घरफिचर्सशिवारशी नाळ जोडणारे शिक्षण

शिवारशी नाळ जोडणारे शिक्षण

Subscribe

ज्ञानरचनावाद, सतत सर्वंकष मुल्यांकन, शिक्षण हक्क कायदा या अंतर्गत शिवाराशी नाळ जोडणार्‍या शिकणं शिकविण्याच्या प्रक्रिया यांना अवकाश उपलब्ध झाला आहे. पुस्तके आता पुस्तकाबाहेरील परिसराबद्दल अधिकची चर्चा करीत आहेत. गावशिवाराबद्दल बोलत आहेत. शिक्षकांची क्षमता बांधणी यादृष्टीने होणे आवश्यक आहे.

गावागावात शाळा येऊन बरीच वर्षे झाली आहेत. काही गावात अनेक वस्तीशाळा आहेत. शाळेतून लिहिणं वाचणं शिकवलं जातंय. विज्ञान तंत्रज्ञानाच्या नवनवीन गोष्टी शिकविल्या जात आहेत. गणिते सूत्रात मांडली जात आहेत. मोठ मोठाल्या प्रश्नांची कोडी चुटकीसरशी कशी सोडवायचे याचे हिशोब मांडले जातायत. अलीकडे मुलांना आनंद येईल या पद्धतीने शिकविण्यावर भर दिला जात आहे. आत्ताची मुलंही चुणचुणीत आहेत. नवनवीन गोष्टी आत्मसात करीत आहेत. मात्र काही अपवादाच्या शाळा वगळता गावशिवाराशी विद्यार्थ्यांचं नातं तुटत आहे. पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेने जतन करत आणलेल्या गावशिवाराबद्दलच ज्ञान मुलांपर्यंत पोहचत नाहीय. गाव शिवारातील नदी, नाले, डोंगर, खडक, माती, वनस्पती, या सर्वांसोबतचे लोकांचे सहसबंध आणि सहजीवन ही सगळी शाळेतील शिकण्या-शिकविण्याच्या प्रक्रियेत यायला हवीत. या लेखात काही मोजकी उदाहरणे घेऊन याबद्दलची चर्चा केली आहे.

शिवारातील रानभाज्या
महाराष्ट्रातील बहुतेक गावात किमान वीसहून अधिक रानभाज्या सहज मिळू शकतात. जूनमध्ये पाऊस सुरू झाला की रान सर्व हिरवे होतात. जनावरांना कुरण तयार होते. जनावरांसोबत माणसांनाही मोलाच्या अशा अनेक भाज्या यावेळी उगवतात. गुर्‍हे चारून घेऊन घरी येताना प्रत्येकाकडे काहीना काही रानभाजी आणलेली असते. रानात जायचे म्हणजे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण म्हणून मोठा गमछा घेऊन जातात. घरी परतत असताना हा गमछा भाजीपाल्याची गाठोडी बांधून आणायला उपयोगी होते. सुरणाची कोवळी देठे, बडदा, भारंगीची पाने, चाईची कोंब ज्याला शेंडवेल म्हणतात, डोंगरमाथ्यावर उगलेली पाथरी, भोकराची कोवळी पाने, टाकळ्याची कोवळी पाने, पानाआड लपलेली लुसलुशीत करटुली, आंबट चिंचफुले अशी कैक गोष्टी पावसाळ्याच्या सुरुवातीला भाज्या म्हणून गावातील लोकं घेऊन येतात. हिवाळ्यातील भाज्या अजून वेगळ्या. चाईचा मोहर, भारंगीची फुले, फांगीच्या वेलीला नव्यानेच आलेली पाने इत्यादी. उन्हाळ्यात वेगवेगळी कंद, मोठ्या झाडाची पाने, फुले व फळे या भाजी म्हणून खाल्या जातात. बहाव्याची फुले, काटेसावरीची कोवळी फळे, सौंदड किंवा शमी यांचे कोवळे शेंगा यांची खूपच रुचकर भाजी बनते. मी व भाऊ शिवराज कुठे रस्त्याच्या बाजूला शमीच्या कोवळ्या शेंगा दिसल्या की हमखास तासभर वेळ देऊन भाजीसाठी घरी घेऊन जातोच.

- Advertisement -

एका शाळेतील शिवारफेरीत मैत्रिणीने प्रश्न विचारले, अरे हे सर्व खातात, हे तुला कसे रे माहीत? प्रश्न तसा साधा सरळ होता. मात्र मी त्या प्रश्नाचा जरा जास्तच खोलात विचार केला. हे सर्व खातात हे माणसाला कसे माहिती झाली. कांचा आइलैया नावाचे एक नावाजलेले लेखक आहेत. त्यांचे एक पुस्तक आहे, Turning the pot, Tilling the land. याचा एकलव्य प्रकाशनने हिंदी अनुवाद केलेला आहे. ‘हमारे समय में श्रम की गरिमा’ या नावाने ते उपलब्ध आहे. या पुस्तकात आइलैया यांनी आपल्या पूर्वजांनी हजारो वनस्पतींपैकी काय खाद्य आहे, काय नाही हे शोधून काढले, हे शोधणे म्हणजे स्वतःवर प्रयोग करणे होते. या प्रयोगात अनेकांनी आपला जीवदेखील गमवला. त्यातून आपल्याला माहिती झाले की, काय खातात व काय खात नाहीत. आज आपण या ज्ञानाचे काय करीत आहोत?

मी कामानिमित्त वेगवेगळ्या गावात जात असतो. गावात गेलं की गावशिवारात फिरणे हा माझा आवडता छंद. गावशिवारात किमान एक तर रानभाजी कोणत्याही सीझनमध्ये सहज उपलब्ध होते. ती भाजी सोबत घेऊन येत असताना त्याच गावातील मुलं विचारतात, हे काय आहे? बहुदा ही मुलं शाळेत जाणारी असतात. मुलांचे हे प्रश्न त्यांच्यातील जिज्ञासा जिवंत असल्याचे लक्षण आहे. याचा आनंदही होतो. मात्र शाळेत जाणारी मुलं गावशिवाराशी, गावातील लोकांच्या परंपरागत लोकज्ञानापासून दूर जात आहेत याचे वाईट वाटते. शिक्षक, गावातील नागरिक, पालक यांनी आपलं हे परंपरागत ज्ञान पुढील पिढीकडे पोहचवण्यासाठी शाळा आणि गाव यांचा संवाद वाढवायला हवाय.

- Advertisement -

संपन्न रानमेवा
आज प्लास्टिकमध्ये पॅक केलेली कुरकुरे, पुठ्याच्या बॉक्समध्ये बंद पिझा खाऊन आपला समाज संस्कृत होतो आहे. थोडंसं मळकट साडी घातलेल्या आजीच्या टोपलीतील कारं, बोरं, करवंद, चिंच ही अनहायजनिक ठरवली जात आहेत. अलीकडे रानभाजीबद्दल बरीचसी चर्चा व्हायला लागली आहे. फेसबुक व व्हॉटस्अ‍ॅपवर रानभाजी विषयीची चर्चा करणारी बरेच गट तयार झाले आहेत. या सर्वामध्ये रानमेवा बद्दलची चर्चा अजूनही खूप कमी प्रमाणात होताना दिसते. रानमेव्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे त्यांचे खाण्यातील प्रमाण कमी कमी होत आहे. एकाच कुटुंबाच्या तीन पिढ्यांतील लोकांना जर माहिती असलेल्या रानमेव्यांची माहिती विचारली तर अलीकडील पिढीतील तरुण व छोटी मुलं यांना मोजकीच रानमेव्यांची नावे सांगता येतील. लोकांनी या गोष्टी खाणे सोडल्यामुळे ती आपल्या गाव शिवारात टिकली पाहिजे याबद्दलची सजगता कमी झाली आहे. नवीन रस्ते बनविणे, जुन्या रस्त्याचे रुंदीकरण, शेतीसाठी जमीन काढणे, घर व इतर इमारती बांधकामासाठी जागा मोकळे करणे, या सर्व कारणासाठी रानमेव्याची झाडे, झुडपे गमवावी लागली तर त्याकडे फारसे गंभीरपणे पहिले जात नाही. याचा परिणाम म्हणून गावशिवार निरस होत आहेत.

जडीबुटी व वैदू
काटा रुतला आणि तो आतमध्ये बारीकसा खुडला तर त्यावर गुटगुटीच्या वेलीचं धुध टाकलं की काटा थोड्या वेळात अपोआप बाहेर येतो. आपल्या नकळत काटा पायातच राहिला असेल अन त्याची जखम झाली असेल तर धोतर्‍याचे फळे चुलीत भाजून पायावर बांधावं, काटा मोडून अगदी जोर्‍यात ठणठणत असेल तर बिब्याचे तेल लाऊन चिमणीवर किंवा चुलीतील निखार्‍यावर शेकावे. फक्त काटा मोडल्यानंतरच्या वेगवेगळ्या अवस्थेवर किती नियंत्रित उपाययोजना गावातील लोकज्ञानात उपलब्ध आहे. अनेक गावात वैदू असतात. मात्र माझ्या गावात असा कोणी वैदू नव्हता. मात्र गावातील जवळपास सर्वच शेतकरी बांधवांना छोट्या मोठ्या जखमा, आजार, दुखापती यावरील वनस्पती उपचार माहिती होते. अगदी प्रत्येक घरात नसले तरी प्रत्येक घरापासून हाकेच्या अंतरावर अशी एक दोन लोकं सहज असायची. शेतीत काम करताना जखमा होणेही साहजिक आहे. धस्कट लागतात. आता धस्कट हा शब्द किती जणांना माहिती आहे, हा प्रश्नच आहे. शेतीतील पिके कापून घेतल्यानंतर त्याचे जमिनीत उरलेले भाग हे टोकदार असतात. शेतीतून फिरताना नजरचुकीने ही धस्कटे पायाला लागतात. बर्‍याचदा ही जखम खूप खोलवरील असतात. गवत कापतानादेखील विळी लागून अशा जखमा होऊ शकतात. अशा जखमांना बांधण्यासाठी शेताच्या बांधावर, शेतात कैक वनस्पती असतात. जखम छोटी असेल तर दगडीपाला किंवा जखमजोडी, जखम खूप मोठी असेल तर न्यालकेंदू म्हणून वेगळा पाला.
पाय मुडपले असेल, पीळ बसले असेल तर बेशरमी किंवा तरवडपाला शेकावा. हगवण लागली असले तर लाजाळूची मुळी दह्यात उगाळून द्यावी, डोके दुखत असले तर अमुक पाला चोळावा, कान दुखत असले तर या पानाचे रस टाकावे, असे एक न अनेक उपचार केली जायची. ही उपचार फक्त मानसिक समाधानासाठी नव्हती. यातून खरेच दुखणे थांबायचे. त्यामुळेच तर ही कधीपासून चालत आलेली उपचार पद्धती आजपर्यंत टिकून आहे. मात्र उद्या असेल का याची शाश्वती नाहीय. आधुनिक वैद्यक विज्ञानाने नवनवीन उपचार पद्धती, औषधे शोधून काढली. त्याचे कौतुकच आहे. मात्र हे करीत असताना पिढीजात आलेल्या लोकज्ञानाकडे, शहाणपणाकडे केलेले दुर्लक्ष खूपच अक्षम्य आहे.

जनावरांचे आजार आणि झाडपाला उपचार
जनावरांचे गावात यायला सत्तर ऐंशीचे दशक उजडावे लागले. त्या आधीही जनावरे आजारी पडत, त्यांनाही जखमा होतं, तोंड येत, जनावरे चारा खाणे सोडत. या सगळ्या आजारावर स्थानिक लोक आपल्या शिवारातील वनस्पती वापरून उपचार करीत. पुण्यातील अंथरा नावाची संस्था अशा परंपरागत वनस्पती आधारित औषध उपचारावर अभ्यास केला आहे. आजही डोंगरदर्‍यातील गावामध्ये ही उपचार पद्धती प्रचलित आहेत. याबद्दलचे ज्ञान नव्या पिढीकडे नाहीय. पाठ्यपुस्तके आता अशा विषयांना वर्गात चर्चा करण्याचे अवकाश उपलब्ध करून देत आहेत.

सगळी जुनी उपचार पद्धती वैज्ञानिक आहेत असा दावा नाहीय. मात्र जुनी उपचार पद्धती नाकारत असताना किमान त्यांचा अभ्यास तरी व्हायला हवाय. मोठे घाव झाले तर त्यावर न्यालकेंदू हा पाला लावला जातो. आता हे न्यालकेंदू म्हणजे काय हे फक्त मला व नांदेड जिल्ह्यातील तेलंगण सीमेलगत असलेल्या येरगी गावातील काही लोकांनाच माहिती आहे. मात्र जिल्ह्याच्या बाहेरील लोकांना ही वनस्पती माहिती नाही. त्या भागात ती वनस्पती नाही असे नाही. मात्र तिथे ती वनस्पती वेगळ्या नावाने ओळखली जाते. शाळेत, कॉलेजमध्ये आधुनिक वनस्पती विज्ञान शिकविले जाते. त्यात वनस्पतींचे वनस्पतीशास्त्रीय नावे निश्चित केली जातात. परंपरागत वापरत असलेली या सर्व वनस्पतींचे अशी नावे शोधणे, त्यातील औषधी सायुगांचा अभ्यास होणे मोलाचे आहे. असे अभ्यास होतात, अगदीच नाही असे नाही. मात्र त्या अगदीच मर्यादित आहेत. गावातील गुर्‍हाकी, शेतकरी ही विद्यार्थ्यांचे पालकच असतात. मात्र पालकांना असलेली माहिती ही मुलांना नाहीय. या माहितीकडे ज्ञान म्हणून पहिले जात नाही. मुलं पालकांशी अशा विषयवार खूप कमी संवाद साधतात. शिक्षक म्हणून अशा जाणकार पालकांना शाळेत बोलवून त्यांना असलेली वनस्पती, भाज्या, परंपरागत औषध उपचार याबद्दल बोलायला सांगितलं तर त्याला ज्ञान म्हणून पहिले जाईल.

ज्ञानरचनावाद, सतत सर्वंकश मुल्यांकन, शिक्षण हक्क कायदा या अंतर्गत शिवाराशी नाळ जोडणार्‍या शिकणं शिकविण्याच्या प्रक्रिया यांना अवकाश उपलब्ध झाला आहे. पुस्तके आता पुस्तकाबाहेरील परिसराबद्दल अधिकची चर्चा करीत आहेत. गावशिवाराबद्दल बोलत आहेत. शिक्षकांची क्षमता बांधणी यादृष्टीने होणे आवश्यक आहे. नवीन अभ्यास पद्धती, सुधारणा यांचे निर्णय होतात, अध्यादेश निघतात मात्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकविणारे शिक्षक त्याचं म्हणणे ऐकून घेणे, त्यांची सर्व परिस्थिती लक्षात घेऊन क्षमता बांधणी करणे याबद्दल शिक्षण विभाग उदासीन दिसतो. ही सर्व परिस्थिती गृहीत धरून शिक्षक म्हणून गाव शिवाराशी मुलांची नाळ जोडणारे शिक्षण कसे देता येतील, यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. माहीत असलेल्या गोष्टीकडून माहिती नसलेल्या गोष्टीकडे या शिकण्या-शिकविण्याची पद्धतीच्या प्रभावीपणाबद्दल चर्चा होते. ही पद्धत प्रत्यक्षात आणण्यासाठी गावशिवारातील अनेक गोष्टींना शिक्षणाचे साधन म्हणून पाहता येईल.

-बसवंत विठाबाई बाबाराव (लेखक ‘पर्यावरण शिक्षण’ विषयाचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -