घरफिचर्समुंबईचा आरसा

मुंबईचा आरसा

Subscribe

‘माहीमची खाडी’ ही कादंबरी मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिली. नोकरीच्या निमित्ताने मधुभाई मुंबईत आले. त्यांना सांताक्रूझ येथे एका चाळीत भाड्यानं जागा मिळाली. तिथे जाता येतानाचा रस्ता झोपडपट्ट्यांमधून जात असे. संवेदनशील मधुभाई तिथलं जीवन दररोज पाहात होते. त्याची कलात्म अभिव्यक्ती त्यांनी त्या कादंबरीत केली आहे. ‘माहीमची खाडी’ लिहिली गेली त्यानंतर मुंबई शहरातील वातावरण, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, विद्युतीकरण, रस्ते, इमारती, बागा यांच्या संबंधात होत गेलेला विकास लक्षणीय म्हणायला हवा. त्यानंतर मुंबईत उसळलेल्या दंगली, गिरणी कामगारांचा संप, बाँबस्फोटांच्या मालिका, रॅडिअंट, ताज हॉटेलवर झालेला हल्ला, लोकल्समधील बाँबस्फोट यामुळे निर्माण होणारे प्रश्न पुढचे आहेत. त्यांचं चित्रण करणारं लेखनही झालं आहे.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि देशभरातील सारे विकासाचे प्रकल्प सुरू झाले. असे असले तरी 1 मे 1९60 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि महाराष्ट्रात आजवर रखडलेल्या प्रकल्पांना आणि विविध क्षेत्रांना गती मिळाली. नवनिर्मित महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे स्वत: साहित्य आणि कलाप्रेमी रसिक होते. कलावंतांचा आणि विद्वानांचा सहवास त्यांना प्रिय होता. ते सतत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ग. दि. माडगूळकर यांच्या सारख्यांच्या सहवासात राहाणं पसंत करीत. त्यांनीच साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली आणि तर्कतीर्थांना त्याचं अध्यक्षपद दिलं. साहित्यिकांचा आणि कलावंतांचा उचित सन्मान व्हावा म्हणून त्यांनी उत्कृष्ठ ग्रंथांना पुरस्कार देण्याचे धोरण आखले. उपेक्षित आणि वार्धक्यात जराजर्जर असणार्‍या कलावंतांसाठी मानधन सुरू केले.

मुंबई शहर तेव्हा फार विकसित झालेले नव्हते. वांद्य्रापलिकडे असलेल्या उपनगरांना सिमेंटचा विळखा पडलेला नव्हता. अगदी गोरेगाव, मालाड, बोरिवलीपर्यंत डोंगर आणि वाड्या होत्या. पाडे होते. शिवाय अरबीसमुद्राची किनार तर पार गुजराथपर्यंत गेलेली होती. ठिकठिकाणी गाई-म्हशींचे गोठे असायचे आणि त्यांच्या आसपास उत्तर प्रदेश, बिहार, बंगालमधील लोक दाटीवाटीने राह्यचे. मुंबईत पोट भरायला कोणीही यावं. ती त्याला मदतच करते असा संदेश तेव्हा देशभर पोहोचलेला असायचा आणि विविध प्रकारच्या कामात गती असलेली माणसं इथं येत होती.

- Advertisement -

1965-1970 पर्यंत मुंबईची वाढ प्रमाणातच होती. माहीम-वांद्य्रापासून आत घुसलेली खाडी थेट कुर्ल्याला येऊन भिडलेली होती आणि तिच्या आसपास दलदल असायची. तिच्यात कांदळवन उभं असायचं. संध्याकाळी तिथं डास आणि चिटलांचा वावर असायचा. यशवंतरावांच्या कृपेनं अनंत काणेकर आणि इतरांनी प्लॉट मिळवून साहित्य सहवास हे गृहसंकुल निर्माण केले. तिथले ब्लॉक्स डासांचा उपद्रव असल्याने सुरुवातीला जात नव्हते ही वस्तुस्थिती होती.

मुंबईत नानाविध प्रकारचे लहान-मोठे उद्योग असायचे. त्यासाठी तज्ज्ञ आणि बीनकुशल माणसांची गरज असे. शिवाय मराठी माणसाला मुळातच कष्ट करण्याची सवय नसायची. मासे विकणं, फळं विकणं, पिठाच्या गिरण्या चालवणं, दूधव्यवसाय करणं, केशकर्तन करणं, बूट पॉलिश करणं अशा प्रकारची कामं तो कधीच करीत नसे. उत्तरेकडून येणारी माणसं जगण्यासाठी काहीही करायला तयार होत. त्याचबरोबर एकजण आला आणि त्याचं थोडंसं बस्तान बसलं की त्याच्यामागून क्रमाक्रमानं कुटुंब येई. मुंबई त्यांना आधार देतसे.

- Advertisement -

माहीम कॉजवे पलिकडल्या दलदलीच्या भागात या गरीब माणसांनी झोपड्या बांधून राहायला सुरूवात केली आणि माणसं वाढू लागली तशा झोपड्याही. मग तिथे दादालोक आले. अनधिकृत झोपड्या बांधल्या जाऊ लागल्या. भिन्न धर्मीय, भिन्न भाषिक, भिन्न प्रवृत्तीची माणसं येऊ लागली. एक वेगळा समाज तिथं निर्माण झाला. कायदा आणि सुव्यवस्थेचे नवे प्रश्न उभे राहिले.

1960 पूर्वी मुंबईत ‘नवाकाळ’, ‘लोकसत्ता’, ‘प्रभात’ अशी दैनिकं होती. त्यापैकी ‘प्रभात’ हे ‘मौज प्रकाशना’चे दैनिक होते. त्या वृत्तपत्रात जयवंत दळवी यांनी एम. ए. झाल्या झाल्या वार्ताहर म्हणून काम केले. बातम्या गोळा करण्यासाठी मुंबईतील गल्ल्यागल्ल्यांतून त्यांना भ्रमंती करावी लागली. तेव्हा मुंबईचे त्यांना जे दर्शन घडले ते ‘चक्र’ कादंबरीत चित्रीत झाले. ‘वैतागवाडी’त भाऊ पाध्ये यांनी पाड्यावरील वस्तीचं चित्रण केलं. ‘माहीमच्या झोपड्या’ शीर्षकाची कविता वसंतराव अवसरे या कवींनी लिहिली. ‘माहीमची खाडी’ ही कादंबरी मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिली.

नोकरीच्या निमित्ताने मधुभाई मुंबईत आले. त्यांना सांताक्रूझ येथे एका चाळीत भाड्यानं जागा मिळाली. तिथे जाता येतानाचा रस्ता झोपडपट्ट्यांमधून जात असे. संवेदनशील मधुभाई तिथलं जीवन दररोज पाहात होते. त्याची कलात्म अभिव्यक्ती त्यांनी त्या कादंबरीत केली आहे.

मुंबईमधला कचरा, टाकावू वस्तू, टँकर्सचं धुणं तिथंच चाले. त्यातील तेलांचे ओंगळ तिथल्या डबक्यांतील आणि खाडीतील पाण्यावर पडत, मेलेली जनावरं आणून टाकली जात. त्यांची दुर्गंधी वातावरणात पसरे. झोपडपट्टीत संडास नसत. मुलं, मोठी माणसं उघड्यावर बसत. वातावरणात रोगराई पसरे.

त्या काळात बिल्डर लॉबी नव्हती, पण शहराच्या विस्तारासाठी बांधकामं होऊ लागली. टोलेजंग टॉवर्स उभे राहू लागले. सिमेंटचा तुटवडा पडू लागला. त्यातच पुढे अंतुलेंच्या काळात ‘प्रतिभा प्रतिष्ठान’ प्रकरण उद्भवले.

जुन्या काळात घर घ्यायला कर्ज पुरवणार्‍या संस्था नव्हत्या. पण एचडीएफसीसारख्या वित्त पुरवठा करणार्‍या संस्था आल्या आणि घरासाठी कर्ज घेणं सुकर होऊ लागलं. मुंबई महानगराचा विस्तार बोरिवली-दहिसरपर्यंत पोहोचला.

जमीन संपादण्यासाठी खाड्यांमध्ये भराव टाकण्यात येऊ लागले. झोपडपट्ट्या हटवण्यात येऊ लागल्या. त्यासाठी कायद्याचा, बळाचा वापर करण्यात येऊ लागला. वांद्रे येथे हिर्‍यांचे मार्केट सुरू झाले. पलिकडे सरकारी वसाहती, एम आय टी, लीलावती हॉस्पिटल आणि अन्य कार्यालये सुरू झाली. उच्चभ्रू वर्गाच्या वसाहती आल्या आणि त्यांची वर्दळ वाढली. झोपडपट्ट्या संकोचू लागल्या.

झोपडपट्ट्याही पूर्वीसारख्या बकाल, दरिद्री आणि अनाचार, अत्याचारांचे आगर म्हणून राहिल्या नाहीत. तिथं आरोग्यसेवा आल्या, पिण्याच्या पाण्याची, संडासाची, आरोग्यतपासणीची, प्राथमिक शाळांची सोय होऊ लागली. वाहतुकीची साधने वाढली.

त्याच बरोबर अपुर्‍या जागेत लहानसहान उद्योगधंदे वाढले, माणसांची गर्दी वाढली.

‘माहीमची खाडी’ लिहिली गेली त्यानंतर मुंबई शहरातील वातावरण, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, विद्युतीकरण, रस्ते, इमारती, बागा यांच्या संबंधात होत गेलेला विकास लक्षणीय म्हणायला हवा. त्यानंतर मुंबईत उसळलेल्या दंगली, गिरणी कामगारांचा संप, बाँबस्फोटांच्या मालिका, रॅडिअंट, ताज हॉटेलवर झालेला हल्ला, लोकल्समधील बाँबस्फोट यामुळे निर्माण होणारे प्रश्न पुढचे आहेत. त्यांचं चित्रण करणारं लेखनही झालं आहे.

पण तरीही ‘माहीमच्या खाडी’मधील चित्रणात मधु मंगेश कर्णिक यांनी दाखवलेली कल्पकता, वस्तुनिष्ठता निस्संशय कौतुकास्पद होती, असेच म्हणावे लागते.

-अनंत देशमुख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -