सारे प्रवासी राजकीय सोयीचे !

लक्ष्यवेध

Mumbai

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आता शेवटचा टप्पा बाकी आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर सरशी मिळवून लोकांची मने आणि पर्यायाने मते आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी ज्या काही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. जी काही अमाप चिखलफेेक केली, त्याचे आपण सगळेच साक्षीदार आहोत, पण एकदा का निवडणूक संपली की हीच मंडळी तुझ्या गळा माझ्या गळा, असे म्हणत एक होतील. थोडक्यात काय तर ‘सारे प्रवासी राजकीय सोयीचे’ असाच हा मामला आहे.

राजकीय नेते मंडळींनी निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी एकमेेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडून एकमेकांचा जाहीर उद्धार करणे ही बाब काही नवीन राहिलेली नाही, पण प्रचाराच्या वेळी जणू काही शत्रूराष्ट्रासारखे एकमेकांच्या विरोधात लढणारी ही मंडळी निवडणुका झाल्यावर मात्र एकमेकांच्या गळाभेटी करताना दिसतात. त्यावेळी मात्र सर्वसामान्य माणसांना आश्चर्य वाटते आणि यांनी आपल्याला उल्लू बनवले की काय, असे वाटू लागते. त्यामुळे ही राजकीय नेते मंडळी बाहेरून एकमेकांचे विरोधक वाटत असले तरी आतून कसे एकमेकांशी जोडलेले आहेत, याचाच आविष्कार ते घडवत असतात.

निवडणुकांच्या काळात एकमेकांचे भ्रष्टाचार उघड करणारे, त्याची आकडेवारी जाहीरपणे मांडणारे, आम्ही सत्तेत आल्यावर भ्रष्टाचार्‍यांना तुरुंगात पाठवू असे छातीठोकपणे सांगणारे एकदा सत्तेत आले की, मात्र ते आपली विधाने सोयीस्करपणे विसरून जातात. पत्रकारांनी त्यांना त्यांच्या विधानाची आठवण करून दिली तर, तेव्हा त्या प्रकरणाची चौकशी कशी सुरू आहे, याविषयी तारे तोडत असतात. पण ही चौकशी बर्‍याच वेळा न संपणारी असते. सध्या सत्ताधारी असलेला भाजप जेव्हा राज्यात विरोधी पक्षात होता, त्यावेळी त्या वेळचे जलसिंचन मंत्री अजित पवार यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत आलो की, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करून त्यांना तुरुंगाचा रस्ता दाखवू, अशी भाषा करत होते. पण जेव्हा हेच भाजपवाले सत्तेत आले तेव्हा मात्र चौकशी चालू आहे, असाच पवित्रा त्यांनी घेतलेला दिसतो. जेव्हा जेव्हा पत्रकारांनी अजित पवारांवरील कारवाईविषयी विचारले तेव्हा तपास यंत्रणांकडून चौकशी चालू आहे, त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे ते म्हणत राहिले. अशात सत्तारूढ पक्षाची पाच वर्षे संपायची वेळ आली. तरी सिंचन घोटाळाप्रकरणी तत्कालीन सरकारमधील कुणावरही कारवाई झाली नाही. उलट, ज्यांच्या नावाने आकाशपाताळ एक करण्यात आले ते अजित पवारच हिंमत असेल तर करा कारवाई असे सरकारलाच आव्हान देताना दिसत आहेत. थोडक्यात काय, तर सरकार आपल्यावर कारवाई करणार नाही, याची त्यांना खात्री असावी. म्हणजेच काय तर अळीमिळी गुपचिळीचाच हा प्रकार आहे.

भाजपचे नेते आणि महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मागे एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविषयी म्हटले होते की, आम्ही त्यांची कामे करतो, ते आमची कामे करतात. अर्थात, गडकरी यांनी केलेल्या या विधानात काही चूक आहे असे म्हणण्याचे आणि वाटण्याचे कारण नाही. कारण पक्ष वेगळे असले तरी ही मंडळी राजकारण या एकाच परिघात वावरत असतात. त्यामुळे त्यांना एकमेकांची गरज पडतच असते. सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. जसा टप्पा संपायला येतो, तसा त्या भागातील निवडणूक प्रचार जोर धरतो. त्यावेळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचा वेग वाढतो. त्याची तीव्रता वाढते. पातळी खालावत जाते. बर्‍याचदा आरोप अधिक प्रखर करण्याच्या नादात नेते मंडळींना आपण काय बोलतोय याचे भान राहत नाही. त्यामुळे काही वेळा त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई होण्याची वेळ येते. राहुल गांधी यांनी चौकीदार चोर हैं, असे न्यायालयही म्हणत आहे, असे प्रचाराच्या वेळी म्हटले, पण ते त्यांना भलतेच महागात पडले. कारण न्यायालयाला राजकारणात खेचू नये,अशी ताकीद देऊन न्यायालायाने त्यांना माफी मागण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे तर महात्मा गांधींची हत्या आरएसएसच्या लोकांनी केली असे

राहुल गांधींनी म्हटले होते, पण त्यापासून आतापर्यंत त्यांना भिवंडीतील न्यायालयात हजर राहावे लागत आहे. नरेंद्र मोदी जसे आरोपांच्या फैरी विरोधकांवर झाडत आहेत, तसे विरोधकही मोदींवर टीका करताना मागे पुढे पाहताना दिसत नाहीत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात आकाशपाताळ एक केले. राहुल गांधी पंतप्रधान झाले तरी चालतील, पण मोदी आणि शहा यांना कुठल्याही परिस्थितीत पराभूत करा. ही दोन माणसे देशाच्या राजकीय क्षितिजावर पुन्हा दिसता कामा नयेत. प्रचारसभांमधून राज ठाकरे नरेंद्र मोदींच्या आवाजाच्या आणि बोलण्याच्या तर्‍हा दाखवून त्यांचे भाषण ऐकणार्‍यांना हसताभुई थोडी करून टाकत होते. त्यांच्या प्रचारातील कोट्या आणि कोपरखळ्यांचा किती उपयोग होतो, हे लोकसभेचे निकाल लागल्यावरच समजू शकेल. शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते असले तरी बोचरी आणि भडक टीका करण्यात मागे नसतात. विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याची वेळ येते त्यावेळी मात्र त्यांची कळी अधिकच खुलते. संघाच्या अर्ध्या चड्डीवर पवारांचा खास लक्ष्यवेध असतो. तुम्ही अर्ध्या चड्डीवाल्यांकडे सत्ता देणार का, असा थेट सवालच ते लोकांना आपल्या भाषणांमधून विचारत असतात. महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळीही संघाच्या चड्डीचा पवारांना विसर पडला नाही.

नरेंद्र मोदी यांनी तर यावेळी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर हल्ले चढवले. दिल्लीच्या राजकारणात जसे गांधी घराणे आपली मजबुती टिकवून आहे, तसे महाराष्ट्रात पवार घराणे आपले पाय गेली अनेक वर्षे घट्ट रोवून उभे आहे. त्यामुळे त्यांना भुईसपाट केल्याशिवाय महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत करता येणार नाही, अशी मोदींची भूमिका आहे. त्यामुळेच त्यांनी यावेळी प्रचाराचा मोर्चा पवार कुटुंबियांकडे वळवला. त्यामुळे शरद पवार संतप्त झाले. त्यांनी मोदींवर पलटवार केला. मोदींना स्वत:चे कुटुंब नसल्यामुळे त्यांना कुुटुंबीय काय असतात, ते कसे कळणार. त्यामुळे त्यांनी या विषयावर बोलू नये, असे बजावले होते. मागील लोकसभा निवडणुकीत तर पुण्यातील सभेत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शरद पवारांवर अत्यंत मर्मभेदी टीका केली होती. ते म्हणाले होते, शरद पवार यांनी राजकारणात भ्रष्टाचाराला व्यवहाराचे रूप दिले. म्हणजेच भ्रष्टाचारात काही गैर नाही. तो कामाचाच भाग आहे, असा पायंडा पाडला. शहांच्या या टीकेवर शरद पवार तसेच त्यांची कन्या सुप्रिया सुळे खवळून उठल्या होत्या. मोदीशेठ आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू , अशी धमकीच सुप्रिया सुळे यांनी जाहीर सभेतून दिली होती. त्यामुळे मोदी, शहा आणि पवार यांचा जणू काही महासंग्राम सुरू आहे, असेच लोकांना वाटत होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे पार पतन झाले. त्यामुळे मोदी आणि पवार यांच्यात खूपच वितुष्ट आले आहे, असे चित्र दिसत होते, पण काय आश्चर्य, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली बारामतीत शरद पवारांच्या घरी जाऊन राहिले. मस्तपैकी त्यांचा पाहुणचार घेतला. इतकेच नव्हे तर पुढे बारामतीतील एका कृषिप्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी गेले होते. त्यावेळी मोदींनी शरद पवारांवर त्यांच्याच उपस्थितीत स्तुतीसुमनांची अशी काही उधळण केली, की चक्क पवारांनाच तोंडात बोट घालायची वेळ आली. मोदी त्यावेळी म्हणाले की, शरद पवार हे अत्यंत अनुभवी आणि हुशार राजकीय नेते आहेत. त्यांचे बोट पकडून मी राजकारणात आलो. इतकेच नव्हे तर पवारांचा अनुभव इतका आहे की, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी मी महिन्यातून दोन वेळा त्यांना फोन करतो. मोदी आणि पवार यांच्यातील नाते पाहिल्यावर सामान्य माणसांनाही काही कळेनासे होते.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा टप्पा पार पडला असली तरी देशाच्या अन्य भागात निवडणूक प्रचार सुरू आहे. तिथे मोदी विरुद्ध राहुल गांधी, मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी, अशी धुमश्चक्री सुरू आहे. जनता मतदानातून मोदींना चपराक लगावेल,असा विश्वास ममता बॅनर्जी व्यक्त करत आहेत, तर ममता या दीदी आहेत, त्यामुळे त्यांनी माझ्या कानाखाली मारली तरी मला काही वाईट वाटणार नाही, असे मोदी सांगत आहेत. दुसरीकडे, राजीव गांधी यांना त्यांच्या जवळचे लोक मिस्टर क्लिन म्हणत असले तरी नंबर वन भ्रष्टाचारी म्हणून त्यांच्या जीवनाचा शेवट झाला, अशी जालीम टीका मोदींनी केली. त्याचबरोबर राजीव गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांना तुरुंगात टाकण्याचा इशाराच दिला. त्यामुळे गांधी घराणे हादरले. त्यामुळेच प्रियांका गांधी यांनी मोदी हे दुर्योधन आहेत, असा पलटवार केला. त्यांचीच री ओढत संजय निरुपम यांनी मोदी हे औरंगजेब आहेत, असे म्हटले. त्यातच लालूंच्या पत्नी राबडी देवी यांनी मोदी जल्लाद आहेत, असा सूर आळवून घेतला. थोडक्यात, काय तर निवडणूक जिंकण्यासाठी प्रचाराच्या वेळी राजकीय नेते मंडळी एकमेकांवर जे काही आरोप प्रत्यारोप करतात, एकमेकांसाठी ज्या काही उपमा अलंकार वापरतात ते पाहिल्यावर सामान्य माणूस संभ्रमित होऊन जातो. कारण एकमेकांचे कपडे फाडणारे हेच लोक निवडणूक झाल्यावर तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा म्हणताना दिसतात.