लॉकडाऊन : मी सध्या काय करतोय ?

‘दमलेल्या बाबाची कहाणी नवी..’ हे गाणं ऐकताना यापूर्वी प्रत्येकवेळी नित्यनेमाने डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसून घ्यायचो. गाणं ऐकतानाच ठरवून टाकायचो की आता मुलीला वेळ द्यायचा. पण तेही कामाच्या धबाडगाड्यात राहून जायचं. आता माझ्या लेकी सोबत मस्त वेळ घालवायला मिळतोय. कॅरम, पत्ते हे सारं चालू आहे. त्यांच्या जन्मापासून कधी एवढा वेळ देऊ शकलो नव्हतो आता मात्र पिल्ल एकदम जवळ असतात. बाकी वेळ मोदी भक्त आणि विरोधक यांच्यातील वाद सोशल मीडियावर चवीनं वाचतोय. चीनने कसे जगाला अडचणीत आणले हे देखील वाचून एन्जॉय करतोय.

Nashik

करोनाचा पहिला शिकार ठरणारी कोणती इंडस्ट्री असेल तर ती म्हणजे टुरिझम. जानेवारीच्यामध्या पासूनच हळू हळू काम कमी होत गेले तशी लोकांची चिंता वाढत गेली. बुकींग कमी झाल्या. झालेल्या बुकींग कॅन्सल होत होत्या…. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत हा विळखा वाढत गेला आणि मार्च एंडला पूर्ण वेळ बेकारीच्या अवस्थेत आलो. आता तर मागचे ५ ते ६ दिवस तर स्वतःला लॉकडाऊन करून घेतले आहे. मला आठवते तसे मी हा पर्यटनाचा व्यवसाय चालू केल्यापासून सलग दोन दिवस बिनकामाचा कधी राहिलो नाही. अशी वेळ यापूर्वी कधीच आली नाही.
खुप गोष्टी करायच्या राहून गेल्या होत्या त्या या आठ दिवसात करायला घेतल्या आहेत. अगदी साधी गोष्ट त्याचे तुम्हाला हसू येईल पण मला दाढी वाढवायची होती पण सवयी मुळे ती इच्छा पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे मी आधीच ठरवून टाकले, ऑफिसला ज्या दिवशी जायचे तेव्हाच दाढी काढेल. आधी जॉब करत असताना पुस्तके वाचायची आणि संग्रह करायची सवय होती. पण मोबाईल आणि व्यवसायामुळे ते राहून जात होते. या आठ दिवसांत दोन पुस्तके वाचून काढली. काही सिनेमे बघायचे आहेत ते व बरीच पुस्तके शॉर्ट लिस्ट करून ठेवली आहेत. रोज दुपारी मोबाईलवर ‘पुलं’चे ऑडियो स्वरुपातील कथा, ललित एक तास ऐकायचे. एकंदर या सगळ्या आयुष्यात राहून गेलेल्या एक एक गोष्टी करताना मजा येते आहे.
बायकोचे नेहमीप्रमाणे वर्क फ्रॉम होम चालू आहे. त्यामुळे ती बिझी असते. किमान एकदा तरी जमेल तशी स्वयंपाकाला मदत करायची आहे. पण ती जमू देणार नाही. तसे मला फार कुकिंगची आवड पण नाहीच म्हणा. पण तरीही प्रयत्न करणार. कामवाली बाई पण येत नाही. मग कामाचा लोड वाटून घेताना झाडू मारणे चालू आहे. आता कॅटरिना कैफ पण भांडी घासते. त्यामुळे हे काम आपल्याला पण नक्कीच जमेल याचा आत्मविश्वास वाढलाय. माझ्या ओळखीचे एक कपल आहे, त्यांना तर घरी रहायचे पण सुख नाही. कारण तो पोलिसांत आहे. वहिनी आरोग्य विभागात काम करतात. या भयमुक्त वातावरणात मुल बाहेर येऊ नयेत म्हणून दाराला बाहेरून कूलुप लावून जात आहेत. लॉकडाऊनमुळे आता एकवीस दिवसाचा वेळ मिळाला आहे. थोडा डाएट वर काम करावे असा विचार करतोय. नाही तर एकवीस दिवसात एकवीस किलोने वाढायला वेळ नाही लागणार. ‘दमलेल्या बाबाची कहाणी नवी..’ हे गाणं ऐकताना प्रत्येकवेळी नित्यनेमाने डोळ्याच्या ओलावलेल्या कडा पुसून घ्यायचो. गाणं ऐकतानाच ठरवून टाकायचो की आता मुलीला वेळ द्यायचा. पण तेही कामाच्या धबाडगाड्यात राहून जायचं. आता माझ्या लेकी सोबत मस्त वेळ घालवायला मिळतोय. कॅरम , पत्ते हे सारं चालू आहे. त्यांच्या जन्मापासून कधी एवढा वेळ देऊ शकलो नव्हतो आता मात्र पिल्ल एकदम जवळ असतात. त्यांच्या कडून मोबाईल वर गेम खेळायला शिकतोय. जे मी आजवर कधीच केलं नव्हते. तिच्या सोबत घालवलेला वेळ म्हणजे स्वर्ग सुखच!
बाकी वेळ मोदी भक्त आणि विरोधक यांच्यातील वाद सोशल मीडियावर चवीनं वाचतोय. चीनने कसे जगाला अडचणीत आणले हे देखील वाचून एन्जॉय करतोय. पुढच्या काही दिवसात एक नवीन ईआरपी सॉफ्टवेअरचे ऑनलाईन ट्रेनिंग घेणार आहे आणि जास्तीत जास्त डेटा कसा अपलोड करता येईल ते पाहीन. येणारा काळ कठीण तर असेलच पण या कोरोना व्हायरसच्या भीतीने लोकांना सुट्टी वर जाता आले नाही त्यांना भयमुक्त करणार्‍या सहली पुन्हा काढायच्या आहेत. पर्यटनाचा आनंद फक्त पर्यटनातूनच मिळतो त्याला ऑप्शन नाही थोडा वेळ जाईल पण लोक भयमुक्त होऊन जगभर फिरतील यात शंका नाही.उडी लांब मारायची असेल तर चार पाऊल मागे यावं लागतं. तसा या वेळेचा उपयोग करून एकदम फ्रेश वातावरणात हे दिवस मी घालवतोय. तुम्ही पण असेच मजेत रहा…. राहून गेलेल्या गोष्टी करून घ्या…. घरातच रहा…. स्वतःची काळजी घ्या कुटुंबीयांची घ्या पर्यायाने दुसर्‍यांची घ्या. प्रत्येक गोष्ट सकारात्मकपणे घेतली तर निराशा दूर होऊन आशेची नवीन पालवी नक्की फुटेल…

दत्ता भालेराव, नाशिक.
(लेखक ट्रॅव्हल एजंट असोसिएशन नाशिकचे माजी अध्यक्ष आहेत)