घरफिचर्सबहुस्वरीय जीवनानुभवाचा चिंतनगर्भ ललितमेळा

बहुस्वरीय जीवनानुभवाचा चिंतनगर्भ ललितमेळा

Subscribe

कवितेप्रमाणेच दासू वैद्य यांनी सामर्थ्यशील असे ललित गद्यलेखनही केले आहे. त्यांच्या काव्यप्रकृतीची छाप त्यांनी केलेल्या ललित गद्यलेखनावर आहे. ‘आजूबाजूला’ आणि ‘मेळा’ हे त्यांचे दोन ललित लेखसंग्रह याची साक्ष देतात.‘मेळा’तील लेखन काव्य आणि गद्य यांच्या सीमारेषा पुसट करत समकालाला भिडणारे आणि त्यांच्याच लेखनात सर्वोत्तम ठरणारे असे लेखन आहे. मानवी जीवनाचा विविध कोनातून घेतलेला चिंतनगर्भ तळशोध म्हणजे हे लेखन आहे.

दासू वैद्य हे नव्वदोत्तर काळातील भवतालातल्या विसंगतीला उपरोधशैलीच्या माध्यमातून काव्यबध्द करणारे चिंतनशील मानवतावादी कवी आहेत. ‘तूर्तास’ आणि ‘तत्पूर्वी’ या त्यांच्या दोन प्रसिध्द काव्यसंग्रहांची शीर्षके कालवाचक आहेत. त्यातून या कवितेला काळभान असल्याचे ध्वनित होते. या संग्रहातून वैद्य यांनी आपल्या काळातील उलघालीकडे तिरकसदृष्टीतून पहात व्यक्त केलेला आशय अर्थवलयी आहे. सामाजिक वास्तवाला विरोधन्यास आणि विपरीतताभाव यांच्या वापरातून व्यंजना घडवत प्रतिसाद देणारे कवी म्हणून त्यांचे वेगळेपण अधोरेखित करता येईल. या कारणानेच समकालीन मराठी कवितेत त्यांची कविता स्वत:चा चेहरा घेऊन अवतरते. गावखेड्यापासून ते महानगरापर्यंतचे मोठे अवकाशविश्व या कवितेने व्यापलेले आहे.

नागरी, अर्धनागरी, ग्रामीण अशा सांध्यावरील मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य माणसांच्या काळसंदर्भी जीवनजाणिवांना, जीवनरीतीला ते साक्षात करतात. माणूस, समाज आणि निसर्ग हे त्यांच्या कवितेचे निर्माणकेंद्र आहे. सांस्कृतिक संचिताच्या संस्कारशीलतेने भारलेली त्यांची कविता मानवी वर्तनकृतीचा शोध घेते. परंपरा आणि आधुनिकतेच्या संक्रमणातून आकारलेल्या वर्तमानिक जगाचा वेध घेत सामान्य माणसांच्या जगण्यातील विविध परिमाणांना अभिव्यक्त करते. वैयक्तिक-सामाजिक अनुभूतीविश्वाला नव्या प्रतिकव्यवस्थेच्या उपयोजनातून त्यांनी अनेकार्थक्षम बनवलेले आहे. म्हणूनच समकालीन कवितेत ही कविता स्वत:चे अस्तित्व ठळक करते.

- Advertisement -

कवितेप्रमाणेच दासू वैद्य यांनी सामर्थ्यशील असे ललित गद्यलेखनही केले आहे. त्यांच्या काव्यप्रकृतीची छाप त्यांनी केलेल्या ललित गद्यलेखनावर आहे. ‘आजूबाजूला’ आणि ‘मेळा’ हे त्यांचे दोन ललित लेखसंग्रह याची साक्ष देतात. ‘मेळा’तील लेखन काव्य आणि गद्य यांच्या सीमारेषा पुसट करत समकालाला भिडणारे आणि त्यांच्याच लेखनात सर्वोत्तम ठरणारे असे आहे. मानवी जीवनाचा विविध कोनातून घेतलेला चिंतनगर्भ तळशोध म्हणजे हे लेखन आहे. यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, पर्यावरणीय अवकाशातील घटितांची सारसूत्रे आणि व्यक्ती समूहांच्या विविध वृत्ती-प्रवृत्ती, विचार, भावना, मूल्यकल्पना, नीती-अनीतीचा वैविध्यपूर्ण कोलाजी आविष्कार आहे. सर्वस्पर्शी जाणीवक्षेत्राला कवेत घेत हा चिंतनमेळा साकारतो. इतिहास-वर्तमानाच्या संघर्षशील काळभानाचे आणि बदलत्या समाजवास्तवाच्या ताण्याबाण्याचे परिप्रेक्ष या लेखनाला लाभलेले आहे. हा गेल्या अर्धशतकाच्या भवतालात दडलेल्या बहुस्वरीय आवाजांचा अर्करूपी ललितमेळा आहे. हे स्वर महाराष्ट्रीय ग्राम-नागर जगण्याच्या अनुभवविश्वाने समृध्द झालेले आहेत. या आवाजांची तात्त्कालिकता गळून पडत त्याला वैश्विकता प्राप्त झालेली आहे. समकालीनता आणि कालातीतता हा महत्त्वाचा गुणधर्म या लेखनाचा आहे.

वैयक्तिक-सामूहिक अनुभवांच्या या अठ्ठावीस लेखांच्या संग्रहावर सांस्कृतिक संचिताचा खोलवर ठसा आहे. देशी-विदेशी, ग्राम-नागर, आजचे-कालचे असे विविध सांस्कृतिक संदर्भ या लेखनातून उजागर होतात. त्यातून भौतिक-अभौतिक जगण्याच्या परिभाषेचा सांस्कृतिक इतिहासच ग्रंथबध्द झाला आहे. ‘रंग, कटिंग, श्वानपुराण, अरण्यरूदन, पिच्चर, मनातलं घर’ हे लेख यासंबंधी महत्त्वाचे आहेत. समकाल नासवणार्‍या आणि जगण्याची मुक्त गती अवरूध्द करणार्‍या कळीच्या ठरलेल्या समकालीन प्रश्नांविषयीची समाजहितैषी आशयभाष्य अत्यंत कलात्मकरीतीने या लेखनात येतात. ‘गळा दाबल्याने गाणे अडते का?, मार्गदर्शन, न पाठवलेलं पत्र, लांब नाकवाल्याची गोष्ट’ या लेखांतून आलेली समाजचिंता आणि चिंतन सर्वांनाच अंतर्मुख करायला लावणारे आहे. समाजप्रश्नांबरोबरच सबंध सामाजाला वेढून असलेल्या समाजवास्तवाची प्रखर जाणीव संयतपणे या लेखनातून व्यक्त होते. या वास्तवाला भूत-वर्तमानाचे संदर्भ लगडलेले आहेत.‘सीमेवरचं नाटक, बाई संभाळ कोंदण, अंधारातला नट, अरं… येऊऽऽऽन येऽऽऽन येणार कोण?, खडूची भुकटी, निघून गेला आहे…’ या लेखांचा निर्देश या संदर्भात करता येईल.

- Advertisement -

त्या-त्या काळाचे स्वत:चे असे वास्तव असते. त्या वास्तवाने त्या काळाचा चेहरा स्पष्ट केलेला असतो. हे वास्तव जगण्यातील सुरूप आणि कुरूप बाबींनी आकाराला येते. दासू वैद्य यांनी कुरूप काळवास्तवाला ‘बाजार, झेंडे, गोष्ट लिहिणार्‍याची गोष्ट, अंथरलेली वाळू, बक्षिशी, रस्ता रोको’ या लेखांतून मुखरित केले आहे. जीवनाचे क्षणभंगुरत्त्व अधोरेखित करत त्याचे मर्म आणि अंतिम सत्यार्थाबद्दलचे सखोल अस्तित्वविषयक जीवनचिंतन या लेखनातून येते. माणसाची जीवनाबद्दलची आसक्ती, जीवनमरणाच्या अंतरायातील आशा-आकांक्षा आणि आयुष्याचे गमक या चिंतनातून उलगडते. या दृष्टीने त्यांच्या ‘मरणगंध, पोळणारी सावली, लाल पोशाखातला हिरवा माणूस, पाठलाग आणि प्राप्ती’ या लेखांचा निर्देश करता येईल. निसर्गाचे सजग, सशक्त भान म्हणून ‘उगवून आलेलं…’ व ‘रे पावसा…’ हे लेख लक्षणीय आहेत.

‘मेळा’मधून अधोरेखित झालेले संदर्भ, प्रश्न, वास्तव आणि जाणीवेचा स्थूलपणे निर्देश करणे आवश्यक ठरेल. केस कापण्याच्या प्रथेला असणारे विविध संदर्भ, रंगांना प्राप्त झालेले देश-काल चौकटीतील सामाजिक-सांस्कृतिक अर्थ, स्री-शोषणाची पारंपरिकता, तिच्याबद्दलची पुरूष मानसिकता आणि स्रीवर्गाचा संपूर्ण पुरूषावर असलेल्या अविश्वासाचे सार्वत्रिक दर्शन या लेखनातून घडते. दुष्काळ, शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि राजकारण्यांची त्याकडे बघण्याची असंवेदनशील, उपचारात्मक वृत्ती, पाणी आणि पाण्याने उभा केलेला रणसंग्राम, त्यामुळे खेड्यांची झालेली आबाळ, निवडणुकांमधे तिच-तिच दिली जाणारी आश्वासने, राजकारणाचा मूल्यांकडून मूल्य र्‍हासकडे झालेला प्रवास, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचारवंत, लेखकांचे खून, शिक्षणातील अपप्रवृत्ती, कॉपीचे वास्तव, भाषेचा प्रश्न आणि भाषिक मानसिकता, वाहिन्यांची टीआरपीसाठी चाललेली स्पर्धा आदी विषयांच्या अनुषंगाने दासू वैद्य यांनी केलेले मुक्तचिंतन मूलगामी स्वरूपाचे आहे.

भारतीय सैनिक व भारत-पाक यांच्यातील तणाव आणि भारतीयांची मानसिकता, जात-धर्मांच्या प्रतिकांनी समाजात निर्मिलेली दहशत-भीती, महापुरूषांच्या झालेल्या वाटण्या आणि त्यांचे केलेले प्रतिमानिश्चितीकरण, समाजातील कर्मकांडे आणि त्याची चिकित्सा, पोकळ, दांभिक, कुचकामी सामाजविकासातील फोलपणा, लेखकाची सामाजिक बांधिलकी आणि व्यवस्थाशरणता, भांडवलीकरणाच्या परिणामातून उदयाला आलेली मॉलसंस्कृती आणि त्यातील शुष्कता, माणसांच्या जगण्यातून हरवलेली निरागसता-नैसर्गिकता, त्याला आलेला कोरडेपणा-कोडगेपणा नि कृत्रिमता, गाव-शहरांना प्राप्त झालेले बटबटीत स्वरूप अशा भवतालात साठलेल्या बहुपरिणामी आशयरूपांना हे लेखन मुखरित करते. यासोबतच मृत्यूसंबंधीचे चिरकाल सत्य, समाजातील समूह संघर्ष, निसर्ग सौंदर्य व त्याचा र्‍हास, लहान मुलांमधील निरागसता, मोर्चे, आंदोलने, चित्रपट, प्राणी, घर या अनुषंगाने आलेली चिंतनरूपे मूल्यगर्भी आहेत.

शीर्षकातील प्रतिकात्मकता, अनुभव मांडणीच्या वैशिष्ठ्यपूर्ण पध्दतीमुळे निर्माण होणारे कुतूहल, रूपकाचा केलेला समर्पक वापर, काव्यमय प्रभावितता, कथनात्मक प्रवाही निवेदनशैली, आत्मकथनप्रधान विषय रचना, चित्रात्मकता आणि दृष्यात्मकतेची येणारी प्रचिती, उपरोधातून केलेली समाजटीका, संवादात्मकता आणि वैचारिकता या आविष्कार विशेषांच्या सेंद्रीय एकात्मतेतून या प्रत्येक लेखाचा घाट तयार झालेला आहे. या घाटाच्या संरचनेत घोषवाक्य, म्हणी, वाक्रप्रचार, काव्य ओळी, गोष्टी, घटना-प्रसंग, व्यक्तिचित्रे, आठवरूपे, जातक कथा, चित्रपटातील प्रसंग, गाणी, पत्र यांचे नेमके उपयोजन केल्यामुळे या लेखनाचा आकृतिबंध एकसंध बनत आशय अर्थवाही झालेला आहे. अभिव्यक्तीच्या सर्व क्षमता शक्यता पणाला लावत ही साहित्यकृती सिध्द झालेली दिसते. आशय-अभिव्यक्तीच्या एकात्म एकजीवीकरणातून या सर्वच लेखांचा रचनाबंध घडलेला आहे. सांगण्याच्या अतीव उर्मीतून ही पोतरचना तयार झालेली आहे. त्यामुळे हे लेखन वैशिष्ठ्यपूर्ण झालेले आहे. म्हणूनच वैविध्यपूर्ण अनुभवाचे संश्लेषित सारसूत्र या संग्रहातील प्रत्येक लेखातून जिवंतपणाने साक्षात झालेले आहे. त्यामुळेच भावना, विचार, कल्पना यांच्या नितळ अभिव्यक्तीतून साकारलेला हा प्रत्येक लेख म्हणजे जीवनानुभवरंगाचे शब्दचित्र वाटतो.

जगण्यातल्या साध्या-साध्या अनुभवरूपांची सांधेजोड करत अर्थवलयी कलारूप देण्याची वैशिष्ठ्यपूर्ण हातोटी दासू वैद्य यांच्याकडे आहे. वास्तव आणि कल्पितासह सूक्ष्म निरीक्षणांना सर्जनबध्द करत तरल अनुभूतीची प्रचिती देणारे अनोखे कसबही त्यांच्याकडे आहे. ‘स्व’जाणीवेला सामूहिकतेत परावर्तित करणार्‍या सामाजिक वेदना-संवेदनांचा भावनालेख म्हणूनही या लेखनाची महत्ता अधोरेखित करता येईल. समाज स्पंदनांना शब्दरूप देताना त्यांनी केलेले जीवनभाष्य वाचकांना आत्मशोधाच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत. साहित्याच्या विविध प्रकृतिधर्मांना-प्रकारघटकांना, भाषिक वैशिष्ठ्यांना रिचवत आकार पावलेला हा बहुस्वरीय जीवनानुभवाचा चिंतनगर्भ शैलीदार ललितमेळा मराठी ललितगद्यात अक्षर ठरणारा आणि नव्वदोत्तर मराठी ललित गद्यलेखन वाङ्मयप्रकाराचा रूपविस्तार करणारा आहे.

-केदार काळवणे ई-मेल आयडी: घशवरी.ज्ञरश्रुरपश.28सारळश्र.लेा
-(सहायक प्राध्यापक,मराठी विभाग,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, जि.उस्मानाबाद.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -