घरफिचर्ससखी शेजारिणी...!

सखी शेजारिणी…!

Subscribe

सखी शेजारिणी , तू हसत रहा, हास्यांत पळे गुंफित रहा....मेरी पडोसन अब जवाँ हो गयी हैं...मेरे सामनेवाली खिडकी में एक चाँद का टुकडा रहता हैं, या अशा विविध निमित्ताने शेजारीण आपल्या जीवनात डोकावत राहते. ही गाणी ऐकताना आपल्या मनाचा पिसारा फुलून येतो हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.

‘शेजारिण’ हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे तिच्याविषयी विविध अंगाने, ढंगाने चर्चा रंगत असतात. शेजारिणीशी तुमचे कसे संबंध आहेत, त्यावरून तुमच्या घरातील सुख-शांती अवलंबून असते. शेजारिणीशी तुमचे चांगले संबंध असतील, तर तिची अडीअडचणीच्या वेळी तुम्हाला मदत होते. शक्य तो घरातील पुरुष मंडळींचा शेजारणीशी चांगलेच संबंध ठेवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळेच सखी शेजारिणी , तू हसत रहा, हास्यांत पळे गुंफित रहा….मेरी पडोसन अब जवाँ हो गयी हैं…मेरे सामनेवाली खिडकी में एक चाँद का टुकडा रहता हैं, या विविध निमित्ताने ते आपल्या जीवनात डोकावत राहते. नाटक, चित्रपटांमध्ये शेजारीण म्हणजेच पडोसन हिचे चित्र फारच रंजकतेने रंगवलेले आपल्याला पहायला मिळते. त्यामुळे तिच्याविषयी असणारी गाणीही फार आवडीने ऐकली जातात. इतकेच नव्हे तर मनात फार हळवेपणाने जपली जातात.

सध्या व्हॉट्सअ‍ॅपचा जमाना आहे. आपल्या मनाला जे भावतं ते गरमागरम म्हणजे हॉट बरीचशी मंडळी व्हॉट्सअ‍ॅपवर बिनधास्त शेअर करत असतात. त्यात पत्नीविषयी जसे विविध खट्टे मिठ्ठे किस्से असतात, तसेच शेजारिणीविषयीही बरेच विविधांगी किस्से असतात. एक बाई आपल्या नवर्‍याला सांगते. घरात फराळ भरून ठेवलेला आहे. मी दिवाळीला दोन दिवस माहेरी जाऊन येतेे. लाडू करंज्यांसाठी शेजारी जाऊ नका. आता लाडू, करंज्या यांच्या अर्थ ज्याने त्याने समजून घ्यायचा असतो. घरातल्या पुरुषांना आपल्या शेजारणीविषयी हळव्या भावना असल्या तरी घरातील महिला मात्र शेजारणीविषयी सावध भूमिका घेऊन असतात. एखादी सासू आपल्या सुनेला सांगत असते, ‘शेजारणीची सासू फार कजाग आहे. माझ्यासारखी चांगली सासू तुला नशिबाने मिळाली आहे’.

- Advertisement -

तुमच्या अडीअडचणींच्या वेळी नातेवाइकांच्या अगोदर जर कुणी धावून येत असेल तर ते म्हणजे तुमचे शेजारी असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत चांगले संबंध ठेवणे केव्हाही हितकारकच असते. पोस्टमन, सिलिंडरवाला, शाळेत जाणारी आपली मुले अशा अनेक कारणांसाठी शेजार्‍यांची भूमिका महत्त्वाची असते. तुम्ही घरी नसता त्यावेळी त्यांचा उपयोग होत असतो. काही वेळा तुमच्या घरी पाहुणे येणार असतील, तर अधिकचे जेवण बनवण्यासाठी तुम्हाला सहाय्य करण्यासाठी शेजारीण हा हुकमी असतो. तिच्या मदतीने बर्‍याच गोष्टी पार पडत असतात. त्यामुळे शेजारणीशी जेवढे चांगले संंबंध राहतील, तेवढा त्याचा चांगला उपयोग होतो. शेजारीण हा विषय चेष्टेचा कधीही न बनवता, तो चांगुलपणाने घ्यायला हवा. शेजारणीविषयी बरेच हलके फुलके जोक्स फुलवले जात असले तर त्या जोक्सच्याही पलीकडे शेजारणीची वेगळे महत्त्व असते. म्हणून कठीण समय येता कोण कामासी येतो, असे जेव्हा मनात येते तेव्हा आपली शेजारीणच आपल्या मदतीसाठी उभी असते. त्यामुळे सखी शेजारिणी, तू हसत रहा…पण तिच्या हास्याचा सकारात्मक उपयोग करा. तरच शेजारधर्म फुलत जाईल. अन्यथा दोन्ही घरांचे रुपांतर दोन शत्रू राष्ट्रांमध्ये होऊन शेजारीण हे कळीचे मूळ होऊ शकेल.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -