घरफिचर्सएक हजारों में मेरी ‘आतू’ है!

एक हजारों में मेरी ‘आतू’ है!

Subscribe

साधारण आठ वर्षांची असताना माझी व आतूची भेट झाली. आता ती माझी नणंद आहे. पण, लोकांना आम्ही दोघी सख्ख्या बहिणी वाटतो. आईनं जन्म दिला पण, माझे आयुष्य तिनं घडविलं.

साधारण आठ वर्षांची असताना माझी व आतूची भेट गोरेगाव येथे झाली. आतू म्हटलं म्हणजे ती माझ्यापेक्षा वयानं खूप काही मोठी नाही. तिचं नाव सुलोचना. मी पहिल्यांदा भेटले त्यावेळी मी माझ्या लांबच्या बहिणीसोबत त्यांचे नातेवाईक म्हणजेच आतुच्या माहेरी आले होते. तिथे काही क्षुल्लक कारणानं आमच्यात भांडणं चालली होती. त्यामुळे आतुला काय वाटलं काय माहीत& तिने मला माझ्यासोबत माझ्या घरी कल्याणला येतेस का विचारलं. मी देखील एका क्षणाचा विचार न करता तिच्याबरोबर कल्याणला जायला तयार झाली. त्यावेळी माझ्याकडे एक्स्ट्रा कपडेदेखील नव्हते. मात्र आतुनं मला अजिबात परक्यासारखी वागणूक दिली नाही. तिने मला नवीन कपडे, रिबिन घेतल्या. काही दिवसांनी मला शाळेतही घातलं. शाळेत प्रवेश घेतला. वयानं मोठी असल्यामुळे मी अभ्यास व्यवस्थित करीत होते.

ती माझा अभ्यास घ्यायची. त्यामुळे शाळेतही शिक्षकांकडून माझ्याबाबतीत अजिबात तक्रारी नसायच्या. दुसर्‍या इयत्तेत गेल्यावर शिक्षकांनी मला सगळं येतंय म्हणून दुसरी व तिसरीची परीक्षा एकत्र द्यायला सांगितली. मग सकाळी दुसरी इयत्तेच्या वर्गात बसायचं आणि दुपारी तिसर्‍या इयत्तेच्या वर्गात. त्यामुळे आतु माझा दुसरी व तिसरी इयत्तेचा अभ्यास घ्यायची. माझ्याबरोबर तिचीदेखील तारेवरची कसरत चालू होती आणि मी दोन्ही परीक्षा पास झाले व चौथी इयत्तेत गेले. मी आतूकडे राहायला आले तेव्हा आई माझी विचारपूस करत होती. पण, जेव्हा आई आतूच्या घरी मला न्यायला आली, तेव्हा मी तिच्यासोबत घरी जायला थेट नकार दिला. इतक्या दिवसात आतूचा मला लळा लागला होता. तरीदेखील आई मला घरी घेऊन जाण्यासाठी सारखी प्रयत्न करीत होती. मात्र मी काही गेले नाही. त्यावेळी आतू सांगायची की तुला आईकडे जायचे असेल तर जा.. पण, तुझे शिक्षण अर्धवट राहील. कुणास ठाऊक मला आईकडे जावंसं वाटलं नाही.

- Advertisement -

आतूनं माझंं शिक्षण पूर्ण करून मगच घरी पाठवायचे असा ठाम निर्धार केला होता. पण, नशिबाची साथ मिळाली पाहिजे ना. आईनं घरी परत येण्याचा माझ्यामागे तगादा लावला होता. त्यामुळे आई आणि आतूमध्ये त्यावरून वाद व्हायचे. मी नववी इयत्तेत असताना मला लग्नाच्या मागण्या येत होत्या. मला काय करावं ते सुचत नव्हतं. त्यात आतूचं म्हणणं होतं की तुझं शिक्षण होत नाही तोपर्यंत तुला लग्न करायला देणार नाही. त्यात आई सारखी लग्नासाठी मागे लागली होती. मग, शेवटी मी लग्नासाठी तयार झाले आणि आतूच्या छोट्या भावाशीच माझं लग्न झालं. आईनं कर्ज काढून माझं लग्न लावून दिलं. त्यावेळी मी सोळा वर्षांची होते. लग्न झाले तेव्हा मी दहावी इयत्तेत होते. वर्षभर शाळेत गेले आणि महत्त्वाचं म्हणजे परिस्थिती नसताना देखील आतूनं मला दहावीपर्यंत शिकवले व चांगले संस्कार दिले.

तिने स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले. आता माझे वय ५२ आहे. आताही ती मला सर्व गोष्टीत सहकार्य करते. माझ्या अडचणीत खंबीरपणे पाठीशी उभी राहते. तिला चार मुलं आहेत. तीदेखील तिच्यासारखीच प्रेमळ आहेत. ते मला ताई म्हणतात. कुठल्याही प्रसंगी माझ्यासाठी ते धावून येतात. खरं तर आमच्या दोघींचं नातं काय हे आम्हालाही माहीत नव्हतं. पण, मी तिला आतू म्हणायला लागले आणि तिच्या आजूबाजूची लोकदेखील तिला आतूच म्हणू लागले. माझ्या लग्नानंतरही माझी परिस्थिती बेताची होती आणि तिची परिस्थितीही तशीच होती. तरीदेखील मला मदत लागली तर ती कोणत्याही गोष्टींचा विचार न करता मदत करायला धावून येते. आतू माझी नणंद आहे. पण, आम्हा दोघींना पाहून लोकांना आम्ही दोघी सख्ख्या बहिणी वाटतो. आईनं जन्म दिला पण, माझे आयुष्य तिनं घडविलं. त्यासाठी मी तिचे कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत. त्यामुळे मी आयुष्यभर तिची तिचीऋणी राहीन.


-लता साळवी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -