करोनासोबत जगायला शिकूया…

आपल्या पूर्वजांनी इतिहासात मानवजात अनेकदा महामारीच्या संकटातून गेलेली बघितली आहे. अनेक संकटे आली आणि गेली. माणूस मात्र जगलाय, जगत राहील. आज आपली पिढी करोनाच्या संकटातून जात आहे आणि आपल्याला समर्थपणे या संकटावर मात करायची आहे. शिस्त, चिकाटी, आशावाद आणि जीवनाचा वारसा पुढील पिढीपर्यंत घेऊन जायचा आहे. करोनाची लस उपलब्ध होईपर्यंत आपल्याला त्याच्यासोबत स्वत:ला नीट सांभाळत जगायचे आहे. आपल्याला बर्‍याच गोष्टींमध्ये बदलायचे आहे. करोनाशी सामना दोन पद्धतीने करावा लागेल. एक म्हणजे स्वत:ला संक्रमण होऊ नये म्हणून काही काळजी घेणे आणि दुसरे म्हणजे करोनाचे वाहक बनणे टाळून इतरांना प्रादुर्भावापासून वाचविणे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आला तरी करोना आपल्यात शिरकाव करणार नाही, यासाठी आवश्यक साधनांसह काळजी घ्यावी लागणार आहे.

Mumbai

बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि बदलाचा स्वीकार करणं ही काळाची गरज! आणि आजच्या बदलाचा स्वीकार करण्यासाठीचं निमित्त आहे करोना. गेल्या ५० दिवसांपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केलाय. या लॉकडाऊनच्या निमित्ताने प्रत्येकाच्या तोंडी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटेशन, मास्क, आयसोलेशन, क्वारंटाईन यासारखे शब्द रूळलेत. काहींनी धाकापोटी तर काहींनी समजूतदारपणे ते अंगिकारलेही आहेत. एखाद्या हॉलिवूडच्या चित्रपटात जगावर किंवा मानवजातीवर संकट आल्यानंतर जो काही हाहाःकार दाखवला जातो आणि आपण तो थ्रील म्हणून बघतो तसाच आपण टीव्हीवर आणि सोशल मीडियावर चीन, इटली, फ्रान्ससारख्या देशात करोनामुळे उद्भवलेला हाहाःकार बघितला. तेथील करोनाचा वाढता प्रादुर्भाव, मृतांचा झपाट्याने वाढता आकडा आणि त्यावरील त्यांच्या कधी थोड्याफार यशस्वी तर कधी पूर्णपणे अपयशी ठरत असलेल्या उपाययोजना बघितल्या.

‘पर दुःख शीतल’ या उक्तीप्रमाणे आणि काही या असंवेदनशीलपणाने चायनावाल्यांना असाच धडा मिळायला पाहिजे होता. अशा प्रकारच्या गोष्टीदेखील चर्चिल्या गेल्या आणि म्हणता म्हणता करोना भारतात येऊन धडकला. अद्याप इलाज न सापडलेल्या कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरूवातीला जनता कर्फ्यु आणि पुढे टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन घोषित केला. काही मंडळींनी प्रसंगांचं पुरेसं गांभीर्य न घेतल्याने जनता कर्फ्यु हा एक इव्हेंट आणि लॉकडाऊनचा सुरूवातीचा काळ म्हणजे आपसूक मिळालेल्या सुट्ट्या म्हणून अनुभवल्या. प्रारंभीच्या काळात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन जेव्हा गांभीर्याने टाळेबंदी, संचारबंदीसाठी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा काही मंडळी कधी धार्मिक भावना, कधी राजकारण तर कधी निव्वळ विरोधाला विरोध म्हणून रस्त्यावर फिरत होती. करोना प्रादुर्भावाला हातभार लावत होती. करोना योद्धे म्हणून जीवाची पर्वा न करता काम करणार्‍या डॉक्टर्स, आरोग्यसेवक, पोलीस आणि सफाई कामगार यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून काही गोष्टी करण्याचे जेव्हा आवाहन केले तेव्हा तर या अतिउत्साही मंडळींनी मिरवणुका काढल्या, सामूहिक नृत्याचे कार्यक्रम करत करोनाला आग्रहाने प्रसारित व्हायला मदत केली. एका बाजूला करोनाचे गांभीर्य पोटतिडकीने सांगणार्‍या आणि त्यासाठी काम करणार्‍यांना विरोधदेखील करण्यात आले.

डॉक्टर्स, पारिचारिका आणि पोलिसांवर झालेले हल्ले अशी काही उदाहरणे आपण डोळ्यादेखत बघितली. काही काळ तर करोना सोडून धार्मिकतेढ सोडविण्याचीच प्राथमिकता बनते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. हे घडत असताना ज्यांचे पोट हातावर आहे, आज कमवू तरच खायला मिळेल अशा लोकांचे अतोनात हाल झाले. त्याची परिनिती म्हणून शेकडो किलोमीटर पायी, सायकलने तरी कधी मिळेल त्या वाहनाने चोरटा प्रवास सुरू झाला. जगात आर्थिक विषमता, धार्मिक भिन्नता, वैचारिक भिन्नता कायम असते. या सर्व गोष्टींचे पडसाद या लॉकडाऊनच्या पहिल्या दुसर्‍या टप्प्यात दिसून आले. म्हणजे एकाच वेळी करोनाच्या धास्तीमुळे जीव वाचवण्यासाठी घरात बसलेल्यांवर भुकेने मरण्याची वेळ आली होती तर दुसरीकडे घरात बसून टाईमपास करण्याचे विविध मार्ग शोधून बोअर होत असलेलादेखील एक वर्ग होता. एकीकडे गोरगरिबांना जीवनावश्यक जिन्नसांची मदत करणारी काही सेवाभावी मंडळी होती तर काहींना दारूचे पार्सल मिळेल का, ही चिंता भेडसावत होती. एकीकडे लॉकडाऊनमध्ये सर्वांबद्दल काळजी घेणारा वर्ग होता तर दुसरीकडे नफेखोरी करणारेही जोरात होते. आपत्ती काळात मानवी गरजा आणि प्रवृत्तींचे सर्व प्रकार समोर येत होते. सूक्ष्म करोना मात्र झपाट्याने पसरत होता. काल परवा टीव्हीवर इतर ठिकाणी दिसणारा करोना वेगाने आपल्या शहरात, आपल्या गल्लीत, आपल्या दारात आल्याचे जेव्हा दिसू लागले तेव्हा मात्र गांभीर्य वाढले. आपण लॉकडाऊनचा तिसरा टप्पा ओलांडला आहे आणि करोनाही झपाट्याने सर्वदूर पसरला आहे. करोनावर लस शोधण्यासाठी जगभर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मृतांची संख्या जशी वाढते आहे तशी या आजारातून बरे होण्याचे प्रमाणदेखील आशादायी आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर योग्य काळजी घेतली तर आपण करोना समवेत आणि करोनाशी लढत जगण्याची वेळ आली आहे. पंतप्रधानांनी परवा जनतेशी केलेल्या संवादात आत्मनिर्भर होण्याच्या आवाहनातून ते संकेत दिलेच आहेत.

आपल्या पूर्वजांनी इतिहासात मानवजात अनेकदा महामारीच्या संकटातून गेलेली बघितली आहे. अनेक संकटे आली गेली. माणूस मात्र जगलाय, जगत राहील. आज आपली पिढी या संकटातून जात आहे आणि आपल्याला समर्थपणे या संकटावर मात करायची आहे. शिस्त, चिकाटी, आशावाद आणि जीवनाचा वारसा पुढील पिढीपर्यंत घेऊन जायचा आहे. करोनाची लस उपलब्ध होईपर्यंत आपल्याला त्याच्यासोबत स्वत:ला नीट सांभाळत जगायचे आहे. थोडक्यात आपल्याला बर्‍याच गोष्टींमध्ये बदलायचे आहे. करोना मानवनिर्मित जैविकशस्र की नैसर्गिक विषाणू हे शास्त्रज्ञ शोधून काढतीलच. मात्र आजही आपल्यातीलच काही माणसं या आजारातून बरे होत आहेत, म्हणजे आपल्या शरीरात करोनाला मात देण्याची क्षमता निर्माण होते आहे. करोनाशी सामना दोन पद्धतीने करावा लागेल. एक म्हणजे स्वत:ला संक्रमण होऊ नये म्हणून काही काळजी घेणे आणि दुसरे म्हणजे करोनाचे वाहक बनणे टाळून इतरांना प्रादुर्भावापासून वाचविणे. यासाठी पालन करावयाच्या गोष्टी मात्र सर्वांसाठी समानच आहेत. कारण आजपर्यंत करोनाने कोणासोबतही भेदभाव केलेला नाही आणि करणारही नाही.

करोनाला रोखण्याचा प्राथमिक उपाय म्हणून लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये मानवी जीवनाचे सर्व भाग प्रभावित झाले आहेत. शारीरिक-मानसिक स्वास्थ, माणसामाणसांतील नातेसंबंध, ठप्प झालेले उद्योगधंदे, कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि भविष्याबद्दलचे धुसर चित्र यामुळे सर्वत्र अनिश्चितता जाणवू लागली आहे. दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण होणे दुरापास्त वाटू लागल्याने लॉकडाऊन शिथिल करण्याबद्दलची मागणी जोर धरू लागली आहे. एकीकडे करोना बाधितांची संख्या वाढत असतानादेखील उद्योग व्यवसाय किंवा कामे चालू करण्याची गरज निर्माण झाल्याने आता तशी पावले उचलली जाण्याची चिन्हे आहेत. आणि म्हणून करोनासोबत जगण्याची सवय लावण्याची आता गरज आहे. म्हणजे नेमके काय करावे लागेल ते बघूया. सर्वप्रथम आहे शारीरिक-मानसिक स्वास्थ. शारीरिक तंदुरूस्ती व रोगप्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य विश्राम आवश्यक आहे आणि इथून पुढे जरा जास्तच आवश्यक असणार आहे. यासाठी एका आदर्श जीवनशैलीचा अंगिकार करावा लागेल.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही जीवन पूर्वीसारखे नसेल. त्याला नियम असतील, शिस्त असेल. कारण करोना आपल्या आजुबाजूलाच असणार आहे. अशीही आपल्याला लॉकडाऊनमुळे काही प्रमाणात शिस्त लागली आहेच. बाहेर पडता येत नसल्याने घरातील अन्नपदार्थ खात आहोत. शिवाय कमाई थांबल्यामुळे किंवा मर्यादित झाल्याने आहार गरजेपेक्षा अधिक घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बरीचशी मंडळी घरी व्यायाम, योगा, प्राणायाम करू लागली आहेत. हॉटेल्स बंद आहेत, त्यामुळे जंकफूडला मोठा ब्रेक मिळाला आहे. मद्यपानात मोठा खंड पडल्याने या व्यसनातून बाहेर पडू शकण्याचा बर्‍याच मंडळींचा आत्मविश्वास वाढायला आणि व्यसनमुक्त व्हायला हरकत नसावी. शिवाय या महागड्या व्यसनात खंड पडल्याने कौटुंबिक अर्थव्यवस्था लॉकडाऊनमध्ये शाबूत राहायला चांगलीच मदत मिळाली असणार, हे समंजस लोकांनी मान्य करायलाच हवे. थोडक्यात मर्यादित गरजा, नैसर्गिक, सुरक्षित शिस्तबद्ध जीवनशैली लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरदेखील टिकवून ठेवली तर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास स्वत:सह शासन प्रशासनास मदतच होणार आहे.

मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत म्हणाल तर बदललेल्या परिस्थितीचा तात्काळ स्वीकार, जीवनाप्रती विवेकनिष्ठ आणि उदात्त दृष्टिकोन आणि संयम हीच त्रिसुत्री उपयुक्त ठरणार आहे. यासाठी अतिरिक्त चिंता वाढविणार्‍या चर्चा, बातम्या, अफवा यापासून स्वत:ला दूर ठेवणे, प्रत्येकाने प्रत्येकाबद्दल सहचार, सहकार आणि सहानुभूतीपूर्ण विचार करणे, तसे वागणे, मनातील दुराग्रह सोडून देणे, आपत्तीकाळात आपण काय सकारात्मक योगदान देवू शकतो किंवा स्वत:च्या चांगल्या वागण्याने, करत असलेल्या त्यागाने आपण सर्वांना मदतच करत आहोत, यासारखे उदात्त दृष्टिकोन बाळगणे या सारख्या गोष्टी करणे गरजेचे असणार आहे. ही मनोभूमिका समाजमनापर्यंत पोहचण्यासाठी परस्परांमधील सकारात्मक संवाद, प्रसंगी समुपदेशन, वाचन, चिंतन, मनन, कलाकौशल्यांची साधना, मनाला संस्कारित करणारी काही तंत्रे आणि मेडिटेशन यासारख्या नैसर्गिक गोष्टींचाही वापर करणे आवश्यक असणार आहे.

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामाचे स्वरूप बदलत आहे, अजून बदलणार आहे. व्यक्तिगत स्वच्छता राखत, सोशल डिस्टन्सिंग पाळत, संक्रमण रोखत कामे करताना सुरूवातीस दमछाक होईलही. कारण मनुष्य सवयींचा गुलाम असतो. नवीन सवयी अंगी बाणवाव्याच लागतील. परिस्थितीचे गांभीर्य आणि त्याप्रती आपल्या सकारात्मक भूमिकेचा मनापासून स्वीकार करताक्षणीच या नवीन चांगल्या सवयी आपोआप आंगवळणी पडतील.कामाचे स्वरूप बदलल्याने आर्थिक उत्पन्नाचे प्रमाणदेखील बदलेल. कदाचित कमी होईल. त्यामुळे असेही कमी गरजांमध्ये भागवणे अनिवार्य असणार आहे. त्यातील सकारात्मक बाजूकडे बघितले तर कमी खर्चातदेखील आपण जगू शकतो ही अनुभवसिद्ध जाणीव प्रत्येकाकडे राहील. पुढच्या पिढीकडे एक चांगला संदेश या निमित्ताने आपल्याला देता येईल. खरंतर असाच संदेश द्यावा.

डॉ. शैलेंद्र गायकवाड

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here