घरफिचर्सलालबागच्या राजा सदबुद्धी दे

लालबागच्या राजा सदबुद्धी दे

Subscribe

लालबागच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठापना होते तिथेच यंदा सामाजिक भान जपणारा आरोग्योत्सव होईल. त्यात कोरोना काळात हौतात्म्य पत्करणाऱ्या ९२ पोलीसांना प्रत्येकी एक लाख रुपये आणि भारत-चीन सीमेजवळील गलवान खोऱ्यात २० शहिदांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्यात येणार आहेत. २०० कोरोना योद्ध्यांच्या प्लाझ्मा दानातून तितक्याच जणांना जीवदान देण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत रोज इथे रक्तदान करण्यात येणार आहे. कर्ता हयात नसलेल्या कुटुंबात येणाऱ्या मदतीच्या प्रत्येक रुपयाला किती मोल आहे आणि मृत्यूच्या छायेत असलेल्या रुग्णांना रक्ताचा प्रत्येक थेंब काय अनमोल असतो हे समजण्यासाठी त्या दु:खाचा एक भाग व्हावं लागतं. कोरोनाने अदृश्य स्वरुपात असूनही बरंच काही शिकायला भाग पाडलंय. आपलं सरकार, त्यातले पक्ष त्यांचे नेते आणि नेत्यांचे कार्यकर्ते यांना या शिकवणीतून काही चांगलं शिकण्याची सद्बुध्दी देवो हीच लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना!

यंदा लालबागच्या राजाच्या दरबारात गणेशोत्सव काळात आरोग्यत्सव होणार आहे. गेली नऊ दशकं या राजाची स्थापना लालबागच्या मार्केटमध्ये होतं आहे. यातील गेली दोन दशकं लालबागच्या राजाच्या एकूणच किर्ती, प्रसिद्धी, उत्सव, समाजसेवा, राजकीय दबदबा, साहजिकच भक्तांकडून येणारं दान यामध्ये जो फरक पडलाय तो अभूतपूर्व असाच आहे. २००३ साली सहारा समय या वाहिनीत असताना मी या उत्सवाला पहिल्यांदा छोट्या पडद्यावर आणलं. तेव्हा अनेकांनी माझी थट्टामस्करी करण्याचा प्रयत्न केला. पण मी दुर्लक्ष करत काम करत राहिलो. राजाचा महिमा लोकांपर्यंत पोहचला तसे अनेक व्हीआयपी राजाच्या दरबारात पोहचले. त्यात बच्चन, कपूर, अंबानी, तेंडुलकर, मंगेशकर, ठाकरे आणि शहा असे सगळेच होते. हे सगळं बघून थोड्याच वेळात माध्यमातून माझी चेष्टा करणारे आणि या उत्सवाची थट्टा करणारे सहकारीही यथावकाश आपापले कॅमेरे आणि ओबी व्हॅन्स घेऊन इथे डेरेदाखल व्हायला लागले. कोणत्याही उत्सवाला किंवा क्रिकेट सारख्या खेळाला प्रसिद्धी मिळाली की पैसा येतो. आणि ज्यांच्याकडे पैसा येतो त्यांच्या सगळ्याच गोष्टींकडे मग समाजमाध्यमं, राजकारणी भिंगाचे चष्मे लावून बघत असतात. लालबागच्या राजाजंही तेच झालंय…

- Advertisement -

यंदा कोरोनाच्या जागतिक संकटात लालबागच्या राजाच्या उत्सवाबाबत काय होणार हा प्रश्न अनेकांना पडला होता. राजाच्या उत्सवाच्या तयारीला मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खरंतर सुरुवात होते. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मूर्तीचं पाद्यपूजन होतं. लालबागचा राजाचा उत्सव ज्या मार्केटमध्ये होतो तिथे असलेल्या सात विंगच्या लालबागचा राजा सोसायटीत ४०७ कुटुंब राहतात आणि समोरच्या पेरु कंपाऊंडमध्ये ४०० कुटुंब राहतात. तर १५० च्यावर दुकानदार आणि १० हजार वर्गणीदार आजही उत्सवात स्वत:चा सहभाग ठेवतात. मंडळाच्या कार्यकारिणीत ३२ सदस्य आणि तीन पदाधिकारी असे ३५ जण मनोभावे काम करतात. त्यांना साथ असते शेकडो स्वयंसेवक- कार्यकर्त्यांची. तिथे उसळणारी लाखोंची तोबा गर्दी आणि त्यावरचं १० दिवसातलं  नियंत्रण पाहता काही भल्याबुऱ्या गोष्टी अनाहूतपणे घडत असतात. त्याचं समर्थन मला करायचं नाही ते कुणीच करणार नाही. या प्रचंड आणि हेवा वाटावा अश्या उत्सवाला नेतृत्व आहे ते मानद सचिव सुधीर साळवींचं. हा माझा कॉलेजचा जिगरी दोस्त. तो मंडळात २६ वर्षे सदस्य आहे आणि सलग १६ वर्षे मानद सचिव. हा कट्टर शिवसैनिक. बरेच सामाजिक फटके खाऊन तावून सुलाखून  स्थानिक शिवसेना नेते दगडू सकपाळांच्या भट्टीत तयार झालेला कार्यकर्ता. त्यामुळेच उथळपणा न करता काम करणारा. पण कोणतीही यशस्वी गोष्ट सातत्याने तुमच्या हाती राहीली की तुम्ही टिकेचे धनी होताच…सुधीर साळवीचंही हेच झालंय. पण या बेसुमार टिकेतही उत्सव कसा करायचा हे शिकावं तर सुधीरकडून. घरात बसून फुकटचे सल्ले देणारे कैक असतात. डोकं बर्फासारखं शांत ठेवून कार्यकर्ते, मोठे देणगीदार, पोलीस, राजकारणी, माध्यमं, प्रशासन यांची मदत मिळवतं हा उत्सव होतोय. मी तर म्हणेन ही सगळी मंडळी गणेशोत्सव करत नाहीत तर राजाचा उत्सव जगत असतात. साहजिकच त्यांच्या यंदाच्या प्रत्येक निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. कारण कोरोनाचं संकट महाभयंकर होतं.

गेल्या काही वर्षांत उत्सवही शक्य तितक्या प्रमाणात डिजिटल झालाय. त्याच माध्यमातून यंदा इथल्या रहिवाशांशी संवाद साधला गेला. सगळी वस्तुस्थिती ३० मे रोजीच त्यांच्या समोर मांडली गेली. सगळ्यांनाच धोका लक्षात आला होता. त्यामुळे जे दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये ८००० हजार तबलिगींमुळे झालं. ते मुंबईत लालबागच्या राजाच्या दरबारात होऊ नये असं साऱ्यांचं एकमत झालं. दिल्लीत अविवेक दाखवला गेला, मुंबईत ती जागा विवेकाने घेतली होती. करोडो भक्तांचा जीव की प्राण असलेला लालबाचा राजा न बसवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यावर सरकार म्हणतंय तशी छोटी चार फूटी मूर्ती बसवा इथपासून ते ऑनलाईन दर्शन द्या असे अनेक पर्याय चर्चिले गेले. महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी याचा सगळ्या बाजूंनी विचार केला. मार्केटच्या चिंचोळ्या जागेत नऊ आत आणि बाहेर अश्या १८ गेटमधून दहा दिवसांत साधारण दीड कोटी भाविक राजाच्या दर्शनासाठी येतात अशी पोलीसांची माहिती आहे. त्यात हिरो- हिरोईन पासून ते अंबानी आणि गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच सेलिब्रिटी असतात. उत्सव काळात श्र्वास घ्यायलाही तिथे वाव नसतो. मंडपात पूजेसाठी वेगळी मूर्ती इतर मंडळांसारखी नसते. त्यामुळे मुख्य मूर्तीचेच पूजन सगळ्यांना करावं लागतं. त्यातही प्रत्येकाला राजाच्या चरणी माथा टेकवून मनोकामना बोलायची असते, कारण लालबागचा राजा मनातल्या सदिच्छा पूर्ण करतो ही भक्तांची धारणा आहे. या सगळ्या गदारोळात किती जणांना कोरोनाची लागण झाली असती याची कल्पना न केलेली बरी. आताच मंडळातील ३२ पैकी १० प्रमुख कार्यकारिणी सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते उपचार घेऊन बरे झाले. पण या गर्दीत या आजाराने पुन्हा उसळी घेतली तर?  मला आता कोरोना होऊन गेला आहे म्हणून येणारे आणि मला होऊ नये म्हणून साकडं घालायला येणारे या दोघांच्याही अलोट गर्दीत जीवघेण्या भिती शिवाय काहीच नव्हतं.

- Advertisement -

साहजिकच यंदा गणेशोत्सवाच्या जागी आरोग्योत्सव घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर आशिष शेलारांसारख्या भाजप नेत्यांनी ही ‘भक्त आणि लालबागच्या राजाची ताटातूट’ असल्याचं म्हटलं. खरंतरं आशिष शेलार हे स्वत: अस्सल मुंबईकर, कामगार वस्तीत लहानपण घालवलेले एक हुशार नेते. आयोजन हा त्यांच्या अभ्यासाचा आणि सरावाचा भाग. त्यांना सरकारला – मुख्यमंत्र्यांना राजकीय चिमटे काढायचेत. पण ते लालबागच्या राजाच्या विषयावरुन निशाणा धरत असल्याने भाजपमधील गणेशभक्त ही दुखावलेत. शेलार काय किंवा प्रविण दरेकर काय अस्सल मैदानी कार्यकर्ते. त्यांना लालबागच्या राजाच्या दरबारात काय होईल हे नेमकं माहितीये…पण राजकीय विजनवासात ट्वीटसाठी विषय लागतातच. त्यातून हे सगळं होतंय. या उत्सवाचे नेतृत्व सुधीर साळवीचं असलं तरी भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय अश्या अनेक पक्षांशी संबंधित पदाधिकारी- कार्यकर्ते आपले राजकीय जोडे मंडपाबाहेर उतरवून उत्सवात सहभागी होतात. जबरदस्त आयोजनाचं यश हे एकट्या सेनेच्या सुधीर साळवीचं मुळीच नाहीय. हे मुळात सगळ्यांनीच समजून घ्यायला हवं. जे समजूतदार असतील त्यांना आरोग्योत्सवाचं महत्व नक्कीच पटेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -