रामायणच्या निमित्ताने उलगडली आठवणींची शिदोरी

१९८० च्या दशकातील अजरामर रामायण मालिका शनिवार (दि.२८) पासून सुरु होत आहे. ही गोष्ट माहित झाल्यानंतर घरोघरी रामायण मालिकेदरम्यानच्या आठवणींची चर्चा सुरु झाली. घरात बसून-बसून काय करायचे असाही प्रश्न अनेकांसमोर आहे. त्यात रामायण मालिकेदरम्यानच्या आठवणी लिहा आणि आम्हाला पाठवा असे आवाहन ‘आपलं महानगर’ने केले. त्यास भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक आठवणी...

Nashik

१९८० च्या दशकातील अजरामर रामायण मालिका शनिवार (दि.२८) पासून सुरु होत आहे. ही गोष्ट जाहीर झाल्यानंतर घरोघरी रामायण मालिकेदरम्यानच्या आठवणींची चर्चा सुरु झाली. घरात बसून-बसून काय करायचे असाही प्रश्न अनेकांसमोर आहे. ही संधी साधत रामायण मालिकेदरम्यानच्या आठवणी लिहा आणि आम्हाला पाठवा असे आवाहन ‘आपलं महानगर’ने केले. त्यास भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक धमाल आठवणी…

रामायणच्या संस्कारात वाढलो :

मी त्यावेळी पाचवी -सहावीला असेल. न विसरता रामायण पाहायचो. आमच्या घरी टीव्ही नव्हता. आम्ही रविवारी रामायणाच्या शीर्षक गीताचा आवाज येताच ज्यांच्याकडे टीव्ही होता, त्या दिशेने पळत सुटायचो. रामायण पाहत असलेल्या स्त्रिया डोळ्याला पदर लावून रडत. ते पाहून आम्ही पण रडायचो. आज कळत आहे. रामायण ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट टीव्हीवर बघायला मजा येत. रामायणच्या संस्कारात आम्ही मोठे झालो. आज पुन्हा लक्ष्मणरेषा मारण्याची वेळ आली आहे. जो ही रेषा ओलांडेल त्याला करोनारुपी राक्षस उचलून नेईल.
-निलेश दुसे

आपुलकी अन् माणुसकीचे दर्शन व्हायचे :

जुने नाशिक भागातील बुधवार पेठत केवळ तीनच ठिकाणी टीव्ही होता. माडी बाई, सुराडे आणि लोणारी यांच्याकडे रविवारी रामायण पाहायला एकच गर्दी होत असे. आहे त्या जागी निमूटपणे बसून मालिका बघीतली जायची. त्यावेळी आपुलकी व माणुसकी प्रकर्षाने दिसायची. अहंकार नव्हता. आम्ही आजोळी जालना जिल्ह्यात जायचो तेथेही अशीच गर्दी व्हायची. सकाळी 10 वाजता सगळीचकडे शुकशुकाट असायचा. त्यानंतर रजनी, नुक्कड या मालिका असायच्या. त्यादेखील कमालीच्या गाजल्या होत्या. बुनियाद बघायला बुधवारी आम्ही सुराडेंकडे जायचो.
– अ‍ॅड. राजेंद्र हिंगमीरे

पाहुण्यांसमोरच घरात घडले ‘रामायण’:

दूरदर्शनवर रामायण ही मालिका ज्या कालावधीत सुरु होती त्याच काळात माझी ताई ज्योती हिचं लग्न करायचं ठरवलं. नेमके रविवारीच तिला बघायला पाहुणे यायचे. मी लहान होते. धाकटा भाऊ ५-६वर्षाचा असेल. तो खूपच खोडकर होता. शेजारच्या काकूंच्या घरीच फक्त टीव्ही होता. मात्र भाऊ खूप त्रास देतो म्हणून आम्हाला त्या येऊ देत नसत. फक्त आई, आजी आणि दोघी बहिणींनाच येऊ देत. अशातच ज्योतीताईला एक नगरचे स्थळ आले. फोन नसल्यामुळे ते कधी येणार माहित नव्हते. त्यामुळे सकाळी १० वाजेच्या सुमारास आई आणि बहिण रामायण बघायला काकूंकडे गेले. नेमके त्याच वेळी मुलाची आई आणि त्यांचे भाऊ, वहिनी असे तिघे व एक लहान मुलगा ताईला बघायला आले. घरात फक्त आम्ही बच्चेकंपनी होतो. आम्ही त्यांना ओळखलेच नाही. त्यांनी घरी आल्यावर आई,दादा कुठे गेले असे विचारले. मी उत्तर दिले ज्योतीताईला बघायला पाहुणे आले होते. नगरचे लग्न ठरले. साखरपुडा झाला आहे. कालच तिची सासू वारली. आई, दादा त्यांना आताच फोन आला आणि ते म्हातारीला (सासूच्या) वाटे लावायला गेले. पाहुणे एकदम शॉक झाले. त्यांना वाटले हे लोक रामायण बघायला गेले असतील. पण माझी कहाणी ऐकून त्यांची बोलतीच बंद झाली. रामायण संपले. आईबहीण घरी आल्या. त्यांना मी सांगितले की हे पाहुण्यांना तुम्ही नगरला गेले सांगितले तरी ते इथेच बसले. त्यानंतर त्यांना जे कारण सांगितले तेही आईला सांगून दिले. त्यानंतर आईने मला पाहुण्यांसमोरच धो- धो धुतले.
– संगीता कुलकर्णी

मालिका बघायच्या बदल्यात टीव्हीवाल्याची कामं करायचो-
आम्ही स्लम भागात रहायला होतो. आमच्याकडे टीव्हि नव्हता. त्या वेळेत ‘विक्रम- वेताळ’ ही सिरिअल जोरात होती. सकाळी रामायण आणि संध्याकाळी विक्रम वेताळ तसेच शनिवार पिक्चर हे सर्व कार्यक्रम बघायचे असतील तर टीव्ही मालकाच्या घरी पाणी वाहून आणायची अटच असायची आणि आम्ही ती मान्यही करायचो. उरले सुरले काही घरकाम असेल ते मालिका संपल्यावर करायचो. अतिशय दिवस होते ते. त्यामुळे आता कटू आठवणी असलेली सिरीअल पाहणारच नाही. नाहीतर दररोज ते सगळे वाईट दिवस आठवतील आणि ते आठवून आताचे दिवस खराब होतील.
– सतीश रुपवते

ज्याचा बाण हरेल तो रावण..

आम्ही असू तेव्हा सात आठ वर्षांचे.. रामायण मधले युद्ध आम्हाला खूप भारी वाटायचं.. म्हणजे इकडून राम एक बाण मारणार.. मग तिकडून रावण एक बाण मारणार.. मग दोन्ही बाण सुसाट येत एकमेकांसमोर येऊन थांबणार .. मग अतिशय समजूतदार पणे ’कोणता बाण भारी’ हे आपआपसात ठरवून एक बाण मध्येच गायब होऊन जानार.. हे सारं बघून प्रचंड उत्सुकता वाटायची.. असच एकदा एपिसोड संपल्यावर बांबूच्या कामटी वाकऊन त्याला सुतळी बांधून आम्हीही धनुष्य बनवले. घोळाच्या काडीच्या टोकाला रस्त्यावरचं वितळलेल डांबर काढून त्याची छोटी गोळी लावली आणि ठरलं… ज्याचा बाण हरेल तो रावण व ज्याचा जिंकला तो प्रभू श्रीराम…समोरासमोर उभे ठाकलो … एकमेकांच्या दिशेने बाण ताणले.. आणि दिले सोडून… पुढे सांगावं काय… राम – रावण नाही पण रामानंद सागर मात्र जागेवर आठवले…आणि आम्ही दोघेही बोबट्या ठोकत “आई मला याने मारले” म्हणत पळत सुटलो…
– अमोल जगताप

टीव्हीवरच राम-सितेच्या पाया पडायचो :

रविवारी सकाळी १० वाजता रामायण सुरु व्हायचे तेव्हा रस्ते सामसुम व्हायचे. आता करोनाच्या भीतीने होतात तसेच. टीव्हीतील राम आणि सीतेला आम्ही नमस्कार करत. कधी-कधी परीक्षेत पास कर, शिक्षकांकडून शिक्षा मिळू देऊ नको असे नवसही करुन टाकत.
– प्रणव सोनार

पाहुण्यांचाच टायमिंग चुकला:

आम्ही ज्या वाड्यात रहायचो त्यात टीव्ही आमच्याच घरी होता. त्यामुळे रामायण बघण्यासाठी आमचे घर फुल्ल असायचे. दारं, खिडक्या लावत अंधार करुन मालिका बघीतली जायची. एकेदिवशी रामायण सुरु असतानाच मला बघण्यासाठी पाहुणे आलेत. मात्र अंधारामुळे घरात कोण आले आहे हे समजलेच नाही. मालिका संपताच त्यावर आमच्या घरातच ‘चर्चासत्र’ रंगले. त्यामुळे पाहुण्यांना तितकावेळ तिष्ठत बसावे लागले. जेव्हा लक्षात आले की गर्दीत पाहुणेही आहेत. त्याचक्षणी आम्ही त्यांची माफी मागितली. पण त्यांनीच कबूल केले की आम्हीच चुकीच्या वेळी आलो आहोत.
– नूतन मिस्त्री

…अन् झाली राम- भरत भेट !

उन्हाळ्यात सुट्टीत मी माझ्या गावी वावीला गेलो होतो. तिथे टीव्ही नसल्याने रामायण बघायला मिळत नव्हते. काही दिवसानंतर माझा मोठा भाऊ महेश नाशिक वरून गावी आला. मी अंगणातून त्याला येताना बघीतले आणि त्याच्या कडे धावत सुटलो! त्याला भेटून मी पहिला प्रश्न विचारला. “भाऊ, राम आणि भरत भेट झाली का?” तो म्हणाला “पहिले मला तर भेट! ” रामायण मालिकेने एवढे वेड लागले होते की, राम-भरत भेट होऊन गेली म्हंटल्यावर दिवसभर उदास होतो. अशी मालिका परत होणे नाही!
– मंगेश मालपाठक

आधी लग्न मालिकेचं, मग स्वत:चं !

६ डिसेंबर १९८७ चा तो दिवस होता. मी रामायणची मोठी फॅन होती. महत्वाचे म्हणजे तो माझ्या लग्नाचा दिवस होता. मी कमालीची रागावलेली होती. का ते माहित नाही. लग्नच करायचे नव्हते की रामायणच्या वेळेतील मूहूर्त होता म्हणून राग आला हे माहित नाही. पूर्ण मेकअप करुन मी टीव्ही समोर सोफ्यावर बसले. लग्न ज्या हॉटेलमध्ये होते तेथे घरची सगळी मंडळी गेलीत. मी म्हटले सिरियल संपल्यावर येते. आत्तेभावाला माझ्याबरोबर सोडून सगळे निघून गेले. फोनवर फोन सुरु होते. मला मालिका संपूच नये असे वाटत होते. असे वाटत होते की सिरिअल चालूच रहावी आणि लग्नाचा मूहूर्त टळावा. बिचारा आत्तेभाऊ गयावया करत होता. शेवटी सिरिअल संपली आणि मी वास्तवाशी तोंड द्यायला निघाली. सीतेला धरणीमातेच्या कुशित का सामावून जायचे होते हे तेव्हा समजले.
– प्रा. मनीषा भामरे

रडणार्‍या बायकांकडे बघून मुलंही रडायची:

रामायण मालिका चालू होती तेव्हा आम्ही खूपच लहान होतो. फक्त ग्रामपंचायतीत एक टीव्ही होता. बाकी कुठेच नाही.सुरु होण्याआधीच अर्धा तास आम्ही जागा पकडायला जायचो. राम वनवासाला निघाले तेव्हाचा क्षण खूप भावुक होता… सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी असायचे बायका तर फुदुफुदू रडायच्या. त्यांच्याकडे बघून लहान मुलं पण रडायचे. मग त्यांची समजूत काढताना नाकेनऊ यायचे. मालिका बघून झाल्यावर आठवडाभर तिच्यावर चर्चा सुरु असायची. रावणाच्या नावाने बोटं मोडत आठवडा संपायचा.
– रेखा पाचोरकर

घड्याळ अन् चप्पलचोर सापडला पण…

सटाण्यात बोटावर मोजण्याइतक्या घरात रंगीत टीव्ही होते. त्यात आमच्याही घराचा नंबर लागायचा. मिराट्रॉन कंपनीचा टीव्ही आमच्याकडे होता. रामायण लागल्यावर गावातील हौसे, नवसे आणि गवसे जमा व्हायचे. घरात आम्हाला बसायलाही जागा नसायची. त्यात जे गवसे वृत्तीचे लोक होते ते जाता-जाता घरातील वस्तूंवर हात मारायचे. त्यात वडलांचे हाताचे घड्याळ, पेन, कात्री या वस्तू चोरीला गेल्या होत्या. म्हणून आम्ही रामायणच्या आधी सगळ्याच वस्तू आतल्या खोलीत न्यायचो. पण घरात काही मिळाले नाही म्हणून घराबाहेर ठेवलेल्या चपला एकेदिवशी चोरीला गेल्या. एकेदिवशी एकाच्या हातात तेच घड्याळ, खिशाला तोच पेन आणि पायात त्याच चपला दिसल्या. पण ती व्यक्ती वयाने इतकी मोठी होती की या वस्तू कोठून आणल्या हे विचारण्याची आमची हिंमतच झाली नाही.
– ज्योती लांडगे

रामायणमुळे घरी टीव्ही आला

रामायण सुरू होते त्यावेळी आमची घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती …आम्ही दुसर्‍यांच्या घरी जाऊन रामायण पाहायचो. एकदा माझे वडील अचानक घरी आले आणि आमच्या आईला विचारले की पोरं कुठं गेले? (मी आणि माझा मोठा भाऊ) आम्ही शेजारी गेलो असल्याचे आईने सांगितले. रामायण पाहायला दुसर्‍यांच्या घरी आम्ही गेलो हे ऐकून वडिलांना वाईट वाटले. त्यांनी दोन दिवसात इकडून तिकडून पैसे जमवले आणि ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घेऊन आले. त्यामुळे रामायण आठवलं की आम्हाला आमच्या पहिल्या वहिल्या ब्लॅक अँड वाईट टीव्ही ची आठवण येते. तेव्हाचे लाकडी दार बंद होणारा क्राऊनचा टीव्हीही भारीच होता.
उमेश अवनकर

अ‍ॅण्टीना सेट करणे म्हणजे दिव्यच:

रामायण सुरु होण्याचा काळ आणि शासनाने ग्रामपंचायतींना कलर टीव्हीचे वाटप करण्याचा काळ एकच होता. आनंदवलीत ग्रामपंचायतीचे कार्यालय हे आमच्या घरात होते. तेव्हा गावातील 25-40 लोक रामायण व महाभारत बघायला येत होते. मी नुकताच त्यावेळेस टीव्ही रिपेअरिगचा कोर्स मुंबई येथून करून आलो होतो. त्यावेळी फक्त दूरदर्शन होते व त्यासाठी बघण्यासाठी मोठी अँन्टेना लागत असे. तो अ‍ॅण्टीना सेट करणे म्हणजे मोठेच दिव्य होते. नेमके रामायण लागले की, टीव्ही खराब दिसायला लागायचा. मग अ‍ॅण्टीना सेट करण्याचे काम सुरु व्हायचे.
-शरद काशिनाथ मंडलिक

इतिहासाची पुरावृत्ती म्हणतात ती हीच:

रामायण मालिका लागायची तेव्हा रस्त्यावर कर्फ्युसारखं वातावरण असायचं. आज कर्फ्युसारखं वातावरण असताना पुन्हा रामायण लागणार आहे. ही मालिका लागायची तेव्हा मी जितक्या वर्षांचा होतो तितकाच आज माझा मुलगा पण आहे त्यामुळे त्याला आवर्जुन ही मालिका दाखवणार आहे. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात ती हीच !
– सौरभ रत्नपारखी

अगरबत्ती, फुलं घेऊनच मंडळी यायची 

काय तो रविवार. .रामायणाची वेळ झाली की माझे आजोबा तयार असायचे..पूर्ण रामायण मालिका संपेपर्यंत सर्वत्र शांतता.. परिसरातील सगळीच मंडळी दूरदर्शन बघायला आमच्याकडे येत. बायबापडे अगरबत्ती, फुलं घेऊनच येत. अनेक जण ही फुलं टिव्ही समोर वाहून असनावर बसायची. तन्मयेतेने, समरसतेने मालिका बघायची, ऐकायची ..श्रीराम वनवसाला निघाले तेव्हा कोठावदे परिवार व कळवणकर मंडळी रडताना बघीतली. ही गोष्ट आजही मनाच्या काळजात कोरलेली आहे. कधीही न विसरता येणारी ही आठवण !
-दत्तात्रय कोठावदे

चोरांसाठी सुमुहूर्त ठरायचा

रामायण सुरू झाले की आधी बाहेर असलेले भांडे, वाळत असलेले कपडे, बूट, चप्पल त्या बरोबर बाहेर काही असेल तर आधी घरात घ्यावे लागायचे. इकडे लोक रामायण बघण्यात लोक व्यस्त असायचे तिकडे भुरटे चोर डल्ला मारायचे.
नवीन नाशिकच्या गल्ली बोळातून हे चोर जे भेटेल ते चोरायचे. त्यामुळे रामायणची वेळ चोरांसाठी सुमुहूर्त ठरायचा असेच म्हणावे लागेल.
-तुषार गवळी


 

राम आणि सीतेची एंट्री झाली की लोक टीव्हीच्या पाया पडायचे

मला अजून चांगले आठावतोय २५ जानेवारी १९८७ चा तो दिवस. त्या दिवशी रामानांद सागर यांची “रामायण” ही टीव्ही मालिका दूरदर्शनवर दाखवायला सुरुवात झाली. मालिकेचे एकूण ७८ भाग होते. शेवटच्या भागाचे प्रासारण ३१ जुलै १९८८ ला झाले. रामायण ही दूरदर्शनच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही मालिका आहे. तो जमाना कृष्ण-धवल टीव्हीचा होता.रंगीत टीव्ही बाजारात आलेले नव्हते.त्यावेळी फक्त दूरदर्शन होते व त्यासाठी बघण्यासाठी मोठी अँन्टेना लागत असे. तो अॅूण्टीना सेट करणे म्हणजे मोठेच दिव्य होते. नेमके रामायण लागले की, टीव्ही खराब दिसायला लागायचा. मग अॅंण्टीना सेट करण्याचे काम सुरु व्हायचे. त्या काळी घरोघरी टीव्ही आलेले नव्हते.आम्ही ज्या सोसायटीत रहायचो त्यात टीव्ही फक्त आमच्याच घरी होता. त्यामुळे रामायण बघण्यासाठी आमचे घर फुल्ल असायचे. दारं, खिडक्या लावून घेऊन अंधार करुन मालिका बघीतली जायची. रविवारी सकाळी १० वाजता रामायण सुरु व्हायचे तेव्हा पुण्यातील सगळे हमरस्ते (अगदी लक्ष्मी रोड सुद्धा ) सामसुम व्हायचे.रस्त्यावर चिटपाखरूही नसे. सध्याच्या कोरोनात सरकारने जशी संचारबंदी केली आहे,तशी अघोषित संचारबंदीच असायची.घरोघरी टीव्ही ला हार घातले जायचे. राम आणि सीतेची एंट्री झाली की लोक टीव्ही च्या पाया पडायचे. अगदी लहान मुलांपासून ते ९० च्या वर वय असलेली म्हातारी माणसेही टीव्ही समोरून हलायची नाहीत.

-प्रमोद तांबे, पुणे


त्या बायकांचे शुर्पनखेसारखे नाका कापावेसे वाटत :

दर रविवारी सकाळी लवकर आटोपून मोठ्या उत्सुकतेने आम्ही रामायण मालिका बघण्यात तल्लीन होऊन जायचो. त्यात शूर्पनखेचे नाक आणि कान रामाच्या सांगण्यावरून लक्ष्मणाने कापलेले बघून मलाही पाण्याच्या नळावर माझी अर्धी भरलेली बादली काढून स्वतःची बादली भरणार्‍या बायकांचेही नाक कान कापून टाकावेसे वाटायचे. एकदा आम्ही परीवारासह नाशिक येथील सोमेश्वर येथे गेलो होतो. तेथे अरुणजी गोवील ( रामाची भूमिका केलेले ) मला दिसले. खूप वर्षांनी पाहिल्यामुळे मला त्यांना बघितल्यासारखे वाटत होते पण नाव लक्षात येत नव्हते. तेवढ्यात एका वृद्ध महिलेने त्यांच्यासमोर जाऊन “जय श्रीराम” म्हणून हात जोडले. त्यांनीही हात जोडून प्रतिसाद दिला. महिलेनेच मला सांगितले की, ते रामायण मालिकेतील श्रीराम आहेत. मला खूपच आनंद झाला मीही त्यांना “जय श्रीराम” म्हणून हात जोडून नमस्कार केला. खर सांगायच तर दीपिका आणि अरुण गोवील यांनाच लोक खरेखुरे राम आणि सीता समजत होते.

– प्रिती पाटील, नाशिक

सर्वच जण रामायण जगायचे

मला नीट आठवत सुद्धा नाही, फार लहान होतो मी. मला आई वडील सांगतात, आम्ही त्या वेळी लाखलगावला रहायचो. गावच्या सरपंचाकडे आणि आमच्या घरी असे दोनच कलर टीव्ही गावात होते. आम्ही ज्या चालीत रहायचो तिथले सर्वजन आमच्या घरी यायचे. सगळे आजी बाबा, लहान मुले, खूप जण. टीव्हीवर राम, सीता, लक्षमण, हनुमान असे कोणी दिसले  की, सगळे आनंदाने टाळी वाजवायचे. आजी बाबा लोक तर घाई घाईने पुढे होऊन टीव्हीच्या पाया पडायचे. जसे काही ते रामायण जगायचे सर्वजन. फार वेगळ्या प्रकारचे दिवस होते. घरात एखादा समारंभ असल्या प्रमाणे रामायण नुसते बघितले नाही तर अनुभवले जायचे आणि या आठवणी घेऊन, त्यावर चर्चा करत पुढील एपिसोड ची अतिशय उत्सुक होऊन वाट पहिली जायची..

– अभिषेक निकम 

जटायूच्या मृत्यूनंतर सगळेच रडले होते :

रामायण मालिका जेव्हा सुरू झाली त्यावेळी मी तिसरी किंवा चौथी मध्ये असेल. त्यावेळी खूप कमी लोकांकडे टीव्ही असायचे. रविवारी सकाळी सार्वजनिक नळ असायचा तिथून घरातले पाणी भरून घेणे नंतर लवकर अंघोळ करून ज्याच्या कडे टीव्ही आहे त्यांच्या कडे टीव्ही बघण्यासाठी जायचे ठरलेले असायचे. त्यावेळी ज्यांच्याकडे टीव्ही त्यांचा रुबाब मोठा असायचा रामायण सुरू झाले की सगळे एकत्र बसून मालिका बघायचो. माझ्या आठवणीतील क्षण म्हणजे जेव्हा रावण सीतेला अपहरण करून घेऊन जाणार असा क्षण आला आणि जटायू आणि रावणाचे भयंकर युद्ध होते . त्यात जटायू मरण पावतो त्यावेळी जेवढे हा भाग बघत होते. ते सर्व रडायला लागले आणि तो भाग संपल्यावर सर्वांनी आपल्या घराच्या बाहेर चिमणी, कावळा जे काही पक्षी दिसायचे त्यांना धान्य किंवा पाणी ठेवायचे. म्हणजे या मालिकेतून प्राणी पक्षी आणि मनुष्य हे सर्व जीव आहे आणि प्रत्येकाने देवाला आपल्या परीने मदत केली आहे अशी भावना निर्माण केली. ही मालिका बघत असताना ज्यांच्या घरात बघत आहोत त्यांच्या सकट सर्वच खूप आपुलकीने एकत्र येवुन ही मालिका बघत. त्यात कुठे ही अहंकार किंवा छोटे मोठे ही भावना नव्हती. तसे आजच्या काळात ही भावना जाणवत नाहीं.

-श्याम जाधव

अरुण गोविल, दीपिकाच्या कॅलेंडरची पूजा करायचो

रामायणावर प्रभावित होऊन आम्ही मुंबईतून एक कॅलेंडर आणले होते. त्यावर अरुण गोविल आणि दीपिका शहा राम- सीतेच्या रुपात होते. आम्ही त्यांचीच पूजा करायचो. सिरीयल बघायला लागल्यापासून मी हनुमान भक्त झालो हे विशेष. जय बजरंग!
– सुधाकर झाडे

चक्क टीव्हीलाच हार घालायचे :

रामायण लागले की आमच्या घरी खूप गर्दी जमायची. येणारी वयस्क मंडळी चक्क फुल हार घेऊन यायचे. टीव्हीला हार घालायचे, तसेच लहान मुले सिरियल संपली का रामायण खेळायचे कोणी राम, लक्ष्मण बनायचे आणि बाण बनवून लढाई करायचे…. तशा खूप आठवणी आहेत रामायणातील ती सगळी पात्र खरी वाटायची.

-अनिता थोरात- महाले

मग सुरु व्हायचं शाळेत रामायण:

रविवारी ही मालिका लागायची… सुट्टी असल्याने आम्ही ह्या मालिकेसाठी लवकर उठून बसत… त्यावेळी मला रामाने सोडलेला बाण आणि त्या पासून मेलेल दैत्य हे बघायला खूप आवडायचं.. आणि दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर पूर्ण रामायण मग वर्गात व्हायचं.. मित्रांसोबत भारी वाटायचं…!

-मयुर गांगुर्डे

एक प्रतिक्रिया

  1. आठवणींची शिदोरी – रामायण मालिकेदरम्यानच्या आठवणी
    मला अजून चांगले आठावतोय २५ जानेवारी १९८७ चा तो दिवस. त्या दिवशी रामानांद सागर यांची “रामायण” ही टीव्ही मालिका दूरदर्शनवर दाखवायला सुरुवात झाली. मालिकेचे एकूण ७८ भाग होते. शेवटच्या भागाचे प्रासारण ३१ जुलै १९८८ ला झाले. रामायण ही दूरदर्शनच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही मालिका आहे.
    तो जमाना कृष्ण-धवल टीव्हीचा होता.रंगीत टीव्ही बाजारात आलेले नव्हते.त्यावेळी फक्त दूरदर्शन होते व त्यासाठी बघण्यासाठी मोठी अँन्टेना लागत असे. तो अॅूण्टीना सेट करणे म्हणजे मोठेच दिव्य होते. नेमके रामायण लागले की, टीव्ही खराब दिसायला लागायचा. मग अॅंण्टीना सेट करण्याचे काम सुरु व्हायचे.
    त्या काळी घरोघरी टीव्ही आलेले नव्हते.आम्ही ज्या सोसायटीत रहायचो त्यात टीव्ही फक्त आमच्याच घरी होता. त्यामुळे रामायण बघण्यासाठी आमचे घर फुल्ल असायचे. दारं, खिडक्या लावून घेऊन अंधार करुन मालिका बघीतली जायची. रविवारी सकाळी १० वाजता रामायण सुरु व्हायचे तेव्हा पुण्यातील सगळे हमरस्ते (अगदी लक्ष्मी रोड सुद्धा ) सामसुम व्हायचे.रस्त्यावर चिटपाखरूही नसे. सध्याच्या कोरोनात सरकारने जशी संचारबंदी केली आहे,तशी अघोषित संचारबंदीच असायची.घरोघरी टीव्ही ला हार घातले जायचे. राम आणि सीतेची एंट्री झाली की लोक टीव्ही च्या पाया पडायचे. अगदी लहान मुलांपासून ते १ ९० च्या वर वय असलेली म्हातारी माणसेही टीव्ही समोरून हलायची नाहीत.

Comments are closed.