महाराष्ट्र काँग्रेसची गलितगात्र अवस्था !

काँग्रेसमध्ये भाजपच्या आक्रमक प्रचाराला तोंड देण्यासाठी अथवा भाजपवर हल्ला चढवण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हेच एकमेव किल्ला लढवताना दिसतात. तर कधीकधी अधूनमधून माजी मुख्यमंत्री व आत्ताचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर, भाई जगताप अशी मोजकीच मंडळी आणि तेही अत्यंत मोजक्या विषयांवर मते मांडताना दिसतात. मात्र एरवी काँग्रेसमध्ये सगळा आनंदी आनंद आहे. त्यांची ही गलितगात्र अवस्था कधी आणि कशी संपणार हा प्रश्न आहे.

oped

महाराष्ट्रामध्ये काँग्रेसविरोधात बोलणार्‍यांची मोठी फळी भाजपामध्ये सक्रिय आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, किरीट सोमय्या अशी भलीमोठी यादी भाजपमध्ये आहे. त्या मानाने काँग्रेसमध्ये मात्र भाजपच्या आक्रमक प्रचाराला तोंड देण्यासाठी अथवा भाजपवर हल्ला चढवण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हेच एकमेव किल्ला लढवताना दिसतात. तर कधीकधी अधूनमधून माजी मुख्यमंत्री व आत्ताचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर, भाई जगताप अशी मोजकीच मंडळी आणि तेही अत्यंत मोजक्या विषयांवर मते मांडताना दिसतात. मात्र एरवी काँग्रेसमध्ये सगळा आनंदी आनंद आहे. त्यांची ही गलितगात्र अवस्था कधी आणि कशी संपणार हा प्रश्न आहे.

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची राज्यातली स्थिती ही सत्तेत असूनदेखील चिंताजनक आहे असेच म्हणावे लागेल. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते हे नरेंद्र मोदींच्या धसक्यातून अजूनही बाहेर आलेले दिसत नाहीत. त्यात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा घोळ अद्याप सुटलेला नाही. पक्षाचे राष्ट्रीय नेते व ज्यांच्यावर काँग्रेसची भविष्यातली पूर्ण मदार आहे असे राहुल गांधी हे अद्यापही राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी खांद्यावर घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रातही जो मोदीविरोधी मतप्रवाह आहे तो आकर्षित करेल असं नेतृत्व काँग्रेसकडे आजमितीला नाही. आणि त्याचा वारंवार फटका राज्यात आणि देशातही काँग्रेसला बसत आहे. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही शहाणपणा आलेला नाही. यात सर्वात जास्त अपेक्षाभंग हा काँग्रेसवर विश्वास असणार्‍या तरुण वर्गाचा होत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस या गलितगात्र अवस्थेतून बाहेर कधी पडणार या विवंचनेत काँग्रेसचा तरुण मतदार आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष या नात्याने सध्याचे ठाकरे सरकारमधील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. बाळासाहेब थोरात हे काही मास लीडर नाहीत, मात्र हायकमांडशी असलेली निष्ठा ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. पक्षात आणि सत्तेमध्ये सर्वोच्च पदे देताना काँग्रेसमध्ये गांधी घराण्याशी असलेली निष्ठा हा सर्वोच्च गुण समजला जातो, हे जरी खरे असले तरी अशा सर्वोच्चपदावरील व्यक्तीचा पक्ष संघटनेवर आणि जनसामान्यांवर कितपत प्रभाव आहे, हे पाहणे आताच्या काळात अत्यंत आवश्यक झाले आहे. हे कधीतरी काँग्रेसच्या हायकमांडने लक्षात घेणे गरजेचे आहे. बाळासाहेब थोरात हे नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान पाईक आहेत. याबद्दल कोणाच्या मनात दुमत नाही. तसेच ते महसूलमंत्री म्हणूनही अत्यंत कार्यक्षमपणे कारभार करत आहेत, याबद्दलही वाद नाही. प्रश्न आहे तो बाळासाहेब थोरात यांच्यासारखी प्रशासन कुशल व्यक्ती उत्कृष्ट वक्ता असण्याचा आहे. बाळासाहेब थोरात हे मुळातच मितभाषी आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकारण अथवा राधाकृष्ण विखे पाटील असे त्यांचे आवडते विषय सोडता अन्य विषयांवर जाहीर मत व्यक्त करण्यात ते फारसे इच्छुक नसतात. तसेच ते राज्याचे महसूलमंत्री असल्यामुळेही त्यांच्यावर मंत्रिमंडळातील कामाची जबाबदारी आहेच. काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्रात प्रथमच शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या पक्षाशी सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चांगला सुसंवाद व समन्वय राखण्याची अवघड जबाबदारी ही बाळासाहेब थोरात यांच्यावर आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या वागण्या आणि बोलण्यावर ती मर्यादा येतात. मात्र असे असले तरीही काँग्रेसचा मोदीविरोधातील आवाज हा महाराष्ट्रात तितकासा प्रभावी नाही. उलट तो क्षीण झाल्यासारखी स्थिती राज्यभरात सर्वत्र दिसत आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या बलाबलामध्ये चौथ्या स्थानावर असलेला आणि सध्याच्या ठाकरे सरकारमध्ये एक महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची ही स्थिती अशी का झाली आहे, याचा त्यांनी विचार करण्याची गरज आहे.

महाराष्ट्रामध्ये काँग्रेसविरोधात बोलणार्‍यांची मोठी फळी भाजपामध्ये सक्रिय आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, किरीट सोमय्या अशी भलीमोठी यादी भाजपमध्ये आहे. त्या मानाने काँग्रेसमध्ये मात्र भाजपच्या आक्रमक प्रचाराला तोंड देण्यासाठी अथवा भाजपवर हल्ला चढवण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हेच एकमेव किल्ला लढवताना दिसतात. तर कधीकधी अधूनमधून माजी मुख्यमंत्री व आत्ताचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर, भाई जगताप अशी मोजकीच मंडळी आणि तेही अत्यंत मोजक्या विषयांवर मते मांडताना दिसतात. मात्र एरवी काँग्रेसमध्ये सगळा आनंदी आनंद आहे. यामध्येही पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर हे देशाच्या अधिक आणि तुलनेने महाराष्ट्राच्या कमी अशा आर्थिक प्रश्नांवरच भूमिका मांडतात. आर्थिक प्रश्नांवर भूमिका या देशासाठी व राज्यासाठी अत्यावश्यक असतात, मात्र त्यामध्ये सर्वसामान्यांना फारसे स्वारस्य नसते. त्यामुळे आर्थिक प्रश्नांमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अन्य मंडळींचा अभ्यास दांडगा असला तरी तो जनसमर्थन मिळवण्यासाठी पक्षाला काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात जर पुन्हा ताठ मानेने उभे राहायचे असेल आणि पक्ष संघटनेला चांगले यश मिळवून द्यायचे असेल तर भाजपच्या काँग्रेसविरोधी आक्रमक प्रचाराला तोडीस तोड देणारे तरुण नेतृत्व पुढे आणावे लागेल. त्याचे वक्तृत्वही लोकांना आकर्षित करणारे असावे लागेल. अशा प्रकारच्या नव्या तरुण नेत्यांची फळी महाराष्ट्रात उभी करावी लागेल. प्रश्न अशा तरुण वक्त्यांना काँग्रेसने योग्य असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आहे. दुर्दैवाने काँग्रेसमध्ये अगदी ब्लॉक अध्यक्षापासून ते प्रदेशाध्यक्षापर्यंत सारेजण दरबारी राजकारणात स्वतःला पारंगत समजतात. त्यामुळे विरोधकांच्या हल्ल्याला आणि आरोपांना उत्तरे देण्याची, जोरदार प्रतिवाद करण्याची गरज काँग्रेसच्या राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाला वाटत नाही, हेच खरे काँग्रेसचे दुर्दैव आहे. गटबाजी ही काही काँग्रेसला नवीन नाही. मात्र ज्या पक्षाने आतापर्यंत देशात आणि महाराष्ट्रातही सत्तेची सर्वोच्च पदे उपभोगली, त्या पक्षाला महाराष्ट्रात तीन पक्षांची आघाडी सरकार स्थापन झाल्यावर तिसर्‍या स्थानी बसावे लागणे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. अर्थात, आघाडी सरकारमधील हे तिसरे स्थान मिळण्यातही महाराष्ट्र काँग्रेसवर शरद पवारांचे मोठे उपकार आहेत, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. काँग्रेसचे महाराष्ट्रात ४४ आमदार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीची जर काँग्रेसची स्थिती पाहिली तर काँग्रेस वीस पंचवीसच्या पुढे जाणार नाही, असेच सर्वसाधारण चित्र राज्यात दिसत होते. मात्र सातार्‍यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ती पावसात भिजणारी ऐतिहासिक सभा झाली आणि मतांचा पाऊस राष्ट्रवादीबरोबरच राज्यातील काँग्रेसच्या उमेदवारांवरही पडला. त्यामुळेच एरवी पंचवीस-तीसमध्ये कुंडली जाऊ शकणारी काँग्रेस राज्यांमध्ये पूर्वीपेक्षा तीन जागांनी अधिक का होईना, परंतु ४४ व्या आकड्यावर स्थिरावली. निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात एवढे वितुष्ट येईल याची कल्पना काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्यातील नेत्यांनाही नव्हती. त्यामुळे पुढची पाच वर्षे पुन्हा विरोधात बसणे एवढेच एकमेव काम काँग्रेसच्या निवडून आलेल्या ४४ आमदारांकडे होते. त्यामुळेच जेव्हा महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र येत होती त्यावेळी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी मात्र महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये सहभागी होण्यास उघड नाराजी दर्शवली होती. तरीही राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आणि त्यातही विशेषत: तरुण ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत हायकमांडला महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या भाजपविरोधी सरकारमध्ये सहभागी होण्याचा हट्ट धरला. याचे मुख्य कारण हेच की मुळात काँग्रेसचा स्वभाव हा विरोधी पक्षात बसण्यासारखा नाही. विरोधी पक्षात बसून सत्ताधार्‍यांकडून स्वतःच्या मतदारसंघातील कामे करून घेण्याचे जे स्किल भाजपा आणि शिवसेना या दोन पूर्वाश्रमीच्या मित्रांकडे आहे ते काँग्रेसकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याबरोबरच महाराष्ट्रात आणि देशात मोदी आणि भाजप सरकार असल्यानंतर विरोधी पक्षात असताना काय हाल होतात याचा अनुभव राज्यातील काँग्रेस नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत बराच सोसला होता. त्यामुळे पुन्हा आता पुढची पाच वर्षे विरोधी पक्षात टाळ कुटत बसण्यापेक्षा शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या हाताखाली काम करणे हे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी अधिक सोयीचे मानले. मात्र दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रात सत्तेत असतानाही काँग्रेसच्या मंत्र्यांकडून तसेच काँग्रेसच्या नेत्यांकडून आणि पदाधिकार्‍यांकडून सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे होताना दिसत नाहीत. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दर आठवड्याला मंत्रिमंडळ बैठकीनंतर जनता दरबार आयोजित करून लोकांच्या समस्या, तक्रारी, गार्‍हाणी ऐकून घेण्यास आणि त्या सोडवण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसमध्ये मात्र दुर्दैवाने अजूनही मंत्र्यांचा जनसंपर्क अथवा जनता दरबार सुरू झालेले नाहीत. काँग्रेसचे मंत्री मंत्रालयात येतात कधी आणि बैठका आटपून जातात कधी हे सामान्य कार्यकर्त्यांना सोडा बड्या बड्या नेत्यांनाही ठाऊक नसते. जर काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे मंत्री आणि पदाधिकारी नेते, कार्यकर्ते आणि काँग्रेसवर प्रेम करणारी जनता यांच्यात असाच दुरावा यापुढेही कायम राहिला तर मात्र राज्यात काँग्रेसला तारण्यासाठी ब्रह्मदेवही काही करू शकणार नाही, हे लक्षात घेण्याची गरज आहे.