आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने!

आजवर वारीला सातशे वर्षे लोटली, पण वारी अखंड प्रवाही आहे. वारकरी संप्रदायात परमसुखप्राप्ती म्हणजे आद्य परब्रह्म पांडुरंगाची भेट. वारकरी संप्रदायाचा थोडक्यात इतिहास सांगणारा हा लेख नक्की वाचा.

Mumbai
pandharpur wari
प्रातिनिधिक फोटो

आजवर वारीला सातशे वर्षे लोटली, पण वारी अखंड प्रवाही आहे. वारकरी संप्रदायात परमसुखप्राप्ती म्हणजे आद्य परब्रह्म पांडुरंगाची भेट. पंढरपूर नगरीत अवघ्या विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आषाढी व कार्तिकी वारीमध्ये सहभागी होणारे लाखो वारकरी हे २१ व्या शतकातील शांतीदूत आहेत. अंधश्रद्धा, कर्मठ परंपरा आणि विषमतेवर शब्द आणि कृतीतून प्रहार करणारे संतसाहित्य ही वारकरी संप्रदायाची अक्षय शिदोरी आहे. येथे संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत गोरोबा, संत नरहरी, संत निळोबा राय या आणि अशा असंख्य भक्त – संत कवींचे लिखित साहित्य वाणीमय होऊन अवघ्या महाराष्ट्राला मुखोग्द्त झाले आहे. विलक्षण प्रेम, संतांच्या शब्दांना असलेली धार, प्रमाण आणि गृहस्थाश्रमात परमेश्वर भेटीचे, सत्कर्माचे मार्गदर्शन, परब्रह्म भेटीची व्याकुळता, समतेचा मार्ग सांगणार्‍या, प्रबोधन करणार्‍या कविता यांनी हे साहित्य बहरले आहे.

यामध्ये भेदा-भेद अमंगल मानणारे आणि परमेश्वराच्या व्यापक एकतेचा बोध झालेले संतकवी रंजल्या – गांजलेल्या माणसांना समतेची शिकवण देत होते, त्यांच्यातील माणूस जागा करत होते, ही गोष्ट संतांनी हाती घेतलेल्या मानवमुक्तीच्या कार्याची महती स्पष्ट करणारे आहे. संत नामदेवांनी तर पंजाब प्रांतात जाऊन भागवत धर्माची महती व ईश्वर भक्तीचा नाममार्ग तेथील शिख धर्मीय बांधवांना सांगितला. संत नामदेवांच्या रचना शिख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्ये घेण्यात आल्या, यावरून वारकरी संप्रदायाच्या वैश्विक बंधुत्वाच्या विचाराची खात्री पटते.

वारीमध्ये सामील होणार्‍या दिंड्या हा व्यवस्थापन, उत्तम नियोजन, मानव संसाधन शाखा व पर्यटनाच्या बहुविध शक्यतांचा समुच्चय म्हणून पाहता येतो. केवळ शब्दांच्या सामर्थ्यावर तरलेल्या अभंग गाथेचे अवीट माधुर्य ते भावार्थदीपिका अर्थात भगवद्गीतेवरील ज्ञानेश्वरांनी केलेल्या टीकेचे प्राकृत भाषेतील रूप ज्ञानेश्वरीच्या ओव्या महाराष्ट्रातील माणसांच्या मनांवर, हृदयात केवळ प्रेम आणि भक्तीच्या माध्यमातून खोलवर कोरल्या गेल्या आहेत, नव्हे नव्हे, मराठी संस्कृतीचे दृश्य रूप बनल्या आहेत. रोजच्या जगण्यातील उदाहरणांतून परमात्मा प्राप्ती, मोक्ष प्राप्तीचा संदेश देणे हे कर्मठ धर्मसत्तेला सहजी मान्य नव्हते.

आजही अनेक मनुच्या श्रेष्ठत्वाचा डंका पिटणार्‍या कुप्रवृत्तींना संतांनी प्रेमाने विणलेले वारकरी साहित्य नकोसे होते, त्या साहित्याच्या प्रभावाने उभे राहिलेल्या महाराष्ट्राला विषमतेच्या वैशाख वणव्यात पेटवण्यासाठी व चातृवर्ण सनातन धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी अगम्य तुलना करून मनुला श्रेष्ठ ठरवण्यासाठी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांना कमी लेखले जाते. पण वारकरी हे सहिष्णुता आणि प्रेम यांचा भुकेला असलेल्या विठ्ठलाचे अनुयायी आहेत. ते विघातक कारवायांकडे दुर्लक्ष करून त्या प्रवृत्तींना वारकरी संप्रदायात सहभागी होण्याचे आवाहन करतात, यावरून वारकर्‍यांच्या बौद्धिक उंचीची व सहिष्णुधर्माच्या अपार कारुण्यदृष्टीची साक्ष देता येते.

संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या नावांनी ‘ग्यानबा – तुकाराम’ चा जागर करत शेकडो मैल अंतर चालत सर्व दु:ख, दैन्य, संसारिक पीडा विसरून जात, ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता भक्तीरसात चिंब होत पंढरपूर येथे हे वारकरी विठ्ठलाच्या भेटीला येतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याच्या जाती, करी लाभाविण प्रीती हा तुकोबांचा अभंग संतांच्या शिकवणीचे सार म्हणता येईल. गेल्या सातशे वर्षांहून अधिक काल सुरु असलेल्या वारीने नेहमी सत्याची कास धरली. ‘सत्य आम्हा म्हणी, नव्हे गबाळाचे धनी’, ‘सत्य – असत्यासी मन केले ग्वाही, जुमानिले नाही बहुमता’ हा लढवय्या बाणा अंगिकारलेल्या वारकर्‍यांचा पोशाख असतो पुरुषांच्या डोईवर टोपी, अंगावर धोतर नाहीतर पायजमा, महिलांच्या डोईवर साडीचा पदर, सहावारी – नऊवार लुगडे, असा मातीतील माणसांचा, शेतात काबाडकष्ट करणार्‍या मातीच्या रंगाशी नाते सांगणार्‍या साध्या माणसांचा हा अखंड हरिनामाचा गजर करत निघालेला भक्तीमार्गातील महासमन्वय असलेला मेळा आहे.

जगातील पहिली पालखी वारी इसवी सन १६८५ च्या सुमारास सुरू झाली. तोपर्यंत केवळ वारकर्‍यांच्या दिंड्या पंढरपूर येथे जात असत. प्रारंभीच्या काळात संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी पालखी वारीची सुरुवात केली. संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीमध्ये ठेवून आषाढी वारी सुरू केल्याचे दाखले मिळाले आहेत. नारायण महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना वारीच्या संरक्षणासाठी सैन्याची तरतूद करण्याची विनंती केल्याचे पुरावे समोर आले आहेत. खर्‍या अर्थाने भक्ती – शक्ती संगम होण्याचा तो परमोच्च प्रसंग होता. आजही हे उदाहरण महाराष्ट्र धर्माच्या उदात्त ध्येयसिद्धीचे उदाहरण म्हणून पाहता येईल. पुढे सन १८३२ मध्ये हैबतबाबा आरफळकर यांच्या पुढाकाराने संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सुरू करण्यात आली. नारायण महाराजांनी लावलेला रोपट्याच्या वेलू आता गगनाला जाऊन भिडला आहे.

ऑनलाइन वारीच्या माध्यमातून २१ व्या शतकाने इंटरनेट वरून वारीच्या दर्शकांना अक्षरश: वेड लावले आहे. आधुनिकतेचा अंगीकार केलेल्या वारकर्‍यांनी जीपीएससह विविध आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पालखी सोहळ्याचे लाईव्ह दर्शन घेण्याची संधी जगभरातील वारकर्‍यांना व अभ्यासकांना उपलब्ध करून दिली आहे. परंपरा आणि आधुनिकता याचा अचूक मेळ साधत पालखी वारी सोहळे समतेच्या वाटेवरील वारकरी शोभून दिसत आहेत. आजही जगभरातील अभ्यासकांना कौतुकाचा व कुतूहलाचा असलेल्या वारीचा हा सोहळा केवळ शब्दांच्या श्रीमंतीतून उभा राहिला, तो माणसांच्या कैक पिढ्यांच्या खांद्यावरील गेरूच्या पताका, टाळ – मृदंगांच्या व अक्षय अभंगाच्या रूपाने अव्याहतपणे जनसागरात प्रवाहित होत आहे, ही समजून घेण्याची एक वेळ अनुभवण्याची गोष्ट आहे.

ज्या ज्या ठिकाणी प्रेम मार्गाने परमेश्वर प्राप्तीचा संदेश दिला जाईल, प्रेमाने मानवमुक्तीचा विचार केला जाईल, त्या त्या ठिकाणी संत साहित्याच्या वारीच्या या विलक्षण भक्ती- प्रेम आणि समतेच्या अखंड प्रवाहाची दखल घ्यावी लागेल. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील विश्वकल्याणाचा विचार वारकरी संप्रदायाने जगाला दिला आहे. शब्दांच्या या श्रीमंतीची माहिती मराठी जनांना आणि मराठी मनांना समृद्ध करण्यासाठी नेहमी शक्ती देत राहोत.


-हर्षल लोहकरे