मराठा लॉबीचे काय होणार !

Mumbai

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रामुख्याने मराठा लॉबीचा नेहमीच मोठा पगडा राहिलेला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची सूत्रे मराठा लॉबीकडूनच हलविली जात असतात. महाराष्ट्रात मराठा समाज हा पूर्वीपासून राजकारणात प्रमुख स्थानी असल्यामुळे त्यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व राहिलेले आहे. राजकारणात सक्रिय असलेल्या मराठा समाजातील लोकांमधून मराठा लॉबी उदयास आली. विशेषत: सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील भागात सहकार क्षेत्र आणि साखर कारखानदारी जोमाने वाढली. त्यातून राजकारणासाठी आवश्यक असणारी संसाधने आणि आर्थिक शक्ती निर्माण झाली. सातारा आणि कोल्हापूर ही मराठेशाहीत सत्तेची केंद्रे होतीच. त्यामुळे या भागाचा विशेष प्रभाव होता.

महाराष्ट्राच्या अन्य प्रातांच्या तुलनेत येथे विकासाची मुळे अगोदर रुजलेली दिसतात. मोठ्या शिक्षण संस्था, साखर कारखाने आणि उद्योग या भागात विकसित झालेले दिसतात. जातीयदृष्ठ्या प्रबळ असलेला मराठा समाज हा आर्थिकदृष्ठ्याही प्रबळ बनला, त्यामुळेच त्यांच्या भूमिकेला महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष महत्त्व राहिलेले आहे. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते शरद पवार यांच्यापर्यंत पाहिल्यास मराठा समाज आणि मराठा लॉबी यांचा कसा प्रभाव आहे ते दिसून येईल. पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा नेहमीच अभेद्य बालेकिल्ला राहिलेला आहे. त्याला खिंडार पाडणे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कुणालाही शक्य झालेले नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या मराठी मनावर पकड असलेल्या नेत्याने पश्चिम महाराष्ट्राचा हा गड फोडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला; पण त्यांनाही ते शक्य झाले नाही. राजीव गांधींच्या काळात देशभर काँग्रेसचे पानिपत झालेले असताना याच पश्चिम महाराष्ट्राच्या बळावर त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवारांनी मोठे यश मिळवून दिले होते.

पुढे काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेस या वेगळ्या पक्षाची स्थापना केली; पण तरीही त्यांनी पुढे काँग्रेसशी आघाडी करून राज्यातील सत्ता काबीज केली आणि केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मराठा समाजातील नेत्यांचा म्हणजेच मराठा लॉबीचा प्रभाव आहे. या मराठा लॉबीत नारायण राणे यांनी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळेच मोठ्या उमेदीने काँग्रेसमध्ये आलेल्या राणेंना काँग्रेसचा त्याग करावा लागला. पश्चिम महाराष्ट्राचा हा अभेद्य किल्ला कुणीही फोडू शकणार नाही. तेथील जनता, तेथील सहकार क्षेत्र आपल्याच ताब्यात आहे, असा ठाम विश्वास मराठा लॉबीतील नेत्यांना वाटत होता; पण त्यांचा हा ठाम विश्वास २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत साफ मोडीत निघाला. मराठा लॉबीतील नेत्यांसाठी हा प्रचंड धक्का होता. या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांची अशी काही लाट आली की, त्यात पश्चिम महाराष्ट्राच्या बोलकिल्ल्याच्या ठिकर्‍या उडाल्या. आजवर अधिराज्य गाजवलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नरेंद्र मोदींनी अक्षरश: धूळ चारली. महाराष्ट्रात काँग्रेसला दोन आणि राष्ट्रवादीला चार जागा टिकवता आल्या. अशी लाजीरवाणी दूरवस्था होईल, अशी कल्पना या पक्षांच्या नेत्यांनी कधी केली नव्हती. त्याही पेक्षा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची वाईट स्थिती झाली. राष्ट्रवादीला एक जागा वाढवून पाचवर पोहोचता आले, तर काँग्रेसला औषधाला एक जागा टिकवता आली.

मराठा लॉबीच्या नेत्यांचा समावेश असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अशी का अवस्था झाली. त्यांच्याच बालेकिल्ल्यांमधील त्यांच्या पारंपरिक हुकमी मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवून गुजरातमधून राष्ट्रीय पातळीवर गेलेल्या नरेंद्र मोदींना मतदान का केले. तेही एकादा नव्हे तर दुसर्‍यांदा. कारण २०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपने जिंकल्यानंतर मध्यंतरीच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोदी सरकारच्या धोरणांविरोधात आकाशपाताळ एक केेले होते. त्यामुळे त्याचा परिणाम या लोकसभा निवडणुकीत दिसून येईल, असे वाटत होते; पण तसे काही झाले नाही. यावेळी मोदींनी मागील वेळेसारख्या २६ सभा घेतल्या नव्हत्या. तरीही महाराष्ट्रातील लोकांनी मोदींनाच मते दिली. हे असे का होत आहे, महाराष्ट्रातील मराठा लॉबीचा दबदबा कशामुळे कमी झाला आहे, असा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहत नाही. यापुढे मराठा लॉबीचे काय होणार, त्यांचे राजकीय वर्चस्व संपुष्टात आले आहे का? कारण आजवर महाराष्ट्रातील सत्तेची सूत्रे याच मराठा लॉबीच्या हाती असत.

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन एकदा म्हणाले होते, ‘महाराष्ट्रात राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर मराठा किंवा दलित असायला हवे. ब्राह्मणांना इथे राजकीय भविष्य काढणे अवघड आहे, म्हणून मी दिल्लीचा रस्ता धरला’. शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार असलेल्या प्रमोद महाजन यांनी केलेल्या या विधानाला महाराष्ट्रातील मराठा लॉबीचा संदर्भ आहे, हे विसरून चालणार नाही. शिवसेना-भाजप युतीच्या काळात १९९५ साली पहिल्यांदा मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सध्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि कर्तृत्ववान आहेत. त्यामुळे नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या जोडगोळीने महाराष्ट्रातील मराठा लॉबीला निष्प्रभ करून सत्ता आपल्या ताब्यात घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही नेत्यांना आता भाजपचे आकर्षण वाटू लागले आहे.

मराठा लॉबी म्हणून आजवर ज्यांचा दबदबा होता अशी नेते मंडळी अलीकडच्या काळात कमकुवत झालेली दिसतात. भाजपचा म्हणजेच संघप्रणित विचारसरणीच्या नेत्यांचा महाराष्ट्रात राजकीय प्रभाव वाढताना दिसत आहे. भाजपप्रणित हिंदुत्ववादाचा राज्यात आणि देशात वाढता प्रभाव पाहता शाहू-फुले-आंबेडकरांचा जयघोष करणारी मराठा लॉबी निष्प्रभ होताना दिसत आहे. मराठा समाजाला आरक्षणासाठी आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करावा लागत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचारात आणता आला नाही. कारण मराठा लॉबीतील नेत्यांना मराठा समाजाने लांब ठेवले. त्यामुळे पुढील काळात महाराष्ट्रातील मराठा लॉबी निष्प्रभ होणार का, अशी शंका आल्यावाचून राहत नाही. कारण नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या प्रभावाने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी अवस्था झाली आहे, त्यातून सारे काही उघड होत आहे.