घरफिचर्सदप्तरातला लपलेला सिनेमा

दप्तरातला लपलेला सिनेमा

Subscribe

सोरटमधून सिनेमा रिळांचे कापलेले तुकडे मिळवून आरशाच्या प्रकाशात त्यावेळी पिक्चरचा फिल आणला जात होता. जवळच्याच एका मित्राकडे चोरबाजारातून आणलेलं रिळ प्रोजेक्टर होतं. त्यानं ते चोरबाजारातून आणल्याचं सांगितल्यावर चोरबाजार म्हणजे कुठलंतरी खतरनाक ठिकाण वाटायचं. त्याला फिल्मी रिळं लावून जोरानं फिरवायचं तर एक्शन रिप्लेसारखा सिन समोरच्या पडद्यावर पडत होता.

दहावीला असताना पेन्सिल बॉक्स, त्याला आम्ही कंपास बॉक्सच म्हणत होतो. त्याच्या आयताकृती झाकणावर ‘तेजाब’चं हेच पोस्टर होतं. वह्यांवर एकमेकांमोर तलवार रोखलेले धरमवीर मधले धर्मेंद्र, जितेंद्र होते. निळ्या रंगाचं खोडरबर डोक्याला घासून तेलकट केल्यावर वर्तमानपत्रातलं ‘टूरटूर’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’, ‘कुणी तरी आहे तिथं’, नाटकाची काळ्या शाईतली पोस्टरांवर दाबल्यावर ती चित्रं सुलटी खोडरबरवर उमटत होती.

‘शहंशाह’चा १६ की १७ किलोच्या पेहरावाचं कुतूहल वाटायचं, जरकीनच्या खिशात हात घातलेला अमिताभ चार आण्याला मिळणार्‍या रंगीत छपाई कागदानं शाळेच्या पांढर्‍या शर्टाच्या खिशावर इस्त्रीनं पाणी लावून छापलेला. त्याच वेळी इतर अनेकांच्या खिशावर शंकर, श्री दत्तदेवही अवतरीत व्हायचे. साईबाबांची जागा तर हक्काची. बहुतेकांच्या शर्टावर बाबांना जागा मिळायची. जवळच्या अहिंसा किंवा भीमनगरातल्या मित्राच्या खिशावर डोळे मिटलेला बुद्ध किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा रंगीत फोटो आताच्या टॅटूसारखांच इस्त्रीनं छापलेला.

- Advertisement -

अनेकांच्या कंपाशीत, दप्तरांत देवदेवतांचे फोटो आणि पुस्तकवह्यांत तळहातावरील रक्ताभिसरणातून कोलांटउडी घेणारा जिलेटीन पेपरचा फँटम पैलवान… जावेद नावाच्या एका खास मित्राच्या दप्तरात सिनेमाची जवळजवळ शंभर-दीडशे पॉकेट पोस्टरं होती. ‘हुकुमत’चा हातात साप घेतलेला धर्मेंद्र, ‘वतन के रखवाले’तले मिथुन-श्रीदेवी, ‘शान’मधला शाकाल, अमिताभ, शशी, ‘शत्रुकान शीना’ बघायला सगळेच जावेदच्या बाकड्यावर मधल्या सुटीत गोळा व्हायचे. जावेद वांद्य्राच्या भारत नगरात राहायला होता.

जिथं आता बीकेसी वसू लागलंय. अमिताभच्या देशप्रेमीमध्येही कामगारांची भारत नगर ही वस्ती होती. त्याचं शुटींग वांद्य्राच्याच भारत नगरमध्ये झाल्याचं आम्हाला त्यावेळी मोठ्यांकडून सांगितलं जात होतं. तर चार आण्याला मिळालेल्या रिळांच्या फिल्मातून भिंग लावून भिंतीवर पांढरा कागद डकवून सिनेमा करण्याची हौस होती. सोरटमधून सिनेमा रिळांचे कापलेले तुकडे मिळवून आरशाच्या प्रकाशात त्यावेळी पिक्चरचा फिल आणला जात होता. जवळच्याच एका मित्राकडे चोरबाजारातून आणलेलं रिळ प्रोजेक्टर होतं.

- Advertisement -

त्यानं ते चोरबाजारातून आणल्याचं सांगितल्यावर चोरबाजार म्हणजे कुठलंतरी खतरनाक ठिकाण वाटायचं. त्याला फिल्मी रिळं लावून जोरानं फिरवायचं तर एक्शन रिप्लेसारखा सिन समोरच्या पडद्यावर पडत होता. ‘आप आये बहार आयी’तला राजेंद्रकुमार चालत चालत वळतो. एवढाच तो सीन त्यासाठी हातभर रिळ तीन सेकंदात संपून जायचं. ‘शान’ आणि ‘शोले’च्या कथाप्रसंगाची पेन्सिल गिरमिटमध्ये कातरताना एकएक सिन कापला जाताना वाईट वाटायचं. ३० वर्षांपूर्वी सिनेमा घर, शाळा, कपाटं व्यापून होता. वांद्य्राच्या ड्राईव्ह इन (ओपन) थिएटरचं पोस्टर दर शुक्रवारी बदलंत होतं. गांधीनगरची म्युनिसिपालटीची शाळा सुटल्यावर हे पोस्टर पहायला टोळक्यानं जात असू. आता जिथं वांद्रा इस्टातलं सिनेमॅक्स आहे तिथं पिक्चरची टाकी म्हणजेच कलामंदिर होतं. अमिताभच्या ‘अंधा कानून’चं पोस्टर तिथून विकत आणलं होतं. तर चार आण्याच्या सुपर स्टार चॉकलेटातून मिळालेल्या पोस्टरचे तुकडे नंबरनुसार जोडून चित्र पूर्ण करण्याचं एक छोट्या पुस्तकासारखा फॉर्म भरण्याचं वेड त्याकाळी होतं.

अ‍ॅडना नावाच्या चॉकलेटातून ब्रूस ली साकारला जायचा, तर सिल्वेस्टर स्टॅलनचं पोस्टर पूर्ण व्हायला खूप वेळ लागायचा. हातात भली मोठी गन घेतलेला आणि कपाळाला काळा फडका बांधलेला पीळदार रॅम्बो मारामारीत अमिताभचाही बाप वाटायचा. यातला लकी नंबर कधीच चॉकलेटमध्ये लागत नसे. त्यामुळे पोस्टरही पूर्ण होत नसे.
त्यामुळे पोस्टर्स पूर्ण करणारा एक नंबर जोडण्यात वर्षही निघून जाई. क्रिकेट पोस्टर्सच्या नावानंही हे चॉकलेट मिळत होतं. आता इंटरनेट, युट्युबच्या युगात आता पिक्चरचा खेळ संपूनही तीन दशकं उलटली आहेत पण मनाच्या भिंतीवर डकवलेली ही पोस्टर्स आहे तशीच आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -