घरफिचर्सहर तरफ आग हैं,दामन को बचाये कैसे!

हर तरफ आग हैं,दामन को बचाये कैसे!

Subscribe

‘महानगर’चं अख्खं कार्यालय बॉम्बस्फोटाच्या त्या एकाच बातमीवर एकवटलेलं. त्यातच कुणीतरी बीबीसी लावलेलं. बीबीसीने फोनवर मुंबईतल्या कुणा वाटसरूला गाठलेलं. ‘तुम्ही आता नेमके मुंबईच्या कोणत्या भागात आहात?’ बीबीसीच्या त्या प्रतिनिधीने त्या वाटसरूला विचारलं. याच जातकुळीतले, याच छापाचे आणखी काही प्रश्न बीबीसीच्या त्या प्रतिनिधीकडून विचारले जातात. शेवटी या प्रश्नोत्तराचा समारोप म्हणून प्रथापूर्वक समारोपाचा प्रश्न विचारला जातो - ‘हे सगळं बघून एक मुंबईकर म्हणून आज तुमच्या मनात नेमक्या काय भावना येत आहेत?’पलीकडून आधी थोडा पॉज घेतला जातो आणि मग उत्तर येतं - ‘रस्म-ए-उल्फत को निभाएं तो निभाए कैसे, हर तरफ आग हैं दामन को बचाये कैसे?’

12 मार्च 1993.
मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. प्लाझा सिनेमा, सेना भवन, पासपोर्ट ऑफिस, शेअर बाजार वगैरे वगैरे ठिकाणी काही मिनिटांच्या अंतराने हे बॉम्बस्फोट होत गेले. अख्खी मुंबई हादरली.

मी दादर स्टेशनला उतरून ’महानगर’च्या कार्यालयात जाण्यासाठी निघालो होतो. वाटेत प्लाझा लागलं. प्लाझाकडे सगळं भीषण चित्र. रूग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या लालबुंद गाड्या, पोलिसांच्या निळ्याजांभळ्या गाड्या. फुटपाथवर अधेमधे रक्त सांडलेलं. बघणार्‍यांची मनं सुन्न झालेली. काही जखमी, काही मरण पावलेले देह स्ट्रेचरवरून नेले जात असलेले. वातावरण आतबाहेर पूर्णपणे हबकून टाकणारं.

- Advertisement -

तसाच पुढे आलो तर सेनाभवनच्या बाजूची चाळ हललेली. तिथेही प्लाझासारखंच वातावरण. मुळ्याची भाजी आणणारे, बँकेत पासबुक अपडेट करायला गेलेले निष्पाप निष्कारण मरण पावलेले. वातावरणात बीभत्स शांतता. घटना घडली तिथे गर्दी, पण पुढचे रस्ते निर्मनुष्य. मी त्याच सुनसान रस्त्याने आजुबाजूच्या इमारतींकडे संशयाने पहात निघालो.

‘महानगर’चं अख्खं कार्यालय बॉम्बस्फोटाच्या त्या एकाच बातमीवर एकवटलेलं. त्यातच कुणीतरी बीबीसी लावलेलं. बीबीसीने फोनवर मुंबईतल्या कुणा वाटसरूला गाठलेलं.

- Advertisement -

‘तुम्ही आता नेमके मुंबईच्या कोणत्या भागात आहात?’ बीबीसीच्या त्या प्रतिनिधीने त्या वाटसरूला विचारलं.
‘मी आता वरळीच्या पासपोर्ट ऑफिसकडे आहे,’ वाटसरूने उत्तर दिलं.
‘काय दृष्य दिसतं आहे तुम्हाला आता तिथे?’
‘रक्त सांडलेलं आहे, लोक जखमी झालेले आहेत, त्यांना काही लोक मदत करताहेत, वातावरण गंभीर आहे.’
याच जातकुळीतले, याच छापाचे आणखी काही प्रश्न बीबीसीच्या त्या प्रतिनिधीकडून विचारले जातात. शेवटी या प्रश्नोत्तराचा समारोप म्हणून प्रथापूर्वक समारोपाचा प्रश्न विचारला जातो – ‘हे सगळं बघून एक मुंबईकर म्हणून आज तुमच्या मनात नेमक्या काय भावना येत आहेत?’
पलीकडून आधी थोडा पॉज घेतला जातो आणि मग उत्तर येतं – ‘रस्म-ए-उल्फत को निभाएं तो निभाए कैसे, हर तरफ आग हैं दामन को बचाये कैसे?’
नक्श लायलपुरींचे ते शब्द, लता मंगेशकरांचा तो स्वर आणि मदनमोहनजींचे ते संगीत लाभलेल्या त्या गझलचे सूर त्या दिवशी त्या भकास-बेसूर वातावरणात त्या वाटसरूला आठवले आणि बीबीसीच्या त्या प्रतिनिधीसाठी ती गझलच त्याचं उत्तर झालं.
मुळात ती गझलच शब्द आणि सूर अशा दोन्ही बाजूंनी इतकी दर्ददिवाणी आणि हळवीहळदिवी आहे की त्या मुंबईकराकडून ते उत्तर म्हणून ऐकताच अंगावर सर्रकन काटा आला. त्या दिवशीच्या बॉम्बस्फोटांच्या त्या काळ्या ढगांच्या वातावरणात ती अख्खी गझल तिच्या आकाराउकारासह नजरेसमोर उभी राहिली. कानाला टोचत राहिली. काळीज कुरतडत राहिली.
नक्श लायलपुरींनी त्या गाण्याच्या पहिल्या अंतर्‍यात लिहिलं आहे – दिल की राहों में उठाते हैं जो दुनिया वाले, कोई कह दे वो दिवार गिराए कैसे?
…नक्श लायलपुरींनी इथे लिहिलेली ती दिवार म्हणजे ती भिंत त्या भयाण दिवशी खरोखरच जातीपातीची, धार्मिक द्वेषाची भिंत वाटून गेली…आणि ही भिंत पाडायची कशी याची चिंता नक्श लायलपुरींना त्या गझलमध्ये वाटली तशी ती त्या दिवशी खरंच मनाला दंश करत राहिली.
शेवटच्या अंतर्‍यात नक्श लायलपुरी लिहून गेले आहेत – बोझ होता जो गमों का तो उठा भी लेते, जिंदगी बोझ बनी हो तो उठाये कैसे?
…खरंच आहे, हे सुंदर जीवन, ही सुंदर सृष्टी पहायला आलेल्या माणसाला हे लालभडक क्रौर्य सांडलेलं दिसतं तेव्हा नक्श लायलपुरींच्या शब्दांतली जिंदगी खरंच बोझ वाटू लागते.
एका मुंबईकराला या गझलची आठवण त्या दिवशी बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने झाली, पण त्या गझलच्या जन्माची आठवणही तशीच अनोखी आहे.

खरं तर दिल की राहे या सिनेमासाठी मदनमोहननी चाल तयार केली होती आणि त्यावर नक्श लायलपुरींनी गाणंही लिहिलं होतं. पण सिनेमाच्या निर्माता-दिग्दर्शकांचं वेगळंच म्हणणं होतं. सिनेमाचं संगीत मदनमोहन देताहेत आणि सिनेमात एकही गझल नाही असं कसं चालेल, असा त्यांचा प्रश्न होता. पण हा प्रश्न त्यांनी शनिवारी केला होता आणि जे काही गाणं असेल ते गाण्यासाठी लता मंगेशकरांकडे सोमवारशिवाय पुढची तारीख नव्हती. मदनमोहननी नक्श लायलपुरींना पटकन गाणं लिहिण्याचं फर्मान काढलं. मदनमोहनच्या घरात त्यांचं लक्ष त्या दिवशी एकाग्र होऊ शकत नव्हतं आणि त्यांचं स्वत:चं घरही तसं दूर होतं. मग ते बाहेर पडले. रस्त्यातच एके ठिकाणी थोडा बसण्यापुरता आसरा मिळाला. तिथे त्यांनी कागद काढला, पेन काढलं. पण तरीही त्यांना शब्द सुचत नव्हते. अशा वेळी ते स्वत:शीच पुटपुटले – इतने कम वक्त में लिखे तो लिखे कैसे?…इस मुसीबत से निकले तो निकले कैसे?…

…आणि असं स्वत:शीच पुटपुटत असताना त्यांनी कागदावर शब्द लिहिले – ‘रस्म-ए-उल्फत को निभाएं तो निभाए कैसे, हर तरफ आग हैं दामन को बचाये कैसे?’

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -