घरफिचर्सदगडांच्या देशा...

दगडांच्या देशा…

Subscribe

अश्मयुगापासून माणसाला दगड परिचित होता. परकीय टोळीपासून बचावासाठी त्याने दगडाची हत्यारे बनवली. दगडावर दगड घासून माणसाने पहिल्यांदा जेव्हा आग पेटवली तेव्हा ती नव्या क्रांतीची सुरुवात होती. हळूहळू दगडांनी माणसांना गिळणं सुरू केलं आणि आपली सत्ता स्थापन केली. आता दगडांच्या हातात हाडामासांची माणसं गेली आहेत. माणसच दगड झालेली आहेत. माणसांची मने, मेंदूही दगडांचे झालेले आहेत. या दगडांच्या देशात जिवंत माणसांना कायम धोका आहे. या दगडांविरोधात निर्णायक विजयी लढा देण्यासाठी पुस्तकांनी ढाल बनवली आहे..

व्यवस्था दगडासारखी ढिम्म असल्याने त्याविरोधात दगड भिरकावले जातात. या अशा दगडांचं कौतुक केलं जातं. फँड्रीतल्या जब्याने भिरकावलेला दगड सामाजिक, राजकीय आणि धार्मिक व्यवस्थेत रमलेल्या आपल्या टाळक्यात आदळल्यावर आपली व्यक्तीगत टेंगळं कुरवाळत आपण फटका किती जबरदस्त होता, याचं नाईलाजास्तव कौतुक करतो. ही व्यवस्था आपणच पोसलेली निवडलेली असते. हा दगड जोपर्यंत आपल्या घराच्या तावदानाला भेदत नाही, तोपर्यंत आपल्याला या दगडाची भीती नसते. ज्यावेळी आपल्या साळसूद सामाजिक पांढरपेशा व्यवस्थेवर असे दगड अधूनमधून आदळू लागतात त्यावेळी आपल्याला या दगडांची भीती वाटते.

सातत्याने कानावर आदळणार्‍या बातम्यांमुळे दगडफेक हा शब्द आपल्या परिचयाचा असतो. मंत्र्यांच्या गाडीवर आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांची दगडफेक, सैन्यावर, पोलिसांवर जमावाची दगडफेक…अशा बातम्या आपण ऐकत असतो, माणूस दगड उचलतो, तो शेवटचा पर्याय म्हणून असे आपल्याला वाटत आलेले असते, पण दगड झालेल्या व्यवस्थेला जागे करण्यासाठी सातत्याने दगड हाच पहिला आणि शेवटचा पर्याय हाती असलेल्या आणि भकास माळरानावर पालं ठोकून दगडाची चूल पेटवणार्‍या आणि दगडावर विश्वास ठेवून त्याची पूजा करणार्‍या मनाने दगड झालेल्या माणसांविषयी शहरातल्या दगडांना अनभिज्ञ असतात. दगडांमध्येही वर्णभेद असतात, मजबूत राकट, काळाकभिन्न दगड इमारतीच्या पायांसाठी वापरला जातो. तो बाहेर दिसता कामा नये, बाहेर दिसण्यासाठी शहरातल्या इमल्यांना मार्बलचे चकचकीत पांढरपेशे संगमरवरी दगड लावले जातात. विठ्ठलाची मूर्ती काळ्या पाषाणाची असते आणि पायाखालची वीटही धन्य असल्याचे अभंगात सांगितलेले असते. तर मोठ्या मेट्रोपोलिटन भागात वेगळी परिस्थिती असते. कोट्यवधीच्या फ्लॅट संस्कृतीत सुविधांना अ‍ॅमिनिटीज म्हटले जाते. या ठिकाणी जिम, बिलियर्ड रूम, स्विमिंग पूल आणि मंदिरात मार्बलची देव मूर्ती असल्याचे बिल्डरकडून कौतुकाने सांगितले जाते.

- Advertisement -

ईंट का जवाब पत्थर से देण्याच्या तत्वज्ञान इतिहासाचा आपल्याला अभिमान असतो. त्यामुळे विठूमाऊलीच्या पायाखालची वीट आणि दगडांच्या देशा यातला सोईस्कर फरक आपण आपल्या साहित्य आणि संस्कृतीत केलेला असतो. जिवंत माणसांपेक्षा आपल्याला दगडाचे पुतळे, मूर्तींचे अप्रूप असते. हे पुतळे किंवा मूर्ती विटंबना झाल्यावर मोर्चे, आंदोलने करणारे नसतात. दगडाच्या पुढे जाऊन आपण हजारो कोटींचा खर्च करून महापुरुषांचे उंचच उंच पुतळे उभारतो. ही उभारलेली स्मारके, धर्मस्थळे आणि मूर्ती दगडाच्या असतात म्हणायला आपली भक्ती किंवा संस्कृती परवानगी देत नसते. या दगडांच्या देशात हाडामासांची माणसं खिजगणतीत नसतात. काही माणसं मेल्यावर त्यांची उंच दगडं बनवण्यात आपल्याला कमालीचा रस असतो. अशा दगडांना हारफुले घालून आपण त्याचे सेल्फी सोशल मीडियावर वाटून टाकलेले असतात. दगडाच्या देवस्थानासाठी हाडामासांची माणसं कापली, जाळली जातानाही आपल्या दगडी मनाला पाझर फुटलेला नसतो. दगडावर काहीच उगवत नाही, असंघटीत कामगार आणि शेतकरी कुदळीने दगड फोडतो. शिल्पकार डेव्हीडसारखी कलाकृती दगडातून साकारतो. याच दगडाचा देव बनतो, बुद्ध, प्रेषित किंवा देवाचा दूत वर्षानुवर्षे बनवला जातो. काळ्या दगडाच्या खाणीतच एखादा किमती दगडाचा हिरा सापडतो. माणसांना दगडाचं मोठं अप्रूप असतं.

हिमालय, सह्याद्री, दगडांच्या किल्ल्यांचा इतिहास शाळेत शिकवला जातो, या किल्ल्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असताना संस्कृती आणि व्यवस्था, पुरातत्व खाते सातत्याने दगड झालेले असते. डोंगर दर्‍यात राहणारी, रस्त्याच्या कडेला, झोपडपट्टीत, वास मारणार्‍या नाल्याजवळ राहणारी माणसं केव्हाच दगड झालेली असतात. या काळ्याकभिन्न दगडांना शहरातल्या संगमरवरी दगडांमध्ये जागा नसते. अशा वेळी निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाते, धर्माचे नगारे वाजवले जातात आणि या दगडांना विकासाची इस्टमनकलर स्वप्न पुन्हा दाखवली जातात. देवातल्या, देवस्थानातल्या, पुतळ्यातल्या दगडासाठी हाडामसांची दगडं हातात घेतात. हाडामासांची दगडं हाडामासांच्या दगडांवर दगड भिरकावतात.

- Advertisement -

दगडांना जात नसते, धर्म, अस्मिता, परंपरा, संस्कृती, राजकीय हेतू, निवडणुकीत विजयांची इच्छा नसते. पण दगडांचा वापर दगडांना नियंत्रणात ठेवणारे आपल्या सोयीनुसार खुबीने करतात. दगड फेकणारे आणि फेकायला लावणारे वेगवेगळे असतात. दगडांची देवस्थाने, मूर्ती, पुतळे त्यांच्या अंगावर दगडं पडली म्हणून मोर्चे काढत नाहीत. मोर्चे हाडमासांची माणसं काढतात. यातल्या काही संगमरवरी हाडामासांना अशी दगडं आपल्याजवळ वेळ येईल तेव्हा वापरासाठी ठेवावी लागतात. योग्य वेळी या दगडांना माथेफिरू असं नावं दिलं जातं. मग अशी दगडं महामानवाच्या दगडी घरावर फेकली जातात. या घरात पुस्तकं असतात. भारतीय संविधान नावाचे सगळ्यात मोठे कायद्याचे पुस्तकही या घरात असते. या पुस्तकाच्या पानापानावर दगड झालेल्या माणसांना पुन्हा हाडामासांचा जिवंत माणूस बनवण्याचं काम सुरू असतं. या पुस्तकाजवळच एका कोपर्‍यात सत्य आणि करुणेने भरलेला दगडी किंवा धातूच्या मूर्तीचा बुद्ध असतो. महामानवाच्या घरातील हा बुद्ध दगडाचा निश्चितच नसतो. त्यामुळे तो संविधान नावाच्या पुस्तकाशी अधूनमधून संवाद साधत असतो.

प्रज्ञा, शील, करुणा, सन्मार्ग, मानवी मूल्य आणि आनंद याशिवाय स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या चर्चा महामानवाच्या घराच्या आवारात पडलेले दगड ऐकत असतात. ही चर्चा हळूहळू या दगडांच्या मनावर परिणाम करू लागते. हळूहळू ही दगडं माणसं बनतात, माणसांत येतात या माणसांना आता दगडासारखं भिरकावण्यासाठी वापरणं अशक्य झालेलं असतात. दगडाचं काम आता बदलेलं असतं. दगडाचं जातं झालेलं असतं, त्यातून पसरलेल्या पिठाची रांगोळी कल्पनेतल्या चंद्राची खरीखरी भाकरी बनवते. दगडांना हळूहळू पाझर, धुमारे फुटतात, या दगडाची धरणं बनतात, मजुरांसाठीच्या योजनांची घरं बनतात. अश्मयुगात अग्नी चेतवण्यासाठी दगडावर दगड घासणारी माणसंच खरी माणसं होती आणि त्याकाळी दगडांचं काम दगडं करत होती. हळूहळू माणसं दगड बनत गेली, एकमेकांवर हाणून पेटवली जाऊ लागली आणि दगडांना माणसांचं महत्त्व येऊ लागलं….आपली झालेली ही फसवणूक राजगृहात फेकलेल्या दगडांना आता समजली होती. त्यांचीही हाडामासांची माणसं होणं आता रोखता येणार नव्हतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -