घरफिचर्सराजकीय शिमगा!

राजकीय शिमगा!

Subscribe

होळीचा सण जवळ आलाय… आणि लोकसभेच्या निवडणुकाही लागल्या आहेत. पुढच्या आठवड्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत गावाकुसात, खेडोपाड्यात, शहरात, गल्लीत, नाक्यावर ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या…’ म्हणून फाका (एकमेकांच्या नावाने बोंब) घालायला सुरुवात झालेली असेल. मात्र राजकीय सारीपाटावर एकमेकांची उणीदुणी काढण्याच्या शिमग्याने आधीच रंग भरला आहे. चला, आपणही या धुळवडीचे आतले आणि बाहेरचे रंग बघू…

शिमगा प्रयोग एक : या शिमग्यात ‘जाणता राजा’ शरद पवारांच्या ‘खेळ्या’ने राज्यातील जनतेचे विस्फारलेले डोळे आणि उघडलेले तोंड अजूनही मिटायचे नाव घेत नाही. पवार म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात माहीर आणि पाडापाडीच्या राजकारणात तरबेज. पण, पवारांसारखा बेरकी राजकारणी अचानक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार का घेतो? या प्रश्नाचे उत्तर अजूनही लोक सोडवत आहेत. पवार मात्र आपले मिश्किल हास्य करून मोकळे झालेत. केवळ स्वत:ची माढ्याचीच उमेदवारी नव्हे, तर पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबतचे सुरुवातीचे वक्तव्य आणि अहमदनगरच्या जागेवरूनही पवारांनी मारलेल्या कोलांटउडीने त्यांच्या पाडापाडीच्या पुलोद प्रयोगाची सहज आठवण आली. आधी नगरची जागा काँग्रेसला सोडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी असा निर्णय झालेला नसल्याचे सांगितल्यानंतर पवारांनाही तसा खुलासा करावा लागला. राजकारणात आपल्या कलंदर डावपेचातून अनेकांच्या दांड्या गुल करण्याची कला अवगत असलेल्या पवारांना असे बॅकफुटला जाताना बघून शेवटी घराणेशाही त्यांनाही चुकलेली नाही, हेच अधोरेखित करणारे ठरले.

- Advertisement -

मावळ मतदारसंघातून आपले नातू आणि अजित पवारांचे चिरंजीव पार्थ यांना उमेदवारी जाहीर करतानाच पवारांनी माढा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे पवारांच्या निर्णयाविषयी प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आजवरच्या कारकिर्दीत पवारांनी अनेक घरांमध्ये सवतासुभा मांडला. बंडखोरी करायला भाग पाडून भाऊ-भाऊ, चुलता-पुतण्या, सासरा-सून अशा अनेक कौटुंबिक लढती घडवून घराणी फोडली. कराडचे यशवंतराव-जयवंतराव भोसले या सख्ख्या भावांमधील संघर्ष, सातारचे अभयसिंहराजे भोसले विरुद्ध कल्पनाराजे भोसले आणि नंतर उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले विरुद्ध उदयनराजे भोसले, बीडमध्ये गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशा मोठ्या घराण्यांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण हा तर पवारांच्या हातचा मळ होता. अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यासह अनेक कौटुंबिक लढती लढवत पवारांनी आपले घर शाबूत ठेवले. पण आपल्या पवार घराण्यावर तीच वेळ आल्याचे शरदरावांना आज पाहावे लागत आहे.

पवार घराण्यातील मतभेद, बदललेली राजकीय परिस्थिती याचबरोबर राज्यसभेची गमवावी लागणारी जागा अशा काही कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाला लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्याची चर्चा आहे. या निर्णयामुळे त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत वारंवार दाखविलेली स्वत:बद्दलची अनिश्चितताही कायम ठेवली आहे. मात्र याचवेळी पक्षात मात्र अजित पवारांचे वर्चस्व वाढत चालल्याचे दिसत आहे. शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र यांचे चिरंजीव रोहित पवार पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. रोहित हे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असून, पवार घराण्यातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. भविष्यात ते पवारांचा वारसा चालविणार असल्याची चर्चा होती. यामुळे अजित पवार व त्यांचे चिरंजीव पार्थ अस्वस्थ झाले होते. त्यातच पार्थ यांना मावळ मतदारसंघामधून लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली होती. हे सुरू असतानाच पवार यांनी माढ्यातून आपली उमेदवारी जाहीर केली.

- Advertisement -

आपली उमेदवारी जाहीर करतानाच, या लोकसभा निवडणुकीत आपण आणि आपल्या कन्या सुप्रिया सुळे हे दोनच पवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, असे सांगण्यासही ते विसरले नव्हते. साहजिकच, पार्थ यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच अडचणीत आल्याची भावना अजित पवार समर्थकांमध्ये पसरली होती. पवार यांनी माढ्यातून उमेदवारी मागे घेण्यामागे पवार कुटुंबातील तणाव हे एक प्रमुख कारण असल्याचे मानले जाते.

अजित पवारांनी आपली ताकद दाखवून दिली असतानाच पवारांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी ‘साहेबांनी फेरविचार करावा’ अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. एकीकडे अजित पवारांकडून दबाव आलेला असताना दुसरीकडे रोहित पवारांनी फेरविचार करण्याचा दिलेला सल्ला पाहता पवार कुटुंबात एकवाक्यता नसल्याचे दिसते. शरद पवारांच्या निर्णयाला कुटुंबातील राजकीय वर्चस्वाच्या वादाचीही किनार दिसते. रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट त्याचेच द्योतक आहे. मावळ मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे हे लक्षात घेऊन शेकाप नेत्यांच्या तोंडून पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर करून अजित पवारांनी शरद पवारांवर एकप्रकारे दबाव आणला. यापूर्वी दोन वेळा आझम पानसरे, राहुल नार्वेकर हे उमेदवार फसल्यावर आता घरचा उमेदवार देण्यासाठी अजित पवारांनी दबाव निर्माण केला. या कौटुंबिक दबावापुढे पवारांना नमते घ्यावे लागले, हेच यातून दिसून येते. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचा शब्द अंतिम मानला जातो, त्याच पक्षाच्या घड्याळ्याचे काटे आता उलटे फिरू लागले आहेत.

शिमगा प्रयोग दोन : विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. सुजय यांच्या निर्णयामुळे पारनेर तालुक्यातील काँग्रेस पक्ष संपुष्टात आला आहे. एवढेच नव्हे तर राज्यातही काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. सुजय किंवा एकूणच विखे घराण्याला असलेल्या बंडखोरीच्या इतिहासामुळेच नव्हे, तर विखे घराण्याविषयीच्या रागामुळे शरद पवार यांनी अहमदनगर दक्षिण मतदारसंघ काँग्रेसला देण्याचे नाकारण्याबरोबरच सुजय यांना राष्ट्रवादीत घेणेही टाळले. बाळासाहेब विखे यांनी शरद पवारांचे राजकारणच संपवण्याच्या केलेल्या प्रयत्नांचे शल्य पवारांच्या मनात आजही कायम आहे.

विखेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराच्या सांत्वनालाही पवार गेले नाहीत. २८ वर्षांपूर्वीची मनातील सल कायम ठेवून विखेंचा नातू डॉ. सुजय याला राजकारणात पावन करून घेण्यास मदतीचा हात देण्यास नकार देतात, तेव्हा राजकारणातील शत्रुत्व किती टोकदार असते, याचा प्रत्यय येतो. राजकारणात कोणीही कोणाचा दीर्घकाळ मित्र वा शत्रूही नसतो, असे कोणी कितीही सांगत असले तरी यानिमित्ताने राजकीय शत्रुत्वाचा एक नवा अध्याय महाराष्ट्राने पाहिला. राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर दक्षिणेची जागा काँग्रेसला सोडली नाही, त्यामुळे संतप्त विखे समर्थक काँग्रेस आघाडीचा धर्म पाळण्याची सुतराम शक्यता नव्हती आणि झालेही तसेच. बाळासाहेबांच्या माध्यमातून विखे घराण्यात सलग ४० वर्षे खासदारकी होती. बाळासाहेब असतानाच ती गेली होती. त्याची फार मोठी खंत विखेंना होती. सुजयच्या रूपाने पुन्हा खासदारकी घरात यावी, ही त्यांची सुप्त इच्छा होती आणि मुलाला भाजपमध्ये पाठवून ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी पहिले पाऊल टाकले. आता विखे काँग्रेसमध्ये, मुलगा भाजपात असे फालतू प्रश्न लोकांना पडले आहेत. कारण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय हा मुलाचा होता, असे सांगत विखेंनी लोकांच्या तोंडाला रंग फासण्याचा प्रयत्न केला… मात्र राजकीय फायद्यासाठी काँग्रेसमधून शिवसेना, पुन्हा काँग्रेस आणि आता भाजप हा विखे घराण्याचा जुना राजकीय खेळ आहे. आता शिमगा तोंडावर असल्याने त्यातील रंग उजळून दिसले इतकेच!

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पराभवानंतर बाळासाहेब विखे यांनी काँग्रेसने भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, असे विचित्र आवाहन केले व भाजप प्रवेश करण्याचा दबाव टाकून मुलगा राधाकृष्ण विखे यांच्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळवले. विखे व मुख्यमंत्र्यांचे कायम हितसंबंध चांगले राहिलेत. आपला नगरचा गड कसा सुरक्षित राहील, याची काळजी त्यांनी कायम घेतली. राज्याचे प्रश्न हा ते विरोधी पक्ष नेते झाल्यापासून दुय्यम होता. मुळातच, राजकारणातील घराणेशाहीचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी, सर्व सत्तापदे आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी, पुढच्या पिढीला ती विनासायास उपलब्ध करून देण्यासाठी दिग्गज नेत्यांची धडपड सुरू असते. तोच प्रकार विखेंच्या घराण्यात दिसून येतो. विचार पायदळी तुडवून, विरोधी विचारांना शरण जाण्यापर्यंतची लाचारी विखे घराण्याने अनेकवेळा स्वीकारलेली आहे. घराणेशाहीच्या या मनमानीला, बेबंदशाहीला चाप बसवण्याची ताकद लोकशाहीने मतदारांना दिलेली आहे. ही ताकद ओळखून मतदारांनीच त्याचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे. दुसरीकडे उमेदवार आयात करून बालेकिल्ले तयार करण्याचे भाजपचे धोरण अजबच आहे. विखे-पाटील भाजपमध्ये किती दिवस थांबणार, हे ते स्वत:देखील सांगू शकणार नाहीत. त्यामुळे भविष्यात विखे घराण्याने पुन्हा बंडखोरीचा वारसा जपल्यास नवल वाटणार नाही.

शिमगा प्रयोग तीन : डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीने राज्यात ४८ उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेत भाजप-शिवसेना युतीविरोधात एकत्र लढण्याच्या मनसुब्यावर पाणी फिरवले आहे. भाजपच्या वळचणीला गेलेल्या रामदास आठवलेंच्या विरोधात मोठी नाराजी असताना आणि गेल्या दोन वर्षांत आंबेडकरांनी राज्यात मोठा जनाधार निर्माण केला असताना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण, आपली लोकप्रियता वाढत चालली आहे, हे पाहून त्यांना आपल्याविषयी भलत्याच अपेक्षा निर्माण झाल्या आणि त्यातून त्यांनी काँग्रेसकडे २२ जागा मागत आघाडी मोडली. आंबेडकरांचा सुरुवातीपासून एकूणच पवित्रा हा आघाडी मोडण्याकडे होता. तो शेवटी त्यांनी अवास्तव मागणी करत मोडून काढला.

दलित समाजात जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, दिवंगत रा. सु. गवई, प्रकाश आंबेडकर असे अनेक नेते आणि त्यांचे अनुयायी आहेत. या सगळ्यातून बाहेर पडत आपलं नेतृत्त्व राष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित व्हावं ही प्रकाश आंबेडकरांची जुनी महत्त्वाकांक्षा आहे. एमआयएमशी युती करण्यामागे आंबेडकर यांचा हा हेतू आहे. नावात ‘आंबेडकर’ असूनही राष्ट्रीय राजकारणात स्थान नसल्याची खंत त्यांना आहे. मात्र रोहित वेमुला प्रकरण, भीमा कोरेगाव, मराठा क्रांती मोर्चा आणि दादरला आंबेडकर भवन पाडल्यानंतर आंबेडकरांनी ताकद दाखवत ही खंत दूर करण्याचा प्रयत्न केला. आठवले मंत्री झाल्याने सरकारविरोधातला वर्ग आपल्याकडे वळवण्यात त्यांना यश मिळाले, त्यांचे उपद्रवमूल्य वाढले. मात्र राजकीय खेळ ऐन रंगात आला असताना त्यांनी वेगळी चूल मांडत युतीला रान मोकळे करून दिले. राज्यातलं दलित नेतृत्व एकत्र येऊ शकत नाही याची खूणगाठ बांधलेल्या आंबेडकरांनी आपल्याला पुढे जायचे असेल तर दलितपल्याड विचार करायला हवा या अपरिहार्यतेतून एमआयएमशी हातमिळवणी केली आहे. दलित-मुस्लिमांना एकत्र आणल्याने त्यांची ताकद वाढत चालली आहे, असे वाटत होते. मात्र काँग्रेसपासून फारकत घेत आंबेडकर यांनी एमआयएमप्रमाणे आपली भूमिका भाजपला पोषक होईल, अशीच शेवटी घेतली.

गांधी घराण्याच्या नावाने बोटे मोडत देशातील सर्वच घराण्यांनी राजकारण केले, सत्तेचा फायदा घेतला. त्याला पवार, विखे आणि ठाकरे घराणेही अपवाद असू शकत नाही. फक्त ही घराणेशाही राबवताना कोणाच्या तोंडाचा रंग किती गडद आहे, एवढेच पाहणे आपल्या हाती उरते. याचवेळी डॉ. प्रकाश आंबेडकर यांचाही रंग फार वेगळा नसल्याचे दिसून येते आणि मोठा अपेक्षाभंग होतो.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -