इतना सन्नाटा क्यो है भाई!

Mumbai
शरद पवार ,राहुल गांधी,राज ठाकरे

इतना सन्नाटा क्यो है भाई! शोलेतला हा एक डायलॉग लोकसभा निकालानंतर विरोधक, विरोधी पक्ष, डावे, अती डावे, पुरोगामी आणि अती पुरोगामी आणि चिकित्सक या सर्वांची झालेली मोठी बिकट अवस्था सांगून जाणारा आहे. भाजप म्हणजे नरेंद्र मोदी यांना 300 पेक्षा जास्त जागा मिळाल्याने या मंडळींच्या तोंडातून शब्द बाहेर पडेनासे झालेत आणि डोळे पांढरे होऊन सर्वत्र एकच सन्नाटा पसरलाय… तर आपण या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात राहणार्‍या विरोधकांच्या गावी जाऊन हा सन्नाटा काय आहे ते पाहू…

शोले सिनेमा लगेच आणा डोळ्यासमोर… पटपट! रामगडमध्ये गब्बरची प्रचंड दहशत आहे. त्याच्या विरोधात गेलेल्या कोणालाच तो सोडत नाही. या दहशतीमधून त्याला गावावर आणि परिसरावर आपली पकड कायम ठेवायची आहे. या गावातील रहीम चाचाचा तरुण मुलगा पोटापाण्यासाठी बाहेरगावी चाललेला असतो. एका मुगळ्याला चिरडल्यासारखा गब्बरची माणसे या तरुणाला मारतात. घोड्यावरून त्या तरुण मुलाचे म्हणजे सचिनचे पार्थिव पुन्हा गावात येते तेव्हा रामगडवासियांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसतो… गावात सन्नाटा पसरतो. नेहमी जागले असणारे गाव चिडीचूप होऊन जाते.

अंध रहीम चाचा म्हणजे ए. के. हंगल यांना ही बातमी कोण सांगणार? या निशब्द जीवघेण्या शांततेत रहीमचाचाचा धीरगंभीर आवाज वातावरण चिरून टाकतो : इतना सन्नाटा क्यो है भाई! आणि आपला मुलगा या जगात नाही हे कळल्यानंतरचे हंगल यांचे रुदन आजही अंगावर काटा आणते! शोलेतला हा एक डायलॉग लोकसभा निकालानंतर विरोधक, विरोधी पक्ष, डावे, अती डावे, पुरोगामी आणि अती पुरोगामी आणि चिकित्सक या सर्वांची झालेली मोठी बिकट अवस्था सांगून जाणारा आहे. भाजप म्हणजे नरेंद्र मोदी यांना 300 पेक्षा जास्त जागा मिळाल्याने तोंडातून शब्द बाहेर पडेनासे झालेत आणि डोळे पांढरे होऊन सर्वत्र एकच सन्नाटा पसरलाय… तर आपण या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात राहणार्‍या विरोधकांच्या गावी जाऊन हा सन्नाटा काय आहे ते पाहू…

राहुल गांधी : आई सोनिया गांधी, बहीण प्रियंका गांधी आणि भावजी रॉबर्ट वडरा १० जनपथच्या आपल्या घरी बसलेले. सगळ्यांची तोंडे चार बाजूला. कोणच कोणाशी बोलायला तयार नाही. सर्वांचे चेहरे रडवेले. डोळ्यातून पाण्याच्या धारा. खरेतर निकालानंतर पत्रकार परिषदेतच राहुल आणि प्रियंकाच्या डोळ्यातून धारा वाहणार होत्या. पण, वेळीच त्याला आवर घालत घरी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. थोडे सावरल्यानंतर राहुल आईला म्हणाला, मी काय करायचे बाकी ठेवले होते. दोन महिने गरगर फिरलो. राफेल, ईव्हीएम, बेरोजगारी, नोटाबंदी, हुकूमशाही, शेतकरी असे सगळे बाण भात्यातून बाहेर काढले… पण काय फायदा झाला. लोकांनी कमळाचेच बटन दाबले. आणि पुन्हा एकदा राहुलला अती वेदनेमुळे रडू आले. उगीउगी, बाळा रडू नकोस… किती जीवाला त्रास करशील.

मी आहे ना. तू मला वार्‍यावर सोडून जगभर फिरत होतास तेव्हा मला किती त्रास झाला असेल हे लक्षात घे. तुलाच हे पुढे सांभाळायचे आहे. विजय पराजय येत असतात. लोकांनी दहा वर्षे मोदींना द्यायची ठरवली आहेत. यामुळे आता नापास झालास तरी पुढची पाच वर्षे शहाण्या मुलासारखा अभ्यास कर आणि परीक्षेला बस. लोकशाहीचा पुढचा पेपर कदाचित सोपा असेल. हे सांगत सोनिया मायेने राहुलच्या डोक्यावरून हात फिरवतात… प्रियंका इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे दिसत असली तरी बाईंसारखी तडफ अजून तिच्यात दिसत नसल्याने सोनिया काहीशा तिच्यावर रागवल्या आहेत. तुला आम्ही उतरवले ते भावाला मदत करायला. पण, स्वतः तर निवडणुकीला उभी राहिली नाहीस, शिवाय उत्तर प्रदेश सोडून कुठे बाहेर फिरली नाहीस… हे बरोबर नाही. एकतर पूर्ण वेळ राजकारण कर, नाही तर घरी बस… हा गुस्सा मग जावयावर निघाला, ’ आता आपले राज्य नाही. काय कराल ते सांभाळून. उगाच आमच्या जीवाला घोर लावू नका. तुम्ही अडकाल आणि आम्हालाही अडकवाल.

शरद पवार : उध्वस्त धर्मशाळा झाल्यानंतर मग्न तळ्याकाठी युगांत लोटल्यासारखे बसले होते. सर्व विरोधकांना एकत्र घेऊन पंतप्रधानपदाचे स्वप्न शेवटी स्वप्नच राहिल्याने चेहरा अधिकच गंभीर झालेला. सुप्रिया आणि अजितदादाही सोबत. पण दोघेही गप्प. शेवटी हाताची घडी सोडली आणि तोंडावरचे बोट काढले. पुटपुटल्यासारखे ते बोलले, जे फक्त सुप्रिया आणि छोट्या पवारांना कळते. बाकी सर्वांना कान देऊन ऐकावे लागते. अजितदादा तुम्हाला सांगत होतो, पार्थला उभे करू नका. तरीही तुम्ही हट्टाला पेटला. मी तुमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त बघितले. मावळ जिंकता येणार नाही, हे मला माहीत होते. तरी ऐकायला तयार झाला नाहीत. त्यामुळे तुमचा जीव गुंतला येथे आणि हवा तसा प्रचार झाला नाही. इतर जागा तर गेल्याच, पण पार्थ पडल्याने उगाच पवार घराण्याला पराभवाचा बट्टा लागला. आता आजपासून विधानसभेला लागा.

मी आहे सोबत, पण मी या वयात किती फिरू आणि भाषणे करू. आपल्याला राज्याची सत्ता मिळाली नाही तर कायमचा संन्यास घ्यावा लागेल… अजितदादा हो हो करतात आणि पवारांची स्वारी सुप्रियाकडे वळते, आता फक्त दिल्ली एके दिल्ली करू नका. थोडे राज्याकडेही लक्ष द्या. आताच त्या लोकांनी आपली बारामतीची मते कमी केलीत. पुढे काय होईल, सांगता येत नाही. सावध राहा. आणि पवार हे सांगून राज ठाकरे यांचे काय करायचे, असा विचार करून पुन्हा एकदा हाताची घडी घालतात.

राज ठाकरे : कृष्णकुंजवर नेहमीसारखी गर्दी नाही. दिवस डोक्यावर आल्यानंतर थोडी लगबग सुरू झाली. पुस्तके, काही कात्रणे, चित्रे, व्हिडिओ यांच्या गराड्यात राज एकटेच बसलेले. तोंडावरचा हात अजूनही अनाकलनीय निकालांमुळे खाली यायला तयार नाही. देशात एवढा कुठला नेता भाजपविरोधात पेटून उठला नसेल, इतके मी मोदी आणि शहा यांना सोलून काढले… शाळा कॉलेजमध्ये एवढा अभ्यास केला नव्हता तेवढा व्हिडिओ तयार करण्यासाठी केला. पण, लोकांना काय झाले आहे काय माहीत नाही. त्या फेकुचंदचे भूत काही उतरायला तयार नाही, असे पुटपुटत सिगारेटचे दोन झुरके जरा अधिकच जोरात त्यांनी ओढले… आणि काहीसे वैतागत कोण आहे रे सांगत त्या बाळा आणि संदीप आणि शिदोरे यांना आत पाठवण्याचे आदेश दिले… आता नेतेच शिल्लक राहिले नसल्याने आहे त्यांना जवळ ठेवायला हवे, असे स्वतःला मनोमनी बजावत बाळा नांदगावकरांना विचारतात, आपल्या सभांना लोक तर फुल्ल पॅक होते. पण तरी मोदी पॅक झाले नाहीत.. अरे काय चाललंय काय. लोकांना काय झालंय समजत नाही.

उठता बसता मोदी, खाता पिताना मोदी… आता फोटो काढा आणि आरती करा. ही लोकशाही आहे की भंपकशाही. बाळा आता आपल्याला आजपासून विधानसभेच्या तयारीला बसावे लागेल. नाही तर आपल्याला मोदी केदारनाथच्या गुहेत कायमच्या तपाला बसवतील. शिदोरेंकडे वळतात, पवार काय म्हणतात, मनसेने सभा न घेता उमेदवार उभे करायला हवे होते. पवारांचे काही खरे नाही, आज एक बोलतील. उद्या तो मी नव्हेच, असे सांगत दुसरेच बोलतील. एक तर यांच्यासाठी भाषणे करून घसा अजूनही सुजलाय आणि वर आम्हालाच शहाणपण सांगणार. जाऊ दे काकांच्या वयाचे आहेत. संदीप मी काय म्हणतोय ते बघ… आता आपण दुसर्‍याच्या लग्नात नाचायचे नाही. एक तर आपले नवरे उभे करायचे नाही तर घरी बसायचे… बरोबर आहे तुमचे साहेब करत संदीप ही चर्चा संपवतो.

अशोक चव्हाण : पर्व उलटून गेल्यासारखे आपल्या नांदेडच्या गादीवर बसलेले. पराभवाने ही गादी टोचायला लागल्याने भयंकर निराश झालेले. मला निवडणूक लढण्याच्या भरीला पाडू नका असे कानीकपाळी ओरडून सांगत असताना राहुल ऐकायला तयार झाले नाहीत. मला मोकळा सोडला असता तर राज्यात आणखी जोरात फिरलो असतो. आता या अपयशाचे खापर माझ्या कपाळावर बसणार… काय चाललंय कळत नाही. अशीच हालत राहिली तर विधानसभेत काही खरे नाही, असे स्वतःला सांगत आणखी गप्पगार होतात. सोबत बोलायला कोण नसल्याने आणखी वैतागतात. आपल्या पतीदेवांची अशी हालत झालेली पाहून काळजीने अमिता बैठकीच्या घरात येतात. अशोकरावांना तेवढेच बरे वाटते. बोलतात,‘विखे गेले आता राहिले कोण, पृथ्वीराज आणि थोरात. दोघांनाही मास बेस नाही.

थोरात अर्ध्या नगरच्या बाहेर पडत नाही आणि पृथ्वीराजांना सातार्‍यातही जनाधार नाही. अभ्यास भिभ्यास बरा आहे. पण, लोकांच्या परीक्षेत पास व्हायला पाहिजे ना. सगळी गडबड आहे. मी एकटा काय करू. राष्ट्रवादीच्या घड्यालाचा काटाही पुढे सरकत नाही. तो काय योगेंद्र यादव सांगतोय. काँग्रेस संपली पाहिजे. ती संपायला कोकोकोलाची बाटली आहे का, या पुरोगाम्यांना आधी आपली एक जागा जिंकून आणता येणार नाही, पण आव मात्र बहुमत मिळाल्याचा’. नवरा काही विचार करायचा थांबत नाही हे पाहून काळजी करत अमिता म्हणतात, दोन एक दिवस आराम करा. शांत व्हा आणि थेट राहुल यांना भेटा. उगाच त्रास करून घेऊ नका.

याचवेळी ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी देवेगौडा, फारुख अब्दुल्ला अशी सर्व विरोधक मंडळी होय नाय म्हणत एकत्र आलीत आणि निकालाची चिरफाड करताना एकमेकांना दोष देत बसलीत. आपण पुढे जाण्यासाठी पुढे काय करायचे ते सोडून पुन्हा मोदींवर घसरल्याने हा सन्नाटा नाही तर डोक्याला शॉट असल्याचे पाहून आम्ही काढता पाय घेतला आणि काही दिवस आपणच मोदींच्या नावाने जीवाचा आकांत न करता पाऊस कधी पडतोय त्याची वाट बघत गप्प बसायचे ठरवले…