Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

Related Story

- Advertisement -

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण कार्यातील थोर समाजसुधारक, ब्राह्मधर्म प्रचारक, संशोधक व लेखक. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटक राज्यातील जमखंडी या संस्थानच्या गावी खानदानी मराठा कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजीबाबा व आईचे नाव यमुनाबाई. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह आत्याची मुलगी रुक्मिणी हिच्याशी झाला. घराण्याची पूर्वापार श्रीमंती गेल्यामुळे वडील रामजीबाबा हे संस्थानामध्ये काही काळ शिक्षकाची व कारकुनी स्वरूपाची नोकरी करीत होते. ते पंढरपूरचे वारकरी होते. आई सात्त्विक वृत्तीची होती व घरातील वातावरण जातीभेदाला थारा न देणारे होते.

जमखंडी येथील इंग्रजी शाळेतून १८९१ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. शिंदे यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एलएल.बी. परीक्षेकरीता मुंबईला गेले. तेथे ते प्रार्थना समाजात दाखल झाले. महर्षी शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते सुधारक होते. त्यांनी स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्त्वांसाठी माणसातला माणूस जागा केला. मानवाने मानवावर समभावाने प्रेम करावे तसा आचार सर्वत्र घडावा म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ते कर्मयोगी होते.

- Advertisement -

मानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवून मानवी समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न करणार्‍या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरुवातीच्या काळामध्ये केवळ शंभर रुपये मानधनावर प्रार्थना समाजाचे कार्य सुरू केले. भारतीय समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांना आळा बसावा व हिंदू धर्मात सुधारणा घडून यावी या उद्देशाने एकोणिसाव्या शतकात येथील काही समाजसुधारकांनी ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज व आर्य समाज यासारख्या संघटना स्थापन केल्या होत्या.

१८ ऑक्टोबर १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ या संस्थेची स्थापना केली. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली. अस्पृश्य उद्धाराच्या कार्यासाठी महर्षी शिंदे यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी डिस्प्रेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची मुंबईत स्थापना केली. अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणींचे निवारण करणे, अस्पृश्यांना खर्‍या धर्माची शिकवण देणे आणि त्यांचे शीलसंवर्धन घडून आणणे, इत्यादी या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे होती. या संस्थेच्या माध्यमातून महर्षी शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांमध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू करणे, त्यांच्यासाठी वसतिगृहे उघडणे, शिवणकामाचे वर्ग चालवणे, प्रबोधनपर व्याख्याने कीर्तने आयोजित करणे, आजारी असणार्‍या लोकांची सेवा करणे, इत्यादी गोष्टींचा समावेश या संस्थेच्या कार्यामध्ये होता. अशा या थोर समाजसेवकाचे २ जानेवारी १९४४ रोजी निधन झाले.

- Advertisement -