घरफिचर्सलोहार कामाशी संबंध नसलेली लोहार चाळ

लोहार कामाशी संबंध नसलेली लोहार चाळ

Subscribe

लोहार चाळीत खरेदी करताना येथे भाव केला जात नाही. येथील विक्रेते जो भाव सांगतील त्या भावात वस्तू खरेदी करायला लागतात. वस्तूंवर लिहिण्यात आलेल्या एमआरपीपेक्षा कितीतरी कमी दरात त्या येथे विकल्या जात असल्यामुळे ग्राहकही फारशी घासघीस करत नाहीत. येथे मिळणार्‍या वस्तूंची विक्रेते वॉरंटी देतात. वॉरंटी कालावधीत ती वस्तू परत आणून दिली तर त्याची दुरुस्ती अथवा तत्सम सोपस्कार पार पाडले जातात. त्यामुळे या बाजारात खरेदी करताना फारशी काळजी घ्यावी लागत नाही. लोहार चाळ हे हार्डवेअरचे मार्केट नावारुपाला आले आहे.

ईलेक्ट्रीकल आणि ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू मुंबईत कुठे चांगल्या आणि स्वस्त मिळतात, असे कोणी विचारले तर मुंबईकरांच्या तोंडी लोहार चाळीचे नाव आल्याशिवाय रहात नाही. या लोहार चाळीत आता प्रत्यक्षात लोहारांची चाळ राहिलेली नाही. पुन्हा येथील बाजार हा अनेक इमारतींमध्ये विभागला गेला आहे तरीही या मार्केटला लोहार चाळच संबोधले जाते. १८ व्या शतकात मुंबईत इंग्रज रुळले. तेव्हा त्यांच्या घोड्यांना नाल बसवणे, हत्यार तयार करणे यासाठी लोहारांची गरज भासू लागली. हे लोहार अर्थातच मुंबईच्या बाहेरून आलेले होते. हे सर्व लोहार सध्याच्या कॉफ्रर्ड मार्केटच्या बाजूच्या उत्तर-पश्चिम भागात रहात होते. त्यांची एक चाळच तेथे वसली होती. त्याला लोहार चाळ असे नाव देण्यात आले.

कालांतराने तेथे वस्ती वाढली, इतरही इमारती उभ्या राहिल्या. पण जुनी लोहारांची चाळ तेथे होती म्हणून त्या भागाचे नामकरण झाले ते लोहार चाळ. लोहारांची चाळ आज तेथे अस्तित्वात नाही. पण अनेक इमारतींचा समूह हा लोहार चाळ या नावाने ओळखला जाऊ लागला. येथील बहुसंख्य इमारतीत वरच्या मजल्यावर आजही लोक रहातात. त्यात प्रामुख्याने पारशी लोकांचा भरणा जास्त होता. मात्र सध्या गुजराती आणि मारवाडी येथे मोठ्या संख्येने रहात आहेत. लोहार चाळीतील लोहार गायब झाले तरी त्यांचे नाव या परिसराला कायमचे पडले. आज हा बाजार ईलेक्ट्रीकल आणि ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे.

- Advertisement -

येथील गल्ली आणि लेनच्या समूहाचे लोहार चाळ हे पडलेले नाव आजही कायम राहिले आहे. लोहार चाळ हे ईलेक्ट्रीकल, ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू, त्यांचा कच्चा माल याचे होलसेल मार्केट आहे. याठिकाणी घरी, कामाच्या ठिकाणी लागणार्‍या ईलेक्ट्रॉनिक्स, ईलेक्ट्रीकल वस्तू स्वस्तात मिळतात. तसेच सणांच्या वेळी डेकोरेशनसाठी लागणारे सामानही मिळते. येथे होलसेलर दुकानांची संख्या जरी जास्त असली तरी रेटेलमध्ये वस्तू विकणारेही बरेच आहेत. विविध लाईट्स, इंडस्ट्रीयल ईलेक्ट्रीकल सामान, केबल आणि वायरचे डिलर, इन्व्हटर डिलर, एईडी सिरिज, इतर हार्डवेअर आणि ईलेक्ट्रीकल दुकानेही आहेत.

लोहार चाळ परिसरातील इमारती जुन्या आहेत. काहीतर १८ व्या शतकातील आहेत; पण अजूनही त्या मजबूत आहेत. बहुतेक इमारतीच्या तळ मजल्यावर दुकाने आहेत. पहिल्या मजल्यावर त्या दुकानाचे गोदाम तर दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर निवासी गाळे आहेत. या परिसरात आल्यावर आपण जुन्या मुंबईत आल्याचा फिल येतो. मुंबईत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, ख्रिसमस धुमधडाक्यात साजरा केला जातो. हे उत्सव येण्याच्या १५ दिवस अगोदर लोहार चाळ खर्‍या अर्थाने फुलून येते.

- Advertisement -

यावेळी डेकोरेशनचे ईलेक्ट्रीकल, ईलेक्ट्रॉनिक्स सामान जसे एलईडी बल्बचे तोरण, कंदील, रंगबेरंगी लाईट्स, रंगीबेरंगी लेझर लाईट, तोरण लक्ष वेधून घेतात. हे सामान होलसेलने खरेदी करण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांची आणि रिटेलमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लोहार चाळीत एकच गर्दी उसळते. लोहार चाळीतील वस्तू इतर बाजारांपेक्षा ३० ते ३५ टक्के कमी दराने मिळतात. उत्सवांच्या काळात किरकोळ विक्रेते येथून सामान घेऊन जातात आणि मग मुंबईच्या विविध भागांत ते विकून चांगला नफा कमावतात. या बाजारात ईलेक्ट्रीकच्या कोणत्याही वस्तू जसे पंखा, लाईट्स, इस्री, गिझर यांपासून ते लहान, मोठे बल्ब, आकर्षक कारंजे, डिस्को लाईट अशा वस्तू किफायशीर किमतीत मिळतात.

लोहार चाळीत खरेदी करताना येथे भाव केला जात नाही. येथील विक्रेते जो भाव सांगतील त्या भावात वस्तू खरेदी करायला लागतात. वस्तूंवर लिहिण्यात आलेल्या एमआरपीपेक्षा कितीतरी कमी दरात त्या येथे विकल्या जात असल्यामुळे ग्राहकही फारशी घासघीस करत नाहीत. येथे मिळणार्‍या वस्तूंची विक्रेते वॉरंटी देतात. वॉरंटी कालावधीत ती वस्तू परत आणून दिली तर त्याची दुरुस्ती अथवा तत्सम सोपस्कार पार पाडले जातात. त्यामुळे या बाजारात खरेदी करताना फारशी काळजी घ्यावी लागत नाही. लोहार चाळ हे हार्डवेअरचे मार्केट नावारुपाला आले आहे. येथून केवळ मुंबईतीलच किरकोळ विक्रेते नव्हेत तर ठाणे, पालघर, नवी मुंबई, अलिबाग, रायगड जिल्ह्यातील किरकोळ विक्रेतेही येथून खरेदी करतात.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -