घरफिचर्समैं शायर तो नही...

मैं शायर तो नही…

Subscribe

राज कपूरनी अल्लाउद्दीनना शैलेंद्र सिंगच्या नवतरूण आवाजात गाणं रेकॉर्ड करायला सांगितलं. नेमका त्याच वेळी ऋषी कपूर तिथल्याच एका खांबाला टेकून ते गाणं ऐकत होता. गाणं संपल्यानंतर शैलेंद्र सिंग आणि ऋषी कपूरचं हाय-हॅलो झालं. पुढे हाच आवाज आपला पडद्यावरचा आवाज बनणार आहे हे ऋषी कपूरला माहीत नव्हतं आणि हाच ऋषी कपूर याच सिनेमामुळे नावारूपाला येऊन पुढे याच्यासाठी लोक आपला आवाज वापरतील हे शैलेंद्र सिंगच्याही गावी नव्हतं.

सिनेमाच्या क्षेत्रात शिरकाव करायला मिळणं यात आधी अर्धा जन्म जात असतो आणि नंतर त्या क्षेत्रात स्थिरावण्यात नंतरचा अर्धा जन्म जातो. हा नियम तसा कुणी लिहिलेला नाही, पण तो सिनेमाच्या वाटेवर पाय ठेवणार्‍या बहुतेकांना पाळायला लागतो. पण लिखित नियमांना जसे अपवाद असतात किंवा अपवादाने जसे नियम सिध्द होत असतात तसं काही वेळा सिनेमाच्या लाइनीत घडत असतं. शैलेंद्र सिंगच्या बाबतीत नेमकं असंच घडलं!

शैलेंद्र सिंगला तशी गाण्याची आवड होतीच. तो गाणं शिकत होता ते छोटे इक्बाल नावाच्या गुरूंकडे. या गुरूंची आणि त्याची भेट झाली ती संगीतकार शंकरमुळे. शंकर-जयकिशनमधले शंकर. त्यांनी या छोटे इक्बालना शैलेंद्रला संगीताची दीक्षा द्यायला सांगितलं. एव्हाना कुणाच्याही लक्षात येईल की शैलेंद्र सिंगच्या कुटुंबाचा सिनेमा लाइनीशी संपर्क असावा…आणि तो अंदाज खराही आहे. शैलेंद्रचे वडील राजश्री प्रॉडक्शन्सचं काम करायचे. त्याआधी ते व्ही. शांतारामांकडे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक होते. त्यामुळे त्याच्या घराला ही ग्लॅमरची दुनिया काही नवी नव्हती. त्यातूनच स्वत: शैलेंद्रकडे छान गोरंपान, नाकीडोळी नीटस व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे अभिनय वगैरे करण्याची आवड असणं साहजिक होतं. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये म्हणूनच शैलेंद्र डेरेदाखल झाला होता. पण त्याने अभिनय करावा हे नियतीच्या मनात नव्हतं.

- Advertisement -

झालं होतं असं की राज कपूर बॉबी नावाच्या सिनेमाच्या तयारीत गुंतले होते. या वेळी त्यांच्या सिनेमात एक नवा कोरा चेहरा झळकणार होता आणि त्या चेहर्‍याचं नाव होतं ऋषी कपूर. त्यांचाच चिकणाचोपडा चिरंजीव. राज कपूरना त्याला पडद्यावर आवाज देण्यासाठी तसाच नवा कोरा आणि वेगळा आवाज हवा होता. तोपर्यंत मुकेश, महंमद रफी, किशोरकुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर हेच गायक आलटूनपालटून वापरायची सवय अख्ख्या सिनेमानगरीने स्वत:ला अपरिहार्यपणे लावून घेतली होती. पण आपल्या तरण्याबांड लेकासाठी नेहमीचे आवाज वापरात आणायचे नाहीत हे राज कपूरनी पक्कं ठरवलं होतं. त्यामुळेच ते संपूर्णपणे नव्या आवाजाच्या शोधात होते. त्यांना चाकोरीबध्द, साचेबध्द आवाज चालणार नव्हता. ही गोष्ट बॉम्बे पब्लिसिटीच्या व्ही.पी.साठेंना कळली. ते शैलेंद्र सिंगच्या वडिलांचे मित्र होते. त्यांना शैलेंद्र सिंग गाणं गातो याची माहिती होती. त्यांनी शैलेंद्र सिंगच्या वडिलांना शैलेंद्रला पुण्यातल्या फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इस्टिट्यूटमधून मुंबईत बोलवायला सांगितलं.

निरोप मिळताच शैलेंद्र सिंग मुंबईला आला. त्याला घेऊन व्ही.पी.साठे राज कपूरकडे गेले. तेही चक्क आर.के. स्टुडिओत. राज कपूरनी त्याला गाणी ऐकवायला सांगितली. त्या काळात शैलेंद्र सिंगला गझल गाण्याची आवड होती. त्याने राज कपूरना गझल गाऊन दाखवली. राज कपूरनी त्याचा आवाज नीट एकाग्र होऊन ऐकला. त्यांनी त्याला तिथल्याच रेकॉर्डिंग रूममध्ये यायला सांगितलं. अल्लाउद्दीन नावाचे मुख्य रेकॉर्डिस्ट तिथे होते. त्यांना या शैलेंद्र सिंगच्या नवतरूण आवाजात गाणं रेकॉर्ड करायला सांगितलं. नेमका त्याच वेळी ऋषी कपूर तिथल्याच एका खांबाला टेकून ते गाणं ऐकत होता. गाणं संपल्यानंतर शैलेंद्र सिंग आणि ऋषी कपूरचं हाय-हॅलो झालं. पुढे हाच आवाज आपला पडद्यावरचा आवाज बनणार आहे हे ऋषी कपूरला माहीत नव्हतं आणि हाच ऋषी कपूर याच सिनेमामुळे नावारूपाला येऊन पुढे याच्यासाठी लोक आपला आवाज वापरतील हे शैलेंद्र सिंगच्याही गावी नव्हतं.

- Advertisement -

राज कपूरनी शैलेंद्र सिंगचा आवाज रेकॉडिर्ंंग रूममध्येही ऐकला. त्यांना तो ऋषी कपूरसाठी पसंत पडला. तोपर्यंत त्यांनी त्याचं नाव विचारलेलं नव्हतं म्हणून ते म्हणाले, मुझे तेरी आवाज अच्छी लगी, पर तेरा नाम क्या हैं?
मैं शैलेंद्र? शैलेंद्र सिंग म्हणाला.

वा, क्या बात हैं, तुने मुझे मेरे दोस्त की याद दिलाई, राज कपूर म्हणाले. त्यांना त्या क्षणी त्यांचा कवी मित्र शैलेंद्रची आठवण आली.

राज कपूरनी ‘बॉबी’ला संगीत देण्यासाठी लक्ष्मीकांत-प्यारेलालना करारबध्द केलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे शैलेंद्र सिंगला घेऊन जाणं राज कपूरना क्रमप्राप्त होतं. राज कपूरनी त्याला त्यांच्या म्युझिक रूममध्ये नेलं. त्याची ओळख करून दिली. लक्ष्मी-प्यारेकडून तिथे त्याला गाणं ऐकवायला सांगितलं जाणारच होतं. त्याने त्याच्या ठेवणीतल्या गझला ऐकवल्या. पण लक्ष्मीजींनी त्याला मुद्दाम एखादं फिल्मी गाणं ऐकवायला सांगितलं. शैलेंद्र सिंगनेही कमाल केली. तो बसला होता लक्ष्मीजींच्या घरात…आणि त्याने गाणं ऐकवलं आर.डी.बर्मनचं, ‘बॉम्बे टू गोवा’मधलं ‘देखा ना हाय रे सोचा ना.’

पण शैलेंद्र सिंगसाठी या सगळ्या औपचारिक गोष्टी पार पडल्यानंतर राज कपूरनी सरळ मुद्याला हात घातला. त्यांनी ‘बॉबी’साठी केलेलं गाणं लक्ष्मीजींना ऐकवायला सांगितलं. ते गाणं होतं ‘मै शायर तो नही.’ ते गाणं राज कपूरनी लक्ष्मीजींच्या आवाजात कॅसेटमध्ये रेकॉर्ड करून द्यायला सांगितलं आणि ती कॅसेट शैलेंद्र सिंगला घरी घेऊन जायला सांगितली. राज कपूरनी त्याला त्या गाण्याची नीट रिहर्सल करून यायला सांगितलं. ते म्हणाले, या गाण्याचा तू तुझ्या पध्दतीने अभ्यास कर आणि ये, आपण ते गाणं तुझ्या आवाजात रेकॉर्ड करू आणि मग काय ते ठरवू!

ठरल्याप्रमाणे शैलेंद्र सिंग त्या गाण्याची व्यवस्थित रिहर्सल करून आला. नवरंग स्टुडिओत ते गाणं चार-पाच वादकांच्या साथीने पुन्हा एकदा रेकॉर्ड करण्यात आलं. ते गाणं राज कपूरनी ऐकलं. नंतर थोडा वेळ संगीतकार लक्ष्मी-प्यारेशी चर्चा केली. तोपर्यंत शेलेंद्र सिंग एका कोपर्‍यात एकटाच बसला होता. त्याच्या मनावर बरंच दडपण आलं होतं. पण अखेर राज कपूर त्याच्याकडे आले आणि म्हणाले, ‘बॉबी’तली सगळी गाणी तूच गाणार आहेस!

शैलेंद्र सिंगने सुटकेचा नि:श्वास टाकला.

पुढे आर. के. बॅनर्ससाठी शैलेंद्र सिंग गायला. बॉबी तुफान चालला. ‘बॉबी’चं संगीत हिट झालं. त्यातली सगळी गाणी सातासमुद्रापार पोहोचली. शैलेंद्र सिंगला बॉबी पडद्यावरही झळकला नव्हता तेव्हाच मनमोहन देसाईंनी आपल्या सिनेमात गाण्यासाठी बोलवलं.

जेव्हा मुकेश, महंमद रफी, किशोरकुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर यांचीच चलती होती तेव्हा नव्या गायकाला एकही संगीतकार दारातही उभा करत नव्हता, पण शैलेंद्र सिंगच्या तळहातावरची रेषा इतकी मोठी होती की या गंधर्व नगरीत गायक म्हणून नाव मिळवण्यासाठी त्याला धडपड करावी लागलीच नाही. आधी म्हटल्याप्रमाणे नियतीच्या नियमाला अपवाद असतो तो असा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -