घरफिचर्सपुन्हा लॉकडाऊन, पुन्हा बिगिन अगेन

पुन्हा लॉकडाऊन, पुन्हा बिगिन अगेन

Subscribe

राज्यात एक जुलैपासून मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा सुरू होत असतानाच लॉकडाऊन वाढवण्याचीही मागणी जोर धरू लागली आहे. मुंबईमधील काही भागांमध्ये लॉकडाउन केले जात असतानाच ठाणे महापालिकेची पूर्ण हद्द पुन्हा दहा दिवसांसाठी लॉकडाउन करण्यत येणार आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका का लॉकडाउन केली जात नाही, असाही प्रश्न विचारला जात आहे. सध्या राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये रोेज मोठ्या प्रमाणावर करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच राज्यातील सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

बाजारपेठा, उद्योग, दुकाने, खासगी कार्यालयांमधील व्यवहार सुरळीत झाले असून मंंदिरांमध्येही दर्शनासाठी परवानगी दिली जात आहे. शेतीशी संबंधीत सर्वच व्यवहार पहिल्या लॉकडाउनपासून सुरू असून त्यामुळे बाजार समित्यांमधील सर्व खरेदी विक्री, शेतमालाचे व्यवहार सुरू आहेत. एकीकडे सरकार टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत करून लोकांना करोनासोबत जगण्याची सवय लावू पाहत असतानाच प्रत्येक शहरात करोना बाधीतांची संख्या रोज नवनवे विक्रम करीत असून ग्रामीण भागातही करोनाचा शिरकाव होत आहे. यामुळे लोक घराबाहेर पडतानाच करोनाच्या दहशतीचे मनावर मोठे ओझे घेऊन ते बाहेर फिरत आहेत. सरकार लोकांना दोन मीटर अंतर राखा, हात धुवा आणि मास्क वापरून काळजी घेत करोनापासून बचाव करा, असा सल्ला देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असो यांचे आवाहन प्रत्यक्ष लोक किती पाळतात, हे सर्वांनाच दिसत आहे.

- Advertisement -

करोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात करोनापासून लोकांचा बचाव व्हावा यासाठी सरकारने सर्वांना घरात बसवले आणि करोनावर उपचारासाठी पुरेसे तपासणी किट, पीपीई कीट आणि व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लोकांना बाहेर पडण्यास परवानगी देण्यास सुरवात केली आहे. पण या परवानगीमुळे देशातील व राज्यातील रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. ही संख्या नागरिकांच्या उरात धडकी भरवून त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणारी असली तरी सरकारी यंत्रणा रुग्ण संख्येचा दुप्पट होण्याचे दिवस कसे वाढले आहेत आणि जगाच्या तुलनेत भारताने दर दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेत रुग्ण संख्या कशी कमी आहे. बरे होण्याचा वेग व मृत्यूदर जगाच्या तुलनेत कसा चांगला आहे, या बाबी सांगून पाठ थोपटण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, सुरवातीला आपल्या गावात, आपल्या शहरात रुग्ण आढळल्याच्या बातम्या वाचणारे नागरिक आता आपल्या शेजारच्या इमारतीत रुग्ण आढळले, आपल्या ओळखीच्या रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला अशा बातम्या माध्यमांमधून बघत वा वाचत नाही तर या घटना डोळ्यासमक्ष बघत आहे. त्यामुळे करोना आपल्या दारात अवतरला असून या संकटातून आपण कसे वाचणार, असा मोठा प्रश्न लोकांना भेडसावत आहे.

करोना संसर्ग टाळण्यासाठी एकीकडे काही नागरिक प्रचंड काळजी घेत असून त्यांच्या या अतिकाळजीमधून अनेक लोकांना मानसशास्त्रीयदृष्ट्या विकृतीही जाणवू लागली आहे. त्याचवेळी मुख्य बाजारपेठांमध्ये लोकांची खरेदीसाठी झुंबड उडाली असून तेथे सामाजिक अंतर ठेवणे, मास्क वापरणे याबाबतच्या कुठल्याही नियमांचे पालन केले जात नाही. अशीच परिस्थिती शहरांमधील भाजी मंडईंची व बाजार समित्यांची आहे. तेथे व्यापारी, हमाल, मापारी, आडतदार व विक्रेते यांच्याकडून कुठल्याही नियमांचे पालन केले जात नाही. यामुळे सर्व मोठ्या शहरांमध्ये मुख्य बाजार पेठा आणि बाजार समित्या- भाजी मंडई करोनो विस्फोटाचे हॉटस्पॉट झाले आहेत. मात्र, तेथील व्यवस्थापन असो वा दुकानदार व्यावसायिक असो कुणीही सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करण्याबाबत गंभीर नसल्याने माध्यमांनी वारंवार समोर आणले आहे. मात्र, सरकारी यंत्रणा यावर ठोस उपाययोजना करून तेथील व्यवस्थापनाकडून अंमलबजावणी करून घेण्याबाबत आग्रह धरण्यापेक्षा अशा बातम्या कशा येणार नाहीच, याच काळजीत आहेत. त्यामुळे एकीकडे लोकांना कामानिमित्त घराबाहेर पडायचे आहे, पण बाहेर आपण सुरक्षित नसल्याची त्यांची खात्री होत आहे. यामुळे सर्व राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन असे कितीही गोंडस नाव दिले तरी लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत आणि दुसरीकडे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

- Advertisement -

करोना रुग्ण बरे होण्याचा दर दिवसेंदिवस वाढत असल्याच्या दिलासादायक बातम्या सरकारकडून दिल्या जात असल्या तरी सध्या रुग्णांची वाढलेली संख्या व उपलब्ध आरोग्य यंत्रणा यांचे प्रमाण व्यस्त असल्याचा अनुभव रुग्णांना आाणि त्यांच्या नातेवाईकांना येत आहे. या वैश्विक महामारीमुळे उत्पन्नाचे सर्व साधने संकुचित झाली असून लोकांसमोर रोजच्या जगण्याचे आव्हान आहे. अशा स्थितीत खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणार्‍या वैद्यकीय उपचाराच्या बिलांच्या बातम्या वाचून लोकांमध्ये या आजाराविषयीची भयावहता आणखी वाढली आहे. यामुळे प्रत्येक ठिकाणी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी होत आहे. सरकारी यंत्रणेचे निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सूचनांनुसार ठरलेले असल्यामुळे स्थानिक प्रशासनाला त्यात काहीही हस्तक्षेप करता येत नसल्याने लोक स्वताहून लॉकडाउन जाहीर करीत आहेत. त्यातून करोनाबाबत लोकांचा सरकारी यंत्रणेविषयचा विश्वास कमी होत चालल्याचे दिसत आहे.

अर्थात करोना बाधीतांची वाढणारी संख्या आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या प्रमाणात असलेले पोलीस वा आरेाग्य यंत्रणेतील मनुष्यबळ यांचा विचार करता ही तुटपुंजी यंत्रणा अजूनही या महामारीचा सामना करीत आहे, हेही कौतुकास्पद आहे. हे कौतुक असले तरी लोकांंच्या जगण्यामरण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने लोकांमध्ये अधिरता वाढत असून ती नियंत्रणात ठेवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे. सध्या केवळ सरकारी यंत्रणेवर विसंबून राहण्यापेक्षा या सरकारी यंत्रणेला मदत करू शकेल अशा पाठीराख्या यंत्रणेची उभारणी करण्याची गरज आहे. त्यात स्वयंसेवक असतील व इतर सरकारी सेवांमधील कर्मचारी असतील, पण गर्दीच्या ठिकाणी करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून घेण्याचा आग्रह करणारी यंत्रणा तातडीने उभारण्याची गरज आहे. केवळ गर्दी होते, म्हणून प्रत्येक वेळी तेथे जनता कर्फ्यू पुकारणे हा पर्याय नाही, तर त्या गर्दीमध्ये सामाजिक अंतराचे पालन केले जाईल, वेळच्या वेळी हात स्वच्छ ठेवले जातील, मास्क लावले जाईल याबाबत संबंधीत यंत्रणेकडून पालन होते की नाही, यावर देखरेख ठेवण्याची गरज आहे.

कुणी याचे पालन करणार नसेल तर त्यांच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत. तसे झाल्यास गर्दीमधील अनिर्बंधता नाहीशी होऊन करोनाचा संसर्ग टाळण्यास मदत होईल आणि लोकही बिनधास्तपणे बाहेर पडू शकतील. त्यातून मंदिरे, हॉटेल, पर्यटन स्थळे, रेल्वे, बससेवा, खासगी वाहतूक सेवा सर्व काही सुरळीत होऊ शकते. पण त्यासाठी दोन गज दुरी या सूत्राचे पालन करण्याची प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. कारण या महामारीला घाबरून घरात बसण्याचे दिवस संपले आहेत, तसेच या महामारीचा प्रसार करणार्‍या बेफिकिर वाहकांनाही चाप बसवण्याची गरज आहे. केवळ रस्त्यावर पोलीस उभे करून आणि दुकाने चालू व बंद ठेवण्याच्या वेळा ठरवून करोना आटोक्यात येत नाही, हे सिद्ध झाल्याने आता त्यापुढे जाऊन प्रत्येक दुकान, व्यवसाय, उद्योग, मंदिर आदी ठिकाणांच्या जबाबदार व्यक्तिंकडून या सामाजिक अंतराचे पालन करून घेण्याचे बंधन टाकण्याची गरज आहे.

तसे झाले तरच या मिशन बिगिन अगेनला काही अर्थ आहे. नाही तर केवळ आवाहन करायचे, इशारे द्यायचे आणि प्रत्यक्ष करोना पसरवण्यात हातभार लावणार्‍यांना मोकाटपणे फिरू द्यायचे या धोरणाला तिलांजली देण्याची वेळ आली आहे. एकदा या शिस्तीची नागरिकांना सवय लागल्यास त्याच शिस्तीने सार्वजनिक वाहतूक सेवा आणि शाळा, महाविद्यालयेही सुरू करण्याचा मार्ग मेाकळा होऊ शकतो. मात्र, त्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी लोकांची आहे, हे ठामपणे सांगून पालन न करणार्‍यांना कायद्याचा बडगा दाखवण्याची हिम्मत दाखवण्याची गरज आहे. ही हिम्मत दाखवली तरच लोकांच्या मनातील करोनाची दहशत नाहीशी होऊन मिशन बिगीन अगेनच्या दुसर्‍या भागाला काही अर्थ उरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -