घरफिचर्सअरण्यातील चिंतन नाट्याचा आविष्कार

अरण्यातील चिंतन नाट्याचा आविष्कार

Subscribe

इंट्रो : आविष्कार या प्रायोगिक नाट्य-संस्थेच्या परंपरेला पोषक असे आणि संस्थेचे नाटककार-दिग्दर्शक चेतन दातार यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त सादर केलेले ‘अरण्य-किरण’ हे चिंतन नाट्य शैलीतील नाटक आहे. ---------------

चर्चा नाट्यापेक्षा चिंतन नाट्य हा काहीसा कठीण असा नाट्य प्रकार. तो लिखाणात कादंबरी किंवा कथनशैलीच्या जास्त जवळ असलेला, मुक्त चिंतनाचा. डॉ. वसुधा सहस्रबुद्धे यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. मुळात चिंतन नाट्याची आपली परंपरा नाही. म्हणूनच १९८५ साली प्रा. वसंत देवांनी हिंदीत लिहिलेले हे नाटक क्वचितच कुणी सादर केले. पं. सत्यदेव दुबे यांच्या थिएटर युनिटने सर्वप्रथम. त्या गोष्टीला साक्ष असलेले, ‘लास्ट ऑफ द मोहिकन्स’ म्हणून, अजित भगत यांनी ते आज दिग्दर्शित करणे संयुक्तिकच!

मानवी मन हे म्हटले तर एक जंगलच! इथे जागोजागी हिंस्त्र श्वापदे अदृश्य रुपात दडून असतात. त्यांचे त्या अंधार विश्वात साम्राज्यच असते. आपले प्रत्येक कृत्य त्यांच्या लेखी योग्यच असते. ती जगण्याची एक मूलभूत नैसर्गिक प्रेरणा असते असेही तिचे समर्थन करता येईल. मात्र त्या निबिड अरण्यातील स्वार्थापलीकडे माणूस जेव्हा चिंतनप्रवृत्त होतो, तोच काय तो आशेचा किरण! हे पश्चात् चिंतन, म्हणजे स्वगतांची एक मालिकाच होते. या मालिकेचा केंद्रबिंदु आहे, कृष्ण आणि त्याची नीति आणि त्या संबंधाने प्रत्येक पात्राचा स्व-शोध. इथे हा शोध घेतात कृष्णाचे पालक पिता नंद, पत्नी रुक्मिणी, बंधु बलराम आणि गांधारी. या चिंतनाला पार्श्वभूमी आहे, महाभारताचा युद्धोत्तर काळ. काय मिळवले- काय गमावले याचा ताळेबंद. ज्या वाटेने आजवर चालत आलो, ती योग्य होती का? ही शंका. बहुतेकांसाठी कृष्ण हा आरोपीच्या पिंजर्‍यात उभा. त्याच्या नीतिने जे काही घडवून आणले, त्याचा ताळेबंद काय? तो योग्य की अयोग्य? कृष्णाला मध्यवर्ती ठेवून जुळवलेली ही चिंतने, म्हणूनच आपल्या एकूण जगण्यालाच प्रश्न करतात. यशोदेच्या पुत्रवियोगासाठी नंद कृष्णाला जबाबदार मानतो आहे. रुक्मिणी त्याच्या अनेक स्त्रियांशी असलेल्या संबंधात स्वत:चे स्थान शोधते आहे. बलराम ज्येष्ठ बंधू असून उपेक्षित राहिलो ही खंत राखून आहे. गांधारी आपल्या शंभर पुत्रवधाचा हिशेब कृष्णाजवळ मागते आहे. या सर्व आरोपांनी स्वत: कृष्ण देखील शंकित झालेला. तो आपल्या प्रत्येक कृत्याला स्व-नीतिच्या तत्वात ठोकून पडताळून पाहतो आहे. यातून जे बाहेर येते त्याचा कौल प्रेक्षकांवर सोडलेला आहे.

- Advertisement -

समीप रंगमंचासाठी, रवि-रसिक यांनी अरण्यातील एका निर्जन वास्तुचे नेपथ्य उभे केले आहे ज्याच्या द्वाराला दोन रस्ते आहेत. कदाचित ते मानवी मन मंदिराचे प्रतीक आहे. प्रत्येक निर्णयाला इथे दोन वाटा असतात आणि त्यातील एक निवडणे अपरिहार्य असते. असे ते सूचित करते. उत्तरायुष्यातील या अरण्य चिंतनासाठी त्यांनी निळा आणि सूर्य किरणांसाठी अंबर असा समर्पक प्रकाश योजला आहे. कलाकारांत नंदू सावंत (नंद), मृणाल वरणकर (रुक्मिणी), नंदिता पाटकर (गांधारी) आणि सुशील इनामदार (कृष्ण) हे आपापले मुक्तचिंतन सकसपणे सादर करतात. त्यांना योग्य साथ नवनीत येसरे (सूत्रधार आणि सांब) आणि तृप्ती जाधव (नटी आणि यशोदा) देतात. मयुरेश माडगावकर यांचे पार्श्वसंगीत आणि अक्षता दळवी यांची वेशभूषा पूरक आहे. अजित भगत यांनी दिग्दर्शनात हे चिंतन नाट्य हलते ठेवून, ते स्टॅटिक होणार नाही हे पाहिले आहे.

चिंतन नाट्यातील मुख्य अडथळा नाट्य-प्रेक्षक संपर्काचा असतो. त्यासाठी स्वगतांचा मोनोलॉग होऊ न देता संभाषण व्हावे, म्हणून विशेष प्रयास घ्यावे लागतात. या प्रयोगात दीपक करंजीकर (बलराम) यांना ते जमले आहे. त्यांचा बलराम येतो तोच थेट प्रेक्षकांशी जोडला जातो, अगदी त्यांची एक्झिट टाळी घेऊन जाते. मोनोलॉग्जची परिचित शैली टाळून जर संभाषण संपर्कावर विचार केला तर हे नाटक अधिक मोठा एकसंध परिणाम साधेल.

- Advertisement -

 -आभास आनंद

(लेखक नाट्य अभ्यासक आहेत)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -