घरफिचर्सजिद्दीच्या लेकी : मंदा, लता, ममता

जिद्दीच्या लेकी : मंदा, लता, ममता

Subscribe

अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील काही महिला बियाणं कंपनीच्या प्रचाराला बळी न पडता गावरान बियाणं राखून, त्याचे जतन करीत आहेत. गोंदियातील मंदा गावळकर, पिंपळगाव माथा येथील लताताई सावंत, धामणवणच्या शकुताई त्र्यंबक धराडे, देवगावच्या ममताताई भांगरे या व अशा अनेक महिला या शेतीचा आशेचा किरण बनून मोठ्या वादळाशी लढत आहेत. या निऋतिच्या लेकींचे कार्य कौतुकस्पद आहे. यातील मंदा गावळकर यांच्या कामाची माहिती आपण घेणार आहोत.

सध्या बाजारू संकरित बियाणांचा बोलबाला आहे. हायब्रीड बियाणे, जनुकीय बदल केलेली बियाणे कंपन्यांनी सत्तेतील हितसंबंध, अनेक अतिरेकी आमिष दाखविणारी जाहिराती व प्रचारतंत्र वापरून ‘हायब्रीड बियाणं हेच कसं फायद्याचं व राष्ट्रीय हिताची आहेत, हे लोकांच्या गळी उतरविण्यात यशस्वी झाली आहेत. अनेकजण निव्वळ या प्रचारी भूमिकेचे बळी ठरलेत इतकेच नाही, तर ते स्वतः या कंपन्यांची भूमिका घेऊन अनेक ठिकाणी मांडत असतात. देशातील अनेक गोरगरिबांचे पोट भरायची असतील तर ही हायब्रीड बियाणांना पर्याय नसल्याचे सांगत असतात. पण खरा प्रश्न हा आहे की, इथला शतकरी आपलं जुनं सोन्यासारखं बियाणं सोडून देऊन या कंपन्यांच्या प्रचाराला कसे काय बळी पडला.

हा प्रश्न बळी पाताळी कसा धाडला याच्या इतकाच महत्वाचा आहे. इथल्या शेतकर्‍याकडील त्याचं स्वतःच बियाणं काढून घेणं हेही बळीला पाताळी धाडण्याइतकेच नियोजनबद्ध केलं जात आहे. शेतकर्‍यांचा राजा, बळीराजा पाताळी धाडला तरी तो अजून शेतकर्‍याकडे असलेल्या गावठी बियाणाच्या रुपात जिवंत आहे. त्या बळीला परत कायमचा पाताळी धाडण्याचा हा इथल्या शासक जाती वर्गाचा दुसरा प्रयत्न सुरू आहे. वेळीच शेतकरी सावध झाला नाही तर आपलं बियाणं तो गमवून बसेल. बियाणं गमावणं ही किती गंभीर चूक असणार आहे ही बाब अजून तरी आपल्याकडे कुणाच्या ध्यानात आलेली नाही.

- Advertisement -

शेती ज्यांच्याकडे आहे तो शेतकरी असतो का? पाणी नसलं तर शेती कसली करणार? शेती आहे व पाणीही आहे, मात्र बियाणंच नाही तेव्हा शेती कशी आणि कशाची करणार? आता सारा प्रयत्न शेतकर्‍यांकडून त्यांची बियाणे काढून घेण्यासाठी आहेत. शेतीत पेरलेलं हायब्रीड बियाणं धान्य म्हणून खाता तर येईल, मात्र ते शेतीत पेरता नाही येणार. असे दिवस दूर नाहीत, जेव्हा संपूर्ण शेतकरी हा बियाणं कंपनीकडे रांगा लाऊन ते देतील त्या वेळी, देतील त्या किंमतीला घेतील. मग या कंपन्या आपल्या सोयीनुसार नियम व अटी ठरवतील. पिकवलेला माल कुठं विकायचा, कुणाला विकायचा याचा पण निर्णय ते स्वतः घेतील.

अनेकदा राज्य संस्थेकडे, शासन संस्थेकडे एक आशेचा किरण म्हणून पाहिलं जातं. शेतकर्‍यावर जेव्हा संकट ओढवेल, त्याला बियाणे कंपन्या कोंडीत पकडतील तेव्हा शासन धावून येईल, त्याची बाजू घेईल. मात्र याच्या शक्यता मावळल्या सारखे वाटत आहे. उलट राज्य संस्था ही या बियाणे कंपन्यांना पूरक धोरण बनवून त्यांचेच रक्षण करताना दिसत आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर सर्वात जास्त कोडी शेतकर्‍यांची होणार आहे. नावानी वेगवेगळी असलेली राजकीय पक्ष, सत्तधारी व विरोधक या सर्वांकडे त्यांनी घेतलेल्या शेतकर्‍याबद्दलच्या भूमिका, त्यांनी बनविलेले धोरण यावरून जोपर्यंत वेगळं करीत नाही तोपर्यंत या कोंडीतून सुटणे अवघड आहे.

- Advertisement -

निऋतिच्या लेकी शेतीचा एक आशेचा किरण
अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील काही महिला बियाणं कंपनीच्या प्रचाराला बळी न पडता गावरान बियाणं राखून, त्याचे जतन करीत आहेत. पिंपळगाव माथा येथील लताताई सावंत, धामणवणच्या शकुताई त्र्यंबक धराडे, देवगावच्या ममताताई भांगरे या व अशा अनेक महिला या शेतीचा आशेचा किरण बनून मोठ्या वादळाशी लढत आहेत. या निऋतिच्या लेकीबद्दल एक एक करून सवडीने आपण समजून घेऊयाच. आज भंडारा जिल्ह्याच्या एका अशाच लेकीच्या जिद्दीची कहाणी जाणून घेऊ.

मंदा गावळकर या एका छोट्याशा शेतकरी कुटुंबातील 55 वर्षीय महिला. त्या गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खैरी या गावात राहतात. वडिलांकडे शंभर एकर शेती होती. शेतीला पूरक भरपूर गुरं ढोरं होती. त्यामुळे मुबलक शेणखत मिळायचे. मंदाताई यांनी लग्नापूर्वी त्यांचे वडील कुसनरावबापू केवलरामबापू राऊत यांच्याकडे हट्ट करून दोन एकर शेती स्वतः कसण्यासाठी घेतली होती. त्यामध्ये त्या वेगवेगळे प्रयोग करीत राहायच्या. तेव्हा रासायनिक खते आजच्या इतकी प्रचलित नव्हती. वेगवेगळ्या खतांच्या कंपन्यांकडून गावोगावी रासायनिक खत मोफत वाटले जायचे. मोफत मिळणार्‍या खतांचा मोह टाळून मंदाताई सेंद्रीय शेतीचे प्रयोग करीत होत्या. हाच छंद, आवड मंदाताईनी लग्नानंतरही कायम ठेवला. यातून त्यांनी जवळपास वीसहून अधिक वेगवेगळ्या गावराण भाताचे वाण त्यांच्या शेतीमध्ये जोपासले आहेत. भातासोबतच वाल, वांगी, तमाटे, मिरची, लाख, लाखोळी जवस, वेगवेगळ्या रानभाज्या, रानफुलं यांची जोपासना ते करतात. गेल्या चाळीस वर्षापासून त्यांनी पारंपरिक मिरची बियाणं जपून ठेवलं आहे. बाजारातून कधीच मिरचीचे बी आणत नाहीत.

गावातील अनेक लोकांना या मिरचीची बियाणं ते उपलब्ध करून देतात. मंदाताई अंबाडी व पळस फुलापासून उत्तम सरबत बनवतात. मोहाच्या फुलाचे वेगवेगळे चविष्ट खाद्य पदार्थ तयार करतात. मंदाताईंच्या या सर्व कामास त्यांचे पती केशव गावळकर यांचा पाठिंबा आहे. ताईंच्या प्रत्येक कामात ते आवडीने सहभाग घेतात. विविध स्थानिक परंपरागत वाण टिकवून ठेव्याच्या कामात ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा या संस्थेची मंदाताई यांना वेगवेगळ्या स्वरुपात मदत मिळत असते. राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग समर्थित महाराष्ट्र जनुक कोश या कार्यक्रमामध्ये मंदाताई करीत असलेल्या कामाला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे.

खैरी गावात त्यांच्या पुढाकारातून ‘सुशीला महिला बचत गटाची’ स्थापना करण्यात आली आहे. या गटाच्या माध्यमातून गावामध्ये सेंद्रीय शेती व गावराण वाण यांचे जतन, त्यांचे वेगवेगळे पदार्थ बनवून विक्री व गावपरिसरात लोकजागृतीची कामे केली जातात.

जैवविविधता टिकविणे, विषमुक्त अन्न तयार करणे, जैविक खत व औषधी तयार करणे, नैसर्गिक संपत्ती जोपासणे, नव्या पिढीला शेतीकडे वळवून तयार करणे व प्रशिक्षण देणे अशा अनेक भूमिका मंदाताई आणि त्यांचा समूह पार पाडत आहेत.

मंदा गावळकर यांनी आपल्या शेतीत जोपासलेले भाताचे वाण व त्यांचे गुण-विशेष
अ.क्र. भाताची नावे कालावधी (दिवस) वैशिष्ठ्ये
1. काकडसार 90 ते 100 लाह्या चांगले होतात, चवीला चांगले आहेत.
2. कलिंगड 90 ते 100 कमी पाण्यावर येते
3. दूदेसार 130 ते 135 चवदार आहे, पोहो आणि मूरमुरे चांगले होतात.
4. सुशीला 125 ते 130 बारीक व सुगंधी असते.
5. कामिनी 125 ते 130 जुनं बियाणं, चवदार व सुगंधी
6. जांभळा 100 ते 110 पानं जांभळी असतात, कमी ऊंच, पान सर्व एकसारखी असतात, लाह्या करता येतात.
7. हिरानकी 130 ते 135 बारीक, सुगंधी, चवदार, जास्त उत्पन्न, खीर बनवायला उत्तम, एकरी 9 ते 10 खंडी उत्पन्न. 30 सेमी लांब लोंबी असते.
8. लीलावती 130 ते 135 बारीक, खाण्यास चांगली
9. लुचई सफेद 75 खाण्यास उत्तम, कमी पावसात येते, कापसासारखे मऊ, शिळा भात चांगला लागतो.
10. तुलसी राहुल 125 ते 130 चवदार, सुगंधी
11. पिवळी लुचई 130 खाण्यास सगळ्यात चांगला भात
12. कविराज 130 ते 135 भात मऊ होतो, पोहो केला जातो, भात जाड होतो म्हणून खाल्ला जात नाही.
13. खुशी 2015 मध्ये हा वाण त्यांनी शोधला आहे आणि आपल्या भाचीचे नाव या वाणाला दिले आहे. हा भात बारीक, कमी कालावधीत येतो, सुगंधी व चवदार आहे
14. दुबराज 125 ते 130 सुगंधी, चवदार, उंच वाढतो, याला चन्नोर म्हणून विकला जातो.
15. गुरुमुखीया 100 जुना वाण, ऊंच वाढतो, लाह्या व पोहे साठी वापर
16. पिटरीस 75 जुना वाण
17. नवीन-1 शेवटचे दोन वाण त्यांनी 2016 मध्ये निवड पद्धतीने शोधले आहेत, यांचे बारसे घालणे बाकी आहे
18. नवीन-2 भाताशिवाय त्यांनी काही पिकांचे वाण व रानभाज्या त्यांच्याकडे जोपासल्या आहेत.

वाल: पोपटी(पोपटाच्या आकाराचा), बुटका, लांबट, चौधरी (चार धारा असलेला), हिरवा, पांढरा
वांगी : मांडू, गुलाबी, पांढरा, निळसर,
टमाटे : टिचकी, भेद्री
रानभाजी : कड्डू, तरोटा, लेंगळा, वराकल्या, शेरडिरे, शिलारी, काटेभाजी, कुडवा, माढ, अंबाळी, उंदीरकाण, शेंगा, कोलारी, खापरखटी, पातूर, कोचई, मशाल, कर्मू अशा रानभाज्यांचे संकलन करुन नागरिकांना माहिती देतात व प्रशिक्षण देतात.
रानफुले: हेटी, बाहवा, पिंकफर, तुटूंब, डोजबी, कुरमुळी, कमळकांदा, फुल्या, कांदा अशा नैसर्गिक फळाफुलांचे संकलन करुन त्याबाबतच्या माहितीचा त्या प्रसार-प्रचार करतात.

-मंदा गावळकर संपर्क- 9421885459

-बसवंत विठाबाई बाबाराव: (लेखक ‘पर्यावरण शिक्षण’ विषयाचे अभ्यासक असून, पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे संस्थेत कार्यरत आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -