लॉरेन्स ऑलिव्हिए ः त्याने शेक्सपिअर जाणला

Mumbai
लॉरेन्स ऑलिव्हिए

लॉरेन्स ऑलिव्हिएचा रंगमंचावर जबरदस्त प्रभाव होता आणि त्याच्या भूमिका एवढ्या परिणामकारक असत की प्रेक्षक जागीच खिळून राहत. शेक्सपिअर हा त्याचा खास आवडीचा विषय. त्याने त्याचा बारकाईने अभ्यास केला होता, त्यामुळेच शेक्सपिअरला सर्वाधिक न्याय देणारा अभिनेता म्हणून त्याचा गौरव होत असे. योगायोग म्हणजे शेक्सपिअरच्याच ‘हॅम्लेट’साठी त्याला दोन ऑस्कर मिळाली आणि त्याआधीचे सन्माननीय ऑस्करही शेक्सपिअरच्याच ‘पाचवा हेन्री’मधील कामासाठी होते. स्वतःच दिग्दर्शन करून सर्वोत्तम अभिनेत्याचे ऑस्कर मिळवणारा तो पहिलाच कलाकार होता.

सार्‍या जगानेच नटश्रेष्ठ म्हणून गौरव केला, जो सर्व प्रेक्षकच नाही तर टीकाकारांच्याही पसंतीस उतरला होता आणि समीक्षकांनाही त्याचं किती कौतुक करावे असे वाटायचे असा हा नट. लॉरेन्स ऑलिव्हिए. गेल्या शतकातील मोजक्याच या अत्युच्च पातळीवरील अभिनेत्यांपैकी एक. अर्थात अ‍ॅलेक गिनीस यांचा क्रमांक त्याच्यावर लावणारेही अनेकजण होते, आणि त्यातही वावगे काहीच नव्हते, तर तुल्यबळच होते. मात्र अभिनयाची धाटणी काहीशी वेगळी आणि तरीही तिकीच परिणामकारक म्हणून प्रभावीही. दोघांचाही सर या पदवीने गौरव करण्यात आला होता. पण शेवटी ज्याला सर्वसामान्य प्रेक्षकांची अधिक पसंती त्याचाच अधिक गाजावाजा होतो ना! तसंच काहीसं. पण यामुळे त्याच्या गुणवत्तेबाबत कुणी शंका घेत नाही, एवढी ती अव्वल होती. सुरुवातीला नाटक, नंतर चित्रपट आणि दूरचित्रवाणीच्या युगात छोट्या पडद्यावरही त्याने राज्य केले. सुमारे सहा दशकांची त्याची कामगिरी संस्मरणीयच होती.

त्याचा जन्म 22 मे 1907 सालचा. नाव लॉरेन्स केर ऑलिव्हिए, (काही जण ऑलिव्हर असाही उच्चार करतात) पण ओळख लॉरेन्स ऑलिव्हए अशी होती. घरचे लोक त्याला किम म्हणत असत. त्याचा मोठा भाऊ भारतात गेल्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला अभिनेता बनवण्याचे ठरवले व त्या दृष्टीने त्याची जडण घडण झाली. ऑल सेंटस स्कूलमध्ये असताना ‘द टेमिंग ऑफ द श्रू’मध्ये त्याने कॅथेरीना ही स्त्री-भूमिका केली होती. नंतर त्याने अभिनय आणि रंगमंचाच्या अन्य बाबींबाबत पद्धतशीर प्रशिक्षणही घेतले होते. रंगमंचापासून त्यानं आपली अभिनयाची कारकीर्द सुरू केली आणि अखेरपर्यंत तो रंगमंचाशी जोडला गेलेला होता. त्याने चित्रपटांमध्येही सातत्याने कामे केली. त्याला वेगवेगळ्या चार गटांमध्ये एकूण दहा वेळा ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. प्रत्यक्षात मात्र त्याला फक्त दोन ऑस्कर मिळाली. 1948 मध्ये ‘हॅम्लेट’साठी (अभिनेता आणि सर्वोत्तम चित्रपट) मिळाली. या खेरीज दोन वेळा त्याला मानद ऑस्करही देण्यात आली होती. पाहिले होते 1947 मध्ये ‘पाचवा हेन्री’साठी अभिनयाचे तर 1979 मध्ये जीवनगौरवाचे म्हणून सन्मानाने देण्यात आलेले.

रंगमंचावर त्याचा प्रभाव असा होता आणि त्याच्या भूमिका एवढ्या परिणामकारक असत की प्रेक्षक जागीच खिळून राहत. शेक्सपिअर हा त्याचा खास आवडीचा विषय. त्याने त्याचा बारकाईने अभ्यास केला होता, त्यामुळेच शेक्सपिअरला सर्वाधिक न्याय देणारा अभिनेता म्हणून त्याचा गौरव होत असे. योगायोग म्हणजे शेक्सपिअरच्याच ‘हॅम्लेट’साठी त्याला दोन ऑस्कर मिळाली आणि त्याआधीचे सन्माननीय ऑस्करही शेक्सपिअरच्याच ‘पाचवा हेन्री’मधील कामासाठी होते. स्वतःच दिग्दर्शन करून सर्वोत्तम अभिनेत्याचे ऑस्कर मिळवणारा तो पहिलाच कलाकार होता. एकीकडे तो चित्रपटांबाबत आपल्याला फारसे प्रेम वाटत नाही असे म्हणायचा, पण प्रत्यक्षात मात्र त्याने पन्नासपेक्षाही जास्त चित्रपटांत काम केले. आणि ‘अ‍ॅज यू लाइक इट’ या शेक्सपिअरच्या नाटकावर आधारलेला चित्रपटही निर्माण केला.

सुरुवातीच्या काळातच जिल एस्माँड हिच्याबरोबर काम करताना दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले आणि 1930 मध्ये त्यांनी विवाह केला. हा विवाह दहा वर्षे टिकला. पण खरे तर सात आठ वर्षांनंतरच तो टिकणार नाही, हे स्पष्ट झाले होते. त्यावेळी ‘फायर ओव्हर इंग्लंड’मध्ये काम करत असताना तो व्हिव्हिअन लीच्या प्रेमात पडला होता. तिला ‘गॉन विथ द विंड’मध्ये काम मिळाल्याने ती चित्रीकरणासाठी अमेरिकेला गेल्यानंतर तिचा सहवास मिळेल म्हणून त्यानं हॉलीवूडचा ‘विदरिंग हाइट्स’ हा चित्रपट स्वीकारला. व्हिव्हिअन ली ला ‘गॉन विथ द विंड’साठी अभिनयाचे ऑस्कर मिळाले, तर ‘लॉरेन्सला विदरिंग हाइट्स’ साठी ऑस्कर नामांकन.

व्हिव्हिअन ली बरोबरचा त्याचा विवाह वीस वर्षे टिकला. त्या दोघांनी क्लिओपात्राबाबतची दोन नाटके केली तर 1953 मध्ये ‘स्लीपिंग प्रिन्स’मध्ये दोघांनीही काम केले होते. कदाचित तेव्हापासूनच त्यांच्यातील प्रेमसंबंध निर्माण होण्यास सुरुवात झाली असेल. काही काळातच त्यांचा विवाह होणार हे स्पष्ट दिसू लागले, पण काही काळ पहिली पत्नी जिल घटस्फोट देण्यास तयार नव्हती. पण अखेर साठ साली घटस्फोट झाला आणि व्हिव्हिअन ली आणि लॉरेन्स ऑलिव्हिए विवाहबद्ध झाले.

आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी तो कठोर परिश्रम घेत असे, भूमिका जास्तीत जास्त वास्तव आणि अर्थातच प्रभावी व्हावी म्हणून तो हे करत असे. ‘ऑथेल्लो’साठी त्याने मुद्दाम वेटलिफ्टिंग व अन्य व्यायाम करून आपण त्या भूमिकेत अचूक दिसू म्हणून शरीर जास्त तगडे बनवले होते. इतकेच नाही तर तो मूर (हबशी) आहे हे ध्यानात घेऊन, त्याप्रमाणे तो रंगभूषाही त्याच प्रकारे म्हणजे संपूर्ण कृष्णवर्णाची करत असे. त्याचा प्रभाव त्यामुळे अधिकच वाढत असे. भूमिकेत झोकून देणे असे. ‘मॅरेथॉन मॅन’मध्येही त्याची भूमिका अशीच प्रभावी होती. ती होती एका नाझी दंतवैद्याची. त्याने ती तितकीच समरसून केली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांचा त्याला मोह पडत असे. दर वेळी काही तरी नवे आव्हान त्याला हवेहवेसे असायचे. एक गोष्ट मात्र आश्चर्य वाटावे अशी होती. रंगमंचाबाबत त्याला प्रेम होते हे तर खरेच, पण त्या काळात प्रचलित असलेला मेथड अ‍ॅक्टिंग हा प्रकार मात्र त्याला आवडत नसे, त्याला जणू त्याबाबत तिटकाराच होता. याचे कारण काय ते अर्थातच तोच जाणे.

त्याच्या सहकलाकार आणि मित्रमंडळींमध्ये त्याची ओळख लॅरी अशी होती. ते त्याला लॅरीच म्हणत. 1970 मध्ये त्याने ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’मध्ये शायलॉक ही भूमिका केली होती. त्यासाठीही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘स्लूथ’ या चित्रपटात त्याने मायकेल केनबरोबर भूमिका केली. दोघांवरच या चित्रपटाचे कथानक मुख्यत्वेकरून आधारलेले आहे. मायकेलने केलेल्या भूमिकेला थोडा जास्त वाव असल्याने दोघांचीही कामे तोडीस तोड झाली होती, तरीही ऑलिव्हएचा प्रभाव जाणवत असे. सुरुवातीला दिग्दर्शक जो मँकीवित्झ जरा साशंक होता. कारण मायकेलवर माझा प्रभाव जाणवावा, अशी कथेची मागणी होती आणि मी मात्र त्याच्याच प्रभावाखाली असल्यासारखा वाटत होतो. त्याने हे सांगितल्यावर मला कळले की नक्की काय होत आहे. मी प्रेक्षक असल्यासारखाच मायकेलपुढे उभा राहात होतो, त्यामुळे असे घडत होते. शिवाय त्याला मी अधिक आकर्षक दिसायला हवे असे वाटत होते. त्यामुळे मी मिशी लावली आणि सारे रूपच पालटले. त्यांना हवे तसेच झाले होते. सारेजणच एकदम खूश झाले, असे त्याने म्हटले आहे. सर्वांनाच आता यश आलेच आहे, असे वाटले आणि मीही त्यांना तसेच होईल असे म्हणालो व तसेच घडले. स्नूकरमध्ये मी मायकेलला पार हरवत होतो, कारण मी चांगला स्नूकर खेळाडू होतो असेही त्याने ‘कन्फेशन्स ऑफ अ‍ॅन अ‍ॅक्टर’ या आत्मचरित्रामध्ये लिहिले आहे. त्याच्या या पुस्तकालाही रसिकांची दाद मिळाली होती.

व्हिव्हिअन लीबरोबरचा त्याचा विवाहदेखील अखेर टिकला नाही. 1958 पासूनच दोघांमध्ये कुरबूर सुरू झाली होती आणि त्यात व्हिव्हिअनच्या विक्षिप्तपणाची भर पडली होती. अखेर 1960 मध्ये हा विवाह संपुष्टात आला आणि त्याने जोन फ्लोराइटबरोबर विवाह केला. तो मात्र त्याच्या मृत्यूपर्यंत कायम राहिला होता. त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा तर जोनपासून तीन मुले झाली. तिने त्याला शेवटपर्यंत साथ दिली.अखेरची काही वर्षे तो आजारी असायचा आणि त्यामुळे अशक्तही झाला होता. त्याच काळात त्याने ‘बॅटल ऑफ इंचॉन’ या चित्रपटात डग्लस मॅकआर्थर ही भूमिका केली. पण समीक्षकांना त्याचा प्रभाव जाणवला नाही. तेही साहजिकच होते. त्याकाळात आजारानंतर तो खूप अशक्त बनला होता आणि पुरेशी मेहनत घेणे त्याला शक्य होत नव्हते. तोच त्याचा अखेरचा चित्रपट ठरला. त्याआधी बराच काळ त्याने दिग्दर्शन सोडून दिले होते आणि केवळ अभिनयालाच प्राधान्य दिले होते.

त्याचे असे हॅम्लेट, रिबेक्का, प्रिन्स अ‍ॅन्ड द शो गर्ल, निकलस अ‍ॅन्ड अलेक्झांड्रा, थ्री सिस्टर्स, आह, व्हॉट अ लव्हली वॉर, खार्टूम, स्लूथ, अंकल वान्या, ऑथेल्लो, लाँग डेज जर्नी इन्टू नाइट, मॅरेथॉन मॅन, मर्चंट ऑफ व्हेनिस, अ ब्रिज टू फार, बॉइज फ्रॉम ब्राझील, ड्रॅकुला, द बेट्सी इ. अनेक चित्रपट संस्मरणीयच आहेत. त्याबाबत यथावकाश कधीतरी.

ताजा कलमः थोडंसं राहूनच गेलं खरं. चूकभूल द्यावी घ्यावी म्हणतात तसंः गेल्या अंकात सांगते ऐकाबद्दल लिहिताना रौप्यमहोत्सवानंतर त्यात एक जास्तीचे गीत घालण्यात आल्याचे लिहिले होते. पण कसे कोण जाणे, त्या गाण्याचे शब्द लिहायचेच राहून गेले होते. वामनदादा कर्डक यांच्या त्या गीताचे बोल होते ः तो म्हणतोः अहो, सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला आणि यावर तिचे उत्तर आहे ः अहो, सांगा या येड्याला, माझ्या घरधन्याला, कशी सांगा जाऊ मी सासुरवाडीला .. असे होते. नवरा बायकोतला हा झगडा गायला होता विठ्ठल शिंदे आणि कुमुदिनी पेडणेकर यांनी आणि फक्कड चाल लावली होती वसंत पवार यांनी.

– आ. श्री. केतकर