घरफिचर्सम्युझिक इंडस्ट्रीतील माफियागिरी

म्युझिक इंडस्ट्रीतील माफियागिरी

Subscribe

म्युझिक कंपन्यांच्या दादागिरीचा प्रकार जुनाच आहे. कधीकाळच्या लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल अचानक इंडस्ट्रीमधून बाहेर पडल्या, त्यांच्यासारखेच अनेक गायक अचानक इंडस्ट्रीतून गायब झाले होते. आपली लॉबी तयार करून हांजी हांजी करणार्‍याला काम द्यायचं, जे आमचे तेच कामाचे, बाकी ज्याच्याकडे आवाज आणि स्वतःचे विचार असतील अशांनी घरी बसावं हे सूत्र म्युझिक कंपन्यांनी राबविले आहे. भारतात ज्यांना संगीत क्षेत्रात ऑस्कर मिळालेत त्यांना काम मिळत नाहीये. ए.आर.रहमानसोबत ज्याला साउंडसाठी ऑस्कर मिळाला होता अशा रसूल पुकुट्टीनेदेखील ही तक्रार केलीये, ज्या इंडस्ट्रीत वर्षाकाठी इतके सिनेमे येतात तिथं हे का घडत? असा एक भेसूर प्रश्न या क्षेत्रातील माफियागिरीचे पितळ उघडे पाडतो.

बॉलिवूडमध्ये सध्या विविध वादांना तोंड फुटले आहे, घरच्या भांडणात जसे मुद्दे संपले की, ती जुन्या चुका उकरून काढते अगदी तसंच आता अनेक जुने वाददेखील उफाळून आलेत. सुशांतच्या मृत्यूनंतर माध्यमांसह, सध्या रिकाम्या असलेल्या सेलिब्रिटीजनादेखील चघळायला विषय मिळालाय. आरोप अनेकांनी लावलेत, पण त्यात तथ्य सगळ्यात असेल असं नाही, तरीही काही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. बॉलिवूडमधील संगीत क्षेत्रात माफियागिरी चालते आणि संपूर्ण इंडस्ट्री 2 कुटुंब चालवीत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी गायक सोनू निगम याने केला होता. त्याच्या या विधानाचे अनेक गायकांनी समर्थन केले, दुसर्‍या व्हिडीओत त्याने सरळ टी सिरीज आणि भूषण कुमारला धारेवर धरले, त्याआधी भूषण कुमारच्या बायकोने एका व्हिडिओत सोनू निगमला प्रतिप्रश्न केले होते.

दिल बेचारा सिनेमाच्या प्रदर्शनानंतर ए आर रहमानने देखील एका मुलाखतीत आपल्याला काम मिळू नये यासाठी एक गट सक्रिय असल्याचे सांगितले. शंकर महादेवन असो किंवा कैलास खेर अनेक दिग्गजांनी या विषयावर आपले मत याआधी देखील मांडले होते. सुशांत सिंग राजपुतच्या केसनंतर प्रत्येकजण आपली बाजू मांडतोय, म्युझिक इंडस्ट्रीतील वादांना अनेकवेळा वैयक्तिक बाजूदेखील असते. कुणी ठरलेले पैसे न दिल्याने वाद घालतो तर कधीकधी कुणाची बायको कुणी पळविल्याचा राग देखील बाहेर काढला जातो. अशा वैयक्तिक वादांना मग नेपोटिजम, ग्रुपिजमची बिरुदे लावून समोर आणलं जातं. याचा अर्थ असा मुळीच नाही की सगळेच वाद किंवा आरोप वैयक्तिक असतात, यापैकी बरेच आरोप हे खरे आणि विचार करायला लावणारे आहेत. म्युझिक इंडस्ट्रीत चालणारी माफियागिरी ही कितपत सत्य आहे? हे आता आपल्यालाच ठरवावे लागणार आहे.

- Advertisement -

संगीताच्या नावाखाली सध्या बहुतांश सिनेमात एखाद जुनं गाणं नवं करून, एक रॅप किंवा पंजाबी गाणं, एक आयटम साँग, नेहा कक्कड किंवा अर्जित सिंगच्या आवाजातील रडक गाणं हा सुपरहिट कॉम्बो सर्वत्र दिसतो आहे. जिनके लिये हम रोते है, गेंदा फुलसारख्या अत्युच्च दर्जाचे लिरिक्स लिहिणारे गीतकार हमखास पाहायला मिळतात, सिनेमात कथा असो किंवा नसो नेहा कक्कड, जूबिन नौटीयाल, तुलसी कुमार, टोनी कक्कड यांची गाणी नक्की आढळतील. ठरलेले संगीतकार चोरलेले म्युझिक घेऊन कानातून रक्त काढणारी गाणी बनवतात असा काहींचा समज आहे. पण तरीही ही गाणी सुपरहिट ठरतात असं का ? म्हातारे किंवा आऊट डेटेड झालेले गायक सोडून द्या, पण असे काही गायक जे नवीनच आले होते, ज्यांनी चांगले गाणे देखील गायले, अशी मंडळी अचानक गायब होऊन, स्वतःचं युट्यूब चॅनल काढून तिथेच आपली कला सादर करतात, कारण काय ? मान्य केलं की त्यांचा इगो मध्ये आला असेल, पण सगळ्यांचा ? तोही एकाच वेळी ? आपण हा विचार का करत नाही ? याला देखील कारण आहे.

सुपरहिटच्या नावाखाली निव्वळ कचरा तुमच्यासमोर मांडला जातो, त्याची मार्केटिंग इतकी जबरदस्त केली जाते की तुम्हीदेखील पाहिल्याशिवाय राहत नाही. दुसरं कुठलं ऑप्शन नसल्याने आपण ते ऐकायला सुरू करतो. बरं ऐकलं नाही तर, आउटडेटेड ठरण्याचा धोका, म्हणून संगीताच्या नावाखाली असं सगळं सहन करतो. नेमकं हे घडतं कसं ? संगीताचा दर्जा घसरला आहे का? मला विचारालं तर माझं असं मत आहे की, हा दर्जा बिर्जा काय घसरत वगैरे नसतो, आता लै वाईट आहे आणि आधी लैच भन्नाट होतं, अशातला काही भाग नाही. इंस्पिरेशनच्या नावाखाली म्युझिक चोरण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे आणि त्याच परंपरेचा पाईक होण्याची पात्रता अंगी यावी म्हणून, सध्याचे काही संगीतकार सदैव प्रयत्न करीत असतात.

- Advertisement -

गेल्या काही काळात संगीतकारांची आणि गायकांची म्युझिक कंपन्यांविरोधात नाराजी वाढली आहे. याला अनेक कारण देखील आहेत, एखाद्या गायकाशी किंवा संगीतकाराशी करार करताना लावल्या जाणार्‍या जाचक अटी आणि नियम हे त्यापैकी एक, अनेक मोठे संगीतकार केवळ या एका कारणामुळे कंपनीशी करार करत नाहीत. उदाहरणादाखल एक किस्सा सांगतो, 2013 साली इस्रा ( इंडियन सिंगर्स राईट असोसिएशन) आणि म्युझिक कंपन्यांमध्ये वाद सुरू होता, त्यावेळी इस्त्रा कडून निती मोहन, श्रेय घोषाल, शान यांसारख्या गायकांनी आपली बाजू मांडली, काय मुद्दा होता तो ? म्युजिक कंपन्यांनी घातलेल्या अटी, त्यातली एक अट सांगतो जी वादाचे मुख्य कारण होती. गायकाला त्याने गायलेल्या गाण्याची रॉयल्टी कलम 38 अ(2) अंतर्गत देण्यात येईल, त्यानंतर त्याने गायलेल्या गाण्यावरून त्याचा हक्क संपेल.

कलम 31 सी नुसार गायकाने हे मान्य केले पाहिजे की, तो नंतर कुठल्याही माध्यमांवर हे गाणे म्युझिक कंपनी किंवा प्रोड्युसरच्या परवानगीशिवाय सादर करणार नाही, एव्हाना त्याचे कव्हर साँगदेखील तो म्हणू शकणार नाही. ही अट एका मोठ्या कंपनीच्या करारनाम्यात लिहिलेली होती, याचा फटका खुद्द सोनू निगम, सुनिधी चौहान आणि शेखर सुमनला बसला होता, कारण होतं की हार्टलेसची गाणी सुनिधी आणि सोनू यांनी गायली होती आणि लॉन्च टी सिरीज करणार होती. त्यावेळी भूषण कुमारने ज्या गायकांनी आमचा करार मान्य केला नाही, त्यांचे गाणे आम्ही रिलीज करणार नाही अशी भूमिका घेतली होती. हे मी नाही तर स्वतः त्यावेळेचे इस्त्राचे संजय टंडन यांनी मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. आता हा किस्सा सांगण्या मागे कारण हे की ज्या म्युझिक कंपनीचा एकूण इंडस्ट्रीत 50 टक्के वाटा आहे, जी महत्त्वाची म्हणून ओळखली जाते. अशा टी सिरीजसारख्या कंपनीमध्ये जर असे काही करार मेन स्ट्रीम गायकांना करावे लागत असतील तर तिथे नवख्या गायकांचे काय हाल होत असतील ? याचा विचार करावा लागेल.

टी सिरीज सारखी कंपनी आज त्यांचं म्युझिक काही सेकंदासाठी जरी कुठल्या व्हिडिओमध्ये वापरलं तर व्हिडिओ कॉपीराइटच्या नावाखाली डिलीट करायला लावते. यूट्यूबवर तर हा प्रकार प्रत्येक दिवशी पाहायला मिळतो, पण हीच कंपनी जेव्हा एखाद्या इंडिपेंडंट आर्टिस्टच म्युजिक चोरून वापरते तेव्हा स्वतः चुकी मान्य करते का ? डिसेंबर महिन्यात पती पत्नी और वो सिनेमात रित्विझ नावाच्या एका गायकाच्या गाण्यातील सँपल म्युजिक लिरिक्ससह टी सीरिजने वापरले, जेव्हा ही गोष्ट त्या गायकाला समजली तेव्हा त्याने आवाज उठवला. पण काहींनी त्याला तिथेही सल्ला दिला की इंडस्ट्रीत टिकायचं असेल तर यांच्याशी पंगा घेऊ नको,ते प्रकरण पुढे असच मिटलं. असंही असू शकतं की ही बाब भूषण कुमार किंवा प्रोड्युसरला लक्षात आली नसेल, म्हणून त्यांनी खात्री न करता ते म्युझिक वापरलं, पण प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्या कलाकाराला त्याचा मोबदला मिळाला का ? पैसा सोडा किमान क्रेडिट तरी देण्यात आलं का? उलट सिनेमा ऍमेझॉन प्राईमवर टाकताना गाण्यातले शब्द बदलून टाकण्यात आले.

याला काय म्हणावे ? ज्या इंडस्ट्रीत असे भुरटे धंदे खुले आम केले जातात तिथं या माफियांना कुणाची भीती असणार? देशभक्तीच्या नावाखाली 100 मिलियन सबस्क्राईबर मिळवून देण्यासाठी अनेकांनी युट्यूबवर त्यांचं चॅनल शेअर केलं. पण त्याच कंपनीत सुरू असलेले हे प्रकार उघडकीस येतात का ? हे केवळ टी सिरीजमध्ये घडतंय असं नाही, इथे यांचा उल्लेख केवळ यासाठी केला की, ही एक मोठी आणि नामांकित कंपनी आहे. बाकी म्युझिक कंपन्यांमध्ये देखील फार वेगळं चित्र नाही. तिथेही कराराच्या नावाखाली अशा जाचक अटी गायक आणि संगीतकारांवर लादल्या जातात, जे या अटी मान्य करत नाही त्यांची गाणी कुठल्याही सिनेमात दिसणार नाही याची जबाबदारी त्या कंपन्या घेतात. इंडस्ट्रीत मोठे प्लेयर मोजके असल्याने प्रोड्युसर आणि दिग्दर्शकाना नाईलाजाने का होईना हे मान्य करावेच लागते.

कधीकाळी वर्षाला किमान चार सिनेमे करणारे शंकर एहसान लॉय सध्या वर्षाला एखादा सिनेमा करताना पाहायला मिळतात. राम संपत, जावेद अली, सोनू निगम, मोनाली ठाकूर, कैलास खेर यांसारखे लोक सहसा कुठे आढळत नाहीत. मसकली 2.0 वेळी म्युझिक कंपन्यांच्या दादागिरीचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. इंडस्ट्रीत हा प्रकार आजचा नाहीये, याआधीही हे प्रकार अस्तित्वात होतेच. कधीकाळच्या लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल अचानक इंडस्ट्रीमधून बाहेर पडल्या, त्यांच्यासारखेच अनेक गायक अचानक इंडस्ट्रीतून गायब झाले होते. आपली लॉबी तयार करून हांजी हांजी करणार्‍याला काम द्यायचं, जे आमचे तेच कामाचे, बाकी ज्याच्याकडे आवाज आणि स्वतःचे विचार असतील अशांनी घरी बसावं हे सूत्र म्युझिक कंपन्यांनी राबविले आहे. भारतात ज्यांना संगीत क्षेत्रात ऑस्कर मिळालेत त्यांना काम मिळत नाहीये, ए.आर.रहमान सोबत ज्याला साउंडसाठी ऑस्कर मिळाला होता अशा रसूल पुकुट्टीनेदेखील ही तक्रार केलीये, ज्या इंडस्ट्रीत वर्षाकाठी इतके सिनेमे येतात तिथं हे का घडत? याचं कारणदेखील तेच आहे. कुठल्याही संगीताला माझा विरोध नाहीये, पण केवळ पंजाबी गाणी आणि एकाच सिनेमात 4 म्युजिक डायरेक्टर घालून नेमकं काय साध्य होत ? तनिष्क बागची असो किंवा नेहा कक्कड, एक वेळ मान्य करू की, हे टॅलेंटेड आहेत, आवाज छान आहे वगैरे वगैरे, पण म्हणून यांचाच भडिमार करणे कितपत योग्य? याचा विचार आता तरी म्युजिक कंपनी करतील अशी अपेक्षा आहे.

बॉलिवूड इंडस्ट्री, म्युजिक इंडस्ट्री असा उल्लेख आपल्याकडे आता केला जातो, कला क्षेत्राचं रूपांतर व्यवसायात झालं आहे, हे देखील मान्य. या क्षेत्रात येणारा प्रत्येक जण पैसा कमाविण्यासाठीच येत असतो. म्युझिक कंपन्यांना त्यांचा फायदा महत्वाचा असतो, लोकांनी जे स्वीकारलं तेच देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, अशावेळी कलाकार किंवा गायक काय म्हणतो ? तो काय विचार करतो ? याला त्यांच्या लेखी काहीही महत्व नाही. आपण हे सगळं एकवेळ मान्य केलं, पण तरीही कंपनीत काम करणार्‍या मजुराला ही काही अधिकार असतात, काही स्वातंत्र्य असते. या म्युजिक इंडस्ट्रीत हे अधिकारसुद्धा नवीन कलाकारांना मिळतात असं दिसत नाही. म्हणून गायक आणि संगीतकारांची अवस्था त्या मजुरांसारखी झाली आहे, आपलं पोट भरण्यासाठी मालक म्हणेल तसं वागायचं आणि नसेल जमत तर काम सोडून उपाशी मरायचं, असे दोन पर्याय यांच्यापुढे आहेत. एक तिसरा पर्यायसुद्धा आहे, स्वतःची निर्मिती करून ती युट्युबवर टाकणे आणि तिथून पैसा कमविणे, पण त्यातून मिळणारा मोबदला हा तेवढा नसतो. म्हणून त्यांच्यापुढे वरचे दोनच पर्याय शिल्लक राहतात. म्युझिक इंडस्ट्रीतील ही माफियागिरी थांबवायची असेल तर आता ते प्रेक्षकांच्या हातात आहे, अन्यथा हे माफिया अनेक नवख्या टॅलेन्ट्सची अशीच शिकार करत राहतील.

-अनिकेत म्हस्के 

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -