घरफिचर्समहाराष्ट्र ते दिल्ली व्हाया बिहार!

महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया बिहार!

Subscribe

बिहार निवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस यांची प्रतिमा मोठी केली जात आहे, हे एव्हाना शहा यांच्या लक्षात आलेले आहे. मात्र, या घडीला मोदी यांना आपल्याला दुखावून चालणार नाही, शांतपणे आपल्या दमदार चालीत राहून फडणवीस कुठे कमी पडतात, याचा ते अंदाज घेतील. बिहार निवडणुकीत फडणवीस यांच्या प्रभारी नेतृत्वाखाली भाजपने मोठे यश मिळवल्यास फडणवीस यांचा दिल्ली मुक्काम निश्चित झाला, असे समजावे लागेल. केंद्रात त्यांना अतिशय महत्त्वाचे मंत्रिपद देऊन त्यांचा पुढचा प्रवास ठरवला जाईल आणि पुढच्या साडे तीन चार वर्षांच्या काळात मग फडणवीस यांच्या कारभाराची लिटमस टेस्ट होऊन पंतप्रधानपदाचा मुकुट त्यांना दाखवला जाईल.

गल्ली ते दिल्ली राजकारणात सध्या जोरात धुमशान सुरू आहे. कोरोनाच्या अपयशावर राम मंदिर पायाभरणीचा इलाज करत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आपली प्रतिमा प्रत्यक्षाहून उत्कट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरे सरकारवर सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचे शिंतोडे उडवण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपने हाती घेतला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव केंद्रस्थानी आणत देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी सध्या रान उठवले आहे. हे करण्यामागे त्यांची दोन उद्दिष्टे असून ठाकरे सरकार तर बदनाम करायचे, वर आगामी बिहार निवडणुकीत सुशांत प्रकरणी सहानुभूती मिळवून भाजपला फायदा मिळवून द्यायचा.

यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांना साथ द्यावी, हे दुर्दैव म्हणायला हवे. भाजपच्या नादाला लागून भल्याभल्यांची मती गुंग होते, हेच खरे. बिहारच्या निवडणुकीत मतांची लॉटरी आपल्या बाजूने लागावी, यासाठी हा आटापिटा असून त्यासाठी आपण एका आत्महत्येचे राजकारण करत आहोत, याचा साधा विचार न करण्याची भाजप आणि जनता दल संयुक्त यांनी आपली बुद्धी गहाण ठेवली आहे. विशेष म्हणजे हेच राजकारण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमोशन मिळाले असून ते बिहार निवडणुकीत प्रभारी म्हणून भाजपचे कमळ घेऊन फिरतील. महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचारात ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असा प्रचार करत आणि निकालाआधीच आपले मुख्यमंत्रिपद कायम असल्याचा आक्रस्ताळी प्रचार करत फडणवीस यांनी जनमानसातील आपली प्रतिमा आपल्याच हाताने मलीन केली होती. त्यामुळे आता महाराष्ट्र सोडून फडणवीस पक्ष कामासाठी बिहारला जाणार असल्याने ‘मी पुन्हा जाईन, मी पुन्हा जाईन’, अशी बोचरी टीका समाज माध्यमांवरून त्यांच्यावर केली जात आहे. पण, या निमित्ताने त्यांचा महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया बिहार असा प्रवास सुरू झाला असल्याचे चित्र अधिक गडद झाले आहे.

- Advertisement -

बिहारमध्ये भाजपचे विद्यमान प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस काम पाहणार आहेत. बिहार निवडणूक प्रभारीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सी.पी. ठाकूर यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली.‘देवेंद्र फडणवीस हे एक उत्तम नेते आहेत आणि निवडणुकांमध्ये ते चांगले काम करतात’. अचानक फडणवीस हे राष्ट्रीय पातळीवरील नेते असल्याचा भाजपला साक्षात्कार झाला आहे. मात्र, तो अचानकपणे झालेला नाही. भाजप आणि त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कुठलीही गोष्ट आली मनात म्हणून करत नाहीत. त्यांचे सगळे ठरलेले असते. भविष्यात कोणाला कुठे बसवायचे याची ते पाच वर्षे आधीच तयारी करतात. या सार्‍याचा विचार करता फडणवीस यांचा महाराष्ट्र ते दिल्ली असा प्रवास निश्चित करण्यात आला आहे.

२०२४ साली पुढच्या लोकसभा निवडणुका लागतील तेव्हा आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ७५ वर्षांचे झालेले असतील आणि ७५ वर्षांनंतर या महत्त्वाच्या पदावर त्या व्यक्तीने रहायचे नाही, असा नियमच भाजपने आखून घेतला आहे. मग चार वर्षांनी मोदी पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर नाहीत, तर मग कोण? असा प्रश्न निर्माण होत असताना त्या जागी संघ फडणवीस यांचा चेहरा बघत असल्याची चर्चा आहे. याला मोदी यांचा किती पाठिंबा आहे, हे मोदी यांच्या उजव्या हाताला म्हणजे अमित शहा यांनाही माहीत नाही. परिणामी शहा हे गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ असल्याचे बोलले जाते. मोदीनंतर आपणच पंतप्रधान असा ठाम निर्धार करून वावरणार्‍या शहा यांना हा मोठा धक्का असू शकतो. पण, राजकारणात काही होऊ शकते. होत्याचे नव्हते व्हायला फार वेळ लागत नाही. गुजरातपासून सुरू झालेला मोदी-शहा हा प्रवास २०२४ मध्ये संपून फडणवीस युगाला सुरुवात झालेली असेल…

- Advertisement -

बिहार निवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस यांची प्रतिमा मोठी केली जात आहे, हे एव्हाना शहा यांच्या लक्षात आलेले आहे. मात्र, या घडीला मोदी यांना आपल्याला दुखावून चालणार नाही, शांतपणे आपल्या दमदार चालीत राहून फडणवीस कुठे कमी पडतात, याचा ते अंदाज घेतील. बिहार निवडणुकीत फडणवीस यांच्या प्रभारी नेतृत्वाखाली भाजपने मोठे यश मिळवल्यास फडणवीस यांचा दिल्ली मुक्काम निश्चित झाला, असे समजावे लागेल. केंद्रात त्यांना अतिशय महत्त्वाचे मंत्रिपद देऊन त्यांचा पुढचा प्रवास ठरवला जाईल आणि पुढच्या साडे तीन चार वर्षांच्या काळात मग फडणवीस यांच्या कारभाराची लिटमस टेस्ट होऊन पंतप्रधानपदाचा मुकुट त्यांना दाखवला जाईल. या सार्‍या जर तरच्या गोष्टी असल्या तरी हा एक प्रयोग असेल. असे प्रयोग करत राहणे हे तर संघ आणि भाजपच्या चिंतन शिबिराची खासियत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी २०१२ च्या आसपास या देशाचे पंतप्रधान असतील याची तरी कोणाला खात्री होती.

पण, संघाच्या मनात काही तरी वेगळे सुरू होते. ते लालकृष्ण आडवाणी, सुषमा स्वराज, मुरली मनोहर जोशी, अरुण जेटली, यशवंत सिन्हा, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांना बाजूला ठेवून मोदी यांचा चेहरा पुढे आणताना संघाला एक खमका चेहरा हवा होता. दहा वर्षे भाजपची सत्ता एकहाती चालवणार्‍या नेत्याची गरज होती. मात्र, हा चेहरा संघाच्या अपेक्षेपेक्षा कडक निघाला. या चेहर्‍याने आडवाणीसह स्वराज, जोशी, सिन्हा आणि गडकरी यांना बाजूला सारले. पक्षांतर्गत विरोधकांना मोडीत काढत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. गडकरी यांनाही मोदींनी मोडीत काढले असते, पण गडकरी यांच्या मागे भक्कमपणे उभा असलेला संघ लक्षात घेता गडकरी यांना दूर करण्याची मोदी- शहा यांची डाळ शिजली नाही.

याचवेळी गडकरी यांचा हात धरून राजकारणात मोठे झालेल्या फडणवीस यांनी गेल्या सहा वर्षांत मोदी यांचा सर्वात लाडका नेता हा विश्वास मोठा करत नेला. मोदी यांच्या राजकारणाची मोठी छाप फडणवीस यांच्यावर आहे. आपल्या सहकार्‍यांना फार मोठे न करता प्रसंगी त्यांना खड्यासारखे बाजूला करायचे आणि बाहेरचे सोडा पक्षातील निष्ठावंत लोकांवर विश्वास ठेवायचा नाही, यात फडणवीस वाकबगार झाले आहेत. वेळ प्रसंगी आपल्या पक्षाचा नेता कितीही मोठा असो तो आपल्या वाटेत उभा असेल तर त्याची राजकीय कारकीर्द कायमची संपुष्टात आणायची याचे उत्तम धडे फडणवीस यांनी गिरवले आहेत. आपल्या मंत्रिमंडळातील कोण माणूस कुठे जातो, कोणाला भेटतो याची इत्थंभूत माहिती ठेवत असताना बाहेरच्या पक्षातील लोकांना मोठे करण्याची खुबी फडणवीस शिकले आहेत.

विरोधकांना सत्तेचे लालूच दाखवत त्यांच्या हातून एकेकाळच्या त्यांच्या सहकार्‍यांवर आरोप कसे करून घ्यायचे याचीही ते कला शिकले आहेत आणि हे करताना आपण केलेल्या कामांपेक्षा न केलेल्या कामांचेही श्रेय घेत हा सारा खर्‍या खोट्याचा कारभार आकडेवारी आणि टक्क्यांच्या भाषेत सांगून एक मायाजाल करण्यातही ते वाकबगार झाले आहेत. याआधी कधीही झाला नव्हता एवढा महाराष्ट्राचा विकास हा फक्त आणि फक्त आपल्या पाच वर्षांच्या काळात झाला, हे श्वास न घेता सांगण्याची खुबी त्यांनी इतक्या सहजपणे शिकून घेतलीय की ब्रेथलेस गायन करण्यासाठी प्रसिद्ध असलेला शंकर महादेवन चाट पडलाय म्हणे. तिकडे केंद्रात मोदी यांनी केलेला विकास अजूनही शोधून सापडत नाही आणि इकडे फडणवीस यांच्या विकासाचा थांगपत्ता लागत नाही. एकूणच फडणवीस यांची पावले मोदींच्या पावलावर पडत आहेत. या पावलांचा प्रवास पंतप्रधान पदाच्या खुर्चीपर्यंत जातो का अमित शहा त्यांच्या वाटेत उभे राहतात याचे उत्तर काळच देईल…

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -