या आहारीय पदार्थांचा वारंवार व अतिवापर तसेच बासुंदी, श्रीखंड,पेढे – बर्फी, आईस्क्रिमसारख्या दुग्धजन्य व पचण्यास जड पदार्थाचे अधिक प्रमाणात व वरचेवर सेवन कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते. याशिवाय मांसाहार, शिळे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स, प्रिझर्व्हेटिव्ह घातलेले पदार्थ, शीतपेये यांचाही अधिक वापर कॅन्सरला कारण ठरतो.

काही आहारीय पदार्थ दुस-या आहारीय पदार्थात एकत्र करून सेवन केले तर ते शरीरावर अपायकारक परिणाम करतात, अशा मिश्र पदार्थांना आयुर्वेदात विरूद्धान्न अशी संज्ञा आहे. यात शिकरण, मिल्कशेक, दूध व मांसाहार अशा पदाथार्र्ंचा समावेश होतो. अशा विरूद्धान्नांचे सातत्याने व अधिक प्रमाणात सेवन तसेच जेवणाची अनियमित वेळ, भूकेपेक्षा अधिक प्रमाणात आहार घेणे, त्या त्या त्रतूनुसार आहार न घेणे अशी अनेक कारणे कॅन्सरसारख्या व्याधीला कारणीभूत ठरतात.

आहारीय कारणांशिवाय व्यायाम न करणे, दुपारी जेवल्यावर झोपणे, रात्री जागरण करणे अशा विहारातील कारणांमुळेही कॅन्सर होतो. याशिवाय मुखाचे कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर अशा काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरमध्ये तंबाखू, मद्यपान, सिगारेट-विडी, गुटखा यासारख्या व्यसनांचे वारंवार सेवन, कापसाचे तंतू, विशिष्ट केमिकल्सशी सतत संपर्क, किरणोत्सर्गाशी वारंवार संबंध अशी कारणेही आढळतात. आयुर्वेदानुसार मल, मूत्र, अधोवात, क्षुधा, तृष्णा, निद्रा, शिंक, ढेकर, जांभई, अश्रू या शरीराच्या नैसर्गिक प्रवृत्तींना वेग अशी संज्ञा आहे. या वेगांची संवेदना निर्माण झाल्यावर त्यांचे पालन करणे हे आरोग्यास हितकर असते. वेग निर्माण झाले नसताच बळे बळे त्यांचे उदीरण करणे व निर्माण झाल्यावरही अन्य काही कारणांनी त्याचा अवरोध करणे ही सवय अनेक व्याधीप्रमाणेच कॅन्सरलाही कारणीभूत ठरू शकते. विशेषत: स्तन, गुद, बीजाण्ड, आमाशय या अवयवांच्या कॅन्सरमध्ये अनुवंशिकता हेही कारण आढळते. सतत रागावणे, चिडचिड करणे, व्यवसायजन्य-कौटुंबिक-सामाजिक-मानसिक ताण अशी कारणेही अनेक रुग्णांत आढळतात. वैद्यकीय सल्ल्याशिवाय दीर्घकाळ काही आधुनिक औषधांचे सेवन केल्यास कॅन्सर होतो.

कॅन्सरसारख्या व्याधीचा प्रतिबंध करण्यासाठी रोगप्रतिकारक्षमता वाढविणे व आरोग्यरक्षण करणे महत्वाचे आहे. यासाठी जीवन जगण्याचे शास्त्र असणारे आयुर्वेदशास्त्र सहाय्यभूत ठरते. आरोग्यरक्षणासाठी आयुर्वेदाने दिनचर्या, त्रतुचर्या, संतुलित आहार, आहारसेवनाचे नियम ,योग्य विहार, मानसिक स्वास्थ्य इ.मार्गदर्शक सूत्रे सांगितली आहेत. केवळ कॅन्सरच नव्हे तर इतरही सर्व व्याधींचा प्रतिकार करण्यासाठी निरोगी रहाण्याची ही गुरुकिल्लीच आपण पुढील लेखात जाणून घेणार आहोत. या गुरुकिल्लीचा युक्तीपूर्वक अवलंब केल्यास आरोग्य रुपी धनसंपदेचे निश्चितच रक्षण होईल.

-वैद्य स. प्र. सरदेशमुख,
संचालक, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे.