मराठी नाटकांची गाडी सुस्साट !

नव्या पिढीचे निर्माते नव्या दृष्टीकोनातून नाट्यधंदा वाढवताना दिसू लागले. परिणामी ‘अलबत्या-गलबत्या’ सारखं विक्रमी बालनाट्य अक्षरशः महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहचलं... झपाट्यानं साडे तीनशेच्या पार प्रयोगांची सुसाट मजल मारून ‘बालनाट्य’ ही भरघोस यशस्वी होऊन कमाई करून दिली. आजही मराठी नाट्यरसिक नाटकांना डोक्यावर घेतोय हे दाखवून दिलं.

Mumbai
albatya galbatya

प्रदीर्घ, मोठी भरजरी परंपरा लाभलेली मराठी रंगभूमी-नाट्यसृष्टी, आज २०२० च्या उंबरठ्यावर उभी आहे, प्रवास करते आहे. अनेक वारा-वळण, वादळ-वारे, सुख-दुःखाना अंगावर झेलीत, मराठी नाटकांचा हा प्रवास अविरत चालूच आहे. तेजीने बहकला नाही वा मंदीने झाकलेला नाही. सारं काही ताठ कर्‍यानं झेलून ‘शोर मस्ट गो ऑन’ चा ‘गजर’ करत ही वाटचाल सुरूच आहे.

मात्र या प्रवासाच्या या वळणावर मराठी नाटकं, मराठी रंगभूमी नेमकी कसा प्रवास करते आहे? नेमकी कुठे आहे? नाट्यसिकांच्या, मायबापांच्या भरभरून मिळणार्‍या प्रतिसादाचा ओघ चालू आहे की हिन्दी-मराठी चित्रपट, प्रचंड वाढलेले चॅनेलसची संख्या, वेबसिरीज नावाचा घर-माणसं-मोबाईल्स गिळणारा राक्षस, सोशल मिडिया नावाचा हाताच्या पंजावर अवतरलेली-सर्व व्यक्ती नवी मोहमची दुनिया, अशा खचाखच वाढलेल्या स्पर्धेच्या, हाणामारीत मराठी नाटकं ‘मराठी बाणा’ जपत, अटकेपार झेंडा लावते आहे का?

थोडक्यात सांगायचं तर, आजच्या मराठी नाटकाचा प्रवास पाहण्याचा नाट्यकर्मी-नाट्यधर्मी आणि नाट्यरसिक प्रेक्षक त्यांच्या नाट्यप्रेमाची गोष्ट पाहण्या-एकण्याचा हा अल्प प्रयत्न आहे अर्थात सकारात्मक दृष्टी ठेवूनच केलेला.

एखाद्या टेबलवर पाण्यानं अर्धा भरलेला प्याला बघताना काहीना तो अर्धा रिकामा दिसतो तर काहीना अर्धा भरलेला. ही गोष्ट म्हणजे प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टीकोन आहे. विचार करण्याची पद्धत-सवय आहे.

जेव्हा मुंबई दूरदर्शन सह्याद्रीच्या कडेकपारी निनादत होतं, तेव्हा त्यावर नाट्यावलोकन नावाचा कार्यक्रम म्हणजे मराठी नाटकांचे रसग्रहण करून, मराठी नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत, शहरांबरोबरच गावखेड्यांपर्यंत पोहचवण्याचा महत्त्वाचा टप्पा-राजमार्ग मानला गेला जायचा. नाट्यालोकनात नाटक झळकलं म्हणजे ते हमखास गर्दी करतात, उसळणार हे समीकरण पक्कं झालेलं.

खरं तर नाट्यसृष्टीने तेजी-मंदीचे, ऊन पावसाचे अनेक दिवस पाहिले, त्यातून मार्ग कापत आपण प्रवास सुरूच ठेवला. त्याकाळी सोशल मीडिया, मोबाईल्स नव्हते. फेसबुक नव्हतं अत्यंत खराब रस्ते, खूप कमी सोयीसुविधा, थिएटर्सची वानवा असताना प्रभाकर पणशीकर, राजाराम शिंदे, काणे मोहन वाघ, मोहन तोंडवळकर, उदय धुरत, बाळ कोल्हटकर, मच्छिंद्र कांबळी अशा अनेक ‘एकल मालक’ संस्थानी आयएनटी, गोवा हिन्दु अशा संस्थाचं अपुर्‍या साधन-व्यवस्थांशी सामना करीत मराठी नाटक धंदा जपला-जोपासला… गावखेड्यातल्या नाट्यरसिकांची नाटक बघण्याची भूक भागवली… त्यांनी जे खरंतर जीवन जगून नाटक जगवलं, जपलं, नाट्यरसिकांना रिझवलं.. मराठी चित्रपट तारे-तारकांनीही नाटकांना चांगले दिवस आणण्यासाठी शूटिंगच्या धावपळीत नाटकांचे प्रयोग केले. बदलल्या काळानुसार नाट्यघरही बदलला… नवे, धाडसी निर्माते उभे राहील.

नाटक लोकांपर्यंत पोहचवण्याचा ‘वसा’ घेऊन पुढे जाऊ लागले. सुधीर भट, लता नार्वेकर, मच्छिद्र कांबळी, विलास-दिलीप जाधव, संतोष कणेकर, प्रशांत दामले, प्रसाद कांबळी, अशा अनेक निर्मात्यांनी नव्या उमेदीनं नाट्यवारीची ही दिंडी चालू ठेवावी. राज्य सरकारचे अनुदान, व्यावसायिक नाट्यस्पर्धेतही भरघोस बक्षिसं आणि मटा-झी सन्मान-संस्कृती दर्पणसारखे रंगभूमीला प्रतिष्ठा देणारे, सन्मान करणारे, आर्थिक पाठबळ देणारे उपक्रमासाठी नाटकाना सुखाचे-अच्छे दिन आणण्यासाठी हातभार लावताना दिसले दिसताहेत. जगभरातल्या नाट्यरसिकांनी मराठी नाटकांसाठी नवी बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या कक्षाही रूंदावल्या आहेतच.

दरम्यान, मधल्या काळात म्हणजे खाजगी मराठी वाहिन्यांनी बाळसं धरण्याच्या काळात चॅनेल्स व सिरीयलमुळे नाटक धंदा मंदीत-अडचणीत आल्याची काहींनी ओरड केली. पण त्या संक्रमण अवस्थेतही नाटक तगलं, चाललं, धावलं… आता मराठी रंगभूमीला अर्थात नाटकाला झी-मराठी कर्ल्स वाहिनीने सक्रीय हातभार लावला. नव्या पिढीचे निर्माते नव्या दृष्टीकोनातून नाट्यधंदा वाढवताना दिसू लागले. परिणामी ‘अलबत्या-गलबत्या’ सारखं विक्रमी बालनाट्य अक्षरशः महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहचलं… झपाट्यानं साडे तीनशेच्या पार प्रयोगांची सुसाट मजल मारून ‘बालनाट्य’ ही भरघोस यशस्वी होऊन कमाई करून दिली. आजही मराठी नाट्यरसिक नाटकांना डोक्यावर घेतोय हे दाखवून दिलं.

एका लग्नाची दुसरी गोष्ट (प्रशांत दामले), इडीयट्स (श्रीरंग गोडबोले), नटसम्राट, आरण्यक (अदैत थिरटर्स), तिला काही सांगायचं (चिंतामणी थिरटर्स), हॅल्मेट (जिगीद्या-अष्टविनायक) या आत्ताच्या भव्यदिव्य यश संपादन करणार्‍या, आर्थिकरित्या ‘गणित’ जमणार्‍या नाटकांना, झी स्टुडिओ, कलर्सची साथ, प्रसिद्धी पाठबळ लाभलं आहे, हे निश्चितच सुचिन्ह आहे.

त्याच बरोबर अश्रूंची झाली फुले (सुबोध भावे, शैलेश दातार, सीमा देशमुख, उमेश जगताप) या नाटकालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याला कारण सुबोध भावेच्या अभिनयाचा करिअरचा चढता आलेख, डॉ. काशीनाथ घाणेकर या चित्रपटाची लोकप्रिय आणि डॉ. काशीनाथ घाणेकर या मराठी नाट्यसृष्टीतला पहिला (व एकमेव) सुपरस्टारचा आजही तेवढाच वलयांकीत असलेला करिष्मा भव्य लोकप्रियता कारणीभूत आहे.

मात्र याचवेळेस वाहिन्यांचा सपोर्ट नसलेल्या काही नाटकांनी-स्टार्सनी आपल्या नाट्यकर्तृत्वाने नाट्यरसिकांना जिकलं आहे. त्यांचं हे यश निश्चितपणे कौतुकास्पद आहे. नाट्यकर्मी आणि नाट्यप्रेक्षक त्यांच्या अतूट, घट्ट नात्याला सलाम ठोकायला लावणारे असेच आहे.

अन्यया (ऋतूजा बागवे), देवबाभळी, गुमनाम है कोई, सोयरे सकल (प्रसाद कांबळी), दहा बाय बाय (विजय पाटकर-सुप्रिया पाठारे, प्रथमेश परब), दादा एक न्यूज आहे (उमेद्य बापट- क्षुता दुर्गाळे), परफेक्ट मी (पुष्कर श्रोत्री), घरी मॅरेड बाहेर बॅचलर (संजय नार्वेकर), मोरूची मावशी (भरत जाधव) ह्या नाटकांनी नाट्य व्यवसायाला नवेपण दिलं आणि आर्थिक गणितही फायद्यात सोडवलं…

गावखेड्यातली थिटरर्स, त्यातल्या सोयीसुविधा सुधारण्यासाठी, नाटकांचे प्रयोग सुरू असताना मोबाईलच्या ‘किरकिरीनं’ होणारा रसभंग टाळण्यासाठी मुक्ता बर्वेपासून सुबोध भावेपर्यंत सर्वजण जनजागृती करताहेत. तडफेनं आपली बाजू मांडून व्यथा-समस्यांना वाचा फोडताहेत. (खरं तर कलाकारावर ही वेळच का यावी?) वरवर पाहिलं तर मराठी नाटकांचा हा प्रवास उत्तम चालला आहे, रंगभूमीला बाळसं लाभलं आहे. मराठी नाटकांना सुगीचे दिवस आले आहेत हे जरी मान्य केलं तरीही…
तरीही… काही गोष्टींचे काय?

‘नाटक आणि फक्त नाटक’ करणारे-जगणारे कलाकार-तंत्रज्ञ आज हाताच्या बोटावर उरले आहेत. व्यवसायाच्या बदलत्या गणितांमध्ये हे होणं स्वाभाविकच आहे. मला लांब पल्याच्या मालिका, मराठी-हिंदी चित्रपट, वेब सिरीज, मोठमोठाले इव्हेन्ट्स, खाजगी सुपार्‍या आणि नाटक असा प्रवास काहींचा असतो (त्यात गैर काहीही नाही. हा प्रत्येकाच्या व्यवसायातल्या गणितांचा भाग आहे.) पण या सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मराठी नाटक हे सुट्टी दिवस शनिवार-रविवार यामध्ये सीमीत राहिले आहे. (पूर्वी मराठी नाटकांचे महिन्याला १५-३० प्रयोग व्हायचे आणि गुजराथी नाटकांचे सुट्टीचे दिवस शनिवार-रविवार असे प्रयोग व्हायचे) यावर काहीजण म्हणतील, आता प्रेक्षकांना शनिवार-रविवार नाटकाला यायला जमतं (प्रेक्षकांना की बिझी असणार्‍या कलाकारांना?) त्याचबरोबर प्रेक्षकांकडे वेळ नाही दोन-तीन तास नाटक बघत बसायला (मग तरीही जी नाटके चालताहेत, ती बघायला कोण येतं?), प्रेक्षकांना घरातल्या मोबाईलवर मनोरंजनाचा खजाना मिळाल्यावर ते प्रचंड दगदग, गर्दी, खड्यांचा त्रास, महागाई, अस्थिरता, नोटबंदी, भीती, जीवसृष्टी आर्थिक चणचण सोसून फॅमेलीसह नाटक पाहणं आणि बाहेर हॉटेलिंग करणं अशी महागडी मनोरंजनाची ऐष का करतील? (तरीही आजच्या अनेक नाटकांना प्रचंड आर्थिक यश लाभलंच आहे ना?)

खरं तर इथं कोणवार दोषारोप वा खापर फोडायचं नाहीत… मी ही याच नाट्य व्यवसायातलाच एक भाग आहे. वास्तवाचे, परिस्थितीचे भान मलाही आहे.

सध्याची एकूणच बदलेली-बिघडलेली आर्थिक परिस्थिती, भाववाढ, महागाई अनेक कंपन्यांमध्ये असलेले गंभीर हाल, बंद गिरण्या, साखर कारखान्यांची नाजूक अवस्था (ही सर्व मंडळी नाटकांवर भरभरून प्रेम करायचे, शोज द्यायचे) या सगळ्याचा परिणाम म्हणून नाट्यव्यवसाय एका दुष्टचक्रात अडकलेला दिसतो.

पेट्रोल-डिझेलसह महागाई-भाववाढीमुळे निर्मितीमूल्य वाढली. कलाकार, तंत्रज्ञ, नेपथ्य, दिग्दर्शन, कपडेपट, रंगमंच कामगार, जाहिरात, प्रसिद्धीही स्वाभाविकपणे महागली… त्यातच आजच्या स्पर्धेच्या आणि सर्वोत्तम देण्याच्या काळात नाटकाची सर्व अंग दर्जेदार, सर्वोत्तम असायला हवी या विचाराने, चांगलंच द्यायचं म्हणून खर्चही वाढला. पण त्याचबरोबर महागाईची झळ नाटक पाहणार्‍या प्रेक्षकांनाही सोसावी लागतेय… एकूणच या दुष्टचक्रातून बाहेर काढून नाट्य व्यवसाय तगवायचा, जगवायचा आणि वाढवायचा असेल, त्याचे सातत्य टिकवून शहरांसह बाहेरगावचे प्रेक्षक जगवायचे असतील. नाटक उभ्या आडव्या महाराष्ट्रभर जायला हवं असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन (सरकारनेही त्यांचा वाटा उचलून) संयम, सामोपचाराने आणि विचाराने प्रयत्न करणं वाढवायला हवं…

‘शिवाजी मंदिरात दिवसाला तीन-तीन प्रयोग व्हायचे’ ही आठवण ‘होतात’ या शक्यतेमध्ये बदलायला हवी. जसं दक्षिणतेला चित्ररसिक नवा चित्रपट बघणार म्हणजे बघणारच अशा निष्ठेनं, जिद्दीनं मराठी नाट्यप्रेमी रसिकांनी वेळात वेळ काढून नाटक बघायला हवं. त्याचबरोबर ग्रुप बुकींग, प्रेक्षक सभासद योजना, सुबक सारख्या चांगल्या लोकप्रिय कलाकारांना घेऊन मर्यादित प्रयोग करण्याचा कल्पना परदेशात-परराज्यात राबविण्यात येतात. नाट्य प्रयोग, नाट्य महोत्सव शासनाने अनुदानाबरोबरच गावोगावची थिएटर्स, तिथल्या सोयी-सवलतीमध्ये कमालीचा बदल करायला हवेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी एकमनाने, एक विचाराने नाटक, नाट्यसृष्टी, नाट्यरसिक जोपासण्याचा वज्रनिर्धार केला तर…

वर्षानुवर्षे तिसरी घंटा वाजत राहील.
नांदीचे सूर वाजत राहतील
धुपाचा सुगंध दाखवत राहील
आणि मुख्य शहरांसोबत ‘गावखेड्यात’ नाटक सन्मानाने सादर होत राहील… राहीलच…

-अजितेम जोशी