घरफिचर्सआठवणीतील मैत्रिण - स्वप्निल बोडखे

आठवणीतील मैत्रिण – स्वप्निल बोडखे

Subscribe

आधी आम्ही दोघे माझ्या चाळीतल्या घरी गेलो. गेल्या गेल्या आईच्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. काय रे? कुठे होतास इतका वेळ? मी बोलणार, उत्तर देणार... तेवढ्यात आईचे लक्ष माझ्या मागे उभी असलेल्या श्वेताकडे गेले. तिला बघून आईने आवाजात कमालीचा बदल केला. आणि हळूच म्हणाली, मैत्रिण का तुझी? छान आहे!

मी सहावीत शिकत असताना, मला शाळेत येण्याजाण्यासाठी एक रिक्षा लावली होती. रिक्षातून येण्याजाण्यामुळे सर्वांशीच खूप चांगली मैत्री झाली होती. या सर्वांमध्येच एक श्वेता नावाची मुलगी होती. माझ्या घरापासून थोड्या अंतरावरच तिचं घर होतं, पण ती कधी माझ्याशी जास्त बोलायची नाही. एक दिवस नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर आम्ही सर्वजण ठरलेल्या ठिकाणी रिक्षावाल्या काकांची वाट पाहत बसलो होतो. बराच वेळ झाला तरी आमचे रिक्षावाले काका रिक्षा घेऊन आले नव्हते. आम्हाला दुसर्‍या रिक्षावाल्याकडून कळले की, आमच्या रिक्षावाल्या काकांची रिक्षा पंक्चर झाली आहे. त्यामुळे त्यांना खूप वेळ लागणार होता.

आता घरी कसे जायचे असा सर्वांनाच प्रश्न पडला होता. मग लगेचच इकडून तिकडून ५-६ जणांनी कॉईन बॉक्सवरुन आपापल्या घरी फोन करुन सांगितले. तसे एक एक करुन त्यांचे आईवडील शाळेत येऊन त्यांना घेऊन गेले. मग राहिलो आम्ही दोघेच. श्वेता आणि मी. रिक्षावाले काका आले नाही तर मला तसा फारसा फरक पडणार नव्हता. कारण रिक्षाने मी फक्त पावसाळ्यातच शाळेत जात असे. पावसाळा संपला की, मी नेहमी बसनेच प्रवास करत असे. मला कुणी घ्यायला येणार नव्हते. त्यामुळे सर्वच गेल्यावर १ तास होऊनदेखील रिक्षावाले काका आले नाहीत म्हणून मीदेखील बसने जायला निघालो.

- Advertisement -

मी निघालेला पाहताच श्वेताने मला आवाज दिला. कुठे जातोयेस? मी म्हटले घरी…
श्वेता – कसा जाणार आहेस?
मी -बसने
मला सोडशील का घरी?
मी म्हणालो, घरी फोन करुन बोलावून घे… कुणाला तरी.
त्यावर ती रडकुंडीला येत बोलली, अरे कितीवेळा फोन केला, कुणी उचलतच नाहीये फोन.
सगळेच गेलेत आणि आता तुही जाणार तर मी एकटी कशी थांबणार?
मी मनात विचार करत होतो. हिला सोबत न्यायचे म्हणजे हिचे तिकिटाचे पैसे कोण भरणार?
बरं आणखी थोडावेळ रिक्षावाल्या काकांची वाट बघावी तर आता शाळा सुटून एक तास होऊन गेला होता. तरी रिक्षावाले काका परत आलेच नाहीत. बहुदा त्यांना कुणीतरी सांगितलं असावं की, मुलांनी त्यांच्या पालकांना बोलवाले आणि ते त्यांच्या सोबत घरी निघून गेले.

शेवटी बसने जायचे ठरले. आम्ही बसमधून निघालो. तुला स्टॉप आल्याचे कसे कळते? वगैरे वगैरे… तिचे प्रश्न सुरु झाले. त्यावर माझे ठरलेले उत्तर मला बसच्या प्रवासाची सवय आहे. हसत खेळत गप्पा मारत वेळ कसा गेला कळलेच नाही आणि आमचा स्टॉप आला. आम्ही बसमधून उतरलो. आधी आम्ही दोघे माझ्या चाळीतल्या घरी गेलो. गेल्या गेल्या आईच्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. काय रे? कुठे होतास इतका वेळ? मी बोलणार, उत्तर देणार… तेवढ्यात आईचे लक्ष माझ्या मागे उभी असलेल्या श्वेताकडे गेले. तिला बघून आईने आवाजात कमालीचा बदल केला. आणि हळूच म्हणाली मैत्रिण का तुझी? छान आहे! असे म्हणत श्वेताशी बोलायला लागली. मग मी घडलेला प्रसंग सांगितला. आणि श्वेताला घरी पोहचवायला निघायलो.

- Advertisement -

श्वेताचे घर माझ्या घरापासून चालत १५ मिनिटांच्या अंतरावर होते. जाताना श्वेता मी आईने रागवल्यावर कसा घाबरलो होतो याचे वर्णन करत हसायला लागली. खरं तर मला चेष्टा केलेली आवडत नसे; पण ती करत असलेली चेष्टा मला आवडत होती. त्यात ती हसताना तिच्या गालावर पडणार्‍या खळीमुळे आणखीनच छान दिसत होती. तिचे घर आले तसे तिने मला तिच्या गेटवरुनच बाय केला. पुढे आमची चांगली मैत्री झाली. पावसाळा संपल्यावर ती कधी कधी मुद्दामहून तिची रिक्षा चुकवून माझ्यासोबत बसने यायची. बर्‍याचदा माझ्यासोबत घरी यायची. माझ्या बाबांनी तर तिचे भावी सुनबाई असे नामकरणही करुन टाकले होते. अर्थातच तिच्या मागे तिला सुनबाई म्हणायचे. चाळीतील माझे मित्रही मला तिच्यावरुन चिडवायचे. पुढे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तिची फॅमिली गावी गेली. ती परत आलीच नाही. नंतर तिच्या बाजूच्यांकडून कळले की, तिच्या वडिलांची दुसर्‍या राज्यात ट्रान्सफर झाली आहे. पुन्हा शाळा सुरु झाल्यावर मी मात्र वाट बघत राहिलो की, ती येईल आणि परत आम्ही सोबत बसने प्रवास करु. आता या गोष्टीला बरीच वर्षे झालीत; पण दरवर्षी पावसाळ्यात शाळा सुरू झाल्या की, तिची आठवण येतेच.
—————————————-

-स्वप्निल बोडखे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -