घरफिचर्समहात्म्य मेगा भरतीचं!

महात्म्य मेगा भरतीचं!

Subscribe

भाजपमध्ये आलेल्या आयाराम गयारामांच्या मेगा भरतीचं कवित्व संपण्याचं नाव घेत नाही. ज्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला तेच आता शिरजोर होत आहेत, अशा वाढत्या तक्रारी भारतीय जनता पक्षात मुळापासून काम करत असलेल्या कार्यकर्त्यांच्या आहेत. या कार्यकर्त्यांचा समज कसा काढायचा, अशा गंभीर समस्येत भाजप नेतृत्व अडकलं आहे. ही समस्या समजावी इतकी सामान्य राहिलेली नाही. त्याचं कारण ते आयाराम आहेत पदाचे लालासी. ते पद लालसेविना भाजपवासी झालेले नाहीत. सत्ता येतेय म्हटल्यावर गुळाला मुंगळे चिकटावेत तसे सत्तेसाठी अनेकजण भाजपला चिकटले होते. यात या आयारामांचा भरणा मोठा होता. सत्तेची शक्यता नाही असं दिसू लागताच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठ करून अनेक जण भाजपत विराजमान झाले, ते केवळ सत्तेच्या आकांक्षेने. त्यांची ही लालसा एकांगी नव्हती. भाजप नेतृत्वही त्यात गुरफटलं होतं. सत्तेची स्वप्नं चिरकाल राहावित यासाठी ज्या मार्गाचा अवलंब करता येईल तो करण्याची तयारी भाजप नेत्यांची होती. याच्या होणार्‍या परिणामांची तमा बाळगण्याची मात्र त्यांना तेव्हा गरज वाटली नाही.

आयारामांना पक्षात घेतलं तर येणारी सत्ता विरोधकांना नेस्तनाबूत करण्यालाही कारण ठरेल आणि अधिक मजबूत सरकार बनवता येईल असा नेत्यांचा होरा होता. गाठीला गेल्या पाच वर्षांच्या सत्तेचा अनुभव होता. बुक्क्यांचा मार घेत ‘ते’ सत्तेत सहभागी झाले होते. आता बदललेल्या परिस्थितीनुसार सत्ताही हातची गेली आणि आयारामांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली. सत्ता गेली आणि पदांची स्वप्नही. यामुळे ते घायकुतीला आले. पदांशिवाय राजकारण त्यांच्याकरता व्यर्थ असल्यामुळे पदाच्या निमित्ताने पक्ष सोडण्याची त्यांनी मानसिक तयारी करून ठेवल्याचं दिसतं. भाजपच्या मुळावर हे आयाराम कसे आलेत ते यावरून स्पष्ट होतंय. या आयारामांचं मन पक्षाला बेतू लागलं तसं त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू झाले. बौद्धिकं घेऊन त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न झाले. ते तात्कालिक ठरले. पुढे हे प्रयत्न निकामी ठरल्यावर अशा परिस्थितीत करायचं काय, या कोंडीत नेते अडकले. आयारामांचं पुनर्वसन केलं नाही तर पक्षाचं काही खरं नाही, याची जाणीव नेत्यांना होऊ लागली. पदाविना ते पक्षात राहतीलच याचा भरवसा कोणी द्यायला तयार नाही. आता सांभाळायचं कुणाला? अशा द्विधा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे हे नेते अडकले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आयारामांविषयीच्या सुरू असलेल्या चर्चा हेच सांगताहेत. आता यातून सुटका कशी करायची, ही गंभीर समस्या आहे. इकडे आड तिकडे विहीर, अशी नेत्यांची अवस्था झाली आहे. एकमेकांकडे बोट दाखवणं, एकमेकांवर जबाबदारी ढकलणं असला खेळ सुरू आहे. ही जबाबदारी दुसर्‍यावर टाकली की आपण नामानिराळे झालो असं नेत्यांना वाटू लागलं आहे. त्यांचं हे वाटणं स्वाभाविक आहे. कारण पक्षवाढीसाठी या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात यावर त्यांचा गाढा विश्वास आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर तसं जाहीरही करून टाकलं होतं. फडणवीस यांच्या उघड भूमिकेनंतर त्यांचे समर्थकही गप्प बसले आणि विरोधकही.

- Advertisement -

फडणवीसांपुढे जाण्याची एकाही नेत्याची तयारी नाही. सत्ता घालवण्यात फडणवीसच सर्वाधिक जबाबदार असूनही त्यांना आजही कोणी दोष द्यायला तयार नाही. खोटी आणि उसनी अवसानं आणून तुम्हीच आमचे नेते असल्याचा आव पक्षाच्या चिंतन बैठकीत आणण्यात आला. आयारामांच्या पुनर्वसनातही फडणवीसांचाच पुढाकार असल्याचं उघड असूनही त्यांना विचारण्याची एकातही धमक नाही. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी उघडपणे नाव घेऊनही फडणवीस आहेत तिथेच असल्याने यापुढेही काहीच बदल होणे नाही, असा मेसेज आता सर्वदूर पोहोचला आहे. याने संकट अधिक गहिरं बनलं आहे. कारवाईच्या नावाखाली जे काही घडतं ती सगळी थापेबाजी होय, हे आता कार्यकर्त्यांनाही कळायला लागलं आहे. या खेळात समाजमाध्यमांवर फडणवीसांच्या नावाने होत असलेली चर्चा पाहिली की कोणताही सच्चा कार्यकर्ता पक्षात राहण्याचा कसा विचार करेल, हाच प्रश्न आहे.

आजवर सर्वसाधारण कार्यकर्ता आयारामांबाबत चर्चा करायचा. ज्यांचा पक्षाशी फारसा संबंध नव्हता त्यांच्यासाठी लाल गालिचा आणि सतरंज्या अंथरणार्‍या कार्यकर्त्याने तेच ते काम करायचं. याचा कार्यकर्ते स्वतःच विचार करू लागले होते. हा एकट्या आयाराम नेत्याचा विषय नव्हता, त्याच्या बरोबर येणार्‍या कार्यकर्त्यांनाही पक्षात मूळ कार्यकर्त्यापेक्षा अधिक सन्मान मिळू लागल्याने पक्षात मुळापासूनच नाराजीने जोर धरला होता. तो दिसत असूनही नेत्यांनी दुर्लक्ष केलं. यामागेही नेत्यांचं राजकारण होतं. स्वतःची किंमत त्यांना आयारामांच्या मदतीने वाढवायची होती. कोल्हापूर असेल वा नगर आयाराम नेत्यांच्या जीवावर नेत्यांनी आपल्या चुली पेटवल्या. आता सत्ता गेल्यावर त्याची किंमत त्यांना मोजावी लागते आहे. सत्ता होती तेव्हा फोडाफोडीची मजा लुटणारे सत्ता जाताच कफल्लक बनले. कोल्हापूर या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची अवस्था तर हाती करोट्यासारखी झाली. शरद पवारांचं घर उखडून टाकण्याची भाषा त्यांच्या विधानसभा प्रचारातच घशात गेली होती. तरी ते बरळतच होते. त्याचीही किंमत त्यांना मोजावी लागली.

- Advertisement -

सत्ता नसल्याने मत्तेचा प्रश्न निर्माण झाला. सत्तेने लाचार झालेले आणि सत्तेसाठी हापापलेले असे सगळेच घायकुतीला आले. यातच विरोधी पक्ष नेत्याची माळ आयाराम प्रवीण दरेकर यांच्या गळ्यात टाकण्यात आली. हा तर निष्ठावंतांना धक्काच होता. नव्हे तो निष्ठावंतांचा अवमान होता. जो तो बोलू लागला. पण तरीही दखल नाही. ज्यांना अपेक्षा होती ते सगळे बेदखल झाले. आता तर ज्यांनी आयारामांच्या प्रवेशाचा रथ ओढला त्यातल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने भाजपच्या एकूणच धोरणाविषयी शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे. इतर राजकीय पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये आल्यामुळे भाजपाच्या मूळ संस्कृतीला धोका निर्माण झाल्याचं मत चंद्रकांत पाटील व्यक्त करू लागले आहेत. त्यांच्या या मतावर टीका होताच सारवासारव करून या विधानाविषयी पाटलांनी खुलाशाची राळ उठवली. केलेला खुलासा कोणी फारसा मनावर घेतला नाही. प्रदेशाध्यक्ष असूनही ते कोणावरही काहीही कारवाई करू शकत नाही यावर सार्‍यांचं एकमत होतं.

सरकार स्थापन न झाल्याने मंत्रिपद मिळवण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे ठरले आहे, अशी परिस्थिती असतानाच चंद्रकांत पाटील यांनी संस्कृतीच्या बाता मारायला केलेली सुरुवात आयाराम नेत्यांना पचेल असं नाही. भाजपची संस्कृती वेगळी आहे तर इतर पक्षांमधून भाजपमध्ये आलेले नेते विशिष्ट घराण्याशी संबंधित असल्याने त्यांची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे त्यांना भाजपच्या संस्कृतीशी जुळवून घेण्यात वेळ लागेल, असं निमित्त करणारे चंद्रकांत पाटील आता सारवासारव करत आहेत. ते पाहुण्याच्या अंगावरच साप सोडत असल्याचा ठपका हे नेते ठेवू लागले आहेत.

भाजपमध्ये आलेले नेते सध्या पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये मनापासून सहभागी होताना दिसत नाहीत. पक्षाने केलेल्या आंदोलनात किंवा पक्षाचे स्थानिक कार्यक्रम या ठिकाणी हे नेते उपचार म्हणून उपस्थित राहतात किंवा सरळ अनुपस्थित राहतात. सर्वात जास्त जागा मिळूनही भाजप सरकार स्थापन करण्यात असमर्थ ठरल्याने या नेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे, असे असताना त्यांना समजून घेण्याऐवजी त्यांच्या पक्षातील आगमनाबाबत शंका उपस्थित करणे चुकीचे ठरणार आहे. प्रदेशाध्यक्ष पदावरील व्यक्तीने असे विधान केल्याने हे पक्षाचे अधिकृत धोरण आहे काय, असा प्रश्न आता विचारला जाऊ शकतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काही नेत्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यापैकी अब्दुल सत्तार सारख्या नेत्यांना आता मंत्रिपदाची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे भाजपमध्ये आलेल्या इतर नेत्यांमध्ये नाराजी वाढली नसल्यास नवलच. खरे तर सध्या विरोधी बाकांवर विरोधी पक्षाचे काम करीत असताना भाजपला आपल्या सर्व आमदारांशी जुळवून घेण्याचे काम करावे लागणार आहे.

मेगा भरतीमध्ये भाजपच्या संस्कृतीला धक्का पोहोचल्याचे चंद्रकांत पाटलांचे मत हा आता कौशल्याचा भाग राहिलेला नाही. ते सगळ्यांनाच जपायला निघाले आहेत. संस्कृतीच्या नावाखाली ते आयारामांना दुखवू शकणार नाहीत. राज्याची सत्ता हातची गेल्याने त्याचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसू लागले आहेत. शिल्लक असलेल्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाला या नेत्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे हे नेते नाराज होणार नाहीत याचीही काळजी घ्यायची आहे. आपण भाजपमध्ये गेलो हीच आपली चूक झाली, असे या नेत्यांना वाटले आणि त्यांनी दुसरा कोणता विचार सुरू केला तर तो भाजपसाठी मोठा धक्का असेल या धक्क्यातून पक्ष बाहेर येणार नाही हे उघड सत्य मानल्याविना भाजपपुढे पर्याय नाही.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -