फडणवीसांचे सत्याचे बोल!

Devendra Fadnavis
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी सलग पाच वर्ष सत्तेवर राहिलेले मोजकेच नेते आहेत. या नेत्यांमध्ये आता आपले विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश व्हायला हरकत नाही. आपण भूमिपूजनही केलं आणि त्या वास्तूचं उद्घाटनही करण्याची संधी आपल्याला मिळाली, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कन्नमवारनगर इथल्या सुश्रृषा हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचे दोन अर्थ निघतात. एक म्हणजे आजवर मुख्यमंत्री पदाची पाच वर्षें वसंतराव नाईक यांच्याशिवाय एकाही नेत्याला पूर्ण करता आलेली नाहीत. याला आपण एकमेव अपवाद ठरू शकतो, असं त्यांना सांगायचं असावं. दुसरं म्हणजे ज्या पदाचे आपण मानकरी आहोत त्या पदावर आपण असेपर्यंत पक्षात कोणीही दावेदार ठरू शकत नाही, असं त्यांना सूचित करायचं असावं. फडणवीस यांचा कार्यकाळ काहीही सांगत असला तरी महाराष्ट्रात त्यांना आज तरी पर्याय नाही. त्यांच्यामागे आमदारांची किती शक्ती आहे, याची मोजदाज करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यामागे असलेली नरेंद्र मोदी नावाची व्यक्तीच त्यांचा तारणहार आहे. जोवर देशाचा कारभार नरेंद्र मोदींच्या हाती आहे तोवर मुख्यमंत्रिपदी देवेंद्रांशिवाय दुसरं कोणी येण्याचीही शक्यता नाही. अगदी शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असो वा मंत्र्यांचा भ्रष्टाचार असो मुख्यमंत्र्यांचं काहीही बिघडणार नाही. खडसे ओरडून ओरडून दमले. मुख्यमंत्र्यांनीच टाकलेल्या जाळ्यातून ते सहिसलामत सुटले. पण तरी ते मंत्रिमंडळात येऊ शकले नाहीत. ते आले नाहीत म्हणून मुख्यमंत्र्यांना कोणी जाबही विचारला नाही. फडणवीस हे या सत्तेची पाच वर्षं पूर्ण करतील, हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य मानायला या सगळ्या गोष्टी कारण ठरल्या आहेत.
महाराष्ट्रातील एकावर एक अशा दिग्गजांच्या नेतृत्वाखालील सत्तांचं अवलोकन करता कोणाही पंतप्रधानाची इतकी कृपादृष्टी त्या नेत्यांवर नव्हती. अ.र.अंतुले यांचे इंदिरा गांधींबरोबरचे घनिष्ठ संबंध महाराष्ट्रातल्या बहुतांश नेत्यांना ठाऊक होते. पण इतक्याशा सिमेंट घोटाळ्यात इंदिरा त्यांना वाचवू शकल्या नाहीत. वसंतराव नाईक वगळता एकाही नेत्याला महाराष्ट्राच्या सत्तेची पाच वर्षं पूर्ण करता आली नाही. यशवंतराव चव्हाण, सुधाकरराव नाईक ते अगदी शरद पवारांपर्यंत एकाही मुख्यमंत्र्याच्या ते नशिबात नव्हतं. अशात या मुख्यमंत्र्यांना सत्तेचा काळ पूर्ण करता आला तर तो इतिहास ठरणार आहे, यात वाद नाही. पण त्याला कर्तृत्वाची देण म्हणता येणार नाही. त्यामागे वशिल्याचा भला मोठा शिक्का लागलेला आहे. फडणवीस यांच्याहून कितीतरी अनुभवी नेते भाजपमध्ये होते. पण मुख्यमंत्री फडणवीस यांना संधी मिळाली ती केवळ नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादामुळे, हे कोणीही नाकारणार नाही. केंद्रातल्या सत्तेत आणि पक्षाच्या सर्वोच्च पदावर मोदी नसते तर फडणवी3
स कुठे असते? एखाद्या मंत्रालयाचे ते प्रमुख असते. कर्तृत्ववान असलेल्या आणि पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या अनेकांना मागे ठेवत फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपद पडलं. आता ते खाली ठेवायचं असल्यास या सर्वोच्च व्यक्तीची संमती हवीच की. ती संमती देऊन मोदी आणि अमित शहा पायावर दगड मारून घेणार नाहीत. हाडाचा कार्यकर्ता हा कोण्या नेत्याच्या कलेप्रमाणे वागू शकत नाही. ज्यांना हे शक्य नाही त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्राची माळ पडणं हे केवळ स्वप्नवतच.
महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांची देशव्यापी ख्याती होती. ते देशाच्या राजकारणातही सतत चर्चेत असायचे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला असं ज्या यशवंतरावांविषयी तेव्हा बोललं जायचं ते तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनाही पाच वर्षांच्या सत्तेची संधी मिळू शकली नव्हती. देशाच्या सर्वच क्षेत्राची उत्तम जाण असलेल्या शरद पवारांसारख्या नेत्याला या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची पाच वर्षं पूर्ण करता आली नाहीत. अगदी शिवसेनेच्या राजवटीत मनोहर जोशी यांचं काम उत्तमरित्या सुरू असतानाही त्यांनाही मध्येच पद सोडावं लागलं होतं. केवळ बाळासाहेबांच्या राणेहट्टापायी जोशींना पायउतार व्हावं लागलं, हा इतिहास होय. चांगली कामं करूनही या नेत्यांना पाच वर्षांचा काळ पूर्ण करता आला नाही. तिथे फडणवीस आपला काळ पूर्ण करणार असतील तर तो केवळ योगायोग कसा समजावा?
काँग्रेसचे मारोतराव कन्नमवार आणि पी.के.सावंत हे तर अल्पकालीन मुख्यमंत्री ठरले. सावंत तर २५ नोव्हेंबर १९६३ रोजी मुख्यमंत्रिपदी रुजू झाले आणि ४ डिसेंबर १९६३ रोजी पायउतार झाले. शंकरराव चव्हाण हे इंदिरानिष्ठांमधील महत्वाचं नाव. पण त्यांनाही आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. नजिकच्या काळात विलासराव देशमुख यांचा काळ पूर्ण होता होता मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला. हल्ला झालेल्या ताज हॉटेलच्या पाहणी दौऱ्यात त्यांनी आपल्या सोबत रामगोपाल वर्मा यांना नेलं आणि मुख्यमंत्रिपदाचा काळ पूर्ण होता होता त्यांना पायउतार व्हावं लागलं.
ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे काही मुख्यमंत्र्यांचे अपवाद वगळले तर बहुतांश मुख्यमंत्र्यांना कुठलंही कारण न देता पद सोडावं लागलं होतं. त्यांच्यामागे फडणवीसांसारखा वशिला असता तर कदाचित या दिग्गजांपैकी अनेकांची कार्यकाळ पूर्ण करणारा मुख्यमंत्री म्हणून नोंद झाली असती. आता ती मोदींमुळे देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नोंदली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here