घरफिचर्सबाई'माणसाची' लस्ट स्टोरी

बाई’माणसाची’ लस्ट स्टोरी

Subscribe

‘लस्ट’ या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ डिक्शनरीमध्ये शोधाल तर ‘लालसा’ किंवा ‘वासना’असे अर्थ तुम्हाला सापडतील. या दोन्ही शब्दांना नकारात्मक छटा आहे. समाजमान्य वैवाहिक नात्यातल्या जोडीदारव्यतिरिक्त इतर कुणाद्वारे लैंगिकसुख उपभोगणे म्हणजे व्याभिचार. म्हणून ते ‘लैंगिक सुख’ नव्हे तर ती ‘वासना’ आणि म्हणूनच त्या वासनेवर आधारित बनलेल्या ‘लस्ट स्टोरीज’.

‘नेटफ्लिक्स’ या ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रीमिंग अ‍ॅपवर अनुराग कश्यप, जोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि करण जोहर या चार दिग्दर्शकांच्या चार शॉर्टफिल्म्सचा मिळून एक चित्रपट ‘लस्ट स्टोरीज’ नुकताच प्रदर्शित झाला. मुख्य भूमिकेत असणाèया स्त्रीने लैंगिक सुखाचे रितेपण भरून काढण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यातून समाजामुळे, कुटुंबामुळे होत असलेला तिचा मानसिक प्रवास असा समान धागा पकडून या चारही फिल्म्स बनवण्यात आल्या. प्रेम, लग्न, शरीरसंबंध याविषयीची चार मैत्रिणींची आपापली भूमिका आणि त्यातून निर्माण झालेलं नाट्य दर्शवण्याचा प्रयत्न करणारा दुसरा एक हिंदी चित्रपट ‘विरे दि वेडिंग’, जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित झाला.

- Advertisement -

‘विरे दी वेडिंग’मधल्या चारही मैत्रिणीचं वागणं कथित सुसंस्कारी सभ्य समाजाला पटणारं नाहीच. तरीही समाजाने जणू त्या सर्वांकडे कानाडोळा केला; पण ते स्वरा भास्करला माफ करू शकले नाहीत. कारण तिने नवèयाकडून पूर्णत्वाने शरीरसुख मिळत नसल्याने व्हायब्रेटर वापरून कृत्रिम पद्धतीने आपली वासना शमवली. ‘लस्ट स्टोरीज’ मध्ये चार स्त्रियांची कथा आहे, प्रत्येकीने समाजाला फाट्यावर मारत स्वतःची लैंगिकक्षुधा कशी शमवता येईल यासाठी प्रयत्न केलेत. कुणा शिक्षिकेने विद्यार्थ्यात जोडीदार शोधलाय, कुणा मोलकरणीने अविवाहित मालकात आणि कुणा पस्तीस चाळीशीच्या महिलेने नवèयाच्या मित्रात; पण तरीही चर्चा होत आहे ती कियारा अडवाणीचीच. कारण तिने साकारलेल्या पात्राने इतर कुणा पुरुषात नव्हे तर एका कृत्रिम सेक्स टॉयमध्ये तिचा लैंगिक जोडीदार शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
‘अतृप्त लैंगिक सुखाला शमवण्यासाठी स्त्रीचे प्रयत्न’ हा या दोन्ही चित्रपटांचा समान धागा.

तरीही इतर स्त्री पात्रांपेक्षा ‘लस्ट स्टोरीज’मधील मेघा म्हणजेच कियारा अडवाणीची आणि ‘विरे दी वेडिंग’मधल्या स्वरा भास्करची जास्त चर्चा झाली. स्वरावर तर समाजमाध्यमांतून अश्लाघ्य भाषेत ट्रोलिंग झालं. या दोन्ही गोष्टींवर आलेल्या प्रतिक्रिया पाहता या सर्वांचं कारण वरवर संस्कृतीरक्षण वगैरे दिसत असलं तरी यामागे पुरुषी मानसिकता असावी. ‘स्त्रीच्या योनीवर केवळ ‘नवèयाचा’ अधिकार आहे या मानसिकतेवरून आता ‘पुरुषाचा’ अधिकार आहे इथवर मजल मारली गेली’ असं म्हणावं लागेल. कारण पुरुषाची जागा एखाद्या कृत्रिम सेक्स टॉयने घेतली तर ‘अखिल पुरुष जातीचं काय होणार?’ अशी काही असुरक्षित भावना या ट्रोल्सच्या मनात आहे की काय कुणास ठाऊक.

- Advertisement -

स्त्रीपात्राच्या लैंगिक भावनेभोवती कथासूत्र गुंफणारे चित्रपट बॉलिवूडसाठी नवे नाहीत. १९८५ साली प्रदर्शित झालेला मीरा नायर दिग्दर्शित ‘इंडिया कॅब्रे,’ दीपा मेहतांचे ‘फायर’ आणि ‘वॉटर,’ शोनाली बोसचा ‘मार्गरीटा विथ स्ट्रॉ,’ पान नलिनचा ‘अँग्री इंडियन गॉडेसेस,’ लीना यादवचा ‘पार्च्ड’ अशा काही चित्रपटांची नावे घेता येतील. यांत स्त्रीच्या लैंगिकभावना दर्शवल्या होत्या. या चित्रपटांच्यावेळीही समाजाने संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या, परंतु ‘विरे दी वेडिंग’ आणि ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटांबद्दल येणाèया प्रतिक्रिया इतरांपेक्षा अधिक तीव्र आहेत. आजीला चित्रपट पहायला घेऊन गेलेल्या एका ‘ट्रोल नातवा’ला स्वरा भास्करचा व्हायब्रेटर सीन पाहून लाज वाटली. ‘ही आपली संस्कृती नाही’ वगैरे आजी म्हणाली, असं त्याने त्याच्या ट्विटर हँडलवर लिहिलं. बहुदा तेथूनच ठिणगी पडत गेली आणि स्वरावर ट्रोल्स तुटून पडले. मुळात चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे सर्टिफिकेट असताना, त्यात काहीतरी ‘बोल्ड’ सीन असण्याची खात्रीशीर शक्यता असताना, हा ‘संस्कारी’ नातू आजीला घेऊन गेलाच कसा? हेच ‘लस्ट स्टोरीज’ बाबत, नावातच ‘लस्ट’, त्यात तो सेन्सॉर बोर्डच्या कटकटीत अडकू नये म्हणून नेटफ्लिक्ससारख्या ऑनलाईन माध्यमावर प्रदर्शित झाला. यात आध्यात्मिक ऐवज’ दाखवला जाणार नाही हे माहीत असताना स्वयंघोषित सभ्य संस्कारी जनता तो चित्रपट का पहात असेल?

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ चित्रपटात नायकाने हस्तमैथुन केल्याचं किती सुज्ञांना लक्षात आलंय कुणास ठाऊक. आलं जरी असेल तरी तो पुरुष आहे आणि या स्त्रिया आहेत म्हणून ते कदाचित आक्षेपार्ह वाटलं नसेल किंवा त्याला ट्रोल करून प्रसिद्धी मिळणार नसेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष झालं असेल. तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रवेश होतो न होतो तोच विधवा बनलेली, थोरल्या दिराच्या अतार्किक वचनामुळे पुनर्विवाह न झालेली ‘काकस्पर्श’ मधली उमा तिचं दुःख बोलून दाखवताना जीवाच्या आकांताने ओरडत रडत म्हणते, ‘फलशोधणाच्या रात्री खोलीत नवऱ्याबरोबर काय काय करतात हे तरी सांगा मला, जन्मभर नुसती तडफडतीय, नवरा गेल्यानंतर खूप काहीतरी महत्त्वाचं गमावलंय एवढंच समजलंय मला, नक्की काय मिळालं नाही ते तरी कळू द्या. थंड पाणी तरी किती वेळा ओतून घ्यायचं अंगावर?’ हा चित्रपट महाराष्ट्रीयन प्रेक्षकाला भावतो, पटतो, हृदयस्पर्शी वाटतो. पण त्याच प्रेक्षकाला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ मध्ये रत्ना पाठक शाहने साकारलेली उतारवयातील विधवा उषा परमार उर्फ ‘बौजी’ बाथरूममध्ये जाऊन हस्तमैथुन करताना खटकते. तिचं ‘फोन सेक्स’द्वारे काल्पनिक विश्वातून स्वतःची लैंगिक इच्छा शमवणं अनैतिक वाटतं.

‘मर्डर,’ ‘जिस्म,’ ‘क्या कुल है हम,’ ‘ग्रँड मस्ती’ अशा चित्रपटांतले संवाद किंवा दृश्ये चावट, अश्लील-आक्षेपार्ह वाटत नाहीत. याउलट वास्तववादाची छटा असणाऱ्या ‘विरे दी वेडिंग, लस्ट स्टोरीज, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटांतील स्त्री पात्रे संस्कृतीविरोधी वाटतात. एकीकडे मानवी देहभावनांच्या उर्मी प्रकट करणारी दृश्ये पाहण्याची आंतरिक लालसा आणि दुसरीकडे तथाकथित संस्कृतीरक्षणाचा झेंडा स्वतःच्या खांद्यावर घेऊन मिरवण्याची खुमखुमी अशा कात्रीत अडकलेल्या प्रेक्षकांसमोर चित्रपटांच्या माध्यमातून वास्तवातली ‘ह्युमन वूमन’ साकारणं चित्रकर्मींसाठी तारेवरची कसरत नक्कीच आहे.


– महेशकुमार मुंजाळे
(लेखक नव्या पिढीतले पटकथाकार आणि दिग्दर्शक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -