घरफिचर्सडॉक्टर आणि नर्सेसचे तरी ऐका

डॉक्टर आणि नर्सेसचे तरी ऐका

Subscribe

चीनमधील वुहान या धनाढ्यांच्या शहरात जन्माला आलेल्या करोना व्हायरसने जगातील २४५ देशांना विळखा घालून आव्हान दिलं आहे. हवा, पाणी यातून नाही तर माणसापासून माणसापर्यंत असा त्याचा प्रवास आहे. यामुळे माणस माणसांपासून दुरावली आहेत. एकाकडून दुसर्‍याकडे जाण्याची या व्हायरसची शृंखला असल्याने करोनाग्रस्तांच्या वार्‍यालाही कोणी उभे राहत नसल्याचे चित्र जगभरात पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत सर्दी, तापाने फणफणणारे शरीर आणि जीवघेण्या कोरड्या खोकल्याने खंगलेल्या रुग्णासमोर ठाण मांडून बसणारा करोनारूपी मृत्यू यांच्यात जर आजच्या तारखेला कोणी देवदूत म्हणून उभा असेल तर तो फक्त डॉक्टर व नर्सेस हा एकच मानव आहे. जो आपल्याला करोनापासून स्वत:चा बचाव करण्यास सांगतोय, पण त्या मोबदल्यात त्याला आपण मारझोड करतोय आई बहिणीवरून शिव्या हासडतोय. ज्या नर्सेस आपलं कुटुंब विसरून जीव धोक्यात घालून डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र आपली सेवा करत आहेत त्यांच्यासमोर अश्लील चाळे करून आपण आपलीच लाज जगासमोर काढतोय. किती वेदनादायी आहे हे गैरवर्तन, पण काहीही झालं तरी तुम्हाला त्यांचं ऐकावंच लागणार आहे.

करोनाच्या प्रकोपापासून दूर राहण्याचा संदेश देशातील प्रत्येक जबाबदार व्यक्ती जनतेला देत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री ते राजकारणी सगळेच जण लोकांना सावध राहण्याच्या सूचना देत आहेत, पण त्या सूचनांना केराची टोपली दाखवत लोकं समूहाने आता आरोग्य कर्मचारी व पोलिसांवर हल्ले करत आहेत. कुठून येते ही वृत्ती आपल्या भल्यासाठी आपला जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणार्‍या लोकप्रतिनिधींनाच आपण आपले शत्रू कसे काय समजू शकतो?.

जमेल तसे लोकांना करोनाबद्दल जागरुक करणार्‍या त्यांची सेवा करणार्‍या डॉक्टर व नर्सेससमोर पँट उतरवून नंगा नाच करण्याची विकृती या साथीच्या महासंकटात डोक्यात कशी काय जन्माला येते? करोनाला रोखण्याऐवजी त्याचा प्रसार कसा करता येईल यासाठी डॉक्टरांवर आरोग्य सेवकांवर थुंकणार्‍या करोना रुग्णांना बेड्या घालून मुसक्या आवळून अ‍ॅडमिट करा असे बोलण्याची वेळ आली आहे. या गैरवर्तनाचे पडसाद देशातच नाही तर परदेशातही आता उमटू लागले आहेत. या विकृत मानसिकता बाळगणार्‍यांवर संपूर्ण जग छी थू करत आहे, पण त्यात देशाचही नाव उगाचच भरडलं जात आहे. अनेकजण याला धार्मिक रंग देण्याचा घाट घालताना दिसत आहेत. यामुळे येथेच या विकृतांच्या नांग्या ठेचणे व डॉक्टर नर्सेस आणि पोलिसांसाठी सुरक्षित वातावरण तयार करणं गरजेचे झाले आहे.

- Advertisement -

जर उद्या या हल्ल्यांविरोधात देशातील सगळेच डॉक्टर एकवटले आणि संपावर गेले तर. पावलापावलावर करोना रुग्णांचे मृतदेह दिसतील. जसे आता इटली व स्पेनमध्ये दिसत आहेत, पण तिथली परिस्थिती वेगळी आहे. तेथे रुग्णसेवा करताना डॉक्टरांना करोनाची लागण झाल्याने अनेक डॉक्टर व नर्सेसचा मृत्यू झाला आहे. यामुळे डॉक्टरांची कमतरता आहे. यामुळे जगण्याची शक्यता असलेल्या व तरुण रुग्णांवरच उपचार केले जात आहेत. बाकीच्यांना देवाच्या हवाली करत एका मोठ्या हॉलमध्ये ठेवले जात आहे.

सुदैवाने ही वेळ अजून आपल्यावर आलेली नाही, पण जर काही समाजकंटकांनी हा धूडगूस सुरूच ठेवला तर त्यांना गोळ्या घालण्याचाही आदेश देणे आवश्यक असेल. कारण एकामुळे जर अनेकजणांचा जीव धोक्यात येत असेल तर त्याला संपवलेलेच बरे. सध्या तरी अशीच प्रत्येक भारतीयाची मानसिकता आहे. यामुळे जगा आणि जगू द्या. जे डॉक्टर व नर्सेस आरोग्य कर्मचारी व इतर लोकप्रतिनिधी कोरोनापासून बचाव करण्याचे संदेश देत असतील तर त्यांना सिरियसली घ्या. कारण ते सध्या करोनाला जवळून बघत आहे. नुकताच दोन नर्सेचाही व्हिडिओही व्हायरल झाला आहे ज्यात पहिल्यांदाच नर्सेस करोना रुग्णांना बघून त्रास होत असल्याचे सांगत आहेत. तसेच अशी वेळ कधीही कोणावरही येऊ नये असे सांगत घरात बसण्याचे व सुरक्षित राहण्याची विनंती लोकांना करत आहेत. अशा सामाजिक बांधिलकी जपणार्‍या आया बहिणींना सलाम करायचे सोडून त्यांना शिव्या घालणार्‍यांना शासनाने कडक शिक्षा करावी हेच जनतेचे मनोदय आहे.

- Advertisement -

-(लेखिका आपलं महानगरच्या कोऑर्डिनेटर आहेत)

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -