घरफिचर्सदुबळे विरोधक लोकशाहीसाठी घातक

दुबळे विरोधक लोकशाहीसाठी घातक

Subscribe

सर्वधर्मसमभाव या आपल्या हुकूमी कार्डाचे लॉलिपॉप दाखवत काँग्रेस बहुसंख्याक लोकांच्या भावनांशी खेळत राहिला. आजही जनमानसाचा कानोसा घेतला तर हाच काँग्रेसबद्दल लोकांचा राग आहे. आणि लोकांनी ठरवले आहे की दहा वर्षे काँग्रेसला बाहेर ठेवायचे आहे तर मतदारांची मानसिकता विरोधी पक्षांनी ध्यानात घ्यायला हवी. खरेतर या निमित्ताने नव्याने काँग्रेस उभी करण्याची संधी असताना एका प्रमुख विरोधी पक्षाने थंड बस्त्यात जाणे, देशाला परवडणार नाही.

२०१४ साली केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी जी कच खाल्ली आहे ती अजून संपण्याचे नाव घेत नाही. विशेष म्हणजे सत्ताधारी हुकूमशहाच्या तोर्‍यात जेव्हा विरोधक आता औषधाला उरले नाहीत, असे सांगतात तेव्हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतासाठी अशी अरेरावी घातक असते. आज आपण लोकसभा आणि विधानसभेचे कामकाज बघतो तेव्हा याची कल्पना येते. सत्ताधार्‍यांना मैदान मोकळे वाटून ते आपल्या विचारांना आचारांना साजेसे असे निर्णय घेऊन मोकळे होतात. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी भाजपसमोर प्रश्न उभे केले खरे; पण त्यात जाणीवपूर्वक सातत्य नव्हते. २०१४ चा सुरुवातीचा काळ हा काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना आपण सत्तेत नाही, हे सहनच होत नव्हते आणि आपण सत्ताधारी आहोत, या मानसिकतेत त्यांची पहिली काही वर्षे गेली. राहुल यांनी नोटाबंदी, जीएसटी, राफेल या महत्त्वाच्या विषयांवर अखेरीस वादळ उठवले खरे, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

२०१९ ला सत्ता गेल्यानंतर मात्र ते निराशेच्या खाईत गेले ते अजून स्वतःला सावरू शकलेले नाही आणि भाजपला हेच हवे आहे. दहा वर्षे काँग्रेस आघाडी सरकार सत्ता उपभोगताना त्यांनी देशाचा असा कुठला महान विचार केला होता? हे एकदा त्यांनी आपल्या मनाला विचारून पाहावे. सर्वधर्मसमभाव या आपल्या हुकूमी कार्डाचे लॉलिपॉप दाखवत ते बहुसंख्याक लोकांच्या भावनांशी खेळत राहिले. आजही जनमानसाचा कानोसा घेतला तर हाच काँग्रेसबद्दल लोकांचा राग आहे. आणि लोकांनी ठरवले आहे की दहा वर्षे काँग्रेसला बाहेर ठेवायचे आहे तर मतदारांची मानसिकता विरोधी पक्षांनी ध्यानात घ्यायला हवी. खरेतर या निमित्ताने नव्याने काँग्रेस उभी करण्याची संधी असताना एका प्रमुख विरोधी पक्षाने थंड बस्त्यात जाणे, देशाला परवडणार नाही.

- Advertisement -

केंद्रात ही हालत असताना महाराष्ट्रात विरोधी पक्षाबद्दल न बोललेले बरे अशी अवस्था झाली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेच्या शेजेला बसलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाची लाज काढली, असे चित्र सार्‍या महाराष्ट्राने पाहिले. विधिमंडळ आणि बाहेर त्यांची देहबोलीच सांगत होती यांना या पदात आणि काँग्रेसमध्ये रस उरलेला नाही. त्यांचा जीव कासावीस होत होता. सत्तेशिवाय राहू शकत नाही, हेच चित्र बरेच काही सांगत होते. विधिमंडळात सरकारला सळो की पळो करून सोडण्याची संधी असताना सिनेमाचे डायलॉग मारत ते वेळ मारून नेत होते. मृणाल गोरे, नारायण राणे, छगन भुजबळ, रामदास कदम, एकनाथ खडसे यांनी सत्ताधार्‍यांचा जीव नकोसा करताना विरोधकांचे अस्तित्व दाखवून दिले होते. त्याच्या उलट विखे पाटील यांनी केले. संस्थानिकांना कायम सत्ता हवी असते. त्यांना देश, राज्य याबद्दल काडीची आस्था नसते. आपण सत्तेच्या माध्यमातून जे काही कमावले आहे ते टिकले पाहिजे. त्यात भर पडून मुलगा, नातू, पणतू, खापर पणतू आणि बरेच अशी त्यांच्या सात पिढ्यांचे कल्याण झाले पाहिजे.

विखे पाटील यांचे घराणे यासाठी प्रसिद्ध आहे आणि तेच त्यांनी दाखवून दिले. शरद पवार यांचे या घराण्याबाबत जे मत आहे त्यात अजिबात चूक नाही. राधाकृष्ण विखे यांचे वडील बाळासाहेब विखे यांनी हेच केले होते. ११९५-९६ च्या दरम्यान शिवसेनेशी जवळीक साधून ते केंद्रात गेले. आपल्या मुलाला युती सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री बनवले. सत्ता बदलतात पुन्हा काँग्रेसवासीय होऊन सत्तेच्या पाटावर बसले. दहा वर्षे ती भोगून झाल्यावर जीव गुदमरल्याने आता त्यांना जातीयवादी भाजप आणि शिवसेनेच्या बाजूला बसून मंत्रीपद मिरवताना जनाची सोडा, मनाची लाज वाटत नाही. जसा राजा तशी प्रजा. खरेतर लोकांनी विखे घराण्याला धडा शिकवायला हवा होता. पण लोकसभेत सुजय विखे पाटील यांना निवडून देत या सगळ्याला आपली मूक संमती असल्याचे दाखवून दिले.

- Advertisement -

विखे पाटील यांचा २०१४ पासूनचा विरोधी पक्षनेत्याचा कार्यकाळ हा सत्ताधार्‍यांना हवाहवासा असताना दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची हवा निघून गेल्यासारखी दिसत होती. काँग्रेसला एक विचारधारा तरी आहे, या काँग्रेसमधूनच निर्माण झालेल्या या पक्षाला सत्तेमधून उभ्या राहिलेल्या घराणेशाहीशिवाय दुसरा कुठलाच विचार दिसत नव्हता. सत्तेविना हा पक्ष राहू शकत नाही, हे गेल्या काही महिन्यांतील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि आमदारांनी सर्वाधिक संख्येने भाजप आणि शिवसेनेत केलेल्या प्रवेशावरून दिसून आले आहे. अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे अशी सत्ताधार्‍यांना नाक मुठीत धरायला लावणारी नेते मंडळी राष्ट्रवादीकडे होती. पण, भुजबळ तुरुंगात गेले आणि या सर्वांची हवा निघून गेल्यासारखी झाली.

जयंत पाटील चिमटे काढत बोलण्यात पटाईत असले तरी समोरच्यांची कोंडी करून त्यांना निष्प्रभ करण्याची त्यांची हातोटी नाही. एकेकाळी भुजबळ शिवसेनेचे एकमेव आमदार असताना त्यांनी सरकारला सळो की पळो केले होते. अजित पवार यांच्यात ती ताकद आहे; पण त्यांच्याभोवती सिंचन, सहकार घोटाळ्यांच्या आरोपाचे जाळे तयार करत ते पुढे सरकणार नाहीत, याची फडणवीस सरकारने काळजी घेतली होती. खरेतर अशावेळी आव्हाड, जाधव आणि शिंदे यांना सरकारसमोर उभे करायला हवे होते. त्यांच्यात ती क्षमता होती; पण तसे झाले नाही.

जिथे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सरकारला कामांपेक्षा बोगा मोठा याचा जाब विचारण्याची मोठी संधी गेल्या पाच वर्षांत विरोधकांना साधता आली नाही. तेच चित्र बाहेरही दिसले. भाजप आणि शिवसेना सत्तेत नसताना त्यांनी जनतेच्या दारात जाऊन आघाडी सरकारच्या पापाचा सतत पाढा वाचला होता. सत्ताधार्‍यांच्या विरोधात मोठी वातावरण निर्मिती केली होती. पण काही अपवाद वगळता तसे विरोधकांना करता आले नाही. अजित पवार, धनंजय मुंडे, अमोल कोल्हे यांनी विरोधकांच्या यात्रेत रान उठवण्याचा प्रयत्न केला; पण त्यातून हाती काही आले नाही. उलट ७९ वर्षांचे शरद पवार यांनी चांद्यापासून ते बांद्यापर्यंत आणि सकाळ ते रात्र असा महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केल्यानंतर आता कुठे विरोधक दिसायला लागले आहेत. पवारांना कधी पुढे जायचे आणि कधी एक पाऊल मागे यायचे, याची अचूक जाण आहे.

ही त्यांच्या सहकारी नेत्यांना आली तर पक्ष पुढे जाऊ शकेल. ईडी चौकशीच्या निमिताने पवार यांनी राज्यभर सत्ताधार्‍यांच्या विरोधात मोठे वातावरण तयार केले होते; पण मनस्वी अजितदादांनी राजीनामा देऊन त्यावर बोळा फिरवला. विरोधकांना नेस्तनाबूत करायचे असेल तर आधी शरद पवारांना टार्गेट करायचे, मग बाकी काम सोपे होते. आता दिल्लीतील फौज यासाठी महाराष्ट्रात उतरणार आहे. त्यांची सगळी तयारी झाली आहे. पवार यांना घेरण्याचा डाव दिसत असताना राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी आपली सर्व ताकद लावून मुकाबला करायला हवा. दुसर्‍या बाजूला काँग्रेस उठून उभी राहील असे दिसेपर्यंत विधानसभा निवडणूक संपलेली असेल, असे एकूण चित्र आता तरी दिसत आहे. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी फक्त राहुल गांधी यांच्या सभांमधून काही चमत्कार होईल, याची अपेक्षा न बाळगता ज्येष्ठ, दुसर्‍या आणि युवा फळीतील नेत्यांवर विश्वास ठेवून त्यांना मैदानात उतरवायला हवे. हातात मोजके दिवस असले तरी लोकांना निवडणुकीच्या निमित्ताने विरोधक दिसले पाहिजेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कृष्णकुंज सोडून बाहेर पडले आहेत, ही विरोधकांसाठी लढाईच्या मैदानात आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट आहे. आज राज यांच्या तोडीचा वक्ता राज्यात नाही आणि देशातही ते सरस आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी तसे दिसले होते. आताही ते दांडपट्टा फिरवून सत्ताधार्‍यांना घायाळ करणार. पण, घायाळ करणे आणि चितपट करणे यात फरक आहे. निवडणूक प्रचार काही दिवसांचा असतो, बाकी दिवस तुम्ही काय करता याकडे जनता तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने बघत असते. दिवाळीला मोती साबण तसे निवडणूक प्रचाराच्या वेळी राज… अशी खिल्ली उडवणारी पोस्ट भाजपकडून सध्या फिरवली जात आहे. निवडणुकीच्या काळात असा टोकाचा प्रचार केला जाणार, त्यात नवीन नाही. पण, तसे आपल्याबद्दल का बोलले जाते, याचा विचार व्हायला हवा.

दिशा आणि आधुनिकता याची मोठी समज राज यांना आहे. युवा मतदारांमध्ये त्यांच्या नावाची क्रेझ आहे, असे स्वतः शरद पवार सांगतात. पण, राजकारण हे पार्ट टाईम कधीच होऊ शकत नाही, असेही ते सांगायला विसरत नाहीत. राज यांचे वय आणि त्यांचा एकूण वकुब बघता ते खूप मोठी मजल गाठू शकतात. मुलुख मैदान तोफ अशी ख्याती मिळवताना त्यांनी कुशल संघटक असेही नाव कमावले तर इंजिन वेगात पळू शकेल आणि ते म्हणतात त्याप्रमाणे मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवा हे त्यांचे पहिले स्वप्न साकार होऊ शकेल…

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -